स्त्रीवादी जडणघडण

मला पाच वर्षांपूर्वी जर कोणी विचारलं असतं की तू स्त्रीवादी आहेस का? तर मला उत्तर देता आलं असतं की नाही शंका आहे. म्हणजे माझे विचार जरी स्त्रीवादी असले तरी स्त्रीवाद म्हणजे नक्की काय असं मला माहिती नव्हतं.
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ नाटकाच्या निमित्ताने वंदना खरेची ओळख झाली आणि तालमीच्या दरम्यान आमच्या चर्चा होत गेल्या; तेव्हा हळूहळू स्त्रीवादाचे अनेक पैलू मला लक्षात आले. तेव्हा माझ्या जगण्यातल्या काही गोष्टी स्त्रीवादी आहेत याचा मला शोध लागला. मला तेव्हा कुठलीही स्त्रीवादाची थिअरी माहिती नव्हती आणि आजही मला खूपच कमी माहिती आहे. मी मोठी होत होते तेव्हा स्त्रीवाद हा शब्दही मला माहिती नव्हता, पण मागे वळून बघताना मला वाटतं की स्त्रीवादी विचार तेव्हाच रुजू लागले होते ज्याला आता हे नाव मिळाले आहे!
मला अजूनही आठवते की लहान असताना माझ्या आईने सांगितलेले - अन्याय सहन करायचा नाही आणि अन्याय करायचा पण नाही! तसेच ती नेहमी सांगायची की तुला जे पटेल ते कर कोणी सांगितले म्हणून किंवा जबरदस्ती करतंय म्हणून करू नको…आणि आजतागायत मी तशीच वागते. कॉलेजमध्ये असताना पाहिजे ते कोर्सेस निवडण्याचे स्वातंत्र्य मला होते, तसेच सातच्या आत घरात असले पाहिजे हा नियमही मला नव्हता. अर्थात तेव्हा उशिरापर्यंत बाहेर काम नसे. पण कामानिमित्त बाहेर राहिला तर कधीच कोणी रागवले नाही किंवा कुठे होते म्हणून संशय पण घेतला नाही. या विश्वासामुळे आज मुलगी, बायको, आई ह्या शिवाय मला माझे स्वतंत्र अस्तित्व आहे... पुण्यामध्ये नागपूरपेक्षा प्रगत वातावरण होते. पण बाहेर जरी प्रगत वातावरण नसले तरी घरी सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्यायला प्रोत्साहन व स्वातंत्र्य मिळाले याचे सगळे श्रेय मी माझ्या आईला देते. माझ्याशी तिचे संबंध खूप मैत्रीचे होते तसेच माझ्या बहिणीशी पण आहेत आणि मला वाटतं बायकांची एकमेकिशी मैत्री - हा स्त्रीवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही दोघीजणी एकमेकींशी कुठल्याही गोष्टी शेअर करू शकतो आणि एकमेकींच्या सगळ्या गोष्टींना आमचा सपोर्ट असतो. त्यामुळे मी जरी कुठेही कामानिमित्त असले तरी मला माझी बहीण माझ्याबरोबर आहे, तसेच माझ्या मुलीपण माझ्याबरोबर आहेत - माझा नवरा माझ्याबरोबर आहे या गोष्टींचा खूप आधार असतो आणि त्यामुळे मला strength मिळालेली आहे !
लग्नानंतर माझे आडनाव बदलले पण आजपर्यंत मला मंगळसूत्र किंवा कुंकू या गोष्टींची कधी कोणी जबरदस्ती केले नाही आणि मी ते ठामपणे मांडू शकते. मला वाटलं तर मी मंगळसूत्र घालीन किंवा कुंकू लावीन पण ती माझ्यावर जबरदस्ती नाहीये. हे ठामपणे म्हणायला मला माझ्या upbringing मुळे ताकद मिळाली आहे.
हे विचार मला ठामपणे मांडू शकण्याची ताकद मिळाली यात मला मिळालेल्या अनेक प्रिविलेजेस् चा देखील प्रभाव आहे! माझी आई त्या काळात बी. ए. झाली होती. ती लग्नानंतर शिकली आणि तिला शिक्षणाचं खूप महत्त्व वाटत असे. घरात शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे तसंच कदाचित ब्राह्मण असल्यामुळे जातीचा एक फायदा मिळतो तो मला मिळाला. तसेच आर्थिकदृष्ट्या पण मला शिकण्याकरता कधी अडचण आली नाही त्यामुळेही मला ठामपणे उभा राहता आलं असं मला वाटतं.
मी स्त्रीवादी आहे कारण मी मानवतावादी आहे. मी जात, धर्म यापेक्षा माणूस महत्त्वाचा मानते. मी स्त्रीवादी आहे कारण पुरुषप्रधान संस्कृतीत ज्या चुका पुरुष करतात त्या स्त्रियांनी करण्याला माझा विरोध आहे माझा समानतेवर विश्वास आहे. स्त्रीवादाचे अनेक निकष आहेत. त्यानुसार स्त्रीवादी म्हणून मी जे जगायला पाहिजे त्यात मला वाटतं काही गोष्टी मी अजूनही करू शकत नाही. म्हणजे घरगुती कार्यक्रमांमध्ये अजूनही कधीतरी मला असे वाटते की मुलींनी थोडे ट्रॅडिशनल ड्रेस घालावे. किंवा आजही मला मुली रात्री लवकर घरी आल्या नाहीत तर काळजी वाटते. मी त्यांना सांगते की तुम्ही खूप उशिरापर्यंत राहू नका मला भीती वाटते! माझ्या वागण्यात आणखीही काही विरोधाभास असतील.
पण मी माझ्या विचारांनी जगू शकते माझे विचार ठामपणे मांडू शकते आणि त्याच्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो मला स्त्रीवादी असल्यामुळे मिळाला असं वाटतं. मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे पंधरा वर्ष एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम केलं पण त्याच्यानंतर मला अभिनयाच्या क्षेत्रात काहीतरी करावे असे वाटू लागले आणि मी त्या क्षेत्रात उतरले. हे करण्यासाठी जे बळ लागतं ते मला स्त्रीवादाने दिले. हे काम स्त्रियांचे आणि ते पुरुषांचे असे कुठल्याही कामाचे मी वर्गीकरण करत नाही आणि तसेच वाटते यात माझ्या नवऱ्याचा आणि मुलींचा पण महत्त्वाचा सहभाग आहे. माझा नवरा माझा चांगला मित्र आहे आणि कुठल्याही बाबतीत पुरुष म्हणून वर्चस्व गाजवत नाही. मला वाटतं माझ्या स्त्रीवादी असण्यामुळे त्याच्यावर जो पुरुषप्रधान संस्कृतीचा जो पगडा होता तो त्याला बाजूला ठेवावा लागला आणि त्याच्यामुळे आमचे नाते हेल्दी आहे. स्त्रीवादी असण्याचे असे अनेक फायदे हे मला जगताना मिळाले आहेत तसेच काही तोटे पण आहेत. जसं स्त्रीवादी म्हटलं की बाहेर बहुतेक सगळ्यांचे चेहरे बदलतात. बापरे आता ही काहीतरी सांगणार, आपल्याला पाहिजे तसं वागू देणार नाही, बोलू देणार नाही - असं काहीतरी लोकांना वाटतं. पण तो आता आयुष्याचा भाग झालाय आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे.


अंजली जोशी



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form