तेव्हा ती पटकन् म्हणाली, “मलाही लग्न करायचं होतंच. ज्याच्यावर कुटुंबाचा रोष ओढवून घेऊन, जिव ओवाळून टाकला असा मित्रही होता. पण लग्नाचा विचार त्याच्यासमोर मांडला आणि तो बदललाच. हळूहळू भेटणं, बोलणं कमी केलं. अधूनमधून विनंत्या केल्यावर उपकार करत असल्यासारखं एकांतात भेटत होता, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी गळ घालत होता. तो कधीतरी आपल्याशी लग्न करणारच आहे, या आशेने म्हण किंवा त्याने एवढ्यासाठी तरी आपल्याला सोडून जाऊ नये यामुळे असेल - पण मीही कधी यातून मागे हटले नाही. पण लग्न करताना त्याने माझा विचार केला नाही. तिथे माझं अंध असणं आडवं आलं. घरच्यांनी निवडलेल्या एका अशिक्षित, गावाकडच्या पण डोळस मुलीशी लग्न करून तो मोकळा झाला. मी मात्र माझ्या घरच्यांना डावलून मी त्याच्यात वाहवत गेले होते. तेव्हापासून मी प्रेम या भावनेत फारशी अडकले नाही.” तिच्या भावविश्वाच्या या तुकड्याने मला कायमची टोचणी लावलेय. ही मैत्रिण तिच्या तरुणपणाबद्दल बोलत होती. म्हणजे १९९० चा तो काळ. मधे ३० वर्ष गेलीत. पण, या विचारसरणीत आज तरी काही फरक झालाय का? खेदाने या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच आहे!
एक पूर्णतः अंध पदवीधर मुलगा...शिक्षण होतं पण, नोकरी नाही. त्यामुळे लग्नाला मुलगी तयार नव्हती. माझ्या आणि भरतच्या संसाराचं त्याला खूप कौतुक होतं. कारण मी अंध असून त्याच्या अंध मित्राबरोबर नेटका संसार करते. काही दिवसांनी तो बॅंकेत चांगल्या पदावर रुजू झाला. पण दरम्यान त्याचं लग्नाचं वय उलटलं होतं. आता नोकरी लागल्यावर त्याच्या घरातल्यांना लग्नाची घाई झाली. पण आमच्या अंध मुलासाठी अंध मुलगी नको ही त्यांची अट होती. त्यांनी गावी मुली पहायला सुरुवात केली. पस्तिशीच्या मुलाचं वय तिशीच्या आतलं सांगून, त्याच्या पगाराचा आकडा सांगून, मुंबईतल्या फ्लॅटची जाहिरात करून त्यांनी आपल्या मुलासाठी २० वर्षांची, पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरातली बायको शोधून आणली. दोघांच्या विचारात, वागण्यात वयाच्या तफावतीमुळे फरक येतो हे त्याला जाणवतंय. पण, आपलं वय ५ वर्षाने कमी असल्याचा खोटारडेपणा झटकून खरं सांगण्याची हिंमत तोही करत नाही. तितका मोकळेपणा दोघांच्या नात्यात उरला असेल का?
हे देखील वाचा - आमचं बाईपण
आपल्या मुलाच्या मदतीसाठी घरच्यांनी हट्टाने डोळस मुलगी सून म्हणून आणली पण, ती कधीतरी त्याचे कागदपत्र बघेल, कधीतरी तिला खरं समजेल तेव्हा तिला काय वाटेल? हल्ली दोघं एका बंधनात अडकल्यासारखे, त्यातून बाहेर पडता येत नसल्यासारखे एकत्र आहेत. आपण सहज सल्ला देऊ शकतो की, का रहावं असं त्यांनी? पडावं बाहेर. पण, फायद्या-तोट्याची गणितं मांडून जमवून आणलेलं नातं कधीच सुंदर, निर्व्याज आणि घट्ट असू शकत नाही याची कल्पना त्यांनाही असेलच!
माझ्या वयाच्या आणखी एका अंध मैत्रिणीची एक आणखीनच वेगळी गोष्ट आहे. ती बॅंकेत चांगल्या हुद्द्यावर आहे. तिच्या घरात आजारी पालक आणि ४ भावंड आहेत. चौघंही भावंडं नोकरी करणारी, नीट कमावणारी आहेत. आई-वडिलांचं आजारपण एकत्रीतपणे निभावतात. या मैत्रिणीच्या अंध बॉयफ्रेंडने तिच्याशी लग्न करायला नकार दिलाय.
तो म्हणतो, “तू किती व्यस्त असतेस. तुझी नोकरी, पालकांची जबाबदारी – यातून तुला माझ्या घरात कसा वेळ देता येईल? तू माझं घर कसं सांभाळशील?”
अंध तरुणांना अंध मुलगी गर्लफ्रेंड म्हणून चालते पण,
लग्न करताना मात्र डोळस मुलीलाच पसंतीअसते.
सक्षमपणे नोकरी करणारी, घर सांभाळणारी अंध मुलगी अंध तरुणांना गर्लफ्रेंड म्हणून चालते पण, लग्न करताना मात्र डोळस मुलीलाच पसंती असते. आपल्या घरची व्यवस्था चोख लावायची असेल तर ती डोळस मुलगीच लावू शकते असं त्यांना वाटतं. याहीपेक्षा आपल्या अंगावर काही जबाबदारी न येता घर सुरळित चालवण्यासाठी डोळस पत्नीच हवी असा समज सर्वांमध्ये जाणवतो. बायको सर्वगुणसंपन्न असावी लागते पण नवरा कसाही असेल तरी हरकत नाही – या समाजातल्या मानसिकतेचाच तो भाग आहे. याला अपवादही आहेत, पण ही ढोबळ मानाने आढळणारी परिस्थिती आहे!
![]() |
एखादा चांगला अपवाद |
आज अगदी तरूण ते उतार वयातल्या कितीतरी अंध महिला आहेत ज्यांचं लग्न होऊ शकलेलं नाही. त्या नोकरी करत असतील तर किमान आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. पण ज्या कमावत्याही नाहीत आणि ज्यांचं आयुष्य कुटुंबावर अवलंबून आहे त्या सगळीकडून नाडल्या जातात. लग्न करायचं की नाही – याविषयी निवड करायचं स्वातंत्र्य त्यांना उरतच नाही.आजही माझ्या कितीतरी अंध मैत्रिणी आहेत ज्यांना त्यांच्या अंधत्वामुळे लग्नाच्या व्यवहारातून लांब ठेवलं जातं. एखाद्या अव्यंग मुलीच्या लग्नासाठी पालक जितके प्रयत्न करतात, तसे प्रयत्न अपंग मुलीच्या बाबतीत करताना दिसत नाहीत. कधीकधी एखादीने स्वत: पुढाकार घेऊन जोडीदार शोधला तरी जातीपातीच्या कारणावरुन तिला विरोध केला जातो. क्वचितच एखादीला डोळस जोडीदार मिळतो.
प्रेमाच्या परिकल्पना मनात असताना अनेक अंध मुलीना त्यांच्या मित्रांनी खोटी वचनं दिली आहेत. लैंगिक संबंध ठेवून नंतर अचानक संबंध तोडले आहेत. त्या मुलांना दुसरी, तिसरी आणि कित्येक अंध मुली पुढे गर्लफ्रेंड्स म्हणून मिळत रहातात; लग्नासाठी डोळस मुलगीसुद्धा मिळते. अशा डोळस मुलीला कमी शिक्षणामुळे किंवा अचानक मिळालेल्या आर्थिक सुबत्तेमुळे सुरुवातीला काही जाणवत नसेल. पण तिलाही प्रणयाच्या अनेक कल्पना सोडूनच द्याव्या लागत असतील ना! अंध पुरुषाशी लग्न झाल्याने हावभावातून व्यक्त होण्याऐवजी तिला अचानक शब्दप्रधानतेला स्विकारावं लागतं! डोळस लोकांच्या घोळक्यात अंध माणसाला जसं मोकळेपणे वावरणं कठिण जातं तसंच, एखाद्या डोळस मुलीलाही अचानक अंध माणसाशी संसार करणं, दिवसाचे २४ तास त्यांना समजून घेत वावरणं कणभर अधिकच कठिण आहे!
थोडक्यात काय तर लग्नाच्या निर्दय व्यवहारात
अंध असोत किंवा डोळस – पण त्रास मुलींनाच होतो!
खोट्या प्रेमाने पोळलेल्या माझ्या अंध मैत्रिणी दुधाने तोंड भाजल्यावर - ताक फुंकून पिण्यापेक्षा ते कधीच तोंडी लावू नये अशा निर्णयापर्यन्त येतात. तरीही या सर्वातून गेल्यावर तयार झालेल्या एका ठाम आणि घट्ट मनोभूमीवर त्या आत्मविश्वासाने उभ्या असतात. कोणातही गुंतणं त्यांना नको वाटतं. प्रेम, आपुलकी आणि विश्वास ही त्रिसुत्री नसेल तर कधीच लग्न नाही झालं तरी चालेल – हे त्यांचं म्हणणंच योग्य नाही का?#अपंगत्व #लग्नसराई #विवाहसंस्था #marriage #disability
अनुजा संखे
या सदरात अपंग व्यक्तींचे संघर्ष,
त्यांच्या यशोगाथा, त्यांचे समाजातले योगदान
आणि समाजाकडून त्यांना मिळालेली मदत
अशा विविध मुद्यांविषयी अनुजा लिहीत आहे.
ती स्वत: पूर्णपणे दृष्टिहीन आहे.
अंध मुलींची लग्न या महत्वाच्या पण डोळस माणसांचं कवचितच लक्ष जातं अशा विषयावर तुम्ही लिहिलं आहे.
ReplyDeleteतुमच्या लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.