लग्नाआधीच्या मेडिकल टेस्टस्

‘शादी ऐसा लडडू है, जो खाये तो भी पछताए, न खाये तो भी पछताए’ - असे म्हणतात.लग्न हा जुगार आहे असेही म्हटले जाते. जुगारात रिस्क असते, तशीच लग्नातही असते. कदाचित लग्नातला धोका कमी व्हावा, म्हणून काही लोक ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात. पण त्याऐवजी काही मेडिकल टेस्टस लग्नाआधीच केल्या तर पुढचे धोके आधीच लक्षात येऊ शकतात आणि त्यानुसार निर्णय घेता येतो. काही लॅबोरेटरीज हल्ली अशा विविध चाचण्यांचे पॅकेजसुद्धा देतात. त्यात अनेक सर्वसामान्य आरोग्य चाचण्या सुद्धा असतात. पण त्यातल्या कोणत्या टेस्टस् लग्नाच्या दृष्टीने खरोखर गरजेच्या असतात, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.


पितृसत्ताक पद्धतीत लग्नानंतर जोडप्याला मुले व्हावी अशी अपेक्षा असतेच. काही टेस्टस त्या दृष्टीनेही आवश्यक आहेत.
  • आजकाल कमी वयात डायबेटिस होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच काही जन्मतः होणारे आजार, स्थूलपणा, PCOD सारखे आजार ह्यामुळे मूल होत नाही. त्याची चाचणी आधी केल्यास पुढचा मानसिक त्रास टळू शकतो. एखाद्या कुटुंबात डायबेटीस, हार्टचे आजार, दमा वगैरे असेल तर आधीच लग्नाला नकार देता येऊ शकतो किंवा पहिल्यापासून काळजी घेता येते.
  • ब्लडग्रुप - रक्ताचे A, B, AB आणि O हे चार ब्लड ग्रुप असतात. नवरा बायकोचे हे रक्तगट वेगवेगळे असले तरी विशेष फरक पडत नाही. मात्र त्यातला Rh फॅक्टर काही गंभीर परिणाम निर्माण करू शकतो. जर आईचा rh निगेटिव्ह असेल आणि वडिलांचा Rh पॉझिटिव्ह असेल तर मुलाचा Rh बरेचदा पॉझिटिव्ह असतो. डिलिव्हरी नंतर आईच्या रक्तात असे काही बदल होतात की जर पुढचेही मूलRh पॉझिटिव्ह झाले तर त्याच्या तांबड्या पेशी वेगाने नष्ट होतात व मृत्यूही येऊ शकतो. अर्थात ह्यावर उपाय नक्कीच आहेत. मात्र लग्नाआधीच हे माहिती असेल तर गर्भारपणाच्या सुरुवातीपासूनच काळजी घेता येते.
  • जर नात्यात लग्न होत असेल तर त्या जोडप्याच्या मुलांना काही जेनेटिक आजार (उदा थालॅसेमिया) होण्याची शक्यता वाढते. अश्या वेळी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफॉरेसिस ही टेस्ट उपयुक्त ठरते.
  • पूर्वीच्या काळी लग्नाआधी शरीरसंबंध क्वचित होत असत. आता मात्र सर्रास बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ह्या नात्यात लग्नापूर्वी सेक्स केला जातो. त्यात ब्रेकअप होऊ शकतो, मग दुसरा जोडीदार निवडण्याचा विचार होतो. तसेच मुलगे कमर्शियल सेक्सवर्कर्स कडे सुद्धा गेलेले असू शकतात. म्हणून HIV आणि गुप्तरोगासाठी VDRL ह्या टेस्टस करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बरीच फसवणूक आणि शारीरिक, मानसिक त्रास वाचू शकतो.
  • मानसिक आरोग्य - कधीकधी मुलाला किंवा मुलीला मानसिक रोग असतो पण तो लपवून ठेवला जातो आणि नंतर खूप त्रास होतो आणि पैशांचा चुराडा होतो. त्यामुळे दोघांनी सायकॉलॉजिस्टकडे जाऊन counselling घ्यावे.
  • समलिंगी संबंध – जरी एखादी व्यक्ती समलिंगी असेल तरी आईवडील जबरदस्तीने आपल्या पाल्याचे लग्न लावू बघतात. आता असेही संबंध कायदेशीर झाले आहेत. पण ह्या सर्व गोष्टींची मोकळेपणाने बोलून खात्री करून घेतलीच पाहिजे.
काही लोक लग्नाआधी फर्टिलिटी टेस्ट करावी असं सुचवतात, पण मला ते योग्य वाटत नाही. कित्येकदा दोघांमध्ये काही दोष नसूनही मूल होत नाही. मुलीला व्यवस्थित पाळी येत असेल तर लग्नाआधी तिची आणखी कुठली टेस्ट करायची गरज नाही. जर लग्नानंतर जोडप्याला शरीरसंबंध नीट जमत असेल आणि ते कुठलही गर्भनिरोधक न वापरता संबंध ठेवत असतील तरीही एक वर्षात दिवस गेले नाहीत तेव्हाच त्याला infertility म्हणतात. अशावेळी पुरुषाची वीर्य तपासणी आणि स्त्रीच्या बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात. लग्ना आधी स्त्रीच्या एवढ्या टेस्ट करतच नाहीत. पुरुषाला सेक्स करता न येणे, म्हणजे Impotence हे घटस्फोटाचे कारण असू शकते पण तोही जोडीदारासापेक्ष असतो. त्यामुळे ह्या बाबतीत लग्नाआधी खरोखर काही करायला हवे असेल तर ते म्हणजे सेक्सविषयी counselling. पण आपल्याकडे लैंगिकता शिक्षणाविषयी खूप गैरसमज असतात.

काहीवेळा अगदी प्रेमविवाह झाल्यावरही मुलाचा व्यसनीपणा लक्षात येतो. ठरवून केलेल्या विवाहात तर आईवडील सर्व माहीत असूनही आपला मुलगा सुधारेल, ह्या आशेने मुलीला फसवून लग्न करून देतात. नंतर तिचे आयुष्य मात्र बरबाद होते. ज्या व्यक्तीशी लग्न करायचे त्यांची नीट चौकशी करणे, सवयी, वागणे बोलणे ह्याचे निरीक्षण करणे आणि डॉक्टरकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. पूर्ण खात्री झाल्याशिवाय लग्न करू नये. लग्न थरवण्याच्या प्रक्रियेत कधीही आक्षेपार्ह गोष्टी लक्षात आल्या तर वेळेवारी त्या नात्याचा पुनर्विचार करावा. पण जर दोघांना मान्य असेल तर अनेक अडचणींवर मात करूनही जोडपी आनंदाने राहू शकतात.
 
‘मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी’ - नाही का ?

#premaritalscreening #health #premaritalhealthcheckup

डॉ.मंजिरी मणेरीकर

 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form