तो फॅक्टरीत एक रासायनिक प्रक्रिया करत होता. अचानक स्फोट झाला आणि त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या दुष्टचक्रातून तो जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याचं त्याला समजलं. अभ्यास, बुद्धीबळ आणि निसर्ग यांचा मेळ साधत जगणाऱ्या कौस्तुभला, आयुष्याच्या या भयंकर चालीवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. तो धैर्याने आपली चाल खेळला आणि त्याने नियतीला शह दिला आणि स्वतःच्या शर्तींवर पुन्हा स्वतःला उभं केलं. यात त्याला खंबीर साथ मिळाली ती ऋजुताची! त्या दोघांच्या प्रेमाची ही आगळी कहाणी.
पुण्यात शिक्षण घेताना ऋजुता आणि कौस्तुभ निसर्ग जाणून घेत होते. अनेक गटांबरोबर जंगलात फिरणं, पशु-पक्ष्यांचं निरीक्षण करणं, एकत्र डोंगर चढणं, नद्या-समुद्राचं संगीत ऐकणं - यातूनच दोघांच्या मनात एकमेकांबद्दल ओढ निर्माण झाली. ही ओढ मैत्रीत आणि मग हीच मैत्री प्रेमात बदलली. या नव्या नात्याला दोन वर्षं होत नाही, तोच कौस्तुभचा अपघात झाला. त्याने आपलं गुंतणं बाजूला सारलं आणि तिला सांगितलं की एका अंध माणसाबरोबर तिने संपूर्ण आयुष्य घालवणं योग्य नाही. ऋजुतानेही विचारासाठी वेळ घेतला. लग्न तर नंतरची बाब असते; पण आत्ता एकमेकांवर असलेल्या प्रेमाचं काय करायचं? पुढे न्यायचं की नाही? असा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने निर्णय मनाशी पक्का केला; “हा माणूसच मुळात आपल्याला खूप आवडतोय. आवडणाऱ्या माणसाला केवळ अंधत्व आलं, म्हणून आपण त्याला आपल्यापासून दूर करू शकत नाही.” असा सांगोपांग विचार करून झाल्यावर, इतर कोणाला काही सांगण्याआधी तिने आईबाबांशी बोलण्याचं ठरवलं.
ऋजुताचे बाबा लहान मुलांचे डॉक्टर आहेत, तर आई गतीमंद मुलांची शाळा चालवते. ऋजुताचं म्हणणं ऐकल्यावर त्यांनीही विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि मग, तिच्या निर्णयात तिच्याबरोबरीनं उभे राहिले. कौस्तुभच्या घरून देखील तिला पाठिंबा मिळाला. आजही कौस्तुभ आणि ऋजुता त्यांच्या दोन्ही मुलींच्या सहित कौस्तुभच्या आईबाबांसोबत राहतात. “जीवन भरभरून जगण्यासाठी प्रगल्भ विचार असणाऱ्या साथीदाराची गरज असते. कौस्तुभ अंध झाल्यावरही त्याच्या विचारांमुळे मला अजूनही प्रेमात पाडत असतो.” ऋजुता कौस्तुभबद्दल भरभरून बोलते.
कौस्तुभला ऋजुताच्या निर्णयाबद्दल काय वाटलं होतं?
तो म्हणतो, ‘आधी डोळसपणा अनुभवल्यामुळे, अचानक आलेलं अंधत्व थोडं त्रासदायी होतं. पण त्याचा मी डोळसपणे स्वीकार केला आणि माझ्या प्रयत्नांना ऋजुताने भक्कम पाठिंबा दिला.लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्याच्या प्राधान्यक्रमांमध्ये फरक पडतोच. लग्नानंतरची ७-८ वर्षं एकमेकांना जाणून घेऊन, समजून घेत मित्र-मैत्रिणीसारखी गेली. पण आईबाबा म्हणून बढती मिळाली आणि मग सर्व काही मुलींसाठी अशी चार वर्षं गेली. आता पुन्हा आम्ही एकत्र वाचन, डोंगरावर फिरणं, तिचा मुलींसोबतचा एकटीचा वेळ, माझा मुलींसोबतचा एकट्याचा वेळ, आम्हा दोघांचा आईबाबा म्हणून मुलींसोबतचा एकत्र वेळ असा आराखडा जमतोय. मुलींनी लहानपणा पासून बाबाला अंध पाहिलेलं आहे. त्यांना वेगळं काही शिकवावं लागलं नाही.
कौस्तुभ स्पष्टच म्हणतो, “लोक बहुतेकदा थेट विचारत नाहीत, पण त्यांच्या बोलण्याची ढब न बोललेलं व्यक्त करत असते. सुशिक्षितांना हे अधिक नीट जमतं. तर अशिक्षित मंडळी मनातलं रांगड्या शब्दात सरळ बोलून दाखवतात. मला बिच्चारा वगैरे म्हणतातच. आणि ऋजुताला हा निर्णय का बरं घ्यावा लागला असेल? याचेही अंदाज लावत बसतात. बऱ्याचदा फिरायला गेल्यावर मला निसर्ग डोळ्याने अनुभवता येणार नाही, याबद्दल ऋजुताला काय वाटतं? असं आडून विचारलं जातं. पण या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांना मी आणि ऋजुता हसून टाळतो. कारण नेहमी सोबत असलेल्यांना माझ्या अंधत्वापेक्षा कर्तृत्वाची माहिती आहे.”
एकमेकांबरोबरचं नातं स्पष्ट करताना ऋतुजा म्हणते, “पती-पत्नीच्या नात्यात विश्वास आणि प्रेम याला खूप महत्त्व आहे. आम्ही दोघं जेव्हा जोडीनं वावरतो तेव्हा लोकांच्या दयार्द्र नजरा मला अधूनमधून झेलाव्या लागतात. पण शक्य असेल तिथे लोकांशी मोकळेपणे बोलून त्यांचा दृष्टीकोनात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याचदा कौस्तुभ अंध असल्यामुळे तो सर्वच बाबतीत माझ्यावर अवलंबून असेल असं लोकांना वाटतं. पण खरंतर तो फॅक्टरीत लक्ष घालणं,शेअरमार्केटिंग करणं अशी व्यावसायिक कामं करतो. मी लेखिका आहे. मी कामानिमित्त बाहेर गेले की, मुलींना गोष्टी सांगणं, त्यांना एकट्यानं सांभाळणं, अशी घरगुती कामंही करतो. खरं तर,आईपणाचे सोहळेसुद्धा मी कौस्तुभमुळेच अनुभवतेय.
लग्नाच्या काही वर्षांनंतर जेव्हा मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दिवस राहीनात. वैद्यकिय उपचार सुरू झाले. या काळात मला प्रचंड नैराश्य आलं होतं. एक वेळ अशी होती की, मी मूल नकोच असं म्हणत होते. तेव्हा कौस्तुभने आय.व्ही.एफ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत माझं मन वळवलं. जर याचा फायदा नाही झाला तर, आपण पुन्हा या गोष्टीचा विचारही करायचा नाही, असंही आम्ही ठरवलं. त्यामुळे मी स्वतःला सावरलं, उपचार घेतले आणि मग लग्नानंतर 9 वर्षांनी आम्ही जुळ्या मुलींचे आईबाबा झालो. त्या काळातले माझे मूड स्विंग्स कौस्तुभने प्रेमाने हाताळले. मला सकारात्मक ठेवणं, माझ्या तब्येतीची काळजी घेणं हे सर्व त्यानं मनापासून केलं.”
ऋजुता आणि कौस्तुभशी गप्पा मारल्यावर मनापासून जाणवतं, ते म्हणजे दोघांनी एकमेकांचा डोळसपणे केलेला स्वीकार. हेच अंधत्व कौस्तुभला लग्नानंतर आलं असतं तर ? कदाचित तो ऋजुताला ‘माझं अंधत्व लक्षात घेऊन नात्याचा पुनर्विचार कर’ असं ठामपणे सांगू शकला असता का? किंवा कौस्तुभने जरी सुचवलं असतं तरी ऋजुताला तसा विचार करणं शक्य झालं असतं का? पण दोघांनी नात्याचा सर्वांगीण विचार केला आणि मग निर्णय घेतला. यामुळे निसर्गाच्या साथीने आणि साक्षीने ती दोघं निसर्गाच्या कुशीत गेली 14 वर्ष आपला संसार फुलवत आहेत. प्रेम, विश्वास आणि विचारांची भक्कम साथ असेल तर नातं कसं बहरू शकतं याचं उदाहरण म्हणजे ऋजुता-कौस्तुभ हे जोडपं आहे.
अनुजा संखे
अपंग व्यक्तींचे संघर्ष, त्यांच्या यशोगाथा, त्यांचे योगदान आणि त्यांना समाजाकडून मिळालेली मदत असे विविध मुद्दे ' अपूर्णांकांची बेरीज 'या सदरात वाचायला मिळणार आहेत