... म्हणून मी स्त्रीवादी आहे

संविधानात 'समानता' ह्या मूल्याचा समावेश करताना, संविधानकारांनी मानवतावादी दृष्टिकोनातून समाजरचना होण्यावर विश्वास दाखवला. महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर भारत असतांना नोकरी, व्यवसाय, कामाची ठिकाणे इथे हे मूल्य कायद्या च्या मदतीने आणता हि येईल पण नात्यांमध्ये तशी समानता आहे का? ह्या सगळ्यांच्या मुळाशी मानवतावादी भावना आपल्या मनात आहे का ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून हि नकारार्थी असतील तर - मी स्त्रीवादी आहे.
जेंडर हि बायोलॉजिकल कन्सेप्ट आहे पण लिंगभाव सामाजिक आहे. नाहीतर जन्मत:च मुली वेण्या घालून आणि मुले दाढी मिश्या घेऊन जन्माला आले असते. त्यांच्या मध्ये असलेला जीवशास्त्रीय भेद त्यांच्या माणूस ह्या आयडेंटिटीलाच मारून टाकत असेल तर ह्या समाजाचे स्क्रिप्ट (स्त्री आणि पुरुष दोघांचेही) चुकीच्याच पद्धतीने चालले आहे. फक्त कायदे करून आणि कायद्यात बदल करून काहीही साध्य होणार नाही. पितृसत्ताक मानसिकतेच्या अंधारात चाचपडणाऱ्या ह्या समाजाला स्त्रीवादी मशालींची गरज आहे. भारतीय स्त्री जीवन आज हि दोन टोकांना दोन पद्धतीचे आहे. एका टोकाला माध्यमातील स्त्री विकृत, कर्कशश , भांडखोर स्त्रिया किंवा अर्धनग्न अशी दाखवली जाते. तर दुसऱ्या टोकाला उपास-तापास, व्रत वैकल्ये, सौभाग्य अलंकार घालून पूजाअर्चा करणे त्याचप्रमाणे व्यसनाधीन नवऱ्याला सांभाळून घर चालवणाऱ्या गरीब स्त्रिया. हे दोन टोकाचे स्त्रीजीवन मध्याकडे आणण्याच्ये महत्वाचे काम आजची स्त्रीवादी चळवळ करत आहे. स्त्रीयांना 'माणूस' म्हणून प्रबोधनात्मक विचार करायला लावणे, हे महत्वाचे आणि अतिशय गरजेचे कार्य हि चळवळ करते आहे.
बऱ्याचदा स्त्री-पुरुष समानता म्हणजे पुरुषाची बरोबरी, तुलना, अनुकरण असे काहीसे चित्र तयार करण्यात काही मंडळी विशेष रस दाखवतात. त्यातच जाहिराती आणि मार्केटिंग तंत्रे स्त्रीमुक्ती, स्त्रीवादी चळवळी ह्या गोष्टी कालवून त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करतात. म्हणून आता - 'स्त्रीवाद म्हणजे माणूसपणाचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न' असा हेतू अधोरेखित करणे जास्त महत्त्वाचे झाले आहे!


 डॉ. सीमा घंगाळे 


1 Comments

  1. स्त्रीवाद म्हणजे माणूसपणाचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न' - हे नेमके आणि समर्पक आहे

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form