कॅलिडोस्कोप


समाजातल्या आपल्या स्थानामुळे तयार झालेली ओळख आपल्या लिंगभावाशी इतकी घट्ट चिकटलेली असते की आपल्याला निवडीला फारसा वाव नसतो.माझी स्वत:ची जी ओळख आहे, त्यात काही अंतर्विरोध आहेत का ? 

‘जेंडर आणि आयडेंटिटी’ संदर्भात विचार करायचा तर केवळ पुरुष आणि बाई किंवा उभयलिंगी एवढेच त्याचे कप्पे पाडून चालणार नाही. जेंडरशी जोडलेल्या माझ्या आयडेंटिटीत मी केवळ स्त्री नसते. तर मी एक उच्चजातीय, मध्यमवर्गीय स्त्री आहे. माझ्या उच्चजातीय, मध्यमवर्गीय स्त्री असण्याचे मला अनेक फायदे मिळतात. अनेक विशेषाधिकार मिळतात. त्यात माझ्या प्रोफेशनचीही भर पडते. मी एक पत्रकार आहे. त्यातही स्त्रीवादी पत्रकार. ही ओळख सांगणं मला अभिमानाचं वाटतं; किंबहुना मी सांगितलं नाही तरी माझ्या लिखाणातून, वावरातून, रोजच्या जगण्यातून ते दिसतं. आता याचे जसे अनेक फायदे आहेत, तसे काही तोटेदेखील आहेत. पण भौतिक फायद्यांच्या तुलनेत तोटे तितके मोठे वाटत नाहीत. उदा. ‘स्त्रीवादी’ हे लेबल अनेकदा उपरोधाने, नकारात्मकरित्याही वापरलं जातं. याहीपेक्षा गंमतीचं उदाहरण म्हणजे मी एकदा टिंडर या डेटिंग एपवर माझं अकाउंट उघडलं. तिथं मला आवडलेल्या एका मुलाशी मी चॅट करत होते. तर त्याने मला माझे काही फोटोज पाठवायला सांगितले. एखाददोन फोटो पाठवायला माझी हरकत नव्हती. मी ते पाठवल्यावर आमचं पुढे आणखी बोलणं झालं. बोलताबोलता मी ‘स्त्रीवादी’ असल्याचं त्याला कळलं. एकतर मी पेशाने पत्रकार, त्यात स्त्रीवादी...तो मुलगा मला विचारू लागला, ‘तू खरंच इथे डेटिंगसाठी आलीयेस ना ? काही स्टिंग वगेरे करत नाहीयेस ना? हे कुठे छापणार नाहीस ना...मला भीती वाटतेय.’ मला हसावं की रडावं हेच कळेना. मग मी त्याला खूप विश्वास देण्याचा प्रयत्न केला की, मी इथे फक्त डेटिंगसाठी आलेय. तरी त्याला ते पटेचना. त्याने पुढे माझ्याशी बोलायचंच सोडून दिलं. अर्थात स्त्रीवादी पत्रकारांबाबत असलेल्या अनेक गैरसमजांमुळे असा प्रकार घडला असावा, असाच माझा कयास आहे. चांगला मुलगा हातून गेल्याची चूटपूटही लागली पण आपल्या एका विशिष्ट ओळखीमुळे लोकांना आपला भीतीयुक्त आदर वाटतो हे पाहून मला गंमतही वाटली.
माझ्या एक वकील मैत्रिणीचं अनेक वर्षांपासून लग्न ठरत नाहीये. पारंपरिक लग्नव्यवस्थेला लागणाऱ्या सर्व घटकांत ती फिट बसत असली तरीही… कारण ती वकील आहे. अनेक नातेवाईकांनी तर तिला प्रोफेशन बदलण्याची सूचना केली. वकील मुलगी कोर्टात जसे युक्तीवाद करते, तसं ती सासरी सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला प्रत्यूत्तर करेल की काय, या भीतीपोटी हे नकार दिले जातात, असं ती सांगते. पण हेच एखादा विवाहोत्सुक मुलगा जर वकिलीचा व्यवसाय करत असला, तर त्याला त्याचा व्यवसाय बदलायला सांगितला जातो, की त्याचं कौतुक केलं जातं? मग तरुण स्त्रियांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या भागाला आणि व्यावसायिक ओळखीला टाटा-बायबाय करावं ही अपेक्षा कशातून येते?
हे इतकंच नाही तर महिलांची ओळख केवळ किंवा नोकरदार महिला किंवा गृहिणी किंवा अमुक जात-धर्माची स्त्री इतक्याच कप्प्यात बंदिस्त केली जात नाही तर विवाहित महिला, अविवाहित महिला किंवा घटस्फोटित महिला, कुटुंब असलेल्या महिला, एकल महिला, सधवा - विधवा महिला, मूलबाळ असलेल्या महिला किंवा मूलबाळ नसलेल्या महिला अशीही केली जाते. किंबहुना लग्न, मुलंबाळं असणं नसणं हे सगळं बाईच्या आयडेंटिटीशी इतकं अभिन्नपणे जोडलं गेलेलं आहे की, सानिया मिर्झालाही एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरच्या मुलाखतीत, ‘तुझा लग्नाचा काय प्लॅन आहे आणि मग तू लग्न झाल्यावरही खेळत राहणार आहेस का?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यावर सानियाच्या उत्तरातून मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला आपली चूक लक्षात आल्यावर त्याने त्याच मुलाखतीत जाहीर माफीही मागितली होती. दुसरा एक प्रकार आढळतो तो बाई कितीही कर्तृत्ववान असली तरी तिची तुलना त्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान पुरुषाशी करायची. जसं मिताली राजला लेडी सचिन तेंडुलकर म्हंटलं जातं. आणि अलीकडेच ट्वीटरवर तापसी पन्नू या अभिनेत्रीला बॉलिवूडची ‘आयुषमान खुराणा’ म्हंटलं गेलं. त्यावर तापसीनं – ‘मी बॉलिवुडची तापसी पन्नू का नाही?’ असा सणसणीत सवाल केला. म्हणजे पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात बाईनं कर्तबगारीनं स्वत:चं स्थान निर्माण केलं की तिच्या कर्तबगारीचं मोजमाप करताना परिमाणंही पुन्हा पुरुषांची वापरायची. हे त्या स्त्रीच्या स्वत: निर्माण केलेल्या ओळखीवर आक्रमण करणारंच ठरतं. म्हणूनच मग पॉर्न स्टार ही ओळख नावामागे चिकटलेली सनी लिऑन ही अभिनेत्री चांगली आई वा पालक ठरू शकत नाही.
याशिवाय एक वेगळाच मुद्दा इथं अधोरेखित करणं महत्वाचं वाटतं. आपल्या समाजात स्त्रियांना स्वीकाराव्या लागलेल्या काही व्यवसायांना प्रतिष्ठा वा समाजमान्यता नाही. उघडपणे वेश्या व्यवसाय करत असलेली स्त्री आपल्या मुला-मुलीच्या शाळेतल्या पॅरेंट्स - टीचर असोसिएशनची अध्यक्ष बनू शकते का? समजा तिने तो व्यवसाय सोडला असला, तरी जर तिच्याबाबत आजूबाजूच्या लोकांना ही माहिती असली आणि तिची अध्यक्ष होण्याची पात्रता जरी असली तरी तिला ते पद मिळेल का? इथं तिनं स्वत: आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला तरी सामूहिक स्मृतींमध्ये असलेली तिची ओळख इतकी अमीट असते, की तिची त्या सार्वजनिक स्मृतींच्या कचाट्यातून सुटका नसते.
असंच एक अलीकडच्या काळातलं मोठं उदाहरण मिया खलिफा या अमेरिकन-लेबनीज क्रीडा समालोचकाचं. ती पुर्वी पॉर्न स्टार म्हणून काम करत होती, इतकंच कशाला आता तिनं ते काम पूर्णपणे बंद केलं असलं आणि गुगलवर तिच्याबद्दलची माहिती शोधल्यावर तिच्या बायो-डिटेल्समध्ये ती स्पोर्ट्स कमेंटेटर असल्याचा उल्लेख आपल्याला सापडला तरी आपण मिया खलिफा म्हंटल्यावर.. ‘पॉर्न स्टार ना?’..असंच म्हणतो. तिच्या पुर्वीच्या कामातून पूर्णपणे बाहेर पडून वेगवेगळ्या थेरपी, मानसोपचार घेऊन तिनं नव्या आयुष्याला सुरूवात केली असली तरी अजूनही ती सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक जबरदस्ती तिच्यासोबत फोटो काढून घ्यायचा प्रयत्न करतात. तिच्या संमतीशिवाय तिच्या अंगाला हात लावतात. हे एखाद्या पुरुष पॉर्न स्टारसोबत किंवा माजी पुरुष पॉर्न स्टारसोबत घडल्याचं ऐकिवात आहे आपल्या? मिया तिच्या एका मुलाखतीत म्हणते, ‘मी कधीकाळी पॉर्नस्टार होते. ही ओळख मी पुसून टाकण्याचा प्रयत्न करतेय. मी शक्य तितके माझे विडिओही इंटरनेटवरून हटवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी अजूनही कायदेशीर लढा लढतेय. पण लोक मात्र मला माझी ही ओळख विसरू द्यायला तयार नाहीत.’
समाजातल्या आपल्या स्थानामुळे तयार झालेली ओळख आपल्या लिंगभावाशी इतकी घट्ट चिकटलेली असते की आपल्याला निवडीला फारसा वाव नसतो. त्यात बदल करणं तर कमालीचं अवघड असतं. माझी स्वत:ची जी ओळख आहे, त्यात काही अंतर्विरोध आहेत का ? याचाही विचार मी ‘जेंडर आणि आयडेंटिटी’ या मुद्द्यावर लिहायच्या निमित्ताने करू शकले. मला स्वत:सकट समाजातल्या सर्व घटकांमधल्या महिलांच्या आयडेंटिटीबद्दल प्रश्न पडले. अर्थात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असं नाही, पण हे प्रश्न पडणं आणि डोळसपणे त्याचा विचार करणं याची सुरूवात तरी या थीमवर काहीतरी लिहिण्याच्या निमित्तानं झाली, हेही मला महत्वाचं वाटतं!

प्रियांका तुपे


1 Comments

Previous Post Next Post

Contact Form