निमशहरी भागातले स्त्री-पुरुष पुस्तकी शब्दांच्या पलीकडे जाऊन स्त्रीवादाच्या चष्म्यातून स्वत:कडे पाहायचा प्रयत्न करतात – तेव्हा काय समोर येते?
खरंतर स्त्रीवाद, स्त्री-पुरुष समता, स्त्रियांची चळवळ, स्त्रियांचे सबलीकरण अशा कोणत्याही विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता. मला एका शाळेत शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी बोलावलं होतं. त्यात त्यांची सोय अशी होती की, मी शाळेजवळ राहत होते आणि वस्तीतल्या इतर बायकांपेक्षा बरी शिकलेली होते.शिवाय त्यांनी दिलेल्या वेळेवर हुशार,आणि बुद्धिमान पुरुष त्यावेळी कॉलनीत असण्याची शक्यता नव्हती. त्यांच्या सगळ्या पात्रतेत मी बसत होते म्हणून मला बोलावण्यात आलं. मी पण - हो म्हटलं, कारण मला आवडतं नवनवीन लोकांना भेटायला, त्यांना समजून घ्यायला. तर अशा अवचित येणाऱ्या भाषणवारासाठी मी काय बोलावं हेच मला कळत नव्हतं. कारण मी काही हाडाची वक्ता नाही!
जवळ जवळ पन्नास स्त्री-पुरुष शिक्षक तिथे हजर होते. त्यांचे ते गटसंमेलन होते. शिक्षकांशी काय बोलावं हे मला कळेना. म्हणून मी त्यांनाच विचारलं की, मी तर विषयाची कोणतीच तयारी केलेली नाही. आपण फक्त गप्पा मारू या का? त्यांनीही एका कंटाळवाण्या व्याख्यानातून आपली सुटका होईल आणि मध्ये मध्ये मोबाईलही हाताळता येईल या भावनेने हो म्हटले.सुरुवात कोण कोणत्या गावाहून शाळेत जातं आणि कामावर जातांना कोण काय काय काम करतं असं बोलण्यातून झाली. पुढे गप्पांच्या ओघात जे पती-पत्नी एकाच गावात आणि एकाच शाळेत नोकरीसाठी जात होते; ते म्हणाले – ‘आम्ही दोघं आमचं आमचं आवरून घरातून बरोबर निघतो.’ म्हणून त्यांच्यातल्याच एका शिक्षिकेने विचारले, “सर तुम्ही घरातलं कोणतं काम करतात?” तर सर म्हणाले, “मी गाडी स्वच्छ पुसतो, आलेला पेपर नीट ठेवतो, दाढी करतो आणि अंघोळ करतो.”
याउलट बाई सकाळी उठून सडारांगोळी, मुलांचे आणि स्वतःचे डबे, आंघोळीला पाणी तापवणे, काढणे, धुणंभांडी बाहेर काढून ठेवणे, झाडलोट ही सगळी कामे करून निघते - असं पुरुषही सांगत होते. तेवढ्यात एकजण म्हणाले, “मला वाटलंच आजचा विषय या स्त्री प्रश्नावर जाईल”
“मग नको का जायला ?स्त्री प्रश्न म्हणजे काय?”
यावर सुरुवातीला कोणीच काही बोलले नाही.
मग एकजण म्हणाले, “स्त्रियांना जागोजागी त्रास होतो, त्यांना मारले जाते, छळ होतो, निर्णय घेवू दिला जात नाही.”अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.
“तुम्हांला पण हे प्रश्न जाणवतात का?”
त्यात खूपजणांचे उत्तर हो असे होते. यासाठी तुम्ही काय करता? असे विचारले तर म्हणाले की, “आमच्या बायका नोकऱ्या करतात ताई, त्या त्यांच्या स्वतंत्र आहेत.”
शिक्षिकासुद्धा म्हणाल्या की, “ताई आम्ही नोकरी करतो आम्हांला मुक्तपणे जगता येते.”
“म्हणजे तुम्ही तुमचा पगार तुम्हांला हवा तसा खर्च करू शकता? वेळप्रसंगी माहेरी आईवडिलांच्या मदतीला धावून जावू शकता?त्यासाठी घरी परवानगीची गरज नाही?”
यावर त्या गप्प बसल्या. पुरुष म्हणाले, “खूप स्त्रिया असे करतात”
“हो करतात पण त्यातल्या कितीतरी जणींना त्यासाठी जाब विचारला जातो का?”
“पण ताई, घर दोघांचं असतं, तर विचारून केलं तर काय हरकत आहे ?
“काहीच नाही,पण पुरुषाने सुद्धा विचारायला हवे ना?”
यावर एकदम शांतता पसरली.
म्हणून विचारले, “तुम्ही स्त्रियांकडे कोणत्या नजरेने पाहता? म्हणजे एखादी स्त्री तुमच्या समोरून गेली की तुमच्या मनात काय येतं? मला खरं खरं उत्तर हवं आहे.”
त्यावेळी बरेचजण म्हणाले, याचं उत्तर देणं अवघड आहे. पण आम्ही स्त्रियांकडे बघतो,नाही असं नाही.पण प्रत्येकवेळी तीच भावना असते असं नाही.पण काहीवेळा जास्त वेळ बोलावं ,बघावं असंही वाटतं.पण स्त्रियाही पुरुषांकडे बघतातच ताई. यावर स्त्रिया काहीच म्हणाल्या नाहीत. स्त्रियांना वाटत नाही का? पुरुषांकडे बघावं, त्यांचं आकर्षण त्यांना वाटतं का? यावर स्त्रियांचं उत्तर होतं, “वाटत असेल,पण आम्हांला नाही वाटत.”
“स्त्री कोण आहे?”
ती बाई आहे, घरातलं सर्व करणारी, मुलांना जन्म देणारी माता आहे अशी अनेक उत्तरं आली.
त्यात एकजण म्हणाली, “मला नाही वाटत स्त्री कुठल्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी आहे. आज आपण बघतोच आहोत की, राष्ट्रपती, पंतप्रधान अशी उच्च पदे स्त्रियांनी भूषविले आहेत. देवाने स्त्रियांना पुरुषापेक्षा जास्त सहनशील बनवले असावे. तिच्यात दया , प्रेम, माया, ममता, वात्सल्य, त्याग असे गुण भरभरून भरले आहेत. मला मुलगी आहे याचा मला अभिमान आहे.”
तिचं हे सांगून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणून मी विचारले,मग स्त्री मध्ये जे गुण आहेत ते पुरुषाला उपयोगी नाहीत का? त्याला जर मायेची,प्रेमाची गरज आहे तर तोही कोणावर तरी प्रेम करू शकतो ना? त्याच्याकडे पण हे गुण असतील ना?
“ताई आम्ही पण आमच्या मुलांवर, आईवडिलांवर प्रेम करतोच, बायकोवरही प्रेम करतो. प्रेम, माया हे सगळ्यांमध्ये असणारे गुण आहे. त्यात अशी विभागणी करणे योग्य नाही.”
“बरोबरच आहे. म्हणजे पुरुषाकडे जसं आपण माणूस म्हणून पाहतो तसंच स्त्रियाही माणूस आहेत, एक व्यक्ती आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. जे हक्क, अधिकार व्यक्ती म्हणून पुरुषाकडे आहेत तेच स्त्रियांना असायला हवेत - असं तुम्हांला वाटतं का? ती तुमच्यासारखीच दमते, तिलाही कंटाळा येतो, तिचीही चिडचिड होते, पोरांचा दंगा नको वाटतो. हे तुम्हांला जाणवते का?त्यासाठी तुम्ही काय करता? काही करावं वाटतं का? मुळात घर,संसार दोघांचा आहे तर घरात सुद्धा आपण तिच्या बरोबर काम करू या असं तुम्हांला वाटतं का? तिच्याकडे तुम्ही व्यक्ती म्हणून पाहता का? हे महत्वाचे. तिच्या नजरेने जगाकडे पाह्यला लागलो की समस्या कळतील आणि त्यांची उत्तरे सापडतील.”
गप्पा संपल्या नंतर जे जोडीने त्या संमेलनाला आले होते, ते येऊन भेटले आणि म्हणायला लागले – “तुम्ही आमच्या घरी या आणि बघाच मी कसा चहा करतो. तुम्हांला माझ्याच हातचा चहा पाजतो!”
तेवढ्यात त्यांची पत्नी म्हणाली, “आज घरी गेल्यावर माझ्यासाठी चहा करा, म्हणजे सराव होईल!”