लग्नगाठ बांधण्याआधीच ...

एका उच्चशिक्षित मुलीचं तिच्या आईवडिलांनी लग्न ठरवलं होतं. परंतु लग्नासाठी जागा, घर, राहणीमान काहीही बदलण्याची तिच्या मनाची तयारी होत नव्हती. कारण तिला फक्त संशोधनातच रस होता. तिच्या समुपदेशन सत्रामध्ये तिची मनोधारणा समोर आली. तिच्या आईवडिलांना हे सांगितले तेव्हा त्यांना दु:ख झाले, पण किमान नंतरची वाताहत टळली. लग्न करायचे नसेल तरी एकटे आनंदी जगता येते. तोही एखाद्याचा चॉइस असू शकतो. पण लग्न करायचे असेल तर विवाहपूर्व समुपदेशनाच्या मदतीने विचारपूर्वक जोडीदार निवडून, सहजीवनाचा अर्थ समजून घेऊन - आनंदी आयुष्य जगता येते.

पूर्वी आईवडिलांनी किंवा नातेवाइकांनी पसंत केलेल्या व्यक्तीशी लग्न करायची पद्धत होती. तेव्हा लग्न जुळवताना जात, वय, शिक्षण, रूप, खानदान बघितले जात असे. स्त्रियांनी सासरी जुळवून घेणे, उत्कृष्ठ माता-पत्नी-गृहिणी होणे हीच स्त्रीजीवनाची इतिकर्तव्यता होती. तशी नाती देखील आयुष्यभर निभावली जात होती. परंतु याचा अर्थ त्या जोड्या आनंदी, समाधानी होत्या की पर्याय नसल्यामुळे एका छताखाली राहत होत्या - हा अभ्यासाचा विषय आहे. पण आज काळ बदलला आहे. वेळेचा अभाव, वाढती महागाई, जागेची टंचाई आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना यामुळे लग्न ठरवतांना आता पूर्वीसारखी नातेवाईकांची involvement नसते. लग्न जुळवताना आईवडील आणि मुलगामुलगी एवढेच लोक असतात. आपली भौतिक संस्कृती झपाट्याने बदलत आहे त्यामुळे जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र अभौतिक संस्कृती म्हणजे परंपरागत मानसिकता मात्र अगदीच मंद गतीने बदलत आहे. आज स्त्रियांना अर्थार्जन करायचे असते. शहरात मुलगामुलगी दोघेही विद्यार्थी जीवनात अभ्यास, करियर यात बिझी असतात. तरीही लग्न झाल्यावर मात्र मुलीने अगदी पूर्वीच्या काळाप्रमाणेच गृहकृत्यदक्ष असावे अशी सासरची मानसिकता असेल तर ते शक्य आहे का?
 

 लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन अशी एकेकाळी संकल्पना होती.

पण खरंतर लग्न म्हणजे प्रथम स्त्री व पुरुष यांचे मनोमिलन आणि 

त्यानंतर कुटुंब अशी संकल्पना असायला हवी! 


विवाहसंस्था ही समाजातली एक मुलभूत संस्था मानली जाते. काळानुसार तिचे स्वरूप बदलत गेले असले तरी अजून ती टिकून आहे. मागील पिढीपर्यंत लग्न जमवणे हा एक मध्यस्थाचा विशेष गुण असायचा. प्रत्येक कुटुंबात एक नातेवाईक हे काम आयुष्यभर करीत असे. मग दाखवण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नसोहळा पार पडेपर्यंत त्याची जबाबदारी असे. अश्या वेळी होणाऱ्या कुरबुरी सोडविण्यासाठी नातेवाईक हजर असत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन अशी संकल्पना होती. खरेतर लग्न म्हणजे प्रथम स्त्री व पुरुष यांचे मनोमिलन आणि त्यानंतर कुटुंब अशी संकल्पना असायला हवी! कारण जेव्हा ते दोघे पतीपत्नी म्हणून परस्परांचा स्वीकार करतील तेव्हाच ते एकमेकांच्या कुटुंबाचा सहजपणे स्वीकार, आदर करू शकतील. 
स्त्रीपुरुष समानतेच्या काळात व्यक्तिगत आयुष्य, करियर यालाही महत्व आहे. लग्न म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नसून तो आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. लग्न म्हणजे सहजीवन हे आता मान्य होत चालले आहे. त्यामुळे लग्न ही निभावण्याची, नशिबाची ,गोष्ट राहिलेली नाही. समतेवर आधारित सहजीवन जगायचे तर समजून उमजून हवा तसा जोडीदार निवडता येतो, हे नव्या पिढीला काही प्रमाणात पटले आहे. गेल्या दोन वर्षात विवाहपूर्व कार्यशाळेमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे, हे चांगले लक्षण आहे. मागील दहा वर्षापासून स्वानंद समुपदेशन केंद्रामध्ये डॉक्टर मोहना कुलकर्णी आणि आम्ही टीम, विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा घेत असतो. या कार्यशाळेची गरज आताच्या वेगवान स्पर्धेच्या काळात अधिक आहे हे नवीन पिढीला पटतंय हि समाधानाची गोष्ट आहे.
विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळेत अनुरूप जोडीदार निवडून दिला जात नाही. त्यासाठी वधूवर सूचक मंडळे असतात. पण या कार्यशाळेत लग्न, सहजीवन, जोडीदार म्हणजे काय? लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, नातेसंबंध, कर्तव्य कोणती? यांची तोंडओळख करून दिली जाते. कधीकधी असा गैरसमज आढळतो, की - सगळेच लग्न करतात त्यात काय एवढे? कधी नको त्या गोष्टींची अतिचिकित्सा किंवा काही बाबतीत अतिदुर्लक्ष्य अशी दोन टोके दिसून येतात - ते टाळण्यासाठी ही कार्यशाळा आहे. अलीकडे विभक्त कुटुंबामुळे घरात नातेवाईक , त्यांच्याशी तडजोड किंवा जुळवून घेणे हा प्रकारच नसतो. लग्नाच्या वयात येईपर्यंत मुलगा आणि मुलगी दोघेही अभ्यास आणि करियर यात बिझी असतात. बाकी अनेक गोष्टी करताना त्याचे सामान्य ज्ञान मिळवले जाते, अगदी पदार्थांची रेसिपी आपण तीन वेळा पडताळून बघतो. 
लग्न करताना तर ज्या जोडीदारासोबत आयुष्यभर राहायचे त्याचा योग्य विचार तर व्हायलाच हवा. आपले विचार आवडी, स्वभाव जुळतात का हे बघायला हवे. ठरवून केलेल्या लग्नात रंगरूप, पगार, घर, संपत्ती, लग्नसमारंभ, फोटोशूट, वेशभूषा यावर लक्ष दिले जाते. आजकाल marriage पेक्षा wedding ceremony ला महत्व आले आहे. पण ज्या मुलामुलीला सोबत संसार करायचा त्यांचे विचार स्वभाव आपसात जुळतात का; याचा विचार करायला वेळ दिला जात नाही. अगदी प्रेमविवाहामध्ये देखील शारीरिक आकर्षण की प्रेम हे लक्षात येत नाही. मग छोट्या गोष्टीवरून कुरबुरी सुरु होतात. सहजीवन म्हणजे आनंदासोबतच त्याग, तडजोड, संयम हे लक्षात घेतले जात नाही. नातेसंबंध निर्माण करतांना, जोपासतांना काही वेळ द्यावा लागतो. तसेच स्वतःचे प्रोब्लेम सोडवतांना कुणाची किती मदत घ्यायची हेही ठरवावे लागते. पालकांच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडते आणि घटस्फोट होतात. आपली मुले आता मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचे प्रोब्लेम सोडवू द्यावेत हे पालकांना जमत नाही. दुसरीकडे घरात मी आणि जोडीदार याशिवाय कुणी नकोच, हे टोक दिसते. त्यामुळे लग्न करणे, सहजीवन जगणे हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. बरेचदा व्यसने, स्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना, जबाबदाऱ्या नकोत ही भावना लग्न मोडण्यास कारणीभूत ठरते. म्हणून लग्न ठरवतांना नेमके काय मुद्दे महत्वाचे आहेत याची जाणीव विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळेत दिली जाते.
या कार्यशाळेत साधारणपणे लग्न करण्याच्या वयातील तरुण येतात किवा लग्न जुळल्यावर देखील दोघेही येतात. विवाहपूर्व समुपदेशन सत्रामध्ये - आपल्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, त्या वास्तववादी आहेत की नाही – हे समजून घेता येते. सहजीवनाचा आदरपूर्वक विचार आणि स्वीकार केल्यामुळे पुढचे धोके ओळखता येतात. संघर्षाचे निराकरण कौशल्य शिकता येऊ शकते. वेगळे होण्याची वेळ आलीच तरी परस्परांचा सन्मान राखून दोषारोपण न करता विभक्त होता येते. त्याचा आयुष्यभर भार होणार नाही किंवा उन्मळून पडण्याची वेळ येणार नाही - याची काळजी घेता येते. म्हणून विवाहपूर्व समुपदेशन ही आजच्या काळाची गरज आहे!

#premaritalcounseling #विवाहपूर्व-समुपदेशन #विवाहसमुपदेशन 

दया पांडे 

समाजशास्त्र प्राध्यापिका,
विवाह समुपदेशक 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form