स्त्री म्हटलं की तिचा संबंध आजही चूल आणि मूल यांच्याशी या ना त्या प्रकारे जोडला जातो. परंतु परिस्थिती बदलते आहे. पूर्वी स्त्रीचा संबंध केवळ घरकामाशीच यायचा. आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया शिक्षण घेऊन आपापल्या आवडीच्या क्षेत्रात, व्यवसायात कार्यरत झाल्या आहेत. पण तरी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करूनही अनेक ठिकाणी महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. स्त्री-पुरुष समानता हे वाक्य फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित आहे. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी हे वर्गीकरण व्यक्तीला जन्मत:च मिळणारं आहे. तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस, तू हिजडा (तृतीयपंथी) आहेस, असा उल्लेख केला जातो. त्यामुळे याबाबतचे मतपरिवर्तन व्हायला अजून बराचसा वेळ लागेल.खरं तर या सगळ्याला आपली पुरुषप्रधान व्यवस्था जबाबदार आहे.
ती मुलगी आहे, मग तिने घरातील कामं करायची, नोकरी करायची नाही. कुटुंबाचं पालनपोषण करायचं, तिने पंजाबी ड्रेस घालायचा, जीन्स घालयची नाही. आम्ही सांगू तसंच ऐकायचं. सातच्या आत घरात यायचं. ही सगळी बंधनं स्त्रीवर लादायची, अन् म्हणे स्त्री पुरुष समानता! मुलगा म्हटलं की घराचा वारस, त्याने वाटेल तसं वागायचं. त्याला वेळेचं बंधन नाही. कपड्याचं बंधन नाही. त्याने त्याच्या मनासारखं जगायचं. एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तरी त्यावर पुरुषाचा हक्क! बायकोशी भांडण झालं की, 'ही मुलं माझी, तू माहेरी निघून जा.हे घर माझं आहे' - असं त्याने हक्काने सांगायचं!
आता कुठेतरी यात बदल होतो आहे. पण अजूनही पुरुषांचं वागणं असंच पारंपरिक आहे, आणि स्त्रियांचा कोंडमारा होतोच आहे.
तृतीयपंथी का सामान्य जीवन जगू शकत नाहीत? कारण आपल्या मनावर बिबंवलं गेलं आहे की, त्यांनी टाळ्या वाजवून पैसे कमवायचे. परंतु अलीकडे त्यांच्या परिस्थितीतही काहीसा बदल होताना दिसतो आहे. त्यांच्या आवडीनुसार ते शिक्षण घेऊन, नृत्य, फोटोग्राफी अशा आपापल्या आवडी जोपासून स्वतःला सिद्ध करत आहेत.स्त्री, पुरुष, तृतीयपंथी यांच्यात लिंगभाव समता आणण्यासाठी प्रत्येकाने बदलायला पाहिजे.
मलाही अशा असमानतेला तोंड द्यावे लागले, संघर्ष करावा लागला. मी समाजकार्य करते आणि मला मनापासून समाजकार्य करायला आवडते. माझी इच्छा होती की, मला घराबाहेर पडायचं आहे, नोकरी करायची आहे. आणि हे मी लग्नाच्या वेळी सासरच्या लोकांना सांगितलं होतं. लग्न झाल्यानंतर एका वर्षानंतर घराबाहेर पडायचं, नोकरी शोधायची असं ठरवलं. नोकरीही मिळाली. उद्यापासून कामावर जायचं, तर आदल्या दिवशी घरातलं वातावरण तापलं. नोकरी करणार मग घरातली कामं कोण करणार? जेवण कोण बनवणार? सातच्या आत घरात यायचं, अशा असंख्य प्रश्नांचा मारा. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर हळुवारपणे दिलं आणि कामाला सुरुवात केली. गाड्या उशिरा असल्या कारणाने घरी कधी उशिरा आल्यावर वाद व्हायचा, यावरून खूप भांडणं झाली, वाद झाले. मी घरातल्यांना जाब विचारले, हे मी काम करते ते आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणूनच ना? तुम्ही उशिरा आलेलं चालतं, मग बायको आलेली का चालत नाही? गाड्या उशिरा असतील तर त्यात माझा दोष नाही. त्यावेळेस जर मी माझ्या पतींना प्रश्न विचारला नसता, तर माझाही कोंडमारा झाला असता. मी आता माझ्या घरात मुक्तपणे स्वतःचे विचार मांडू शकते. माझे निर्णय मी घेते. हळूहळू या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या सासूने, माझ्या नंणदेने माझ्या पतीने सहकार्य केले.
समता हे आपल्या संविधानातील महत्त्वाचे मूल्य आहे. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी यावरून भेदभाव करणं थांबेल, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळेच उंच भरारी घेतील. माझे तमाम मित्र-मैत्रीणी लिंगभाव समतेचं मूल्य आचरणात आणतील तेव्हा या विषयावर अनुभव लिहण्याची गरज भासणार नाही.
समता हे आपल्या संविधानातील महत्त्वाचे मूल्य आहे. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी यावरून भेदभाव करणं थांबेल, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळेच उंच भरारी घेतील. माझे तमाम मित्र-मैत्रीणी लिंगभाव समतेचं मूल्य आचरणात आणतील तेव्हा या विषयावर अनुभव लिहण्याची गरज भासणार नाही.
स्वाती पवार
(लेखिका आयुर्वेद क्लिनिक, येथे फिल्ड एक्झिक्युटिव्ह आहेत.)
Tags
anubhv
छान
ReplyDelete