व्यक्ती ते समष्टी

जुनिअर कॉलेज सावंतवाडी येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करते. गेली काही वर्षे मी सातत्याने कविता, कथा, लेख यांचे लेखन करते. ते करत असतांना माझ्या लिखाणातून कुणाला स्त्रीवाद तर कुणाला समाजवाद आढळू लागला. खरं तर कुठलाही लेखक ठरवून लिखाण करत नाही. त्याच्या अंतर्मनातील उमाळे साहित्यात उतरत असतात. तसं माझ्या बाबतीत घडत गेलं. माझ्या व्यक्तिगत जीवनाकडे कुणी पाहीलं तर फार काही अन्यायग्रस्त स्त्री आहे असे कुणालाही जाणवू नये असे माझे सर्वसामान्य जीवन आहे. पण लेखन करत असतांना माझ्यामधली अन्यायाविरुद्धची चीड सतत कागदावर उतरत असते.
माझ्या स्त्रीवादी होण्याची पाळंमुळं शोधायची तर, मला हायस्कूलमध्ये असताना चित्रा पोंक्षे नावाच्या बाई होत्या. त्या स्वत: स्त्रीवादी होत्या. त्यांनी आम्हाला नववीत असताना रजनी परुळेकर यांची कविता शिकवतांना स्त्रीवादाची जाणीव करून दिली होती. पण तेव्हा स्त्रीवाद हा शब्द समजण्याइतपत माझी वैचारिक समज नव्हती. पण जेव्हा मी साहित्याचा अभ्यास करू लागले तेव्हा इंग्रजी साहित्यातील फेमिनिझम आणि मराठी साहित्यातील स्त्रीवाद मला कळू लागला.
वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील बायका परिस्थितीच्या जोखडाखाली गुदमरताहेत हे मी पाहत आहे. त्यांच्यावर होणारा अन्यायाविरुद्ध आवाज का उठवला जात नाही, हा प्रश्न मला अस्वथ करायचा. नंतर चारदोन शहरी बायका तेवढ्या स्वत:पुरता स्त्रीवाद घेऊन जगताहेत हे दृश्य माझ्या नजरेसमोर आले. माझ्या शेजारच्या कष्टकरी बायका म्हणजे फुलवाली, भाजीवाली, मासेवाली या दारुड्या नवऱ्याच्या जाचाला सामोरे जात एकट्याच संसाराचा गाडा चालवताना मला दिसू लागल्या. नोकरी करणाऱ्या बायकांची परिस्थिती याहून काही वेगळी आहे असे मला वाटत नाही. घरकाम करणाऱ्या बायकांइतकंच त्यांना घरात दुय्यम स्थान दिलं जातं हे मी पाहिलं. स्त्रियांचं वेगवेगळ्या पातळीवर होत असलेलं शोषण बघून माझा अस्वस्थपणा वाढत गेला. माझी ही तगमग कवितेमधून बाहेर पडू लागली. कवितेत न बांधता येणारं संचित, मी ललित वैचारिक लेख, कथा यामधून मी प्रकट करू लागले. एका भाजी विकणाऱ्या बाईने माझे तरुण भारतमधील लेख वाचले व मला म्हणाली, तुम्ही “आमच्यासाठी लिहीत चला”. तिने माझे काही लेख आपल्यासारख्या बऱ्याच कष्टकरी स्त्री पुरुषांना वाचायला दिले. खंत एवढीच वाटते उच्चशिक्षित आणि स्वत:च्या अंतर्विश्वात रमणाऱ्या बायका स्त्रीवादाकडे पुरुषी नजरेने बघतात. तर पुरुष स्त्रीवादाकदे स्वैर आणि चंगळवादी बायकांची चळवळ म्हणून पाहतात. म्हणूनच भारतीय तथाकथित संस्कृतीला नजरेसमोर ठेऊन लिंगभेदाच्या पलीकडे जाणाऱ्या मानवतावादी स्त्रीवाद या अंगाने मी लेखन करायचे ठरवले आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा स्त्री आणि पुरुष दोघांकडूनही सारखाच आहे. मला मी स्त्रीवादी असल्याचा अभिमान वाटतो.

श्वेतल परब 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form