बुरखा, हिजाब आणि त्या पालिकडचं बरंच काही ...

“Just for a piece of cloth, they are ruining our education” – हे शब्द आहेत, बिबी मुस्कानचे ! ही तीच मुलगी आहे, जिने अतिशय निडरपणाने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत तिच्या अंगावर धावून येणाऱ्या भगव्या टोळक्याशी मुकाबला केला होता! 

वेगवेगळ्या चॅनलवर मुस्कानच्या आणि तिच्यासारख्या मुलींच्या मुलाखती बघताना मला आजवर भेटलेल्या अनेक मुस्लिम मुली आठवत राहिल्या. काहीजणी शहरातल्या तर काही खेडेगावातल्या. काहीजणी रंगीबेरंगी बुरखे अभिमानाने मिरवणाऱ्या तर काहीजणी नाईलाजाने काळया बुरख्याशी समझौता करणाऱ्या होत्या. अगदी मुंबईतल्या मुंबईत सुद्धा वेगवेगळ्या आर्थिक वर्गातल्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या मुस्लिम मुलींची हिजाब आणि नकाब विषयी वेगवेगळी मतं आणि अनुभव दिसले. कारण आपल्याला वाटतं तसा मुस्लिम समाज एकसंध नाहीये. अनेक मुस्लिम कुटुंबातून मुलींच्या कपड्यांवर कोणतीच विशेष बंधनं नव्हती. पण काहीजणीना बंडखोरी करून बुरखा नाकारायला लागला होता. उलट काहीजणी आवर्जून बुरखा वापरणाऱ्या होत्या तर काहीजणी घरून निघताना बुरखा घालत पण ट्रेनमध्ये बसल्यावर त्याच बुरख्याला बॅगमध्ये बंदिस्त करून ठेवत! काहीजणी सलवारकुडत्यावरची ओढणी डोक्याभोवती लपेटून घेणाऱ्याही होत्या. पण लहानपणी मला जेव्हा अगदी 3-4 वर्ष वयाच्या मुस्लिम मुलीदेखील बुरख्यात दिसायच्या; तेव्हा बुरखा, चादर, हिजाब असे काही फरक माहिती देखील नव्हते. फक्त बुरखा घातलेली बाई दिसली की,तिला किती उकडत असेल – या विचाराने, “अरेरे! बिचारी..” असं मनात यायचं. जसजशी ह्या मुलींशी ओळख वाढत गेली, काहीजणींशी मैत्री होत गेली – तसतसं बुरखा, रिढा, निकाब, हिजाब यातला फरक समजत गेला. हिजाब बांधायला शिकले, कधीतरी बुरखासुद्धा घालून बघितला - तेव्हा लक्षात आलं की लांबून बघताना वाटतं तितकं काही बुरख्याच्या आतमध्ये गुदमरल्यासारखं वाटत नाही! त्या अनुभवानंतर बुरखा/ हिजाब वापरणाऱ्या मुस्लिम बायकांकडे ‘अरेरे बिच्चारी’ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन देखील हळूहळू बदलत गेला. जसं माझ्या कुटुंबातल्या आई, काकू, मावशी अशा माझ्या मागच्या पिढीतल्या बायकांना जन्मभर फक्त साडी नेसण्यात काही गैरसोय वाटत नाही – तसंच अनेक मुस्लिम महिलांना देखील बुरखा वापरण्यात देखील काही गैरसोय वाटत नसेल – ही शक्यता लक्षात यायला लागली. तसंच ख्रिश्चन नन्सचा पोशाख देखील बुरख्याशी मिळताजुळता आहे, हे देखील लक्षात आलं. जालना,यवतमाळ सारख्या मुस्लिमबहुल भागात बुरखा आणि हिजाब वापरणाऱ्या मुली देखील बालविवाहासारख्या जटिल समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना बघितल्या. शिवाय हिजाब किंवा बुरखा वापरण्यामागे फक्त धार्मिकच कारणं नसतात – हे देखील हळूहळू कळत गेलं.

पण खासकरून 90 च्या दशकातल्या दंगलीनंतर मुंबईतल्या अनेक मुस्लिम बायका नव्याने बुरखा किंवा हिजाब वापरायला लागल्या होत्या. नंतर एका प्रोजेक्ट मध्ये काम करताना, मुस्लिम महिलांशी फोकस ग्रुप डिस्कशन केली तेव्हा त्यांच्याशी या विषयावर बोलायला मिळालं. अनेकजणी म्हणाल्या की, हिजाबमुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी जास्त सुरक्षित आणि comfortable वाटत असे. जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या ह्या आयडेंटिटीमुळे आपल्याला चटकन मदत मिळू शकते – अशी त्यांची भावना होती. खरंतर बाई कुठल्याही धर्माची असली तरी सर्वच बायकांना सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या शरीराची रखवालदारी करायच्या ताणाखाली वावरावे लागते. रेल्वे स्टेशन्स, बसेस अशा ठिकाणी वावरताना देखील स्त्रिया सतत धास्तावलेल्या असतात. कुठल्या क्षणी आपल्या ढुंगणाला चिमटा काढला जाईल किंवा सीटच्या फटीतून बोटे खुपसून छातीला हात लावला जाईल याची सतत काळजी करावी लागते. रोखून पहाणाऱ्या हावरट नजरा अस्वस्थ करतात, आपली ओढणी किंवा पदर ठीकठाक आहे ना; याची कायम खात्री करावी लागते. नजरेने बलात्कार करू पहाणाऱ्या पुरुषांच्या समोरून अदृश्य व्हावं अशी इच्छा मलादेखील होत असते. त्यामुळे बुरख्याच्या आतमध्ये सुरक्षित वाटू शकतं – हे मला चटकन समजलं!
नंतर कधीतरी वेगवेगळ्या देशातल्या मुस्लिम बायकांचे बुरखा आणि हिजाब विषयीचे विचार ऐकले, वाचले – तेव्हा लक्षात आलं की बुरखा हे फक्त पितृसत्तेने केलेल्या दमनाचं प्रतीक नाहीये. जगभरातल्या बायकांनी इतिहासात वेगवेगळ्या काळात ते निरनिराळ्या गोष्टींचं प्रतीक म्हणून कधी आपलंसं केलंय तर कधी झिडकारलेलं आहे. थोडक्यात, ऐतिहासिक काळापासून मुस्लिम बाईने स्वत:चं शरीर कधी, किती आणि कसं झाकावं त्यावर धर्माशिवाय इतरही सामाजिक घडामोडींचा प्रभाव राहिला आहे.
सध्या डोकं झाकण्यासाठी म्हणजे हिजाब म्हणून वापरण्यात येणाऱ्या वावभर कपड्याच्या तुकड्यावरून देशभरात जे वादंग सुरू आहे; तेदेखील असंच बहुपदरी आहे. कर्नाटकातल्या उडुपी मधल्या एका कॉलेजात काही मुस्लिम मुलींना हिजाब घालून वर्गात बसायला अचानक बंदी करण्यात आली. त्यानंतर हे लोण इतर अनेक जिल्ह्यातल्या कॉलेजेस् मध्ये पसरलं. त्यातल्या पक्षीय राजकारणाचा संबंध उघडच होता. हिजाब विरुद्ध भगवे स्कार्फ असा हा वाद चिघळत गेल्यावर कर्नाटक सरकारने आता 18 फेब्रुवारी पर्यन्त कॉलेजेस् बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. या वादामध्ये ज्या मुलींना त्रास झाला, त्या हिजाब घालण्याच्या हक्कावर ठाम असल्याचं पाहून बहुतेक गैरमुस्लिम लोकांना खूप आश्चर्य वाटतं आहे. बुरखा घालणं ही पितृसत्तेची निशाणी असताना सुद्धा कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलींना तो “Choice” कसा काय वाटू शकतो, असा प्रश्न अनेकजण विचारताहेत. त्यातच काही ठिकाणी “पहले हिजाब, फिर किताब” अशी होर्डिंग लावली गेली आहेत. त्यामुळे तर हा जणूकाही धार्मिक निर्बंध विरुद्ध शिक्षण एवढाच वाद आहे की काय, असं वातावरण तयार झालं आहे. ज्या मुस्कानने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत थयथयाट करणाऱ्या मुलांना ‘अल्ला हो अकबर’ असं उत्तर दिलं – तिने ‘जय संविधान’ म्हणायला हवं होतं – असे सल्ले देखील देण्यात आले आहेत! खरं म्हणजे गुंडांनी घेरल्या गेलेल्या एका विशीतल्या मुलीने इतकं प्रसंगावधान दाखवलं आणि ती धैर्याने कॉलेजमध्ये पोचली – हेच किती कौतुकास्पद आहे. पण अनेक channels वरती चर्चेत भाग घेणाऱ्या मुस्लिम महिलांना ‘ तुम्ही शिक्षण निवडणार की धर्म?’ असा पेचात पकडणारा प्रश्न देखील विचारण्यात आला. त्याचवेळी हिजाब किंवा बुरख्याचा धर्माशी काही संबंध नाही – असंही काहीजण ठासून सांगत आहेत. पण ‘हिजाब’ देखील ‘कुंकू, मंगळसूत्रा’ सारखंच एक सांस्कृतिक दडपण म्हणून काम करतं, हे मात्र आपण विसरतो आहोत.
कधी हैदराबाद मधल्या कॉलेजमध्ये मुलींच्या कुडत्याची लांबी मोजली जाते, तर कधी मराठवाड्यातल्या छोट्या शहरांमध्ये हिंदू मुलींनी स्कार्फने चेहरा झाकू नये यासाठी मोठाली बॅनर्स लावली जातात, तालेबानी लोक मुस्लिम महिलांनी ‘चादर’घेतली पाहिजे म्हणून सक्ती करतात, त्याच्या उलट पॅरिस सारख्या शहरात मुस्लिम महिलांना बुरखा वापरायला कायद्याने बंदी केली जाते; हरयाणातले गुज्जर लोक आपल्या जातीतल्या मुलींनी जीन्स घालू नये असा नियम करतात, अगदी कॅनडामधला पोलिस अधिकारीदेखिल तिथल्या महिलांना बलात्कार टाळण्यासाठी – ‘स्लटसारखे’- कपडे घालू नका असे आवाहन करतो –त्याच्या या शेरेबाजीवर प्रतिक्रिया म्हणून जगभर ‘स्लट वॉक’ ची मोहीम उघडण्यात आली होती! त्यालाही आता बराच काळ उलटून गेला – पण अजूनही जगात सगळीकडे बायकांनी घालण्याचे कपडे हा विषय पुन्हापुन्हा चर्चेचे आणि निर्बंधाचेही कारण ठरतच असतो. तुमच्या हिजाबविरुद्ध आमचे भगवे स्कार्फ ही तुलना म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. अशीच दहशत ख्रिसमसच्या वेळी देखील दाखवण्यात आली होती. 

पण वेषभूषेवर घातलेल्या मर्यादा खरंतर, एकूणच ‘बाई’ म्हणून जगताना त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या मर्यादांचे एक दृश्यरूप असतात! अशा नियंत्रणाच्या आडून विशिष्ट कुटूंबाचा, वस्तीचा, जातीचा, धर्माचा किंवा अगदी देशाचाही मान-सन्मान (खरेतर दुराभिमान) याबद्दलचे राजकारण काम करीत असते! बायकांना त्या राजकरणातलं प्यादं म्हणून वापरलं जात असतं. आज डोक्यावरचा हिजाब वादाचा केंद्रबिंदू आहे परवा कपाळावरची बिंदी अशाच वादासाठी वापरली होती तर काही दिवसांनी त्या जागी गळ्यातला क्रॉस देखील असू शकतो! म्हणून अशा दहशतवादाला विरोध करायचा असेल तर तो केवळ बुरखा,जीन्स किंवा स्कर्टपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. हिजाब की किताब अशा पेचात अडकून देखील चालणार नाही. Bulli Bai किंवा Sulli deal सारखी app येत रहातात, तेव्हा हिजाब हाच आधार वाटू शकतो, म्हणजे पितृसत्तेने तयार केलेल्या अडथळ्यांच्या विरोधात पितृसत्तेने लादलेल्या प्रतिकांचाच आधार घ्यायची वेळ येते. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायला लागेल. सर्वच धर्माच्या आणि कुठलाच धर्म न मानणाऱ्या महिलांसाठी सुद्धा सुरक्षित वातावरण निर्माण करणं – हा उपाय कितीही दूरवरचा वाटला तरी तो अमलात आणायची जबाबदारी आपल्याला सर्वांनाच घ्यावी लागेल.    

 वंदना खरे 
संपादक , पुन्हास्त्रीउवाच

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form