स्व-जाणीव झालेल्या महिला एकत्र येतात तेव्हा...

कुठले काम? कुठे करायचे? आणि कसे करायचे? हे निर्णय स्त्रिया स्वतःच घेतात तेव्हा त्या कामातून येणारे यशअपयशअनुभवण्याची हिंमत त्यांना येते. तेव्हाच स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख पटली असे म्हणता येते. 


महाराष्ट्रात ८०-९० दशकात बचतगटांचा महापूर आला होता. कुठल्याही सामाजिक संस्थेला ‘तुम्ही काय करता?’ हा प्रश्न विचारला की ठरलेले उत्तर असायचे – ‘आम्ही बचत गट चालवतो.’ पुढे तर अशा महिला संस्थांच्या किंवा एकूणच सामाजिक संस्थांच्या एकत्र बैठकीत कोणाची किती बचत जमा होते हे सांगण्याची चढाओढ असायची. दहा वर्ष गट चालवले गेले. लाखो रुपयांची उलाढाल झाली. पण आता पुढे काय? हा प्रश्न घेऊनच विसावं शतक सुरू झालं. 
स्त्रियांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी यासाठी एक चळवळ उभी रहावी अशी संकल्पना बचत गट निर्माण करणाऱ्या लोकांनी मांडली होती. त्यामुळेच बचत गट या संकल्पनेचे मूळ नाव हे सेल्फहेल्पग्रुप म्हणजेच स्वयंसहाय्यता गट असे होते.
स्त्रियांना मदत लागली तर ती घेण्यासाठी आणि गटातल्या इतरांनाही आपल्यासारखीच मदत लागते तेव्हा ती पुरवण्यासाठी एकत्र आलेल्या महिलांचा हा समूह होता. एकमेकांना मदत करण्यासाठीच महिलांनी जाणिवपूर्वक एकत्र यावं यासाठी तयार केलेली ही संकल्पना आहे, असंही म्हणता येईल. एकत्र यायचं काही कारण हवं आणि ते कारण देण्यासाठी बचत हा मार्ग निवडला. पण प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत ही संकल्पना येईस्तोवर त्याच्या मागचा सगळा विचार गळून पडला आणि ‘बचत’गट एवढेच टिकले. काही ठिकाणी जाणिवपूर्वक तेवढेच पुढे झिरपवले गेले. महाराष्ट्रात शेकडो बचत गट निर्माण झाले. गंमत म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांची संख्या नसेल तितकी बचत गटांच्या सदस्यांची संख्या भरू लागली. कारण एक स्त्री दोन-तीन गटाची सदस्य असायची. स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करता यायला व्हावी असा स्त्रीवादी विचार नव्हता तिथंही शेकडो गट निर्माण झाले. त्यांचे पैसे जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेत भरले जात होते. देशाच्या पातळीवर बचटगटांनी बँकेत ठेवलेले पैसे आणि बँकांनी त्यांना दिलेले कर्ज यांचे फारच व्यस्त प्रमाण होते.
बचत गटांच्या संचालक मंडळात कायद्याची गरज म्हणून नावापुरत्या स्त्रिया होत्या. प्रत्यक्षात त्यांना काही अधिकार नव्हते. त्यांनाच काय तर गटातल्या बायकांनाही काही अधिकार नव्हते. काही ठिकाणी तर बॅंकेच्या अंतर्गत राजकारणाच्या कुरघोडीमुळे त्या बुडाल्या. याचा फटका गरीब स्त्रियांना बसला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पै-पै जोडलेल्या स्त्रियांना याचा फार त्रास झाला.
पण जिथे बचत गटाचा मूळ हेतू साध्य होत होता, तिथे अशी परिस्थिती नव्हती. स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी, त्यांच्यातला भगिनीभाव जागा व्हावा आणि स्वतःकडे त्यांना माणूस म्हणून पाहता यावे यासाठी जिथे स्त्रियांचे एकत्रीकरण केले गेले तिथे बचत गट असे नाव न देता स्वयंसहायतागट असेच नाव दिले गेले. तिथल्या स्त्रियांच्या मनावरही हेच बिंबवले गेले. नेमक्या कोणत्या प्रकारच्या कामातून स्त्रिया आपली ओळख निर्माण करू शकतात याचा सारासार विचार अशा गटात झाला. त्यातलीच एक म्हणजे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ संस्था! 
आंबेगाव तालुक्यातील जवळजवळ सर्वच लहान मोठ्या गावांमध्ये या संस्थेचे स्वयंसहाय्यता गट आहेत. साधारण दोन कोटींचा वर्षाचा टर्नओव्हर आहे. प्रत्येक गावातल्या गटांचा एक क्लस्टर संघ आणि त्यातून येणाऱ्या प्रतिनिधींचा तालुका पातळीवरचा संघ तयार करण्यात आला आहे. राजगुरूनगरच्या चैतन्य संस्थेने दहा वर्षांपूर्वी सुरू केलेलं हे काम आज नावारुपाला आले आहे. स्त्रिया स्वतः निर्णयात असायला हव्यात. कुठले काम? ते कुठे करायचे? आणि कसे करायचे? हे निर्णय स्त्रिया स्वतःच घेतात तेव्हा त्या कामातून येणारे यश अनुभवण्याची ताकद त्यांच्यात येते तसेच अपयशही अनुभवण्याची हिंमत त्या ठेवतात. तेव्हाच स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख पटली असे म्हणता येते. यशवर्धिनी संस्थेच्या सगळ्याच स्त्रियांमधे ही चमक दिसते. स्वतःची ओळख पटलेल्या स्त्रियांबरोबर गप्पा मारण्याची एक वेगळीच मजा असते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेजही वेगळेच असते.
या संस्थेला भेट द्यायला मी तिथे पोहोचले तेव्हा त्यांची बैठक सुरू होती. २५-३० महिलांचा गट पण बैठक अतिशय शिस्तबद्धपणे चालली होती. दोनपेक्षा जास्त स्त्रिया एकत्र बसू शकत नाही, राहू शकत नाही असा जाहिर अपप्रचार अनेक ठिकाणी केला जातो त्याला हे उत्तर आहे. गेली दहा वर्षे या सर्व स्त्रिया एकत्र काम करीत आहेत. निर्णय घेताना त्यांच्यात संवादाबरोबर कधी विसंवादही होतो. पण त्याचे रुपांतर अबोला, गटातून निघून जाणे, मनात राग धरणे अशा गोष्टींमध्ये होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या नेमक्या कोण आहेत आणि कशासाठी एकत्र आल्या आहेत याची स्पष्ट कल्पना त्यांना आहे किंवा त्यांनी ती निर्माण केली आहे.
त्या सर्व त्यांची ओळख करून देत होत्या तेव्हा त्यांचे काम सांगण्याची पद्धत अगदी सहज होती. तालुक्यात मोठे धरण आहे. त्याचे कालवे पूर्ण तालुक्याभर पसरले आहेत. तसेच डोंगराळ भाग ही आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय. अशात या महिला काम करतात.
बचत जमा करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावायचा. त्यामुळे पैशांचे हिशेब सर्वांनाच आले पाहिजे अशी या गटाची शिकवण आहे. सगळ्याच स्त्रियांमधले विविध प्रकारचे नेतृत्वाचे गुण विकसित होण्यासाठी वाव देणे, गटाने व्यवसाय प्रशिक्षण घेणे, विविध ठिकाणी सहलीचे आयोजन करणे असे अनेक उपक्रम इथे चालतात. याचाच परिणाम म्हणून अनेक जणींना आपली ओळख नीट पटली आहे आणि ती त्यांना दुसऱ्यांसमोर मांडताही येते. त्या सर्व महिला पुरुषांनी आपला परिचय करुन देताना आवर्जून आपापल्या आईचे नाव सांगितले जे मला खूपच भावले.
संघाच्या पहिल्या अध्यक्षा लता बांगर २०१६ साली दुसऱ्यांदा गावात सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. यशवर्धिनी संघाने ढोकाळे नावाच्या अतिशय दुष्काळ असलेल्या गावात पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. रस्ते बांधले. मुलांसाठी खेळण्याच्या जागा आणि खेळण्याचे साहित्य उपलब्ध केले. या सर्व कामाची ही पावती आहे असे लता ताई यांचे मत आहे. स्त्रीचा आत्मविश्वास जागा होतो आणि अशा अनेक स्त्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा ‘विकासाचे मॉडेल’ अगदी वेगळे असते, असा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या गावात सरपंच स्त्री आहे तसेच उपसरपंच ही स्त्री आहे. त्यामुळे कामाचे प्राधान्यक्रम ठरवताना हे स्त्रिया, मुलं आणि दुर्लक्षित समाजाचे घटक यांचेवर लक्ष केंद्रित केले जाते असा त्यांचा आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. यशवर्धिनीच्या स्त्रिया आता स्त्रियांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी तरूण आणि कुमार वयाच्या मुलांसोबत काम करू इच्छितात. व्यवसाय प्रशिक्षणासोबतच मुलांसोबत लैंगिक विषयांवर बोलले पाहिजे यासाठी त्या आग्रही आहेत. जिथे स्त्रियांच्या अस्तित्वावर जाणिवपूर्वक काम करण्याचा प्रयत्न झाला तिथे स्त्रिया असे मुलभूत प्रश्न घेऊन उभ्या आहेत असं आपल्याला दिसतं. अशीच चळवळ दीर्घकाळ टिकते!
यशवर्धिनी संघाच्या कामामुळे सरपंच झालेल्या लताताई यांना आत्तापर्यंत दोन पुरस्कार मिळालेले आहेत. ते दोन्ही पुरस्कार त्यांनी आपल्या संघाच्या सर्व सहकाऱ्यांसोबत वाटून घेतले आहेत. ज्या व्यक्ती किंवा संस्थांनी त्यांना सुरूवातीला मदत केली त्या व्यक्ती किंवा संस्था यांच्या सगळ्या कामाचे श्रेय स्वत:च घेऊ लागल्या तेव्हा या बाया रडत बसल्या नाहीत; काम सोडूनही दिले नाही किंवा त्यागमूर्तीही बनल्या नाहीत. आपल्याच संस्थेत आपल्याला आपले हक्क आणि अधिकार पूर्णपणे वापरता येत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी एकजुटीने निर्णय घेऊन लढा देण्याचे ठरवले. त्यांनी त्या व्यक्तींचा आणि संस्थेचा आदर ठेवत स्वतःच्या कामाचे अस्तित्व आणि आपले स्वतःचेही अस्तित्व सिद्ध केले, टिकवले आणि संस्थेच्या कामावर त्याचा परिणाम होऊ न देता संस्था फुलवली. स्वत:ची ओळख पटलेल्या स्त्रिया अधिक संवेदनशील, सक्रीय, नाविन्यपूर्ण पद्धतीने करतात आणि त्यांचे अंतर्गत संबंध अधिक घट्ट होतात याचे हे उदाहरण म्हणून या संघाची आवर्जून ओळख करून द्यावीशी वाटली !

अनिता पगारे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form