स्त्री मुक्ती चळवळीतील मैत्रीण

समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार असलेली आमची स्त्री मुक्ती चळवळीतील मैत्रीण गेल ओमवेट यांचे २४ ऑगस्टला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहतांना काळाचा एक विस्तृत पट समोर आहे. 
१९६० नंतरचे दशक जगभर चळवळीचे दशक ठरले. अमेरीकेतील ब्लॅक पॅंथर, युद्धविरोध, नागरी हक्कांच्या चळवळींप्रमाणेच विविध चळवळी सगळीकडे सुरू होत्या. अमेरीका असो की चीन सगळीकडेच तरूण रस्त्यावर होते. साहित्य, कला, सिनेमा सगळ्याच क्षेत्रात समांतर प्रवाह उभे राहात होते. सर्वत्र त्याचे स्वागतही होत होते. तरूणांमध्ये उत्साहाचे वारे वहात होते. चे गेव्हेरा, फिडल कॅस्ट्रो हे परिवर्तनाचे स्वप्न पाहणा-यांचे नायक बनले होते. महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरीत झालेल्या नेल्सन मंडेलांची चळवळ, मंडेलांचा प्रदीर्घ तुरूंगवास जगभर चर्चेचा विषय होता. भारतातही या काळात लोकशाही समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारा मानणा-या राजकीय गटांमध्ये तरूणांच्या विविध संघटना स्थापन झाल्या. या देशातील फुले, आंबेडकर, राजर्षी शाहू यांच्या विचारप्रणालीला जोडून घेवून परिवर्तनाचा नवा विचार निर्माण करण्याचा संघर्ष सुरू होता. डॉ. राममनोहर लोहियांनी १९५० पूर्वीपासूनच 'जात', 'स्ति्रयांची गुलामगिरी' यावर चिंतन सुरू केले होते. जातीसंस्था व स्त्रियांची गुलामगिरी हे भारतीय समाज व्यवस्थेचे पिंजरे आहेत. हे पिंजरे तोडल्याशिवाय समाजवाद अस्तित्वात येवू शकत नाही - अशी मांडणी डॉ.लोहियांनी केली होती.
लोहियांनी नरनारी समतेचा, जातीनिर्मूलनाचा विचार राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाचा भाग बनवला होता. यातूनच 'पिछडा पावे सो मे साठ' आणि 'नारी के सहभाग बिना हर बदलाव अधूरा है' या घोषणांचा जन्म झाला. राजकारणाची दिशा काही प्रमाणात बदलली. जयप्रकाशजींच्या नेतृत्वातील संपूर्ण क्रांती आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरूणांबरोबर तरूणीही सहभागी झाल्या.
पण कट्टर मार्क्सवादी 'वर्गविग्रह' कल्पनेवर ठाम होते. भारतातील कम्युनिस्ट पक्षांमधील विविध गटांवर रशिया, चीन, स्टॅलिन, माओ यांचा प्रभाव होता. तर या पक्षांमधील काही तरूणांना वर्गविग्रहात अडकलेला मार्क्सवाद अपुरा वाटत होता. पारंपारिक मार्क्सवादा पलिकडे जावून विचार झाला पाहिजे; जात-पितृसत्तेचा विचार झाला पाहिजे, स्त्रीदास्याची मांडणी करून उत्तर शोधली पाहिजे असा आग्रह होता मानवी शोषणाचे विविध संदर्भ भारताच्या परिस्थितीत शोधले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मागोवा, शहाद्याची श्रमिक संघटना या गटांमध्ये तरूण सहभागी होत होते. मार्क्सवादाच्या परिघातील चर्चाविश्वाला धक्के बसत होते. लाल निशाण पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष असे विविध पक्ष निर्माण झाले. कॉ. शरद पाटील यांनी मार्क्स-फुले- आंबेडकरवाद 'माफुआ' अशी मांडणी केली.
१९६३ मध्ये गेल ओमवेट ही अमेरीका निवासी तरूणी पदव्युत्तर अभ्यासासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत भारतात आली. शिक्षण, संशोधनासाठी आलेली ही तरूणी श्रमिक मुक्ती दल, स्त्री मुक्ती संघर्ष समितीची कार्यकर्ती बनली. भारतीय नागरीक झाली. मागील आठवड्यात वयाच्या ८१ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. १९४१ मध्ये अमेरीकेतील मिनीसोटा राज्यातील मीनिआपोलीस शहरात जन्मलेल्या गेल यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्रातील, सांगली जिल्ह्यातील कासेगाव या गावात अखेरचा श्वास घेतला. १९६३ ते २०२१ हा गेल यांच्या आयुष्यातील बदलाचा कालखंड आहे. गेल ओमवेट यांच्या कार्यकर्तृत्वामुळे हा कालखंड व्यक्तीगत न राहता सामाजिक-राजकीय परिवर्तनाचा बनला आहे.
गेल एक विदुषी होत्या. त्यांचा अभ्यास ग्रंथालयाच्या चार भिंतीत अडकलेला नव्हता. त्यांनी निवडलेला अभ्यास विषयच मुळी महाराष्ट्रातील बहुजन समाजाशी बांधिलकी सांगणारा होता. 'वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड - महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळीचा अभ्यास' या विषयावरील संशोधनासाठी त्यांनी डॉ.एलिनोर झेलीएट यांचे मार्गदर्शन घेतले. विविध ग्रंथालय, संस्थांमधील दस्ताऐवज, पुस्तकांचा अभ्यास केला. ब्राम्हणेतर चळवळीचा वारसा सांगणा-या व्यक्तींना भेटल्या. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई अशी भटकंती केली. डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांना भेटल्या. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकार चळवळीचा अभ्यास करतांना गेल यांची इंदुताई पाटणकर या विद्रोही स्त्रीशी भेट झाली. इंदुताई बरोबर त्या गावोगाव फिरल्या. त्यांची मैत्रीही झाली. भारत पाटणकर आणि गेल यांची भेट त्यानंतर झाली. पुढे दोघांनी लग्न केले. मैत्री, प्रेम, विवाह, सहजीवनाचा प्रवास झाला. ब्राम्हणेतर चळवळीचा अभ्यास करता, करता गेल पाटणकर कुटुंबात पत्नी, सून म्हणून सहभागी झाल्या. ब्राम्हणेतर आणि सत्यशोधक चळवळीच्या वारस बनल्या.
भारत पाटणकर आणि गेल यांचे सहजीवन विचारी कार्यकर्त्यांचे समंजस असे पती-पत्नीचे नाते होते. दोघांनी एकत्रितपणे कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे लिखाण पारंपारीक मर्यादांपलीकडे जाऊन नव्या दृष्टीने केले. भारत पाटणकरांनी गेल यांच्यावर अनेक कविता लिहिल्या. 'सखी' ह्या दीर्घकवितेचे पुस्तक गेलच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणार आहे.
इंदुताई आणि गेल यांना एकत्रित आणि गेलला स्वतंत्र असं भेटण्याची संधी मला मिळाली. इंदुताई ज्येष्ठ होत्याच आणि गेलही माझ्या पिढीतल्या कार्यकर्त्यांपेक्षा वीस वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांच्या विषयी माझ्या पिढीतील कार्यकर्त्यांना कुतुहल आणि आकर्षण होते. उंच आणि काहीसे धिप्पाड असे त्यांचे व्यक्तीत्व होते. इकॉनॉमीक पोलीटिकल विकली मधील त्यांचे काही लेख 'तात्पर्य' मासिकात आले होते. गेल ओमवेट पारंपारिक मार्क्सवादांच्या मर्यादा ओलांडत होत्या. भारतातील परिवर्तनवादी चळवळींनी जातीसंस्थेचा विचार करायलाच हवा असा त्यांचा आग्रह होता. जातिसंस्थेमुळे शोषणाचे स्तर ओळखणे मुश्कील होते. या शोषणात स्त्रीयांचे शोषण मिसळलेले आहे. ही गुंतागुंत समजून घ्यायला हवी अशी गेल यांची मांडणी होती. गेल आणि भारत यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयीचे आकलन पारंपारिक कम्युनिस्टांपेक्षा वेगळे होते. स्वातंत्र्यलढा हा साम्राज्यवादी विरोधी लढा होता. याचे भान मार्क्सवादी गटांना देण्याचे काम गेल आणि भारत पाटणकरांनी केले.
गेल यांना ज्ञानाच्या ध्यासाने झपाटलेले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आपल्या पी.एच.डी च्या प्रबंधाबरोबरच 'सीकिंग बेगमपुरा', 'आंबेडकर टूवर्डस एनलायटन इंडिया', 'दलित व्हिजन', 'दलित अँड डेमोक्रेटिक रेव्होल्युशन इन इंडिया', 'अंडरस्टँडिंग कास्ट-बुद्धा', 'आंबेडकर अँड बीयाँड', ‘We Will Smash this Prison’, 'न्यु सोशल मुव्हमेंट इन इंडिया', 'व्हायलन्स अगेन्स्ट वीमेन', ' Gender and Technology ', 'बुद्धिझम इन इंडिया', 'साँग्ज ऑफ तुकोबा' अशी विविध पुस्तकं लिहिली. या यादीवरून गेल यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. समाजशास्त्र आणि इतिहास अशा दोन्ही अंगानी त्यांनी संशोधन केलेले आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि ब्राम्हणेत्तर चळवळीची गेल यांनी दुनियेला ओळख करून दिली. त्यांचे योगदान मोठे आहे. संत तुकाराम, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नव्याने मांडणी गेल ओमवेट यांनी केली. 
 https://drive.google.com/drive/mobile/folders/181SfKTHfO6Rp7_k2qCUChGTs-SktXAJ2?fbclid=IwAR2VBYjkqyhWLvejM0GFMu9qgQd4tDoMAH_lxJY-QmFf55n4nllqtHqwxYo या लिंकवर त्यांचे विचार वाचता येतील.
अनेक शिबीरं, कार्यक्रम, विद्रोही साहित्य संमेलनात जावून गेल मांडणी करत होत्या. भाषा, प्रदेश, संस्कृती असे सर्व भेद त्यांनी ओलांडले होते. मराठी, हिंदी भाषा शिकल्या. ग्रामीण भागात फिरतांना सर्व गैरसोयी आंनदाने स्वीकारल्या. कधीही तक्रार केली नाही. या विदुषीचे वैशिष्ट्य म्हणजे वागण्या-बोलण्यातील सहजता आणि साधेपणा. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना समोरच्यावर त्यांच्या विद्वत्तेचे कधीही दडपण येत नसे. मोकळा संवाद होत असे. त्या कायम हसत बोलत असत. गेल यांच्या या स्वभावामुळेच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांची मैत्री झाली.
क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर आणि गेल यांचे सासू-सुनेचे नाते मैत्री व जिव्हाळ्याचे होते. इंदुताईना गेलचे अतिशय कौतुक होते. त्यांनी एका लेखात लिहिले- ''भारत व गेल यांच्या लग्नाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया समिश्र होत्या. शहाण्णव कुळातली मुलगी करायला हवी होती. ' 'पाश्चात्य मुलींचं काही खरं नसतं. नव-याला भुरळ पाडून घेऊन जातात. तिकडेच स्थायिक होतात. ' इथपर्यंत अनेक शेरे ऐकले. अशी लग्नं टिकत नाहीत, अशीही प्रतिक्रिया ऐकावी लागली. पण मी पर्वा केली नाही. आमच्या नागनाथ नायकवडींच्या आई क्रांतिवीरांगना लक्ष्मीबाई गेलला बघून म्हणाल्या, 'दोडाचं पांडर द्वाट दिसतंया. अमेरीकेतलं आसलं तरी शेतक-याचंच बाळ हाय! माज्या बाबूजीचं नाव ही पोरगी समद्या दुनियेत न्हेऊन गाजविल्याशिवाय -हानार न्हाय!' त्यांचं म्हणणं खरंच ठरलं. 
महाराष्ट्रातील परित्यक्ता चळवळीत अहमदनगर आणि सांगली, धुळे जिल्ह्यातील काम प्रमुख मानले जाते. समता आंदोलन म्हणजे आम्ही आणि स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीच्या इंदुताई, गेल ओमवेट 'परित्यक्ता' स्त्रियांचा विचार नागरिक म्हणून व्हावा यासाठी आग्रही होतो. हा आमचा विचार व चळवळीतील समान धागा होता. त्यामुळेच परित्यक्तांसाठी स्वतंत्र रेशन कार्ड पालकत्वाचा समान अधिकार, सांपत्तिक अधिकाराच्या मागण्या आम्ही या चळवळीमध्ये केल्या. ५ मे १९९० रोजी समता आंदोलनाने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर परित्यक्तांचा मोर्चा काढला होता. या मोर्चासाठी गेल ओमवेट उपस्थित होत्या. या विषयावर आमचा कायम संवाद राहिला. परित्यक्ता स्त्रियांच्या चळवळीत गेल यांनी इंदुताईंना साथ दिली. स्त्रीवादी नेत्या, विचारवंत आणि कार्यकर्त्या म्हणून गेल आपल्या कायमच्या स्मरणात राहतील. गेल यांच्या स्मृतीला क्रांतिकारक अभिवादन.

अॅड . निशा शिवूरकर

संगमनेर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form