सहजीवनाच्या वाटेवरील समतेचे पुरस्कर्ते

मिळून साऱ्याजणीच्या वतीने दिला जाणारा 'सावित्री जोतिबा समता सहजीवन सन्मान २०२२' हा पुरस्कार यंदा कणकवलीच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका 'सरिता पवार व त्यांचे पती संपादक राजन चव्हाण' या दांपत्याला देण्यात आला. त्यांची ही ओळख ! 
कुटुंबात पारंपरिक विचारसरणीचा पगडा असतानाही स्वतःला विवेकी वृत्तीने बदलत नेणारे राजन सर आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आणि समोर येणाऱ्या प्रत्येक मुलांना ज्ञानाचा आणि विज्ञानाच्या खऱ्या दिशा दाखवणारी शिक्षिका सरिता यांचे सहजीवन या पुरस्कारामुळे अधिकच अधोरेखित होत आहे.
सरिता म्हणते "बाबांनी प्रेमाने पायात घातलेले पैंजण मला कधीही जाचले नाहीत कारण त्याला बाबांनी मला दिलेल्या माझ्या स्वातंत्र्याचा नाद होता.. पण मला जेव्हा ते बंधनकारक वाटू लागले, जाचू लागले, तेव्हा ते मी सहज उतरवले. तसेच समाजाची बंधने सुद्धा जाचू लागली तेव्हा ती देखील तितक्याच सहजपणे मी बाजूला सारली. या सर्वात खंबीरपणे सोबत होता तो माझा नवरा... आपल्या पारंपारिक विचारसरणीला हद्दपार करत संघर्षाला सामोरे जात त्याने माझा आत्मसन्मान जपला. आम्ही एकमेकांचे जिवलग बनलो."
राजन सरांनी जशी सरिताची सोबत केली तशीच राजन सरांच्या प्रत्येक संघर्षात सरिता खंबीरपणे उभी राहिली. त्याचा परिणाम म्हणूनच कोणत्याही संकटाला नेटाने सामोरे जात त्यांनी स्वतःचे डिजिटल न्यूज चॅनेल सुरू करून स्वतः बरोबरच इतरांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न सोडविला आहे. 'आपला सिंधुदुर्ग डिजिटल चॅनेल' आज सिंधुदुर्गाच्या पत्रकारितेत स्वतःचे अढळस्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे.या डिजिटलच्या माध्यमातून या वर्षी प्रथमच साफल्य दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.या अंकाचे संपादन सरिताने अतिशय नेटकेपणाने केले.
गेली वीस वर्ष सरिता शिक्षिका म्हणून कार्यरत असताना सातत्याने लेखनही करत आहेत. अनेक नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक यामधून त्यांच्या कविता, कथा, ललित लेखन प्रसिद्ध होत आहे. राज्यस्तरीय, आंतरराज्यस्तरीय स्पर्धा मधून त्यांच्या कथा-कविता प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरत आहेत. विविध कवी संमेलनातील त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय असतो.
सरिता-राजन यांनी अद्वैत फाउंडेशनची स्थापना करून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम तसेच अनेक सामाजिक संस्थांशी स्वतःला जोडून घेतले आहे. साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमातून समाज भान जपत महाराष्ट्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींसोबत त्यांचा सक्रिय सहभाग वाखाणण्यासारखा आहे.

त्यांच्या सहजीवनाचे सर्वात आदर्शवत उदाहरण म्हणजे स्वतःचा मुलगा असतानाही शिशू आधार केंद्र, कोल्हापूर या संस्थेतून एका मुलीला म्हणजेच मैत्रेयीला दत्तक घेऊन कायदेशीररीत्या तिचे पालकत्व स्वीकारणे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा या सामान्यांच्या मानसिकतेला छेद देत त्यांनी एका मुलीचे स्वीकारलेले पालकत्व अनेक विनापत्य दाम्पत्यांसाठी हसत्या खेळत्या कुटुंबाचा राजमार्ग ठरला. त्यांच्या या निर्णयाचा धडा गिरवत गेल्या दहा वर्षात या दोघांच्या संपर्कातील जवळजवळ बारा जोडप्यांनी दत्तक पालकत्वाचा स्वीकार केला. सरिता नेहमीच सांगते की माझ्या अशा या प्रवाहा विरुद्धच्या सर्व निर्णयात माझे पती नेहमीच माझ्या सोबत राहिले. त्यामुळे असे धाडसी पाऊल अनेक वेळा उचलत आले. मैत्रेयीच्या येण्याचा खरा आनंद झाला तो राजन सरांना. त्यामुळेच तिच्या बाल संगोपनाच्या जबाबदारीपासून आजपर्यंतची सर्व जबाबदारी त्यांनी सरीताच्या बरोबरीनेच आनंदाने स्वीकारली. आज त्यांचं परिपूर्ण कुटुंबचित्र पाहिलं की , कुणाच्या मनात क्षणभर शंका न यावी इतकी मैत्रेयी त्यांच्या आयुष्यात विरघळून गेली आहे.
सरिता शासनाच्या उत्कर्षा अभियानांतर्गत मासिक पाळी समुपदेशनाचे मार्गदर्शन आणि अनुभव लेखन करतात. 'प-पाळीचा' या पुस्तकाची स्वखर्चाने वाटप करतात. पण हे बदल त्यांच्या कुटुंबातही आपल्याला दिसतात. लहान वयातच मासिक पाळी आल्यामुळे मैत्रेयीच्या मासिक पाळीच्या दिवसात सरिता इतकीच जबाबदारी राजन सर व त्यांचा मुलगा नितांत सुद्धा अगदी सहजपणे उचलतात. पुरुषीपणाचा कुठलाही अवघडलेपणा त्या दोघांच्यात न जाणवता तिला लागणाऱ्या सॅनिटरी पॅड पासून ते तिच्या त्या दिवसांतल्या आरोग्यापर्यंत राजन आणि नितांत जागरूक असतात. त्यांच्या घरामध्ये नवरा आणि बायको अशी कामांची वाटणी कधीच दिसत नाही. जे काम समोर येईल ते प्रत्येकाने करायचे हा अलिखित नियम सर्वांना लागू आहे. आणि या संस्कारातच त्यांची दोन्ही मुले मैत्रेयी व नितांत वाढताना दिसत आहेत.
सरिताच्या वडिलांनी वाचन संस्कार केले आणि पुढे तिच्या लेखनाचे ते पहिले वाचक आणि समीक्षक झाले. हाच वाचन संस्कार पुढच्या पिढीकडे वृद्धिंगत करण्यासाठी सरिता दरवर्षी साधना साप्ताहिक, कुमार दिवाळी अंक, थोर विभूतींची चरित्रे, कमला भसीन यांचे 'नकोसा स्पर्श नकोच' अशा सामाजिक विषयांच्या अनेक पुस्तकांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आज पर्यंत 'स्मृतिगंध राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार', आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सरिता ही घरातले शेंडेफळ. ती म्हणते की, "माझी सावित्री मी माझ्या जन्मापासूनच माझ्या आईच्या रुपात पाहत आलेय... माझ्या डॅशिंग, कणखर, नेतृत्वगुण असणारी आणि तितकीच संवेदनशील उत्तम माणूस असणारी माझी आई आणि मुलगी असण्याचं कोणतंही जोखड माझ्या अवतीभवती फिरकू सुदधा न देणारे माझे वडील यांचं योगदान माझ्या व्यक्तिमत्व जडणघडणीत फार मोठं आहे"

ज्या वयात मुलींना खेळण्यासाठी भातुकली दिली जाते त्या नकळत्या वयात क्रिकेट खेळणे, गोट्या खेळणे, पोहणे, मोठ्याने सुरात शीळ घालणे, दुचाकी चालवणे या पुरुषी वर्चस्व असणाऱ्या कृती सरिताने सहज आत्मसात केल्या. तिच्या दोन बहिणी शिक्षिका आणि भाऊ रेडिओलॉजिस्ट. या भावंडांनी मिळून सदाशिव गुरुजी प्रतिष्ठानची स्थापना केली आणि या माध्यमातून सामाजिक उपक्रमांबरोबरच राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण त्या करत आहेत. स्वतःच्या भावंडांच्या आणि मुलांच्या वाढदिवसाचा होणारा खर्च आणि सामाजिक उपक्रमांसाठी देण्याचे स्तुत्य कार्य त्यांच्याकडून सातत्याने होत असते.
सरिता माहेरी जशा प्रत्येक कार्यात अग्रेसर आहेत तशाच विचारसरणी भिन्न असूनही सासरच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर राहून सर्वांची लाडकी बनली आहे आणि हसतमुख राजन सर सरिताच्या माहेरचा जीव आहेत. दोघांनीही आपली नाती सांभाळत आपला मित्र परिवार सुद्धा समृद्ध केला आहे. अतिथी देवो भव असे म्हणत अनेक आजी-माजी विद्यार्थी, चळवळीचे कार्यकर्ते, साहित्यिक यांचा त्यांच्या घरी सातत्याने राबता असतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी घालून दिलेल्या संस्काराचा वसा आणि वारसा चालविणाऱ्या या जोडप्याने स्वतःच्या सहजीवनाचा प्रवास इतरांसाठी आदर्शवत केला आहे.


लग्नानंतर पत्नीच्या शिक्षण, लेखनासाठी सतत धडपडणारा पती आणि पतीच्या संघर्षात खंबीरपणे पाठीशी राहणारी पत्नी असे अर्थपूर्ण सहजीवन फार कमी लोकांच्या वाट्याला येते. कोणत्याही मतभेदांच्या प्रसंगी आपल्या नात्याला अभद्र वळण न लावता एकमेकांची स्पेस जपणारं हे जोडपं मिळून साऱ्याजणी च्या वतीने सावित्रीज्योती समता सहजीवन पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आहे.

#HappyMarriage #typicalIndianmarriage #Indianmarriagesystem #विवाहसंस्था

मनीषा पाटील
सिंधुदुर्ग

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form