प्रियकराचा नवरा होताना ...

मानवी स्त्री-पुरुष नाते संबंधांत आई - मुलगा, मुलगी - वडील, आजी - नातू, आजोबा - नात अशा प्रेमाच्या विविध ‘जातकुळी’ असतात. मात्र या रक्ताच्या नात्यापलीकडलं स्त्री-पुरुषांमधलं प्रेम हा अनंत काळापासून माणसाच्या जीवाभावाचा विषय राहिला आहे. प्रेम ही एक वाहती भावना आहे. संस्कार, नैतिकता, लग्न व्यवस्था इत्यादी जंजाळाला ओलांडून जाण्याचं सामर्थ्य या भावनेत आहे. प्रेमात दुसर्‍याचं होऊन जाणं असतं त्यामुळे ‘स्व’ व्यापक होण्याच्या मन:स्थितीला एक वेगळं अवकाश मिळतं. खरं प्रेम माणसाला मुक्त करतं. प्रेमाच्या असोशीतून माणसाला प्रेमाचा शोध अटळ, अगम्य पण निकडीचा वाटतो.

प्रेमाच्या असोशीतून प्रियकर प्रेयसीचं उत्कट, उत्फुल्ल असं भावगर्भ नातं निर्माण होतं. प्रियकर/प्रेयसीच्या रूपात एक नवं माणूस आयुष्यात येतं. त्या व्यक्तीविषयी आकर्षण, कुतहल, जिज्ञासा, प्रेमाची ओढ यातून आनंद निर्माण होतो. आयुष्य घडण्याची एक नवी वाट उलगडत जाते. या वाटेवर दोघांनाही स्वातंत्र्य असलं तर ते प्रियकर-प्रेयसीच राहतात. मात्र लग्न केल्यानंतर त्यांचं नवरा-बायकोत रूपांतर होतं. कारण लग्न ही एक स्त्री-पुरुषांना लैंगिक संबंधांसहित सहजीवनाचा परवाना देणारी संस्था आहे. संस्था म्हटलं की, यम-नियम, सत्ता, संघर्ष अटळ असतात. प्रसन्न, समाधानी, संवेदनशील माणूसपण ही निरामय सहजीवनासाठी लागणारी आवश्यक शिदोरी आहे. प्रत्येक व्यक्ती बदलत असते. बदल चांगला की वाईट हे सापेक्ष असतं. जोडीदाराच्या त्या त्या वेळच्या परिस्थिती - मन:स्थितीनुसार तो बदल स्वीकारला अथवा नाकारला जातो. माणसाचे मनोव्यापार इतके गहन आणि गुंतागुंतीचे असतात, की कधी कधी जोडीदाराच्या प्रतिक्रिया अनाकलनीय व खूपच अनपेक्षित असू शकतात. अशा वेळी साथीदार किती समजुतीनं वागतो, भावनांचा, वेळप्रसंगी होणार्‍या उद्रेकांचा कसा निचरा होऊ देतो, यावर सहजीवनाचं यशापयश अवलंबून असतं. साद-प्रतिसाद हा नात्याचा गाभा असतो, नात्याच्या भवितव्याची काळजी घेत त्यासाठी मनापासून प्रयत्न करणं दुतर्फा आवश्यक असतं. एकच व्यक्ती चांगली, समंजस, गुणी, संवेदनशील असणं नात्याच्या वाढ-विकासासाठी अजिबात पुरेसं नसतं. सहिष्णुता, सहनशील, सामंजस्य दोन्ही बाजूंनी हवं. जगण्यातली व्यामिश्रता लक्षात घेऊन माणसांनी माणसांशी वागताना लवचिकता ठेवणं गरजेचं असतं. माणसाला अज्ञाताची भीती असते, भविष्याची चिंता असते. खरं तर अनाकलनीय, गूढ भविष्यामुळे तर जगण्याची लज्जत वाढत असते. मनामनाचं नातं कुठल्या एका क्षणी जुळून कायमस्वरूपी ते तस्संच राहत नाही, हे लक्षात घेतलं की सहजीवन हा अखंड वाहणारा चिरंतनाचा एकमेकांच्या मनाच्या शोधाचा प्रवास आहे, असं मानलं की जीवनात आनंदयात्री होणं फार अवघड नाही. पण... हा पण जिथे तिथे कडमडतोच! दोन व्यक्तींच्या सहजीवनाच्या प्रवासात समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव, गृहीत आहे, पण प्रत्यक्षात हे गृहितकच चुकीचं आहे, कसं ते समजून घेऊ या.

प्रेमविवाहात प्रियकराचं रूपांतर नवर्‍यात होतं, 

तेव्हा प्रेमातली तरलता, निरागसता जाऊन 

तिथं अनेकदा काटेरी निवडुंग उगवलेले दिसतात. 

प्रेमामधली ही दुटप्पी नीती पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेमधल्या ‘बाईपणा’ आणि ‘पुरुषपणा’च्या साचेबद्ध प्रतिमांमधून जन्माला येते. लैंगिकसंबंधांसहित स्त्री-पुरुष सहजीवनासाठी विवाहसंस्थेची एकाधिकारशाही असल्याचंच आजचं वास्तव आहे. लिव्ह-इन-रिलेशनसारखे प्रयोग थोड्या प्रमाणात का होईना त्याला छेद देताना दिसतात. प्रेमविवाहात प्रियकराचं रूपांतर नवर्‍यात होतं, तेव्हा प्रेमातली तरलता, निरागसता जाऊन तिथं अनेकदा काटेरी निवडुंग उगवलेले दिसतात. प्रियकर-प्रेयसी या गुलमोहरी नात्यातून जेव्हा समाजमान्य विवाह व्यवस्थेकडे हे युगुल सरकतं तेव्हा परस्परांच्या उणिवा, सर्जकता, अहंगंड, स्वभावसाम्य नि विसंगती यांची टोकदार जाणीव होते. प्रियकर म्हणून आवडलेला पुरुष हा नवरा म्हणून विजोड वाटतो नि तरीही तो स्वीकारण्याला पर्याय नसतो. अशा वेळी लग्न म्हणजे जन्मठेप वाटू शकते. महानगरीय जीवनशैलीत घुसमटणार्‍या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक वेदना... चाळकरी संस्कृतीतला कादंबरी नायक प्रेमविवाहानंतर प्रेयसीच्या सहवासात अधिक न खुलता अंतर्मुख नि अस्वस्थ होत जातो. कौटुंबिक अडचणीतून प्रेम हळूहळू नष्ट होत जातं नि गुण-दोषांचं शीतयुद्ध सुरू होतं. प्रियकराची तरलता पतीच्या कडवटपणात रूपांतरीत होते नि प्रेयसीची ओढ हळूहळू पत्नीच्या संसारगाड्यात लोप पावते. ही प्रीतवंचना दोघांसाठी कधी जीवघेणी ठरते नि प्रियकराचा पती झालेला पुरुष कसा घायाळ होतो, हे ‘पार्टनर’मध्ये वपुंनी चितारलं आहे.
‘स्त्रीगणेशा’ या नीरजा यांच्या काव्यसंग्रहात पती-पत्नी अनुबंधाच्या पैलूचं दर्शन घडवणार्‍या कवितांमध्ये... प्रियकर हा सतत शारीर पातळीवर राहून पतीत्वापर्यंतचा प्रवास करतो हे उलगडून दाखवलं आहे. स्त्रीचं शरीरसुख नि लैंगिक जाणिवांची उत्कटता हे त्याचं भावविश्‍व असूनही प्रेेयसी ते पत्नी या प्रवासात स्त्री या पुरुषाच्या भल्या-बुर्‍या घटनांची वाटेकरी होते. ती अधिक प्रगल्भ व समंजस होत जाते, तर पती विवेकशून्य नि वीर्यनाशाच्या भयानं भांबावलेल्या परिस्थितीचा धनी होतो. या पुरुषात ती स्त्री प्रियकर बघते, पती म्हणून त्याला सर्वस्वी समर्पित होते. त्याचे मन जपते नि त्याची आदिम वासना शमविताना म्हणते :
प्रत्येक संभोगानंतर
हरवलेला असतो पुरुष स्वत:तून
बाई समजून घेते
त्याच्या स्वत्वहीन अस्तित्वाची दुखरी वेदना
आणि वाढत राहते
स्वत: नवनव्या प्रवाहांना सामावून घेत
आपल्या आत...
पौरुषेय अधिसत्ता गाजवणार्‍या व स्त्री देहाला भोग्यवस्तू म्हणून गृहीत धरणार्‍या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तित्वाचे हिंस्त्र व अमानुष पैलू त्यांच्या पत्नी मलिका अमरशेख यांनी धीटपणे पुढं आणले आहेत. समाज रचनेविरुद्ध बंड पुकारणार्‍या कवितेतून शब्दांचे ज्वालामुखी उद्रेकित करणार्‍या नामदेवच्या प्रारंभिक जीवनातील निष्ठा, प्रेम, सलोखा या बाबी कालांतराने दांभिकपणा, हिंस्त्र जाणिवात, व्यसनाधिनतेत व असुरक्षित वेश्यागमनात कशा झाकोळून गेल्या ते मलिकानं लख्ख सूर्यसत्यासारखं सांगितलं आहे. सुरुवातीचा रगेल, बुलंद नि तितकाच तरल शारीरबंध जपणारा प्रियकर नवरा झाल्यावर कालानुरूप खरा कुरूप चेहरा दाखवतो नि आशुतोष हे अपत्य जन्माला घातल्यानंतर पत्नीचे भावनिक व शारीरिक लचके तोडत राहतो व नैतिक अध:पतनाकडे झुकतो... हे सर्व वाचून आपण भयचकित होतो. हे एखादं अपवादात्मक उदाहरण नाही, तर समुपदेशन करणार्‍यांना अशा शेकडो - हजारो नवर्‍यांचे कुरूप चेहरे नित्यनेहमी बघायला मिळतात. 

थोरथोर साहित्यिक, कलाकार अगदी महान पुरुषांच्या पत्नींची आत्मचरित्रं वाचल्यावरही आपण असेच अचंबित होतो. याचा अर्थ ‘नवरा’ हा एक वेगळाच ‘प्राणी’ आहे. (तसाच ‘बायको’ नावाचा पण एक वेगळाच ‘प्राणी’ असतो, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) हा ‘प्राणी’ असा कशामुळे होतो? या प्रश्‍नाचं उत्तर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे हेच अहे. यात अजिबात एकारलेपणा अथवा अतिशयोक्ती नाही. कारण व्यक्तिगत आयुष्यातील माणसाचं भावविश्‍व हे या व्यवस्थेतील सामाजिक मूल्य, रूढी, परंपरा, रीतिरिवाजांचं फळ आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक पायावर उभी असते. या सगळ्यातून संस्कृती प्रतीत होत असते आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. याचाच अर्थ आयुष्याचे हे सर्व महत्त्वाचे घटक एकात्मिक पद्धतीनं एकातएक मिसळलेले आहेत आणि ते सर्व पुरुषप्रधान आहेत. स्त्री चळवळ आग्रहपूर्व ‘जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय’च! ही घोषणा सातत्यानं देत आली आहे. याचा अर्थ नवरा जेव्हा बायकोला मारतो, तेव्हा ती खासगी / व्यक्तिगत गोष्ट नसते, नंतर त्याला सामाजिक - राजकीय परिमाण असतं. हे स्पष्ट करून स्त्री चळवळीनं पीडित स्त्रियांना बोलतं केलं. त्यांच्यामधला न्यूनगंड दूर केला. त्याची दुसरी बाजू म्हणजे नवरा! त्यामुळे अत्याचारी - हिंसाचारी नवर्‍यांना त्यांच्या या कृतीमागे पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेतली मर्दागनीची भ्रष्ट कल्पना कशी जबाबदार आहे, हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनीसुद्धा या व्यवस्थेविरुद्ध लढून स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरायला हवा.

स्त्रीचळवळ असं कधीच सांगत नाही की, सर्व पुरुष वाईट आहेत आणि स्त्रिया चांगल्या आहेत. स्त्री विरुद्ध पुरुष अशी चळवळ नाही, उलट स्त्री आणि पुरुष मिळून पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेला संपवणं गरजेचं आहे. या व्यवस्थेत ‘बाईपणा’ आणि ‘पुरुषपणा’च्या साचेबद्ध प्रतिमांमुळे व्यक्तीला ‘माणूसपणा’पासून लांब नेलं जातं. म्हणूत ती व्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, मैत्रभावाच्या पायावर व्यवस्था उभी राहायला हवी. म्हणजेच आताची विवाहसंस्था मुळापासून बदलायला हवी.
लग्नातीत प्रांजळ, उत्स्फूर्त, नितळ आणि पारदर्शी स्त्री-पुरुष नातेसंबंध (लैंगिकसंबंधांसह अथवा विना) असू शकतात, असं मत स्त्रीवादी बंडखोर लेखिका गौरी देशपांडे आपल्या लेखनातून मांडत आल्या. स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्त्वाच्या ठरीव-ठाशीव प्रतिमांमुळे आजही स्त्रियांना स्वत:ला लैंगिक सुख घेण्याचा अधिकार आहे, हे समाजमन खुलेपणानं मानत नाही. पुरुषी आक्रमकता, स्त्रिया म्हणजे जणू पुरुषांची लैंगिक भूक भागवण्याची वस्तूच अशा प्रकारचे वास्तवाचं चित्रण साहित्यात होताना दिसतं. त्यामुळे शोषित वंचित, अबला तसंच उदात्त, त्यागी, सेवाभावी स्त्रिया साहित्यात प्रतिबिंबित होतात. समाजाने स्त्रियांची स्वत:ची लैंगिक इच्छा नाकारलेली असल्यामुळे ज्या स्त्रिया ही इच्छा धरतात त्यांच्यावर अनैतिकतेचा शिक्का मारला जातो. एकूणच लैंगिकतेबद्दलच्या समाजाने घालून दिलेल्या रीतिभाती आणि त्यांचा स्त्री-पुरुषांबाबतीतला दुटप्पीपणा, ढोंगीपणा याविरुद्ध गौरी देशपांडे यांनी आपल्या लेखनातून उच्च स्वरात आवाज उठवला. स्वतंत्रतेचे अनेक पैलू गौरीच्या लिखाणातून पुढे आले. स्त्री-पुरुष समतेच्या प्रकाशात स्त्रीच्या भाव-भावनांचे पापुद्रे - पापुद्रे सोलून काढत स्त्री-पुरुष नात्याच्या गाभ्याशी जाण्याचा प्रयत्न तिनं प्रांजळपणे केला.

‘कारावासातून पत्रे’ च्या ताजा कलममध्ये, ‘सार्‍या पुरुषजातीशी माझं नातं सशर्त तहाचं. ते चालवून घेऊन त्यातच मौज वाटणारा, त्याला नैसर्गिक समजणारा कुणी भेटला तरच त्याच्याशी माझे काही कायमस्वरूपाचे संंबंध होणार. माझ्या व्यक्तिमत्त्वाची आणि स्वातंत्र्याची कुंपणं फोडून किंवा गनिमीकाव्यानं भेदून आत यायचा जो प्रयत्नही करणार नाही अशाशीच. तो तू नव्हेस.’ असं बाणेदारपणे नवर्‍याला सांगणारी नायिका म्हणजे स्त्री-पुरुष नात्याच्या पर्वाची नवी सुरुवात! यातून प्रियकर हा लग्नानंतरही प्रियकरच राहू शकतो, ‘नवरा’ नाही. ती आपल्या लेखनातून लग्नसंस्थेविषयी सडेतोडपणे, खणखणीत प्रश्‍न विचारत होती. प्रेमाचा लग्नाशी काय बुवा संबंध? असं उपहासानं म्हणत तिनं लग्न संस्थेकडे जास्त चिकित्सकपणे बघायला प्रवृत्त केलं. शारीरिक, भावनिक किंवा मानसिक कोणत्याच बाबतीत स्त्री कमी प्रतीची नसताना मग सातत्याने स्त्री-पुरुष नात्यात असमतोल स्त्रीला का सोसावा लागतो? असा भेदक प्रश्‍न ती लेखनातून विचारत राहिली. तिच्या अशा प्रकारच्या लेखनामुळे पुरुषप्रधान परंपरेचे जोखड फेकून दिल्यावर नव्यानं, स्वातंत्र्याची चव कळलेल्या स्त्रियांना प्रांजळ, मोकळं, निर्भय जगण्याचं नवं दालन खुलं झालं. मात्र यामुळे पुरुषप्रधान मानसिकता असणारे स्त्री-पुरुष घाबरून गेले आणि बिथरून जाऊन गौरीला स्वैराचारी, घरं मोडणारी वगैरे दूषणं दिली गेली.
स्त्रीला काय हवे असते? हे पुरुषांना अजूनही नीट उमगलेले नाही. या प्रश्‍नांनं कधी बिथरून तर कधी घाबरून कधी उत्सुक तर कधी तांत्रिक मांत्रिक बनून मानस विश्‍लेषणाच्या भूलभूलैय्यातून तर कधी तत्त्वज्ञानाच्या हिंदोळ्यावरून शरीर व जीवशास्त्राचा आधार घेऊन तर कधी समाजशास्त्र इतकंच काय पण मार्क्सवादी अर्थशास्त्राची आकडेमोड करून या प्रश्‍नांची तड लावण्याचा प्रयत्न अनेक पुरुषांनी अनेक वर्ष केला. पुरुषांनीच प्रचंड लेखन-चिंतन करता करता तिच्यावर ‘त्याचे’ हवे असणे लादत तिची मूर्ती कशी घडवली, तिचं चित्र कसं चितारलं व का घडवलं याचा शोध स्त्रीवादी अभ्यासकांनी घेतला.
स्त्रीबद्दल वाटणारी भीती हाच पुरुषसत्तेचा केंद्रबिंदू आहे का? असा मूलभूत प्रश्‍न अभ्यासक - चिंतक आणि विचक्षण बुद्धीचे चित्रकार संजीव खांडेकर विचारतात. (यांचा ‘पुरुषउवाच’ दिवाळी अंक 2015, मधील ‘योनी भयग्रस्त शोकांतिका’ हा महत्त्वाचा लेख मुळातून वाचायला हवा.) भीतीमध्ये पलायन व आक्रमण असे दोन परस्परविरोधी संरक्षक प्रतिक्रिया असतात. पलायनात व्यक्तीपासून लांब जाणे, नजरेआड जाणे वा करणे, ती नाहीच असे मानून व्यवहार करणे अशा गुंतागुंतीच्या क्रिया! तर आक्रमणात हिंसा, मालकी, गुलामी व्यवस्था, शासन अशा विविध स्तर-प्रस्थर प्रतिक्रियांची व्यामिश्र रचना, भयाचे रूपांतर त्यांना हिंसक, असहिष्णू व व्यक्तिकेंद्री बनवण्यात करते.
तिला काय हवं याचं उत्तर पुरुषाकडे पाहून नव्हे, तर स्वत:कडे पाहून स्त्रीनं द्यायला हवं. ती स्वतंत्र, न्यूनगंडरहित, स्वप्रकाशित अशी अवतरली तर या व्यवस्थेचा पाया व त्यावर उभी असणारी वर्चस्वप्रवण पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था कोसळू शकते. त्यातून दोन स्वतंत्र व्यक्तींचं प्रेम खर्‍या अर्थानं फुलू शकतं आणि प्रियकराचा लग्नानंतरही ‘नवरा’ न होता प्रियकरच राहू शकतो. तीच गोष्ट प्रेयसीची. तीसुद्धा लग्नानंतर ‘बायको’ न होता प्रेयसीच राहू शकते. कारण नव्या व्यवस्थेत प्रेमातला दुटप्पीपणा गेलेला असेल आणि प्रेमासाठी आकाश मोकळं झालं असेल. असं होण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करत राहूयात.  
 

 डॉ. गीताली वि. मं.

(संपादक- मासिक 'मिळून साऱ्याजणी')

(हा लेख 'तत्रैव' या द्वैमासिकाच्या जानेवारी-फेब्रुवारी 2023 अंकात प्रकाशित झाला होता.) 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form