आमचं बाईपण #womenwithdisability

आपल्या समाजात अपंगत्वाला अजून सहज स्विकार मिळालेला नाही. समाजात अपंगांबाबत ठोकळेबाज विचार केला जातो. अपंग व्यक्तीचं यश असेल नाहीतर अपंगत्वामुळे त्या व्यक्तीला लाभलेली दैन्यावस्था. अपंगांच्या बाबत मोठी घटना घडल्याशिवाय त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना अपंग महिलांचा त्यात समावेश नसतो. विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यात अपंग विद्यार्थ्या विचार नसतो. तरुणाईच्या करिअरबाबत, त्यांच्या लग्नांबाबत, जबाबदारीबाबत बोलताना त्यात अपंग तरुणतरुणींचा विचार खासच नसतो.

सकाळची घाईची वेळ. रोजची ठरलेली ट्रेन चुकली की, हमखास ऑफिसला उशिर होणार. मी विरार स्थानकात शिरले आणि वेळ पाहिली. फलाटाच्या मध्यभागी असलेल्या अपंगांसाठीच्या डब्ब्यापर्यंत वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं. जवळच महिलांसाठीचा डबा आहे हे माहिती असल्याने मी तिथेच जाण्याचा निर्णय घेतला. पाठीवर जड सॅक आणि एका हातात पांढरी काठी. दुसरा हात ट्रेन पकडण्यासाठी मोकळा ठेवलेला.
मी डब्ब्याशी गेले आणि एक पाऊल आत टाकलं,तितक्यात आजूबाजूने आवाज आले - “अग अग, हा हॅंडिकॅप डब्बा नाहीये.”
“मला माहितीये” म्हणत - मी स्वतःला त्या तुडूंब भरलेल्या दरवाज्यातून धक्का देतच आत ढकललं.

“कुठे उतरायचंय हिला?” बायका मला न विचारता एकमेकींना विचारत होत्या.

“मला वसईला उतरायचंय” असं मी त्यांना सांगितल्यावर एक साधी अपेक्षा होती की, आता चर्चा थांबेल.

पण, माझी अपेक्षा सपशेल फोल ठरली.

“यांच्यासाठी अपंगांचा डब्बा असतो ना? मग तिथे का नाही गेली ही?”

“बघ ना. आधीच गर्दी त्यात आता ही.”

“आणि काय गं तू डायरेक्ट लेडीजमध्ये बरी शिरलीस? आम्ही चुकून आलो तुमच्या डब्ब्यात तर सगळे आम्हांला किती बडबडतात”
तेव्हा मी थोडी भिडस्त होते. पटकन तोडून टाकणं शक्य व्हायचं नाही. तरी चेहरा मात्र मी कोरा ठेवून होते. 
पण तेवढ्यात एक जोरकस आवाज आला, “तुमाला तेंच्या डब्ब्यात घ्यायला तुमी लंगड्या की, लुल्या हाव?”
मच्छीवाली मावशीने सडेतोड हल्ला चढवला, “ती बाई हाय, ते दिसतंय ना? न यो डब्बा तुमचा नाही सगळ्या बायकांचा हाय.” - त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणिव झाली की, मी आधी स्त्री आहे आणि मग अपंग आहे ...
आपल्या समाजात अपंगत्वाला अजून सहज स्विकार मिळालेला नाही. म्हणजे, आपण आपल्या सर्व प्रकारच्या माध्यमांतून महिला, बालक, जातीभेद, धर्मभेद, आर्थिकदृष्ट्या मागासलेले वर्ग, इतर देशातली सामाजिक परिस्थिती वगैरेंवर सतत बोलत असतो, चर्चा करत असतो. पण, अपंगांबाबत मात्र समाजात ठोकळेबाज विचार केला जातो.
अपंग व्यक्तीचं यश असेल नाहीतर अपंगत्वामुळे त्या व्यक्तीला लाभलेली दैन्यावस्था. अपंगांच्या बाबत मोठी घटना घडल्याशिवाय त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना अपंग महिलांचा त्यात समावेश नसतो. विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यात अपंग विद्यार्थ्या विचार नसतो. तरुणाईच्या करिअरबाबत, त्यांच्या लग्नांबाबत, जबाबदारीबाबत बोलताना त्यात अपंग तरुणा-तरुणींचा विचार खासच नसतो.
बँकिंग क्षेत्रातला दीर्घ अनुभव असलेल्या अंजलीताईंनी मोकळेपणाने सांगितलं, “मी कॉलेजपासून तशी जवळच रहात होते. हातात क्रचेस घेऊन चालत कॉलेजला जायचे. मला असं चालत जाताना पाहणारे अनेक लोक असायचे पण, सोबत चालत येणारे अगदी मोजकेच. त्या वेळी वाटायचं - मी दिसायला छान आहे, हुशार आहे, स्वतंत्र आहे, शेअरिंग करायला कधीतरी मैत्रिणीही आहेत, गप्पा मारायला अगदी सिनेमाला जायलाही मित्र आहेत. पण, माझ्या हातात क्रचेस असल्यामुळे मी 'गर्लफ्रेंड' मात्र होऊ शकत नाही. हे मनातला न्यूनगंड वाढवणारं आणि फीलिंग असतं.” धडधाकट पुरुषाला तर अपंग बायको नकोच असते, पण  अपंग पुरुषालाही सहसा अपंग बायको नको असते. 
आपल्याकडे रंग, रूप, नोकरी या निकषांवर मुलींचं लग्न होत असतं. मात्र या सर्व बाबतीत पूर्ण असलेली अपंग स्त्री स्विकारण्याइतका आपला अजून तरी प्रगल्भ झालेला नाही. घरातलं काम करणं शक्य होणार नाही म्हणून बरेचवेळा अपंग स्त्रीला नाकारलं जातं. खरं तर, ती कमावती असते. नोकरी करणाऱ्या इतर अनेक सामान्य स्त्रिया जशी स्वयंपाक, स्वच्छता यांसारख्या कामासाठी मदतनिस ठेवतात. तशीच अपंग स्त्री सुद्धा हाच पर्याय निवडून आपला संसार नेटकेपणे करू शकेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. जणू लग्न ही अपंग स्त्रियांसाठी इच्छेची, निवडीची बाबच नाही!
अगदी लहानसहान बाबींमध्येही अपंग स्त्रीचं बाईपण नाकारलं जातं. एकदा मी आणि लेखिका सोनाली नवांगूळ एका ऑनलाइन कार्यक्रमानंतरच्या चर्चेत रंगलो होतो. आम्हा दोघींचं अपंगत्व निराळं असल्याने अवेळी झालेल्या रक्तस्त्रावाबद्दल मला कसं कळतं आणि तिला कसं समजतं असा काहीसा विषय होता. यावरून आम्ही पोहोचलो ते चड्ड्या आणि ब्रा यांच्या वापरापर्यंत. त्यातले ब्रॅंड्स, सोयी-गैरसोयी अशी वळणं घेत आमचं बोलणं पोहोचलं लॉंजरी शॉपिंग पर्यंत. 
सोनालीताई म्हणाली, “अगं, मी परवा लॉंजरी शॉपमध्ये गेले होते.”
मी म्हटलं, “असं फक्त लॉंजरीजसाठीचं शॉप असतं?” मला तर हे माहितीच नव्हतं. माझ्या अपंगत्वामुळे आलेली ही मर्यादा होती. पण, सोनालीताईचा किस्सा आणखीनच वेगळा आहे! तो अधिक बोलका, विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.
सोनाली नवांगुळ 
तिने पुढे सांगितलं - “मी त्या भव्य दुकानात शिरले अन् काउंटरवरच्या मुलींना इनरवेअर्स दाखवायला सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव मी टिपत होतेच. मी ब्रा सिलेक्ट केल्या आणि विचारलं की, कुठे आहे गं चेंजिंग रूम? त्यावर तिची प्रतिक्रिया ऐकून मला हसावं की रडावं असा प्रश्नच पडला! कारण त्या मुलीने मला विचारलं, “तुम्हीपण ब्रा वापरता?” किती अज्ञान, अस्विकार आणि अविचार आहे लोकात! हा किस्सा माझ्या मनात खोलवर रुतला. अपंगत्वामुळे एक विशिष्ट शारीरिक ठेवण असली तरी बाई म्हणूनही आमची गरज बदलते असं लोकांना का वाटत असावं?
एखाद्या व्यक्तीला अपंगत्व थोडंफार दुबळं करतं. अशात, त्यांच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन त्यांचा शिक्षणाचा, संपत्तीचा, कुटुंबातल्या निर्णय प्रक्रियेतला हक्क आणि सहभाग डावलला जातो. शारीरिक दुर्बलतेमुळे घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणीही अपंग स्त्रीला लैंगिक त्रास सहन करावा लागतो. अपंगत्वामुळे आलेली असुरक्षिततेची भावना समाजात वावरताना अधिक ठळक होते. म्हणून अपंग स्त्रीच्या हक्कांबद्दल किमान बोललं तरी पाहिजेच. आता समाज माध्यमांतून व्यक्त होता येत असल्याने अपंगांच्या प्रश्नांना थोडातरी आवाज मिळायला लागला आहे. आपसूकच अपंग स्त्रीचे प्रश्नसुद्धा आपल्यासमोर या माध्यमातून येत राहतील. प्रत्येक माध्यमातून यावर चर्चा मात्र होत राहिलीच पाहिजे!

#अपंगत्व # बाईपण # disability #womenwithdisability

अनुजा संखे 

या सदरात अनुजा संखे - अपंग व्यक्तींचे  संघर्ष, त्यांच्या यशोगाथा, त्यांचे समाजातले योगदान आणि समाजाकडून त्यांना मिळालेली मदत अशा विविध मुद्यांविषयी लिहीत   आहे.अनुजा स्वत: पूर्णपणे दृष्टिहीन आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form