प्रेमरंगी रंगता ...

प्रेम या विषयावर लेख ?
प्रेम हा विषय बोलण्याचा नसून 'पडण्याचा' आहे.
विचाराचा नसून उस्फूर्त भावनेचा आहे.
तर्क, नीती आणि नाती यांच्या शृंखलांनी प्रेमाला जखडण्याचा हा अट्टहास का ? - असे काहींना वाटेल. तर ज्यांना व्यवसाय करता आला नाही, ते जसे कलत्या तारूण्यामध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र चालवितात. तसाच हा प्रकार असावा, असेदेखील काहींना वाटेल. या दोन्ही शक्यता मनात ठेऊन, लेखाच्या अखेरपर्यंत पोचल्यावरच वाचकांनी त्याचा निर्णय करावा.
अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट करू या की, समाजात ‘प्रेमा’ला विरोध होतो किंवा त्यावरून जे वाद होतात, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात येणारे शारीरिक सबंध होय. त्याविषयी आपण नंतर बोलूच! युवक-युवतींना आपण कोणाला तरी आवडलो पाहिजे, आपले व्यक्तिमत्व आकर्षक असायला हवे - असे फार मनापासून वाटत असते. ते याच विवंचनेत असतात. म्हणूनच ते व्हॅलेंनटाईन डे सारख्या खास दिवसाची प्रतीक्षा करत असतात. बऱ्याचवेळा असं समजलं जातं की, प्रेमात पडणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाचा विषय होणे हे दुसऱ्यामुळे घडणाऱ्या बाबी आहेत. यात तुम्हांला कोणीतरी प्रेमवस्तू म्हणून ‘पिक अप’ करतं. म्हणजे इथं तुम्ही काहीच कृती करत नाही,तर तुम्हांला एक वस्तू मानले जाते. हीच तर आजची खरी मेख आहे. खरंतर प्रेम म्हणजे मानवी सबंधाचा अमूर्त आशय आहे. प्रेम म्हणजे दुकानातील आकर्षक वस्तू उचलण्याचा प्रकार नाही. पण नेमकी हीच गोष्ट आजकाल नजरेआड होतांना दिसते. कारण समाजात मार्केटचे मोठं प्राबल्य आहे. तुम्ही एक मार्केटेबल वस्तू म्हणून तयार होता. त्यासाठी जिम् पासून ब्युटीपार्लर्स पर्यंत विविध गोष्टींची मदत घेतली जाते. “प्रेमासाठी काहीपण” या भावनेने मारामारीसारखी अनेक साहसेसुद्धा केली जातात.
त्याचे मूळ आपल्याला दिसते मुख्यतः सिनेमामधून किंवा तशाच प्रकारच्या कथा-कादंबऱ्यातून. कारण प्रेम आणि सिनेमा यांचे आधुनिक भारतीय सांस्कृतिक जीवनात अविभाज्य असे स्थान निर्माण झाले आहे. इतके की, जीवनात प्रेमाचा प्रवेश हा कोणत्यातरी चित्रपटाच्या प्रतिमांमधूनच होतो. प्रत्यक्ष जीवनात जे धाडस आपण करूच शकत नाही; जे सुखसमाधान, प्रेयसी-प्रियकर आणि प्रेम यांची आपण कल्पनादेखील केली नसेल, ते सर्व भारतीय युवक-युवतींना सिनेमा देत आला आहे. म्हणूनच भारतीय सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत नसून चित्रपटांतील प्रतिमांचे प्रतिबिंब समाजात पडताना दिसते.
आपल्याला चित्रपटसृष्टीने इतके ‘नीट’पणाने शिकविले आहे की, प्रेम हे ‘उस्फूर्तपणे’ येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासारखे किंवा वीजेसारखे असते. भारतीय चित्रपटसंगीतामध्ये प्रेम या विषयावर जेवढे काव्य आणि संगीत निर्माण झाले, तेवढे जगात कुठेही झाले नाही. त्या काव्याने आणि संगीताने भारताच्या किमान ४ पिढ्यांची आयुष्ये मोहरून गेली. भारतीय तरूण-तरूणींना प्रेम व्यक्त करण्याची भाषा चित्रपटातील संवादांनी आणि गीतांनी दिली. पोशाख आणि स्टाईल दिली. इतकेच काय आत्मप्रतिमा दिली. प्रेम करताना मुले देव आनंद-शम्मी कपूर-धर्मेंद्र-राजेश खन्ना-अमीरखान-शाहरूखखान बनू लागली. तर मुली नूतन-शर्मिला-वहिदा-नंदा-माधुरी-काजोल-करीना- कतरिना इत्यादी बनल्या.
स्त्रियांना टोकाचे दुय्यम स्थान देणाऱ्या भारतीय समाजात मुलींना प्रेम करण्याचा अधिकार आहे, हे निदान बोलले जाऊ लागले. मुला-मुलींनी आपल्या मताने प्रेम करणे, श्रीमंती-प्रतिष्ठा यांच्या पलिकडे जाऊन विवाहाचे निर्णय घेणे आणि प्रसंगी कुटुंबातील वरिष्ठांचा विरोध पत्करून ते निभावणे ह्याला किमान स्वीकारार्हता या सिनेमांनी मिळवून दिली.प्रेमात काव्य-संगीत हळुवार भावना, एकमेकांच्या भावना जपणे यांबाबत पुराणातील देवादिकांची पात्रे वगळता कोणालाच अधिकार नव्हता. आधुनिक सिनेमा-नाट्यांतून या गोष्टी सामान्यांनी देखील करण्यायोग्य आहेत, अशा ढाँचा रूढ झाला. ही बाब निश्चितच खरी आहे.
या चित्राची दुसरी बाजू
परंतु सिनेमा व्यवसायाच्या सोयीसाठी प्रेमिक हे साधारणतः तरूण, सुंदर आकर्षक असे दाखविणे हे भागच असते. परंतु त्यातून एक नवा साचा तयार झाला. एक म्हणजे, प्रेम हे फक्त तरूणांनीच करावे. ते सुंदर, स्मार्ट, बलवान, प्रमाणबद्ध शरीराचेच असले पाहिजेत. दुसरे म्हणजे प्रेम हे जणूकाही प्रथमदर्शनी आणि जीवनात एकदाच होते. प्रथम प्रेमाचे संबंध फाटले तर जीवनात दुसरे काहीच उरत नाही. जीवन म्हणजे फक्त विराण बाभळीचे काटेरी झाड बनते. प्रेम होताना बहुतेक वेळा मुलांनी मुलींच्या सहनशक्तीच्या पलिकडे जाऊन त्यांनी कितीही विरोध केला तरी, अगदी थोबाडीत मारली तरीही त्यांना सतावणे ह्या सर्व प्रेमाच्या प्रथम पायऱ्या आहेत. मुलींचा असा विऱोध गंभीरपणाने घ्यायचा नाही. उलट तो होकाराचाच आविष्कार असतो – अशा कल्पना रूढ झाल्या!
सिनेमातील अशा प्रतिमांमध्ये स्वतःला पाहून मोठ्या न्यूनगंडाची शिकार झालेल्या युवक-युवती लाखोंनी सापडतील. दुसरीकडे पडद्यावर प्रेमाबद्दलची अत्यंत उदात्त भाष्ये आणि त्याग करणारे नायक-नायिका दिसूनदेखील प्रत्यक्ष जीवनात जाती-पातींची-रूढींची बंधने तोडणारी युगुले अगदी अपवादानेच निघाली. असे धाडसी प्रेमविवाह दाखविणारे सिनेमे पाहूनदेखील ९९.९९ टक्के विवाह परंपरागत रूढींमध्येच बंदिस्त राहिले. हेदेखील वास्तव आहे.
 

त्यामुळे मग प्रश्न तयार होतो की, या प्रेमाची ओळख काय ? 

प्रेम आणि मैत्री यांच्यात खरोखर भेद आणि दरी असते काय ? 


आपण मानवी संबंधांच्या मुळापासूनच सुरुवात करू.मानवी संबंधांचे वर्गीकरण अनेक प्रकारे होऊ शकते. काही संबंध कार्यात्मक-सामाजिक-आर्थिक असतात. जसे विक्रेता-ग्राहक, मालक-नोकर, शिक्षक-विद्यार्थी, नेता-अनुयायी, डॉक्टर-रूग्ण,वकील-पक्षकार इत्यादी. काही संबंध हे रक्ताच्या नात्याने तयार होतात. जसे माता-पिता आणि त्यांची अपत्ये. बंधू-भगिनी इत्यादी.तर पती-पत्नी सारखे काही संबंध जाणीवपूर्वक निर्माण केलेले कायदेशीर संबंध असतात.
आपण जेंव्हा एखाद्याशी मैत्री किंवा प्रेमाचे संबंध असल्याचे सांगतो, तेंव्हा ते वरीलप्रमाणे एखाद्या संबंधांच्या प्रकाराचे नाव नसते. कारण पण प्रेमसंबंध हा मानवी संबंधांचा असा कार्यात्मक-सामाजिक 'प्रकार' नाही. मैत्र आणि प्रेम हा मानवी संबंधांचा अमूर्त आशय आहे. ती जगाशी जोडले जाण्याची एक दृष्टी आहे. रीती आहे. कारण प्रेम आणि मैत्रभाव हा मानवी संबंधाच्या कोणत्याही प्रकारात उपस्थित असू अथवा नसूदेखील शकतो.आणि असलाच तर तो कमी किंवा जास्त होऊ शकतो.

प्रेम ही माणसाची अस्तित्वजन्य गरज
प्राण्यांना भवतालाची जाणीव म्हणजे आपले भक्ष्य, संभाव्य धोके,समागमाची संधी इत्यादी जाणीवाअसतात, तशा मनुष्यालाही असतातच. अन्न, जीवसुरक्षा, लैंगिक संबंधांची इच्छा या नैसर्गिक आवेग,भावना किंवा सहज प्रेरणादेखील इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्यालादेखील असतात. पण त्या सहजप्रेरणांचा मानवी आविष्कार अत्यंत सर्जनशील असतो. उदाहरणार्थ, लैंगिक इच्छा प्राणी आणि मानवाला दोघांनाही असतात. पण माणसे आपल्या प्रिय व्यक्तिला वश करण्यासाठी अनेक उपक्रम-साहसे-कारस्थाने आणि गाणी कविता अशा नवनव्या निर्मितीदेखील करत राहतात. त्याबाबतच्या निराशेतून सर्व शरीरक्षमता असूनदेखील कदाचित् सर्वस्वाचा त्याग करून संन्यासदेखील घेण्यापर्यंत देखील पोचतात.
इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे वेगळेपण असे की, माणसाला भवतालासोबतच स्वतःचीदेखील स्वतंत्र अशी जाणीव असते. दोन पायांवर चालण्यामुळे मोकळे राहणारे दोन हात आणि त्या हातांना स्वतंत्रपणे वापरता येतील असे असणारे अंगठे यामुळे, तसेच बुद्धीच्या क्षमतेमुळे तो कित्येक प्रकारची साधने-हत्यारे निर्माण करतो. वस्तूंची निर्मिती करतो. नव्या सामाजिक संस्थारचना तयार करतो. म्हणजेच त्यातून तो खरे तर निसर्गनिर्मित परिस्थितीपेक्षा वेगळा असा स्वतःचा वेगळाच भवताल निर्माण करतो. इतर प्राण्यांचे कळप हे केवळ सहजप्रेरणांनुसारच वर्तन करत असल्याने त्यातील गुंतागुंत आणि बदल हे अत्यंत मर्यादित आणि थेट शरीराशीच जोडलेले असतात. पण मनुष्याचे तसे नाही. माणसाचे वर्तन पूर्णतः नैसर्गिक सहजप्रेरणांनुसार ठरत नाही. त्याच्या वर्तनामध्ये स्वनिर्मित मूल्यांची भूमिका महत्त्वाची असते. माणसे एकमेकांशी केवळ वैयक्तिक नव्हे, तर संस्थात्मक परिचयाने बांधली जातात. इतरांशी अर्थपूर्ण रीतीने अनुबंधित राहणे ही त्याची मूलभूत गरज बनते. मानवी संबंध हे अशा अर्थाने सामाजिक संबंध बनतात.
मानवी संबंधांच्या आणि रचनांच्या या 'निसर्गा'मध्ये आपल्याला प्रेमाचा शोध घ्यायचा आहे. हे जोडले जाणे कसे घडते, हा कळीचा प्रश्न आहे. म्हणजे जगाशी-माणसांशी जोडले जाण्याऐवेजी जगाविषयी पूर्ण नावड किंवा नकारात्मकता मनात ठेवून जर एखाद्या प्रतीकाला मूर्तीला, धर्मपोथीला शरण जावून होते का ? तसेच स्वतःला नाकारून, केवळ समूहाला शरण जाण्यातून होते की स्वतःच्या शक्ती आणि मर्यादा यांचा आनंदी स्वीकार करत समाजाशी जोडले जाणे होते? थोडक्यात मानवी स्वातंत्र्याचा, आनंदाचा बळी देऊन समाजाचा अनुबंध मिळविला जातो काय? हे पाहिले पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत एरिक फ्रॉम यांच्या मते , प्रेममयता हा उत्पादक-मानवी आणि आनंदी असा पर्याय ठरतो. तर उर्वरित पर्याय हे विध्वंसक आणि अंतिमतः मनुष्यत्व नाकारणारे ठरतात.
माझ्या मते प्रेसंबंधामध्ये पुढील गोष्टी असतात. अर्थात् प्रेमाच्या विशिष्ट संबंधांमध्ये यातील काही घटकांचे प्रमाण कमी जास्त असू शकते.
  • सक्तीचा अभाव आणि स्वेच्छेने असणारा भावनिक-मानसिक अनुबंध (पैसा-मालमत्ता-नोकरी-व्यापार-अन्य भौतिक घटक इत्यादीनिरपेक्ष ),
  • दुसऱ्याच्या सहवासातून मिळणारा आनंद आणि समाधान आणि त्यामुळे त्यासाठी असणारी इच्छा,
  • दुसऱ्याचे व्यक्तित्व किंवा विचार-भावना या आपल्या भावजीवनाचा सहजपणे -आपोआप अपरिहार्यपणे भाग बनत जाणे, दुसऱ्याशिवाय एक प्रकारची आंतरिक अपूर्णता जाणविणे,
  • परस्परांचा गुणदोषांसहित आदर व आनंदाने स्वीकार. (याचा अर्थ दुसऱ्यामधील बदलासाठी प्रयत्न न करणे असा मात्र नाही.)
  • दुसऱ्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आणि स्वातंत्र्य शाबूत ठेवून दुसऱ्याच्या कल्याणाबाबत जबाबदारीची भावना.
प्रेम नेमके काय आहे ?

प्रेम म्हणजे फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तिशी असणारा संबंध नाही. जो मनुष्य माझे केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम आहे आणि इतर गोष्टींची मात्र नावड आहे; असे म्हणतो - तो खरे तर संबंधित व्यक्ति किंवा वस्तूबद्दलची केवळ स्वामित्वभावनाच व्यक्त करत असतो. तो खरे म्हणजे, प्रेमाबद्दल नव्हे तर स्वतःच्याच विस्तारित अहंकाराबद्दल बोलत असतो.
प्रेम ही निष्क्रिय शरणतेची किंवा ताबा गाजविण्याची बाब नसून सक्रिय अनुभवाची प्रक्रिया आहे. प्रेमात साध्य आणि साधने या दोन्ही भूमिका भिन्न नसतात. याचा अर्थ प्रेमसंबंधाला कार्यात्मकता असते, पणे ते कार्यात्मक नसतात. ते लैंगिक असू शकतात पण तो फक्त लैंगिक उपभोग नसतो. तो मानवी संबंधांचा सहज परंतु अपरिहार्य असा टप्पा असतो. प्रेमसंबंधांना भौतिकता असते, पण ते भौतिकतेच्या मर्यादा पार करतात. त्यांना सामाजिकता असते, पण समाज त्यांना आपल्या चौकटीत बांधू शकत नाही. प्रेम ही काही जीवांनी भिन्नत्वात राहूनदेखील साधलेली प्रवाही विकसनशील तादात्म्यता असते. जिथे एक अधिक एक मोठा एकक होतो. पण पुन्हा पहिले एक वेगवेगळ्या आकारात उरतातच. प्रेम हे जिवांचे विझणे किंवा विलीन होणे नसते.


प्रसिध्द विचारवंत तत्त्वज्ञ कर्कग्राड म्हणतो, “ प्रेमामध्ये जिच्यावर प्रेम केले ती व्यक्ति नव्हे, तर प्रेम करणारी व्यक्तीच बदलून जाते.”
फ्रेंच तत्त्वज्ञ जीऑं पॉल सार्त्र म्हणतो. ‘प्रेमामध्ये एक अधिक एक चे उत्तर एक हेच असते’.
ईशावास्य उपनिषदामधील शांतिमंत्र आहे - ओम् पूर्णम् अदः पूर्णम् इदम् । हे पूर्ण आहे... ते देखील पूर्णच आहे.पूर्णात् पूर्णम् उदच्च्यते। पूर्णातून पूर्ण निर्माण होते. पूर्णस्य पूर्णम् आदाय । पूर्णाने पूर्ण दिल्यानंतर पुन्हा पूर्णच शिल्लक राहते.
प्रेमाचे अनेक आविष्कार समाजात आपण अनुभवतो. जसे माता-पिता आणि त्यांची लहान अपत्ये यांच्यामध्ये प्रेम हे जैविक असते. ते समान परिस्थितीत असलेल्यांमधील नसते.निदान बाल्यावस्थेत ते एकतर्फीच, निरपवाद-निरपेक्ष विनाअट असते.बालकाचा संपूर्ण स्वीकार ही त्याची पूर्व अट असते. बंधू किंवा भगिनी प्रेम हे समान परिस्थितीत असलेल्यांमधील सार्वत्रिक स्वरूपाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. त्यामध्ये आपण सर्व एक आहोत. अशी सर्वसाधारण भावना असते. देशप्रेम हे बंधू-भगिनीप्रेमाचा अधिक व्यापक आणि अमूर्त असा आविष्कार आहे. त्यामध्ये आपला भवताल, निसर्ग, परिसर त्यातील संस्था-संस्कृती या सर्वसाधारण घटकांशी असणारा भावनिक-मानसिक अनुबंध व्यक्त होतो.

लिंगभावी किंवा वैषयिक प्रेम

प्रौढ स्त्रीपुरूष प्रेमसंबंध हेच नेहमीच चर्चेत येतात. नीती अनिती यांच्या निकषावर समर्थनाचे किंवा विरोधाचे विषय होतात. याची कारणे म्हणजे एक तर त्यामध्ये लैंगिक संबंधांची शक्यता असते. त्यातून विवाह-अपत्यजन्म-कुटुंब इत्यादी सर्व मालिका निर्माण होते. LGBTQ प्रकारामधील संबंध हे देखील वादाचे विषय होऊ शकतात. पण त्याचा स्वतंत्र विचार येथे विस्तारभयास्तव केलेला नाही.
वयात आलेल्या युवक-युवतींपासून पुढील वयातील सर्व स्त्री-पुरुष संबंध हे मुळात कळत्या वयातील व्यक्तिंमधील संबंध आहेत.पण असा कोणताही संबंध परस्परांवर परिणाम करणारा असतो. त्यामुळे दुसऱ्याची बुद्धी-ज्ञान- गुण-स्वभाव या सर्वांचाच दुसऱ्यावर प्रभाव असतो. हे संबंध जितके सातत्याचे-जवळचे होत जातात, तसतसे ते अपरिहार्यपणे अधिकाधिक व्यक्तित्वाच्या सर्वांगांना व्यापणारे होत जातात. शारीरिकता आणि लैंगिकता हे मानवी संबंधांचे अविभाज्य-सलग असे पैलू आहेत. मग या मानवी संबंधांतून शरीर का आणि कसे वेगळे करणार ? आपण अगदी औपचारिक संबंधांमध्य़ेदेखील हस्तांदोलन करतो. थोड्या परिचयानंतर टाळ्या देतो. खांद्यावर हात ठेवतो. अधिक परिचयानंतर मित्रांना क्षणभर मिठीदेखील मारतो. तेथे लैंगिकता नसली तरी शारीरिकता असतेच.

प्रेम की मैत्री -एक कृत्रिम द्वंद्व

'आमच्यात फक्त मैत्री आहे प्रेम नाही'. ही वाक्ये सर्रास कथांमध्ये-सिनेमांमध्ये वापरली जातात. खरे तर एक ढाल म्हणून किंवा कोणाला तरी नकार देण्यासाठीचा संवाद म्हणून. दोन मित्रांमध्ये किंवा दोन मैत्रिणींमध्येदेखील प्रेमाशिवाय मैत्री कशी असू शकेल? मग तीच बाब मित्र-मैत्रिण या संबंधाला अपवाद कशी करणार ? लैंगिकता आणि शारीरिकता ही एक काल्पनिक लक्ष्मणरेषा मानून त्याच्या संदर्भानेच प्रेम की फक्त मैत्री ? असे काल्पनिक विकल्प निर्माण करणे ही शुद्ध फसवणूक आहे किंवा दमन आहे. जणू काही प्रेमात मैत्री नसतेच आणि मैत्रीत प्रेम नसते.
जर लैंगिकता आणि शारीरिक जवळीकीच्या मर्यादा या सामाजिक अपरिहार्यता म्हणून मान्यच कराव्या लागत असतील, तर तसे स्पष्ट म्हणावे आणि कराव्या. परंतु रक्तसंबंधांच्या पलिकडील स्त्री-पुरूष संबंधांमध्ये लैंगिकता-शारीरिकता म्हणजे पाप समजणे किंवा तशी सामाजिक मान्यता असणाऱ्या संबंधांनाच केवळ प्रेम म्हणावे, ही सामाजिक सोयीसाठी केलेली वैचारिक वंचना आहे. प्रेम आणि मैत्री या शब्दांचा दुरूपयोग आहे.
शिवाय लैंगिकता म्हणजे निव्वळ शारीरीकता नव्हे. ती आपल्या सर्व व्यक्तित्वाला व्यापून असते.खरे तर कोणताही मानवी व्यवहार हा निव्वळ मानसिक किंवा शारीरिक किंवा भौतिक नसतो. जसे आपले अन्न –वस्तू उपभोग-निवास-विहार इत्यादी सर्व काही. या प्रत्येक गरजांमध्ये भौतिकते बरोबरच तिच्याही पार जाणाऱ्या सामाजिक,मानसिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटकांचा प्रभाव असतो. लैंगिकता ही त्याला अपवाद असूच शकत नाही.
थोडक्यात वैषयिक किंवा लैंगिक संबंधांची शक्यता ही अपवित्र किंवा एखाद्या हिंसेइतकी अनैतिक किंवा पाप मानून सर्व प्रौढ स्त्रीपुरूष संबंधांना त्याज्य किंवा अनैतिक ठरविणे एका बाजूस ; तर दुसरीकडे शरीरसंबंधानाच केवळ सुखाचे साधन समजून त्यामागे पिसाटासारखे धावणे किंवा प्रेमाचा पुरावा मानणे हे दोन्ही दृष्टिकोन एकाच खोट्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही चूक आणि अमानुष आहेत. उदाहरणार्थ युवक युवतींना देशाचा राजकीय प्रमुख निवडण्याचा अधिकार असला, तरी स्वतःच्या जीवनाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मात्र नसतो. त्यामुळे जाती,कुळे, गोत्रे,घराने की इज्जत अशा प्रतिष्ठेच्या संकल्पना यातून जे जमेल तेच विवाह संबंध असे मानले जाते. त्यामुळे युवक युवतींचे कल-प्रेम-निवड यांना काडीचीही किंमत बहुतेक भारतीय कुटुंबात नसते. त्यामध्ये तर आता लव्ह जिहाद इत्यादी द्वेषपूर्ण राजकीय विषारी प्रचारामुळे तर परिस्थिती कुटुंबांच्याही बाहेरील घटकांच्या हाती जाते आहे.
असेच दुसरे उदाहरण म्हणजे विवाहित स्त्री पुरूषांना मित्र -मैत्रिणी असता कामा नयेत; असे मानले जाते! खास करून स्त्रियांना मित्र असणे म्हणजे तर महापापच. मानवी संबंधांच्या गुंतागुंतीला नाकारून तसेच शरीराला, मनाला नाकारण्यातून भारतीय विवाहसंस्था बळकट होते हा भ्रम आहे. कारण कोणत्याही सामाजिक संस्थांची निर्मिती ही माणसाच्या कल्याणासाठी,आनंदासाठी झालेली आहे. माणूस आणि त्याचा दीर्घकालीन आनंद हे साध्य आहे, संस्था या केवळ साधनमात्र आहेत. जर साधने हा साध्यच नष्टच करू लागली, तर अशी साधने सुधारणे किंवा बदलणे हाच शहाणपणा ठरतो. म्हणूनच कुटुंबसंस्था असो की विवाह संस्था, व्यक्तीविकास असो की सामाजिक विकास, या सर्वांचा विचार वरील अंगांनी आणि मूल्यांच्याच आधारावर व्हायला हवा. नव्या अधिक मानवी, विकसनशील समाजासाठी सर्वच प्रस्थापित संस्थांचा आणि समाजमूल्यांचा पुनर्विचार करायलाच हवा.




अजित अभ्यंकर

मार्क्सवादी नेते आणि अर्थतज्ञ

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form