विद्या आणि अज्ञान

विद्येने काहीही न बोलता पिंपळाच्या झाडावरील अज्ञानाच्या जंतूला पोत्यात बांधून टाकले आणि ती विज्ञानाच्या मार्गाने चालू लागली. अज्ञानाने सगळीकडे हातपाय पसरण्याच्या आत तिला अंधारनगरीतून बाहेर पडायचं होतं. विद्या चार पावले गेली नाही तोच अज्ञानाची बडबड सुरू झाली. “राणी,तू हे सर्व का करत आहेस, हे मला कळत नाही,निष्कारण तू कष्ट घेत आहेस, तूसुद्धा प्रगल्भ राजाप्रमाणे सुखाला मुकशील, तू मला अंधार नगरीच्या बाहेर नेऊ शकणार नाही.त्यापेक्षा तू बोल म्हणजे मी स्वत:च निघून जाईन.” असे म्हणून अज्ञानजंतू जोरजोरात हसू लागला.पण विद्या निष्ठेने पुढे जाऊ लागली.हे पाहून अज्ञान म्हणाले, “तुला चालण्याचे कष्ट होऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो म्हणजे तुझा रस्ता लवकर सरेल.” 
विदयेच्या प्रतिसादाची वाट न पहाता अज्ञानजंतूने गोष्ट सुरू केली. 
“मेघना नदीच्या डोंगराळ प्रदेशात एक मोठे खोरे होते, नदीच्या किनारी गेले तर किंवा डोंगरावर चढले तरच या खोऱ्यातील गावांना बाहेरचे जग दिसत असे. तिथे एक मुलगी राहत होती, मेधावी. ती सुखवस्तू घरात जन्माला आलेली मुलगी होती. तिचे वडील सांगतील ते सर्व ती करे. एकदिवस तिचे वडील तिला बाहेर फिरायला घेऊन गेले. ते दोघेजण डोंगरावर चढले. आणि प्रथमच मेधावीने बाहेरचे जग बघितले. तिने नदीबद्द्ल, तिच्या प्रवाहाबद्दल अनेक प्रश्न वडिलांना विचारले. फिरत फिरत ते अजून लांब गेले, तेव्हाही मेधावी सारखे प्रश्न विचारतच होती. तिने विचारले, “बाबा जग किती मोठे आहे?” तिच्या वडिलांनी सांगितले की जग खूप मोठे आहे, त्यात खूप राज्ये, देश, नद्या, डोंगर आहेत, विस्तीर्ण असा समुद्र आहे. प्राणी,पक्षी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत! ते ऐकून मेधावीला खूप उत्सुकता निर्माण झाली. ती रोज काही ना काही कारण काढून बाहेर जायची आणि पण तिची उत्सुकता कमी होण्याऐवजी वाढली. तिला बाहेर जाऊन जग बघण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी तिने पुरेसे शिक्षण घेतले. आणि एकदिवस ती त्या खोऱ्याच्या बाहेर पडली. आईवडिलांनी ‘विवेकाची शिदोरी’ तिच्याबरोबर दिली. वेळोवेळी त्याचा उपयोग करण्यास सांगितले. आणि पूर्ण विश्वासाने ती जग फिरायला निघाली. 
रस्त्याने जातांना तिला अनेक वनस्पती दिसल्या, त्या वनस्पतींचा अभ्यास कसा केला जात असेल? असे प्रश्न तिला पडू लागले. तेवढ्यात चालतांना ती अडखळली आणि खाली पडली, तेवढ्यात एक युवक धावत आला आणि त्याने तिला उठवले. तो म्हणाला, “तुम्हांला जखम झाली आहे, ती बरी कशी करायची हे मला माहीत आहे.तुम्ही माझ्या बरोबर चला.” मेधावीने विचार केला,आता जर मदत घेतली नाही तर आपण पुढे जाऊ शकणार नाही.म्हणून ती त्या युवकाबरोबर निघाली.त्याची जवळच एक झोपडी होती.त्याने घरात जाऊन काही मडकी आणली.आणि त्यांचा वास घेतला.मेघावीने विचारले, “तुम्ही कशाचा वास घेत आहात? तेव्हा तो युवक म्हणाला, “मला वनस्पती मधले औषधी गुण वासाने ओळखता येतात,तो वास घेऊन मी औषधोपचार करतो.”त्याच्या घरात अनेक आजारी लोक पहुडले होते.त्यांना त्या युवकाने बरे केले होते.मेघावी त्या युवकाची विद्या बघून भारावून गेली,ती म्हणाली, “मला तुमची विद्या शिकावी वाटते,ती शिकून तुमच्याबरोबर काम करावे वाटते.” तो युवक यावर काहीच बोलला नाही.
मग मेघावी काही दिवस तिथं राहिली आणि पुढच्या गावाला गेली. 
तेव्हा तिला बाजारात एक माणूस दिसला जो पक्ष्यांशी बोलत होता.त्याचा तो गुण तिला फार आवडला.ती त्या माणसाला म्हणाली, “मलाही पक्ष्यांची भाषा शिकवा,सारे जीवन मी त्यासाठी देऊ शकते.” तो पक्ष्यांचा भाषा जाणणारा मेघावीचे बोलणे ऐकून खुश झाला. मेघावी काही दिवस त्या गावात राहिली आणि नंतर ती पुढे जाऊ लागली.तेव्हा ती दाट जंगलातून जाऊ लागली.आजूबाजूला कोणी नाही,अशा अंधारातून चालतांना ती घाबरली नाही.पण अचानक तिचा पाय एका सापळ्यात अडकला,कोणीतरी तिला वर उचलून घेत असल्याचे तिच्या लक्षात आले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तेव्हा जवळच्या गावातील काही लोक धावत आले. तेव्हा एका युवकाने प्रसंगावधान राखून मेघावीचा जीव वाचवला.त्याने तिला सापळ्यातून सुखरूप सोडवले.त्याचे हे धैर्य बघून मेघावीला आनंद झाला.त्याने तिला त्याच्या गावातील घरी नेले.स्वतः तिला पाणी आणून दिले. नंतर त्याने मेघावीला जेवणाचा आग्रह केला.तेव्हा मेघावीला काय बोलावे कळेना, तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझा मुलगा उत्कृष्ट स्वयंपाक करतो आणि तो स्त्रियांना आदराने वागवतो.” मेघावी त्याच्या हातचे जेवण जेवली. आणि दोन दिवसाने मेघावी पुढच्या प्रवासाला निघाली.तिला अनेक माणसं भेटली.ती एक दिवस आपल्या खोऱ्यात परत आली,तेव्हा तिचे वडील म्हणाले आता तुझे लग्न करायला हवे.तेव्हा तुला कोणी पसंत असेल तर सांग?”
विद्या भराभर अंधेर नगरीच्या बाहेरच्या रस्त्याकडे जात होती.त्याचवेळी अज्ञानाने तिला प्रश्न विचारला, “विद्या आता तू सांग, मेघावी कोणाशी लग्न करेन? तू जर या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीतर मी तुझ्या अस्तित्वाचे तुकडे तुकडे होतील” विद्या कितीतरी वेळ विचार करत होती.तिला बोलायचं नव्हतं,पण उत्तर दिल्याशिवाय तिला राहवत नव्हतं. तेव्हा अज्ञान जोरजोरात हसू लागले, तेव्हाच विद्या बोलू लागली, “ज्याला वनस्पती शास्त्राचे ज्ञान आहे,ज्याला औषधी गुण समजतात,तो लोकांना मदत करतो, मेघावी त्याच्याशी लग्न करणार नाही. कारण तो माणूस म्हणून घरात कसा आहे हे तिला माहीत नाही. दुसरा ज्याला पक्ष्यांशी भाषा येते, त्याचे एक वेगळेच जग आहे,काही काळ ते आकर्षक वाटते,पण तो त्याचा उपयोग मानवी समाजासाठी कसा होईल याचा विचार करतांना दिसत नाही. आणि तो घरात माणूस म्हणून कसा वागतो हे तिला माहीत नाही.म्हणून ती त्याच्याशी लग्न करणार नाही.ती तिसऱ्या धाडसी आणि वेळेला मदतीला येणाऱ्या युवकाशी लग्न करेल - कारण तो घरात त्याच्या आईला सन्मानाने वागवतो. तसेच तो घरात माणूस म्हणून कसा वागत होता हे मेघावीने बघितले आहे.”
“ हा: हा: हा: हा:”अज्ञान हसत हसत पोत्यातून बाहेर येऊन म्हणाले, “विद्ये तू चातुर्याने या प्रश्नाचे उत्तर दिलेस - पण तू आपला नियम मोडला म्हणून मी पिंपळाच्या झाडावर निघून जात आहे. स्त्रियांना सन्मानाने वागवण्याचे ज्ञान तुझ्या राज्यात नक्की सर्वांना मिळेल. यांची मला खात्री आहे.” असे म्हणून अज्ञान पिंपळाच्या झाडावर जाऊन बसले. माणसाच्या ज्ञानात कुठे फट दिसते यावर अजूनही ते बारीक लक्ष ठेवून आहे!

अश्विनी बर्वे 

निफाड 

7 Comments

  1. सुंदर व बोधप्रद कथानक ...

    ReplyDelete
  2. ओहो.. खूप भन्नाट तंत्र वापरलंय गोष्ट साःगण्याचं. आणि गोष्टही फार छान. जामा आवडली.

    ReplyDelete
  3. गोष्ट फारच छान आहे. ह्यातल्या व्यक्तीरेखा अमूर्त किंवा प्रतिकात्मक आहेत पण त्यातून मिळणारा बोध विचारपूर्वक आहे.

    ReplyDelete
  4. खूप सुंदररित्या सांगितले आहे .

    ReplyDelete
  5. अगदी सुरेख जमली आहे गोष्ट , वाह वा

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form