नावात काय नाही? नावात बरंच काही आहे. मुलगी जेव्हा वडिलांऐवजी आईचं नाव–आडनाव घेते तेव्हा त्याला एवढा विरोध कशासाठी होतो?कारण आपल्या नावात कायदेशीरपणे आईचं नाव वापरणे म्हणजे पितृसत्तेलाच उघड उघड झुगारणं आहे!
मी अगदी तीन चार वर्षांची होते, तेव्हा मला माझं ‘मुक्ता’ हे नाव अजिबात आवडायचं नाही. मी सारखी आईकडे कटकट करायचे की तिने माझं नाव हेच का ठेवलं? दुसरं काही नाव का नाही ठेवलं? तेव्हा ती म्हणायची "तू तुला आवडेल ते नाव ठेऊन घे. मी तुला त्या नावाने हाक मारेन..." त्यावेळी मला ‘मोगली’ची मैत्रीण फार आवडायची म्हणून मग मी माझं नाव ‘राधा’ ठेवलं. पण आठवड्याभराने मला ‘श्रेया’ नाव आवडलं, मग एरियल, नंतर जसमिन, कधीतरी अवंतिका, अरुंधती, अशीच आणखीन काय काय नावं आवडतच राहिली. एका मावशीला ही आयडिया खूपच आवडायची. ती फोनवर बोलताना सुद्धा विचारायची - "सध्या मुक्ताचं नाव काय आहे?" आणि मला त्याच नावाने हाक मारायची.
नंतर कधीतरी कशामुळे कोण जाणे, पण मोठी होत गेले तसं माझं ‘मुक्ता’ हेच नाव मला आवडायला लागलं. तरी माझ्या आडनावाच्या बाबतीत एक मोठा पेच होता. मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मी माझ्या नावापुढे माझे आई आणि वडील दोघांची आडनावं लाऊन नाव सांगायचे. दोन/अडीच वर्षांची असताना माझे आईवडील वेगळे झाले. माझी आई मला घेऊन मुंबईला आली. पण तरी मी नाव तसंच सांगत राहिले. लोकांना आश्चर्य वाटायचं किंवा विचित्रही वाटत असेल. पण शाळेत जायला लागल्यावर मला धक्काच बसला. माझ्या बाई मला म्हणाल्या की आपलं नाव असं सांगायचं नसतं. एका नावाला दोन आडनावं नाही लावता येत. इथून पुढे लक्षात ठेव – ‘नेहमी स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि वडिलांचं आडनाव असंच नाव सांगायचं.’ जरी शाळेतल्या दाखल्यावर माझ्या नावापुढे वडिलांचं नाव आणि आडनाव असलं तरी स्वत:चं नाव सांगताना मी माझ्या नावापुढे आईचं नाव लावायचे. तीच मी माझी आयडेंटिटी समजायचे. मी राहते आई बरोबर, आईच मला जेवायला देते, नवीन कपडे आणते आणि वडील तर कित्येक दिवसात दिसलेले पण नाहीत. मग माझ्या नावात आईचं नाव नसून कसं चालेल? एवढं मला ५-६ वर्षांची असताना पण कळायचं. शाळेची सगळी वर्ष माझी खूप चीडचीड होत राहिली. कायदेशीरपणे नाव बदलता येण्यासाठी अठरा वर्षांचं व्हावं लागतं. पण तरी मी त्यात एक पळवाट शोधली होती. शाळेच्या बाहेर किंवा कॉलेजात गेल्यावर देखील सगळीकडे मी माझं नाव मुक्ता खरे असंच सांगायचे. त्यामुळे माझी तशीच ओळख तयार झाली होती. आता फक्त चर्नीरोडला त्या गॅझेट ऑफिसमध्ये जाऊन नाव बदललं की झालं! (I wish...)
माझ्या अठराव्या वाढदिवसा नंतर थोडे दिवसांनी मी नाचत नाचत चर्नीरोडला गॅझेटऑफिस मधे पोचले, फॉर्म घेतला, भरला आणि भरलेला फॉर्म घेऊन एका काऊंटर वर गेले. तिथे एक बाई बसली होती आणि ती दुसऱ्या एखाद्या बाईशी बोलत होती.(असं मला वाटलं) पण मी आसपास बघितलं तर कोणी दिसेना. त्या बाईकडे नीट बघितलं तर ती फोन वर सुद्धा बोलत नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की ती तिच्या टेबलखाली बसलेल्या मांजरीशी बोलतेय ! ‘आज ट्रेनला खूप गर्दी होती, अमुक भावाकडे जायचंय’ - असं सगळं ती त्या मांजरीला सांगत होती. सवडीने तिने माझ्याकडून फॉर्म घेतला, वाचला आणि तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. तिचं कंफ्यूजन लक्षात येऊन मी म्हणाले – ‘हो मला माझ्या आईचंच नाव लावायचं आहे’.
तिने विचारलं, ‘का?’
मी सांगितलं, ‘मला पूर्वीच असं करायचं होतं. पण मी अठरा वर्षांची होईपर्यंत आम्ही थांबलो होतो.’
तरी तीने विचारलंच, ‘पण तुम्हाला वडिलांचं नाव का बदलायचं आहे?’
मी म्हंटलं, ‘मला वडिलांचं नाव नाही बदलायचं, माझं स्वतःचं नाव बदलायचं आहे.”
ती थोडावेळ माझ्याकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, ‘तुम्ही आतमध्ये सरांना जाऊन भेटा.’
मी आत गेले. तिथल्या सरांना भेटले. तिथेपण आधीचाच संवाद जसाच्या तसा रिपीट झाला. मला कळतच नव्हतं की ह्या सगळ्यांना असं का वाटतंय की मला माझ्या वडिलांचं नाव बदलायचंय?
शेवटी ते सर म्हणाले, ‘तुम्ही असं करा, मंगळवारी या. ते अमुक अमुक सर आज आले नाहीयेत ते मंगळवारी येतील.’
माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. मी बरं म्हंटलं आणि तिथून निघाले.
मंगळवारी परत त्या ऑफिसात गेले. तिथपासून माझ्या मनस्तापाची लेव्हल बरीच वाढणार होती. ह्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मला वडिलांचं NOC आणायला लागेल. NOC म्हणजे मी नाव बदलण्या बद्दल माझ्या वडिलांची काही हरकत नाही ह्याचा पुरावा! ज्या माणसाशी माझा गेल्या 16 वर्षात संबंध आलेला नाही, त्या माणसा कडून हे मला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणायला सांगत होते. एका adult व्यक्तीला नाव बदलण्यासाठी कोणाच्याही NOC ची गरज नसते. मी जरी माझं नाव गाढव, ससा, कासव काहीही ठेवायचं ठरवलं तरी मला तसं करण्याचा पूर्ण हक्क आहे. मी म्हंटलं – ‘माझा माझ्या वडिलांशी काहीही संपर्क नाही.’ त्यावर त्यांनी मला affidavit करून आणायला सांगितलं. आता मला रडू यायला लागलं होतं. पण मी चुपचाप काही न बोलता तिथून बाहेर पडले. म्हणजे ह्या ऑफिस मधल्या लोकांनी मला त्रास द्यायचा आणि माझं क्षुल्लक काम जास्तीत जास्त कठीण करून ठेवायचं असं ठरवलंच होतं तर. मग मी पण ठरवलं, पंगा तर पंगा!
शेवटी दिवसभर उन्हात धावपळ करून, काही न खातापिता मी affidavit बनवलं. माझ्या मैत्रिणीचे वडील पोलिस होते. त्यांच्या मदतीमुळे हे काम एका दिवसात आटपलं. मग affidavit घेऊन मी पुन्हा त्या ऑफिस मध्ये गेले. आता तिथले महाशय म्हणाले की हे affidavit चालणारच नाही. बास! आता माझा पेशन्स संपलेला. पुढचं वर्षभर मी त्या ऑफिसकडे ढुंकुन सुद्धा बघितलं नाही. त्यादरम्यान आम्हाला समजलं की असं affidavit करायची खरंतर काहीच गरज नसते. मग माझ्या आईने सगळी सूत्रं तिच्या हातात घेतली. ती तिच्या एक कलीगला घेऊन चर्नीरोडला पोचली. त्याला अशा सरकारी ऑफिसर्सशी कसं डील करतात ते चांगलंच माहीत होतं. ते दोघं त्या ऑफिसमध्ये पोचले आणि त्या महाशयांनी पुन्हा तेच पुराण ऐकवल. असं वडिलांचं नाव काढता येत नाही, तसा नियम असतो, वडिलांची परमिशन लागते वगैरे वगैरे. आईचा कलीग म्हणाला, “ ठिक आहे. तुम्ही हे जे म्हणताय ते सगळं लिहून द्या. मग तुमचं लेटर मी त्या अमुक अमुक साहेबांना दाखवतो. आमचे घरगुती संबंध आहेत त्यांच्याशी!”
ह्या साहेबांचं नाव ऐकल्यावर मात्र ते सद्गृहस्थ घाबरले आणि म्हणाले, “बरं बरं राहुदे. तुम्ही उद्या येऊन पैसे भरा, तुमचं काम होऊन जाईल.”
हुश्श! शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला. मी आणि आई ऑफिसमध्ये पोचलो. परत एकदा फॉर्म भरला आणि पैसे भरायला परत त्या मांजरवाल्या बाईच्या टेबलपाशी गेलो. पुन्हा त्या बाईने न राहवून विचारलच,”पण काय कारण काय असं नाव बदलून घ्यायचं?” मग मात्र माझ्या आईची सटकली. ती म्हणाली, “कारण हवंय तुम्हाला? घ्या लिहून – पुरुषसत्तेला विरोध! असं कारण लिहा!” बाई वरमली आणि चुपचाप पैसे घेतले. तर अशाप्रकारे एकदाचं माझं नाव बदललं. आता माझ्या पॅन कार्डवर, आधार कार्ड वर, आणि पासपोर्टवर सुद्धा माझं नाव “मुक्ता वंदना खरे” असंच आहे! मी पितृसत्तेच्या विरोधात एक छोटीशी लढाई जिंकली आहे. एक नवा post patriarchal पर्याय उभा केला आहे.
ही सगळी उचापत मी एका मित्राला सांगत होते. मला किती मनस्ताप झाला आणि तरीही मला कसं गड जिंकल्यासारखं वाटतंय वगैरे वगैरे. तर तो दीड शहाणा म्हणतो की, "पण काय गरज होती? नाहीतरी तू तुझं नाव मुक्ता खरे असंच सांगतेस, सगळे तुला मुक्ता खरे म्हणूनच ओळखतात, तर कायद्याने एवढं नाव बदलून घ्यायची काय गरज होती? तुझा सगळा त्रास वाचला असता.." आता ह्या माणसाला कसं कळावं की प्रश्न त्रास वाचवण्याचा नाहीये, तर मला माझा हक्क वापरता येण्याचा आहे! मला सगळे informally मुक्ता खरे म्हणून ओळखत असले तरीही, जेव्हा नवीन अकाऊंट उघडायचं असेल, आधार कार्ड काढायचं असेल, पासपोर्ट बनवायचा असेल तेव्हा मला माझ्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव लिहावंच लागलं असतं. मला त्या नावाशी अजिबात रीलेट होता येत नाही. तर अशा नावाचं ओझं मी का बाळगायचं? शेक्सपियर काहीही म्हणालेला असला तरी माझ्या मते नावात सगळं काही आहे. नावात ओळख आहे! चांगली सुद्धा आणि वाईट सुद्धा. त्यामुळे आपलं नाव आपल्याला हवं तसंच असलं पाहिजे. तो आपला हक्क आहे! मी माझा हक्क बजावला. इथून पुढे सुद्धा मला अनेक लोकांचा रोष पत्करावा लागेल, प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील ह्याची मला कल्पना आहे. पण मी ती देइन आणि माझ्या विचारांवर ठाम राहीन. माझ्या post patriarchal विचारांचा आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या कष्टाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. मी जेव्हा स्वतःला post patriarchal म्हणवते तेव्हा मला असं म्हणायचं असतं की माझा पितृसत्तेला विरोध आहे आणि पितृसत्तेशिवायचं आयुष्य मी जास्त सुखी समजते.
आपलं नाव आणि आडनाव ह्यावर पितृसत्तेचा ठसा उमटलेला असतो. पितृसत्तेमुळे कुटुंबसंस्थेत पुरुषाला आपोआप प्रमुखपणा मिळतो. कुटुंबाला मिळणारा पैसा, प्रतिष्ठा सगळं काही त्याच्या एकट्यामुळेच मिळतं असं मानलं जातं आणि बाईचा वाटा नाकारला जातो. कुटुंबासाठीचे निर्णय पुरुष घेतात, त्यांनी ठरवलेले नियम घरात पाळले जातात. कुटुंबातले सगळेजण पुरुषाच्या वंशपरंपरेने आलेले आडनाव लावतात. कुटुंबात सून म्हणून येणाऱ्या बाईला स्वत:चे नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव सोडून द्यावं लागतं. म्हणजे पितृसत्तेमध्ये बाईला एकप्रकारे स्वत:ची लग्नापूर्वीची ओळख पुसून टाकावी लागते, तिचं क्रेडिट काढून घेतलं जातं. लग्नानंतर मुलीने माहेरचं आडनाव टाकून नवऱ्याचं आडनाव लावलं पाहिजे अशी सांस्कृतिक जबरदस्ती असते. त्यात कुणाला कधी काही गैर वाटत नाही – उलट तिचं आडनाव बदलणे हा जणू काही कायदाच आहे – अशी अनेक लोकांची समजूत असते. पण हल्ली शहरांमध्ये तरी बऱ्याच मध्यमवर्गीय मुली (अगदी स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणाऱ्या मुली सुद्धा) लग्नानंतर आडनाव बदलत नाहीत - हळूहळू नाईलाजाने का होईना त्यालाही मान्यता मिळू लागली आहे. मग माझ्यासारखी मुलगी जेव्हा वडिलांचं नावसुद्धा नाकारते आणि त्याऐवजी आईचं नाव–आडनाव घेते तेव्हा त्याला एवढा विरोध कशासाठी होतो? खरंतर आई आपल्याला जन्म देते म्हणून आपल्या नावापुढे तिचं नाव लावायचं – इतकं हे साधंसरळ असायला हवं नाही का? पण प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण आपल्या नावात कायदेशीरपणे आईचं नाव वापरणे म्हणजे पितृसत्तेलाच उघड उघड झुगारणं आहे!
पितृसत्तेने कुटुंबात पुरुषाला प्रमुख जागा दिलेली आहे. ज्या कुटुंबात पुरुष गैरहजर असतो आणि बाईच कुटुंब चालवत असते तिथेसुद्धा तिला कुटुंबप्रमुखाचा दर्जा मिळू दिला जात नाही. जरी घरातल्या माणसांनी तिला कुटुंबप्रमुख मानलं तरी कुटुंबाबाहेरच्या व्यवस्था त्याला “बेकायदेशीर” ठरवायचं प्रयत्न करतात. खरं म्हणजे व्यक्तीने स्वत:चं नाव कशाप्रकारे लावायचं यावर कायद्याची काही बंधनं नसतात. पण स्वत:चं नाव कसं लिहायचं ते अमलात आणायची प्रक्रिया मुद्दाम किचकट करून दाखवली जाते. ज्यांना स्वत:च्या नावातून वडिलांचं नाव वगळायचं असेल त्यांना अत्यंत खासगी प्रश्न विचारून भंडावून सोडलं जातं. माझ्या ओळखीत ज्या ज्या माणसांनी कायदेशीर डॉक्युमेंट्सवर वडिलांचे नाव, आडनाव वगळण्याचा प्रयत्न केला त्यांना भरपूर त्रास दिला गेला आहे आणि बहुतेकांनी आपला प्रयत्न जवळजवळ सोडूनच दिलेला आहे. अशा पद्धतीने पितृसत्ता नाकारण्याचे वैयक्तिक प्रयत्न अनेक सामाजिक संस्था हाणून पाडत असतात. पण पितृसत्तेच्या खुणा नाकारण्याचे प्रयत्न करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यातूनच post patriarchal समाजाची पायाभरणी होणार आहे.
काही वर्षांपासून शाळांमधून मुलांच्या नावात आईचं नाव जोडलं जायला लागलं आहे. हल्लीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी मधे आदित्य ठाकरे आणि इतरही काही आमदारांनी आपल्या नावापुढे आईचं नाव लाऊन शपथ घेतली. सध्या टीव्हीवर दोन मराठी सिरीयल सुद्धा सुरू आहेत जिथे क्रेडिट्स मध्ये कलाकारांच्या नावांमध्ये आईचं नाव लिहिलं जातं. आपण स्वत:च्या नावापुढे आडनाव लावतो त्याचं कारण आपल्याला आपल्या वडिलांना (आणि आईला सुद्धा) क्रेडिट द्यायचं असतं. आपल्याला मोठं केल्याबददल, शिकवल्या बद्दल, त्यांचा पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल. पण माझ्या बाबतीत फक्त आईने मला शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळंच दिलंय. माझ्या वडिलांचा मला मोठं करण्यात शून्य सहभाग होता. म्हणून मी फक्त आईचं नाव लावते. माझी आई शिक्षणाने आर्किटेक्ट आहे. पण तिची ओळख एक धाडसी स्त्रीवादी लेखिका आणि नाट्यकर्मी अशीदेखील आहे. भरपूर कष्ट करून ताठ मानेने जगलेली ती एक स्वतंत्र बाई आहे. सगळ्यांची आई अशी नसते ह्याची पण मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून जी माणसं आपल्या आईचं नाव लावण्याचं कौतुकास्पद काम करताहेत त्यांनी अजूनही काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. उदा. आईचं स्वतःचं बँक अकाऊंट आहे का? तिला तिची प्रायव्हसी मिळते का? आपण तिला सारखं छोट्या मोठ्या गोष्टींमधे त्याग करायला लावत नाही ना? अठरा वर्षांचे झाल्यावर तरी आपण आईवर कमीत कमी अवलंबून राहिलं पाहिजे. आणि तेदेखील आपल्यासाठी चांगलं असतं म्हणून नव्हे तर तो तिचा हक्क असतो म्हणून हे आवर्जून करायला पाहिजे. आपल्या नावासोबत आईचं नाव-आडनाव जोडण्याबरोबर आईचे हे हक्क पूर्ण होतात की नाही त्याबद्दल सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. आईचं अस्तित्व नुसतं नावापुरतं राहणार नाही यांची आपण काळजी घेतली तरच खऱ्या अर्थाने post patriarchal पर्याय उभे करता येतील.