डोपामिन (Dopamine) डिटॉक्स की रिटॉक्स?

दर काही महिन्यांनी - वर्षांनी किंवा कदाचित दिवसांनी सुद्धा काही नवीन फॅशन्स, नवनवीन फॅड्स येत असतात. त्या बरोबर काही नव्याने कॉइन केलेले शब्दही येतात. अश्यापैकी सध्याचा पॉप्युलर शब्द म्हणजे डोपामिन डिटॉक्स (Dopamine Detox) किंवा डोपामिन उपवास! 

पूर्वी मनोविकार तज्ज्ञ् किंवा मानसोपचार तज्ज्ञ् , मानस शास्त्रज्ञ यांच्या शब्दसंग्रहात असणारे हे शब्द गूगल बाईने सर्वसामान्यांच्या तोंडी आणले. जसे अँटी-सोशल व्यक्तिमत्व, डिप्रेशन, OCD हे शब्द अर्थ न कळताच लोक सर्रास हे शब्द वापरतात. फेसबुक सारखे प्लॅटफॉर्म्स या मूर्खपणात काही बाही Quiz टाकून भर घालतात, मला वाटतं - हे डोपामिन डिटॉक्स प्रकरणही तितकंच न समजता पसरत आहे.
डोपामिन(Dopamine) हे मेंदूत स्रवणारं - "आनंद देणारं" रसायन आहे. जेव्हा जेंव्हा आपण आनंद देणारी , मजा येणारी कृती करतो किंवा मजेची अपेक्षा करतो तेंव्हा तेंव्हा हे रसायन स्त्रवतं आणि त्यामुळे वाटणारी भावना आपल्याला आवडत असल्यामुळे ती कृती आपण पुन्हा पुन्हा करत राहतो. याच्या लूपमध्ये अडकलो तर आपण व्यसनी होऊ शकतो म्हणून या डोपामिन स्रवण्यावर काही निर्बंध ठेवावा यासाठी डोपामिन उपवासाची (Dopamine Detox) कल्पना पुढे आली. मात्र याचा अर्थ आपण आनंद देणारी कुठलीच कृती करायची नाही का? किंबहुना आपण डोपामिन स्रवणे पूर्णपणे बंद करायचं का? असे गंमतशीर प्रश्न पुढे येतात!

डोपामिन (Dopamine) कशासाठी? 

पहिली गोष्ट म्हणजे आनंद देण्याखेरीज उत्साह टिकवणे, एकाग्रता किंवा लक्ष केंद्रित करू शकणे अशा इतर अनेक गोष्टींमध्ये डोपामिनचा(Dopamine) सहभाग आहे. त्यामुळे डोपामिनचा स्त्राव पूर्ण बंद करण्याचा विचार चुकीचा आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे आपण अशा पद्धतीने डोपामिन बंद पाडूच शकत नाही. ही मेंदूत आपोआप घडणारी प्रक्रिया आहे आणि आपला त्यावर "टोटल कंट्रोल” कधीच असू शकत नाही. निसर्गतः हे रसायन कमी प्रमाणात व बराच काळ स्त्रवत असत. मात्र आपण कृत्रिम पद्धतीने म्हणजे सिगारेट ओढून, drugs घेऊन , किंवा अगदी social मीडियावर आपल्या पोस्टना किती लाईक्स मिळालेत हे बघण्यासारखी मुद्दाम काही कृती करून निर्माण केलं असता अचानक मोठ्या प्रमाणात त्याचा स्त्राव होतो. मात्र त्याचा निचरा ही लगेचच होतो आणि म्हणून परत आनंद वाटण्यासाठी ती कृती पुन्हा पुन्हा करावीशी वाटतेआणि यातूनच एक प्रकारे आपण त्या कृतींच्या अधीन होऊ लागतो


मग हा डोपामिन उपवास (Dopamine Detox) कुणी, कधी व कसा करायला हवा?

खरंतर असा उपवास करायची वेळच येऊ नये हे जास्त योग्य! म्हणजे, आपण जर रोज वाट्टेल ते - वाट्टेल तेवढे खात असू तर आपल्या पचनशक्तीला विश्रांती देण्याची आपल्याला गरज पडते, म्हणजेच उपवास करावा लागतो. पण आपण जर रोजचे खाणे योग्य प्रमाणात व योग्य क्वालिटीचे ठेवले तर उपवास करायची गरज नसेल. त्याच प्रमाणे डोपामिन निर्माण करणाऱ्या गोष्टी – म्हणजे इंटरनेट ब्राउजिंग, पॉर्न, सेक्स, दारू, सिगारेट, गांजा किंवा इतर ड्रग्ज किंवा अशा इतरही कोणत्या गोष्टी असतील, त्या जर पुन्हापुन्हा, अति प्रमाणात होत चाललेल्या असतील तर डोपामाईन उपवास करायला हवा.

डोपामाईन उपवास (Dopamine Detox) म्हणजे काय करायचं?

तर डोपामिन चा स्त्राव वाढवणाऱ्या गोष्टी टाळायच्या आणि इतर आरोग्यदायी गोष्टींकडे मन वळवायचं. खेळ , व्यायाम, छंद यात मन रमवायचं. हळूहळू आपली डोपामिनची गरज कमी होत जाईल. यासाठी स्वतःवर संयम ठेवायला शिकावं लागेल. हा उपवास खरतर आपल्याला स्वतःवर ताबा मिळाला - अशी खात्री होईपर्यंत करायला हवा. पण कदाचित पुन्हा पुन्हा थोड्या प्रमाणात करत राहील तरी फायदा व्हायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाची आहे ती आपण या गोष्टींशिवाय राहू शकतो हि जाणीव. यापॆकी दारू, गांजा, सिगारेट याकडे आपण आधीपासून व्यसन म्हणूनच बघत आलो आहे. पण नव्याने, नकळत आपण सर्वांच्या आयुष्यात शिरलेलं व्यसन आहे ते इंटरनेट आणि त्यावर उपलब्ध असणारे गेम्स , व्हिडिओज् , पॉर्न , अगदी विविध विषयांतील माहिती सुद्धा. आणि म्हणूनच डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) हे मात्र मला वाटत आपण सगळ्यांनी करायला हवा! निदान सुट्टी असेल त्यादिवशी तरी इंटरनेटला हि सुट्टी घ्यायला सुरुवात करायला हवी. कारण इथे सर्व गोष्टी addictive design या संकल्पनेवरच बनवलेल्या असतात. आपण याला नकळत बळी पडतोय, ते थांबवायला हवं!

स्त्रियांची व्यसनं आणि कारणं  

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे नुसार गेल्या 5 वर्षांत दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या काहीशी कमी झाली आहे. पण याच पाच वर्षात दारु पिणाऱ्या महिलांची संख्या वाढलीये. भारतात सरासरी फक्त 1.2% स्त्रिया मद्यपान करतात, तर पुरुषांची राष्ट्रीय सरासरी 29.2% आहे. ताज्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) नुसार,ओरिसामधील 15 वर्षांवरील महिलांचे मद्य सेवन 2015-16 मधील 2.4 टक्क्यांवरून 2020-21 मध्ये 4.3 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
स्त्रियांचं व्यसनाकडे वळण्याचं प्रमाण आजही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. मात्र सध्याच्या तरुण कमावत्या पिढीतील स्त्रिया हळू हळू त्या दिशेने चालेल्या दिसतात.
प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी नुसार कुणाला कुठल्या गोष्टीचे व्यसन लागू शकेल काही सांगताच येत नाही. अनेक गोष्टी सहज दिसत नाहीत म्हणून आपण त्यांच्याकडे व्यसन म्हणून बघत नाही. मात्र अनेक स्त्रिया कुटुंबाला, नवऱ्याला किंवा मुलांना प्राधान्य देत असल्याने त्यांच्या डोपामिन स्रवणाऱ्या गोष्टींमध्ये " सगळयांना बर वाटणं " हा विचार प्राधान्याने दिसून येतो. स्त्रियांच्या व्यसनांमध्ये TV series ना नक्कीच सामील करावे लागेल. तसे पाहता सिनेमा , वाचन , गाणी एवढेच काय व्यायामाचे सुद्धा व्यसन होऊ शकते. काही ठिकाणी स्त्रियांच्या ह्यासाठी घडणाऱ्या कृती सहज न दिसणाऱ्या हि असू शकतात, उदाहरणार्थ घर चकचकीत ठेवल्यावर लोक आणि सासू, नवरा कौतुक करतात. त्यामुळे छान वाटतं म्हणून स्वच्छतेचा, सुगरणपणाचा अतिरेक करणाऱ्या स्त्रिया दिसून येतील. 
मीडियाने एकीकडे 'मॉडर्न' स्त्रीचं रूप जास्त ग्लोरिफाय केल्याने तरुण स्त्रियांवर त्याचा प्रभाव नक्कीच होताना दिसत आहे. तर दुसऱ्या टोकाला काही टीव्ही सिरियल्स मधून नायिकांच्या त्यागाचे , कुटुंबाला प्राधान्य देण्याचे , पारंपरिक राहणीमानाचेही ग्लोरिफिकेशन होत असल्यामुळे आजची स्त्री या दोन्हीपैकी कुठल्यातरी स्टिरिओटाईप मध्ये स्वतःला बघायचा प्रयत्न करते आहे.

आजही बहुसंख्य स्त्रिया स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांना खुश ठेवण्याच्या मागे  लागलेल्या आहेत. त्यांना डोपामिन डिटॉक्सची नव्हे डोपामिन रिटॉक्सची गरज आहे. 
मला वाटतं  - 
दिवसाकाठी थोडे तरी डोपामिन स्त्रवू द्या ...
स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करा असाच या स्त्रियांना सल्ला द्यावा !

म्हणजेच डोपामिन वाढवणाऱ्या कृती करायला हव्यात. जर दिवसाकाठी कोणतीच आनंददायी गोष्ट आपण करत नसू तर आपल्या जगण्यात मजाच काय राहील? मग त्यामध्ये गाणी ऐकणे, नाच करणे, फिरायला जाणे, चित्र काढणे, ध्यानधारणा , व्यायाम, मैत्रिणीशी गप्पा मारणे, विणकाम, शिवणकाम , बागकाम - जे काही आपल्या कर्तव्य म्हणून केलाच पाहिजेच्या यादीत नाही असे काहीही आपल्या आवडीनुसार केले पाहिजे. अलीकडे शॉपिंग ला रिटेल थेरपी आणि स्पा- ब्युटी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करण्याला सेल्फ-लव्ह असं म्हणायची एक फॅशन आली आहे. इथे लाड आणि प्रेम, मज्जा आणि निखळ आनंद मधला फरक समजून घ्यायला हवा. नाहीतर स्वतःसाठी काहीतरी करण्याच्या नादात नुसताच चंगळवाद फोफावेल , आणि समाधान तरीही नसेल. तेंव्हा स्वतःचे लाड करताना जरा जपून.... नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची.

अगदी एका वाक्यात या लेखाचं सार सांगायचं झालं तर  - आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आरोग्याला धोकादायक होत नाहीत ना ? आपण त्याच्या आहारी जातोय इतक्या प्रमाणात होत नाहीयेत ना ? - यांच्याकडे लक्ष ठेऊन करायला हव्यात - डोपामिन उपवास (Dopamine Detox) याचा इतका साधा सोपा अर्थ लक्षात ठेवला तरी खूप झालं !







विभा पिटकेदेशपांडे 

मानसोपचार तज्ञ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form