मी आणि माझ्या अपेक्षा

कुणीही लग्न करायला तयार आहे असं सांगितलं कि पहिला प्रश्न विचारला जातो “मग कशी हवी मुलगी/मुलगा?” त्याला बहुतांशीवेळा असं उत्तर येत- “माझ्या काही फार अपेक्षा,अटी नाहीत. जोडीदार मला अनुरुप असावा आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जोडीदार आणि कुटुंबातली माणसं चांगली असावीत.” असं म्हणणारे (आणि स्वतःला आधुनिक, खुल्या वृत्तीचे मानणारे) लोकही - अधिक बोलणं झालं की ढोबळ शब्दांत द़डलेल्या अपेक्षा, अटी सांगू लागतात. आम्हाला तेव्हा जाणवतं की यांनी स्वतःकडे डोळसपणे पाहिलेलंच नाही. ना बाह्य रुपरंगाकडे, ना शैक्षणिक-आर्थिक-कौटुंबिक-सामाजिक वास्तवाकडे. अरेंज्ड मॅरेज ही प्रथम आणि बहुतांशी प्रमाणात एक व्यावहारिक अरेंजमेंट आहे.
अरेंज्ड किंवा परिचयोत्तर विवाहात ‘माझ्या काहीच अपेक्षा नाहीत’ हे तितकंसं खरं नसतं.नाहीतर आलेल्या पहिल्याच प्रपोजलला हो म्हणून पटापट लग्न जुळली असती.खूप वर्षं शोध घेत राहूनही लग्न जुळत नाही म्हणून कंटाळलेले,निराश झालेले लोक खूप संख्येनं दिसताहेत. त्यांचं लग्न न जुळण्याचं महत्वाचं कारण हे त्यांच्या अवास्तव अपेक्षांमधे असतं किंवा त्यांचं रंग-रूप,वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक वास्तव सर्वसामान्यांसारखं नसतं, सर्वसामान्यांना स्वीकारायला अवघड असं काहीतरी असतं.(खुलासा-पुढे दिलेल्या उदाहरणात कुणाच्याही रंग-रूप-वैशिष्ट्यांना कमी लेखायचा हेतू नाही.वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आहे.)

स्वओळख करून घेतल्यावर त्याचा संदर्भ घेत आपल्या अपेक्षा स्पष्ट करून घेणं महत्वाचं. मला अमुक तमुक हवं किंवा नको असं आपण कितीही म्हटलं तरी समाजात अपेक्षांच्या जुळणीचे काय अनुभव दिसतात हे डोळसपणे पाहणं आवश्यक असतं. ‘रूपावरून/जाती-धर्मावरून/आर्थिक स्तरावरून माणसाचा चांगुलपणा ओळखता येत नाही.’ हे तत्वतः कितीही योग्य असलं तरी बहुतांशी मुलांना ‘गोरी-उजळ बायको हवी’, ‘जोडीदार शक्यतो आपल्या जाती-धर्माचा-क्लासचा असावा’ असं जर समाजवास्तव असेल तर ‘ते तसं का आहे? ते अन्याय्य आहे’ असं म्हणत बसण्यानी काहीच साध्य होणार नाही.आपलं रूप स्वीकारणारा, समाजमान्य अपेक्षांना किंमत न देणारा/री येईपर्यंत वाट बघावी लागेल ना!

जेमतेम साडेचारफूट उंची असलेली,शिक्षित,नोकरी करणारी नीलम मनासारखी स्थळं येत नाहीत म्हणून कंटाळलेली.आपण सर्वसामान्य लोकांपेक्षा बुटक्या आहोत याची ती कबुली देत असे पण ते स्वीकारून तसाच मुलगा शोधणं किंवा इतर कुठल्या पैलूंबाबत सर्वसामान्यांपेक्षा वेगळेपण स्वीकारण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. ‘नॉर्मल मुलगा मला मिळेल’ असा तिला आधी आधी विश्वास होता मग ती अपेक्षा झाली. एखाद्या समाजात मुली फार शिकत नाहीत हे वास्तव असेल तर त्या समाजातल्या विनयनं ‘माझ्याच समाजातली माझ्यासारखी उच्चशिक्षित अनुरुप मुलगी पाहिजे’ अशी अपेक्षा ठेवणं अवास्तव ठरेल. उदाहरण म्हणून हे पाहाताना आपल्या अपेक्षांबद्दल इतकाही विचार न करणारी माणसं असतात हे वाचकांना विनोदी वाटेल पण अशी उदाहरणं भेटतात.

फोन वरून सल्ला मागणाऱ्या कोल्हापूरच्या अश्लेषाचं उदाहरणच बघा. पुण्याच्या एका मुलाच्या बाबतीत ‘ऑन पेपर’ म्हणतात तसं सगळं जुळत होतं.त्यानं होकार दिला होता. तिच्या घरच्यांना मुलगा खूप योग्य वाटत होता म्हणून ते तिच्या होकाराच्या अपेक्षेत होते. ती त्याला दोन तीनदा भेटलीही होती. तिला पुण्यात मिळू शकणाऱ्या नोकरीसाठी तो घराचं ठिकाण बदलायला तयार होता. त्याच्याबरोबर बोलताना तिला संकोचल्यासारखं वाटत नव्हतं, मोकळेपणा वाटत होता.इत्यादी माहिती तिनं दिली. तिचं मन तिला हो म्हणू देत नव्हतं. तिला सल्ला हवा होता. त्या संवादात तिनं मला विचारलं, “तो फारच बारीक अंगकाठीचा आहे. म्हणून मला होकार द्यायला नको वाटतंय. सलमान खान वगैरे जसे सिनेमांसाठी वजन कमी जास्त करतात तसं मी त्याला जिम लावून वजन वाढवायला सांगू का?” या पुढचा संवाद माझ्यासाठी मनोरंजक पण तिच्यासाठी गंभीर आणि शिकायला मदत करणारा होता.मी टप्प्याटप्प्यानं तिला पुढील प्रश्न विचारले “प्रयत्न करूनही त्याचं वजन वाढलं नाही तर? आत्ता वाढलं पण पुन्हा त्याच्या नैसर्गिक स्थितीला तो गेला तर? त्याच्याशी अनुरूप ठरण्यासाठी त्यांनं तुला बारीक व्हायला सांगितलं तर?” यावर खरी गोष्ट बाहेर आली. अश्लेषा स्वतः रूढ मानानं स्थूलपणाकडे झुकणारी होती आणि तिला आत्तापर्यंत याच कारणासाठी नकार आले होते आणि तिला वजन कमी करता आलेलं नव्हतं.इथे प्रश्न अश्लेषानं त्या मुलाला होकार द्यावा का? दिला का नाही दिला? हा मुद्दा नाहीये तर मुलं/मुली कसा अव्यवहार्य विचार करू शकतात,त्यांच्या अपेक्षांवर कशाकशाचा आणि किती पगडा असतो त्याचा आहे.तेव्हा आपल्या अपेक्षा वास्तवाच्या कसोटीवर तपासून त्यातलं माझं किती,माझ्या कुटुंबाचा प्रभाव किती,मित्रमंडळी,समाज,संपर्कमाध्यमं यांचा प्रभाव किती हेही आता तपासावं लागेल.
यासाठी तज्ञ मंडळी ट्रॅफिक सिग्नलची पद्धती वापरायला सांगतात.
उदाहरणार्थ १.एखाद्या मुलीला सिगारेट ओढणारा जोडीदार आजिबात नकोच असेल. २.एखाद्या मुलाला बदलीची शक्यता असलेल्या नोकरीतली मुलगी नको असेल. या अपेक्षा लाल सिग्नल खाली येतील.पिवळ्या सिग्नलचं उदाहरण- १. एखाद्या मुलाला ‘औपचारिक शिक्षण कितीही कमीजास्त असलं तरी फारसा फरक पडत नाही मुलीचा आर्थिक-मिळकत स्तर साधारण माझ्या आत्ताच्या स्तराच्या थोडा खाली-वर असावा’ असं वाटेल. २.मुलगा एकत्र कुटुंबातला किंवा विभक्त कुटुंब करू इच्छिणारा कसाही चालेल ही अपेक्षा. हिरव्या सिग्नलचं उदाहरण- १. ‘मी उच्च शिक्षित आहे तर माझा जोडीदारही उच्चशिक्षित द्विपदवीधर हवा’ हे किंवा २.‘मी आणि माझं कुटुंब अनेक पिढ्या मोठ्या शहरात वाढलेलं आहे तेव्हा मुलगीही मोठ्या शहरात वाढलेली हवी’. (हिरव्या आणि लाल खाली येणाऱ्या अपेक्षा शब्द-वाक्य रचना बदलली की जागा बदलतील हे लक्षात आलंच असेल) ही पद्धत वापरून अपेक्षा मांडल्या की आपण आपल्या अपेक्षांना कोणत्या कप्प्यात टाकलं आहे आणि ते व्यवहार्य आहे का याची तपासणी करणं चांगलं ठरेल.आपल्या अपेक्षेत बसणारी व्यक्ती सामान्यपणे आपल्या सारख्याला जोडीदार म्हणून स्वीकारताना दिसते का? हेही बघावं लागेल.आपल्याला येणाऱ्या होकार नकारातून आपण हे शिकतो का?

यासाठी अनेकांना मार्गदर्शनाची गरज पडते. आपल्या अपेक्षांकडे तटस्थपणे पाहणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. यासाठी विवाहेच्छू मुलामुलींनी गटात चर्चा करणं, अनुभवांची देवाणघेवाण करणं फार महत्वाचं. त्यातून मुली आणि मुलं जोडीदाराच्या अपेक्षा कशा ठरवतात आणि व्यक्त करतात हे एकमेकांना कळतं. कल्पना-अपेक्षा आणि वास्तव यात तफावत आहे का हेही लक्षात येतं. सध्याच्या मॅरेज अरेंज करण्याच्या पद्धतीत मुलंवाले मुलीवाल्यांबद्दल आणि मुलीवाले मुलंवाल्यांबद्दल तक्रार करण्याचं प्रमाण खूप आहे. जशा काही त्या दोन विरोधी पार्ट्या आहेत. खरं म्हणजे दोन्ही गट एकाच सिस्टिमचे भाग आहेत आणि इतर सिस्टिम्स मधे असतात तशी इथेही बेशिस्त, बेफिकिर, उद्धट, वरचष्मा ठेवणारी मंडळी चांगल्यांबरोबर नांदत असतात. हे गट चर्चेतून लक्षात येतं.ती उपयुक्त,सोयीची वाटो न वाटो या मॅरेजच्या अरेंजमेंटमधे मी कुठे उभा आहे/उभी आहे हे स्पष्ट व्हायला हवं ना!

#HappyMarriage #typicalIndianmarriage #Indianmarriagesystem #विवाहसंस्था

सुषमा दातार 

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या, 
लेखिका आणि विवाह मार्गदर्शक 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form