“एक दोन तीन / दहा वीस पन्नास / शेकडो हजारो लाखो / अगणित अगणित बाया/ ह्या बाया असे वर्ग, धर्म, जात आणि वंश असे भेद बाजूला सारून अनुभवाचे एकत्व साधतात/ दिवस सरत जातात / उन्हं चढत जातात / शिराळ सावल्या उतरत / रात्री पसरत जातात / बायाबायांवर / नवरे चढत जातात / पसंतीचे, नापसंतीचे / होकाराचे, नकाराचे / निचेष्ट निपचित अविचल / शिथिल शिथिल”
सारिका उबाळे यांच्या “कथार्सिस” या कवितासंग्रहातील ही एक कविता!
अनेक स्त्रियांचा अतिखासगी अनुभव जात, वर्ग नि वंशाचे भेद भेदून जगभरातल्या स्त्रियांसाठी ही कविता एक सामायिक अनुभव बनते. स्त्रियांच्या अनुभवातील ही वर्गवंशातीत सामायिकता या खासगीपणात दडलेली सार्वजनिकत्व पुढे आणते. अलीकडे स्त्रीवादामध्ये देहाविषयी सघन असे सिद्धांतन सुरू आहे. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील ताणेबाणे, संघर्ष, विविध प्रकारची हिंसा, अवहेलना, पुरुषांकडून होत असलेली सौंदर्यधारणा (ज्यामध्ये सुप्त अशी हिंसा आणि भोगलालसा दडलेली असते) यांचे व्रण हे शेवटी मनावर जसे उमटतात तसे शरीरावरही उमटतातच. सारिका उबाळे यांच्या कवितेत विलक्षण अशी देहजाणीव, देहनिष्ठा आणि त्यासंबंधी स्वातंत्र्य व स्वायत्ततेची प्रखर अशी आस दिसून येते. स्त्रियांच्या जीवनात असलेल्या श्रमाची यांत्रिकता, नात्यांचा कृत्रिम आणि शुष्क बाजार, इतरांकडूनच्या प्रेम आणि ओलसरपणाचा अभाव याची अतिशय तरल अशी मांडणी सारिका उबाळे यांच्या कवितांमध्ये प्रत्ययाला येते.
स्त्रियांच्या जीवनात येणारे अनुभव हे अतिशय व्यामिश्र स्वरूपाचे आहेत. या कवितांमधून व्यक्त होत असलेल्या स्त्रीजीवनातदेखील कमालीचे वैविध्य आहे. अन्याय मुकाट्याने सहन करीत बसलेल्या स्त्रिया, गृहिणी म्हणून आदर्शत्वात स्वत:ला बसविण्याचा प्रयत्न करणार्या स्त्रिया, “चल ही व्यवस्थेची उतरंड फोडत जाऊ आपण” अशा शब्दांत प्रियकराला साद घालणार्या प्रेयसी, धर्मांची चिकित्सा करणार्या स्त्रिया, आपलं लैंगिक दमन नानाविध मार्गांनी भोगत राहतार्या स्त्रिया अशा अनेक रूपांतील स्त्रीजीवन या कवितांमधून अभिव्यक्त झालेले आहे.
स्त्रियांचे दैनंदिन जीवन हे या कवितेचा नित्यविषय आहे. या साधारण, नित्याच्या आणि अतिसुमार वाटणार्या अनुभवांच्या आड लपलेल्या किंवा अकारण गौरविल्या गेलेल्या, अलंकृत केल्या गेलेल्या आणि आदर्शीकृत स्त्रीजीवनात अदृश्य केल्या गेलेल्या अनुभवांच्या भेसूरपणाची आणि नागवेपणाची उसवणूक करीत असते. ह्या कविता वाचताना भयभित व्हायला होतं! आपली आपल्यालाच घृणाही वाटायला लागते. वाचताना आपण आपोआपच अंतर्मुख होत जातो आणि स्वचिकित्सा करायला लागतो. या कवितेत साकारले गेलेले अनुभवविश्व हे व्यक्तिगत अनुभवविश्व म्हणून एखाद्या स्त्रीचे जरी वाटत असले तरी ही स्त्री एखादी विविक्षित स्त्री राहत नाही. ती तिच्या अवतीभवती असलेल्या आणि नसलेल्या अगणित स्त्रियांची प्रतिनिधी बनते. या कवितेत स्त्रीचे खासगीपण सामुदायिक अनुभवात विरघळून जाते आणि स्त्रीचा सामुदायिक अनुभव हा अंतिमत: तिचा खासगी भोगवटा असतोच असतो. स्त्रीजीवनातील दु:खाची आणि दमनाची दाहकता व तीव्रता ही अतिशय अलवारपणे आणि सुक्ष्मतेत जाऊन शब्दबद्ध करण्याची कला कवयित्रीने दाखविली आहे. अनुभवाची तरलता अभिव्यक्त करण्यासाठी आवश्यक अशी शब्दकळा त्यांच्याकडे आहे.
पारंपरिक कविंप्रमाणे प्रतिमांची सृष्टी न उभारता ही शब्दकळा कवयित्रीने जीवनानुभवातून कमावलेली आहे. कवयित्रीच्या मनातील घालमेल, कासाविस, स्वपीडण, संताप, प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष, दंभस्फोट करण्याची आतुरता, स्वत:ला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची तयारी, इतर स्त्रियांच्या पराकोटीच्या सोशिकतेविषयीची चीड, पारंपरिक नात्यांच्या जाळ्याला नाकारत शाश्वत अशा प्रेमाचा आणि प्रियकराचा शोध घेण्याची आंतरिक उर्मी, उसवलेले जीवन पुन्हापुन्हा विणू पाहणार्या आपल्या अवतीभोवती सामान्यपणे हिंडणार्या-फिरणार्या स्त्रियांच्या जीवनातील अलौकिकत्व शोधण्याची तयारी, हे सारंच वाचून आपण विषण्णही होतो आणि समृद्धही!
शोषणव्यवस्थेविरोधात विद्रोह वगैरे करणार्या स्त्रिया या कवितासंग्रहात फारशा दिसत नाहीत. याऐवजी, स्त्रीजीवनाचे विविध पदर हे हळूवारपणे पण तसेच कणखरपणे आणि योग्य ते धैर्य दाखवून उलगडविण्याकडे कवयित्रीचा कल आहे. याचा अर्थ या कवितेतील स्त्री ही नेहमीच तिचे ‘कर्तेपण’ नाकारून ‘बळी’ या प्रारुपातच बंदिस्त आहे असे नाही. .... या कवितेत कवितेची नायिका पितृसत्ताक धर्माची परखडपणे चिकित्सा करते आणि प्रसंगी पारंपरिक कवितेत अप्रस्तुत आणि अश्लाघ्य मानली गेलेली ‘मोडा’, ‘तोडा’, ‘जाळा’ अशी उग्र आणि निर्भिड भाषा वापरून स्त्रियांच्या कर्तेपणाला साद घालते. सारिका उबाळे पितृसत्तेची उकल करण्याच्या किमानपक्षी ध्येयवादाने भारित आहे. कोणत्याही बांधिलकीकडे ‘ओझे’ आणि ‘मर्यादा’ मानणार्या समकालीन कविंच्या आवाजी गदारोळात उबाळे यांची कविता तिच्या मर्यादांसह बांधिलकी आणि परिवर्तनावर विश्वास ठेवून आपल्यालाही विचार आणि कृतीप्रवण होण्यास नि:संशयपणे प्रवृत्त करेल. प्रस्तुत कवितासंग्रहात पितृसत्तेचे सुक्ष्मतम संदर्भ अतिशय तरलतेने बघायला मिळतात.
स्त्रीजीवनातील व्यामिश्रता हे त्यांच्या कवितेचे एक प्रधान वैशिष्ट आहे. त्यांच्या कवितेत मध्यमवर्गीय एकसूरी अनुभव जगणार्या बायका जशा दिसतात तशाच या कवितेत ‘भ्रमिष्ट बायका’, ‘लोकलमधल्या बायका’, ‘गावाबाहेरच्या बायका’, ‘सिग्नलवरच्या बायका’, ‘लुटलेल्या बायका’, ‘लाचार बायका’, ‘दैवी बायका’, ‘पाठमोर्या बायका’, ‘चिरक्या घोगर्या बायका’, ‘बुरख्यातल्या बायका’, ‘बसमधल्या बायक्या’, ‘बिनचेहर्याच्या बायका’ अशी बायकांची नानाविध रूपे दिसतात. अर्थात कवयित्री या कवितेत स्त्रीदु:खाचा केवळ ‘न’चा पाढा वाचत नाही; तर ती प्रेमाचा बेगमपूराही शोधते आहे.
“तुझ्या श्वासातच / तर असतेय मी / आत घेतलास / तर देहात.. / घेतला नाहीस / तर? / देहाबाहेर...” आणि ‘एकमेकांना मोरपीस भेट देत आहेत मोरपंखी बायका” अशी कल्पना करून “बेनाम गलीच्या काठावरून / एकेक घुंगरु तोडत..” - कवितेचा हा स्वर आश्वासक आणि नवी उमेद देणारा आहे.
शेवटी, स्त्रीदास्याच्या विमोचनाचे मंगलसुक्त कवयित्री गाते -
“हे बिनचेहे-याच्या बायांनो / आम्ही प्रार्थना करतोय / तुमच्यासाठी जगातल्या सगळ्या ओझी वाहणार्या / डोक्याखालच्या / रिकाम्या कॅनव्हासवर / पसरोत नवे रंग.. / फुटोत नवे चेहरे.. / उमलनू येवोत कान, नाक, ओठ, / पाणीदार डोळे.. / ओठा ओठांवर / लगडून येवो शब्द / अन् एक नवी भाषा / स्वातंत्र्य विद्रोह अन् / आत्मसन्मानाची...”.
- कवयित्रीचा ही मंगलप्रार्थना प्रत्येक जीवाचा ध्यास बनो!
दिलीप चव्हाण
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ