“उनमें खौफ है इसिलिए…”

महिला प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे असा एकीकडे गवगवा होत असताना गावपातळीवरील महिलांचाही विचार होणं गरजेचं आहे. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशाच समाजातील गाव-शहरातील महिलांच्या राहणीमान, मानसिकता, विचारांविषयीच्या दोन बाजू असतात.
गेल्या महिन्यात तेलंगाना राज्यातील निजामाबाद येथे मित्राच्या लग्नाला गेलो असताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. पहिल्यादिवशी पोहचल्यानंतर फ्रेश होऊन जेवण केलं… संपूर्ण बंगला मस्त असा होता मला राहण्यासाठी एक स्वतंत्र बेडरूमही दिला होता. दुसऱ्या दिवशी लग्नाची लगबग सुरु झाली. लग्न मुस्लीम समाजातील होते. आम्ही मुलाकडून होतो. रात्रीचं लग्न असल्यामुळे आरामात तयारी सुरु होती. घरातील अनेक महिला मस्त साड्या, लहेंगा घालून तयार झाल्या होत्या… सर्वात लेट माझी तयारी झाली कारण मला फार काही सजण्याची आवड नाही. मी साडी घातली आणि अनेकजण माझ्या रुममध्ये येऊन मला बघत होते आणि बाहेर जाऊन चर्चा करत होते… त्यांच्या घरातील नोकरानी पासून वयोवृद्ध महिलांची चर्चा सुरु होती, मी म्हटलं काय झालं मी काही वेगळी वाटते का? त्यावर त्यांनी समजून सांगितलं हे गाव आहे आणि आमच्या समाजात महिला नकाब घालूनच बाहेर येऊ जाऊ शकतात. मी म्हटलं मग प्रोब्लेम काय आहे मी तर पाहुणी आहे. त्यावर त्या म्हणाल्या, ‘तू जो ब्लाऊज घातलाय तो सिव्हलेस असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यावर आहे. कारण आमच्या कडे कुणी असं घालत नाही.’ अनेकांनी मला त्यावेळी दुसरा ब्लाऊज घालण्यास सांगितले मी म्हटलं, ‘माझ्याकडे नाही दुसरा ब्लाऊज…मी तर अशीच येणार’…. तरीही चर्चा सुरुच होत्या मी त्याकडे कानाडोळा करत खाली आले… खाली आले तर काय एवढ्या नटलेल्या बायका- पोरी- म्हाताऱ्या सगळ्या नकाब मध्ये… त्यांच सजलेलं रूप एका क्षणात काळोखात गेलं आणि त्यात मीच साडीवर होते… मला खूप कसं तरी वाटू लागलं. लग्नाच्या हॉलवर पोहचताच आणखी एक धक्का... स्त्रियांचा आणि पुरुषांचा हॉल वेगवेगळा होता…तेथील महिला म्हटल्या मुस्लीम समाजातील लग्न असंच असतं. नवरा-नवरी वेगवेगळ्या ठिकाणी असतात शेवटी सह्या झाल्यानंतर नवरा मुलीच्या हॉलमध्ये येऊन तिथून तिला आपल्या घरी घेऊन जातो. ही सगळी परंपरा मी नव्यानेच पाहत होते.
विशेष बाब ही की ज्या महिलांना मी नकाबमध्ये पाहिलं त्याचं महिला हॉलवर पोहचताच नकाब काढून आपल्या बॅगेत ठेवत होते. सगळ्या महिलाच माझ्या अवती-भवती येऊन गप्पा मारू लागल्या… अनेक महिलांनी त्यांच्या कहाण्याची पोटली उघडली मग नकाब पासून दाग-दागिण्यापर्यंत…गप्पा रंगल्या. 
एक महिला त्यांच्या पारंपारिक रितीरिवाजाबद्दल बोलताना थोडा राग व्यक्त करत होती. की आता स्त्रियांसाठी हॉल दिला आहे आमच्या महिला-पुरुष वेगवेगळी बसण्याची सोय आहे मग आमच्या खेम्यात पुरुष येऊन बसू शकतात परंतु आम्ही पुरुषांच्या खेम्यात जाऊन बसू शकत नाही… नाही तर आरडा-ओरडा होईल, प्रथेला तडा जाईल असं ती सांगत होती… तिची मानसिकता एकप्रकारे या प्रथेला लाथाडून टाकण्याची होती परंतु एक विरूद्ध अनेक असताना अनेकांच्या विचारांना अधिक महत्त्व प्राप्त होते - अशी परिस्थिती तिच्या बोलण्यातून दिसत होती.
दुसरी महिला त्यांच्या दागिन्यांविषयी सांगत होती, आमच्याकडे नवरा बायकोला मंगळसूत्र घालत नाही तर सासू सूनेला देते त्याला गलसर असं म्हणतात त्यामध्ये चंद्र असतो किंवा नक्षीदार पेंडेंट असत. प्रत्येक दागिन्यापेक्षा अधिक महत्त्व या गलसर दागिन्याला आहे. आणि गळ्यात काही कमी दागिने दिसले की त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन खालच्या दर्जाचा असतो… असं जेव्हा ती महिला सांगत होती तेव्हा माझं स्वतच्या गळ्याकडे लक्ष गेलं मी साधं छोटं मंगळसूत्र घातलं होतं कारण मला साधं राहण्याची सवय… नंतर तिच्या बोलण्याचा रोख कळाला माझ्या गळ्यातल्या छोट्या मंगळसूत्रावर तिला टिप्पणी करायची होती. आणि माझ्या लक्षातही लगेच आलं! मी तयारी करताना नवरदेवाच्या बहिणीने मला एक गळ्यातला भरगच्च दिसणारा हार आणून दिला होता घालण्यासाठी आणि तो मी घातला नव्हता… कारण मला साधं राहणीमान आवडतं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशीच रिसेप्शन होतं. त्यातही मला माझ्या कपड्यांचं दडपण आलं होतं परंतु माझ्या नवऱ्याने समजवलं, 'तु जशी आहेस तशीच राहा कुणासाठी किंवा कुठल्याही जागेसाठी तुला बदलण्याची गरज नाही.'
मी लेहेंगा घातला आणि महिलांच्या चेहर्यावर स्मित हास्य दिसत होतं. परंतु पुन्हा त्याच नजरा माझ्याकडे गुन्ह्याच्या स्वरुपात पाहत होत्या. तरी मी काही लक्ष देत नव्हती… महिलाचं बघणं पुरुषांपेक्षाही घाबरवणारं होत म्हणून मी आमच्या मित्रांसोबतच पुरुषाच्या हॉल मध्ये बसली. नवरदेव मित्राचे वडील मराठीत माझ्याशी गप्पा मारत होते. तेव्हा एका मित्राला नवरदेवाच्या आईचा फोन आला आणि त्यांनी मला स्त्रियांच्या हॉलमध्ये बोलवलं.
नोकरानी म्हणून काम करणारी महिला पुन्हा माझ्याकडे येत माझी तारीफ करत होती आणि अचानक तिने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटलं अरे बापरे…कारण मी लेहंगाचोली असा ड्रेसअप केला होता ज्यात माझं पोट दिसत होतं. पण तिथे उपस्थितीत महिला मंडळ आणि काही पुरुष तिला शांत बस असा दम दिला…
रिप्सेप्शन नंतर घराकडे निघण्याची तयारी सुरु झाली. महिलांनी बॅगेतून आपले नकाब काढले आणि घालून तयार झाल्या पुन्हा त्या लग्नाच्या रोशनाईत काळोख दिसू लागला मला राहावलं नाही, मी विचारलं हे का बरं असं ? तिथून वयोवृद्ध खाला म्हटली… 'आम्ही बाहेर जाताना-येताना नकाब नाही घातला तर आमच्या नवऱ्यांना वाटतं की आम्ही दुसर्या पुरुषांसाठी अंगप्रदर्शन करत आहोत. उनमें खौफ है इसिलिए हमको खौफ याने काले परदे मैं रखा गया है सदीयोसे…आमच्या पुरुषांना एक भिती आहे म्हणून त्यांनी आम्हालाही भिती दाखवून अनेक पिढ्यांपासून आम्हाला असं ठेवलं आहे. एवढ्या पिढ्या या विचारांवर चालत आल्यामुळे आम्हा महिलांचीही मानसिकता पुरुषप्रधानच झाली आहे. आमची नजरही तुमच्या सारख्या मुलींना बघून राग व्यक्त करते.' 
यादरम्यान मी एका मुलीचा इस्लामिक पारंपारिक दगिन्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता… हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना तिने खूप उत्सफूर्तपणे व्हिडिओ दिला होता आणि शाळेत, कॉलेजमध्ये अँकरींग केली असल्याचंही मला धाडसाने सांगितलं होतं… मला हे पाहून खूप आनंद झाला… मुंबईला मी परतल्यावर तिचा व्हिडिओ मी तिच्या सांगण्यावरून सोशल मिडीयावर अपलोडही केला परंतु तिचा फोन आला की - 'तिच्या नवर्याला हे काही आवडणार नाही, तो तिला ओरडेल तिच्या आयुष्यात काही तरी चुकीचं होईल अशी तिला भिती होती'… म्हणून नाईलाजाने मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला… 
एकंदरितच तेलंगानातील गावात मुस्लीम महिलांसोबतच्या अनुभवात एक बाब लक्षात आली की, एकतर आपण मुस्लिम लोकांत शिक्षणाचा अभाव असल्याची  चर्चा करतो, परंतु त्यांच्या घरातील अनेक जण इंग्रजीमधूनच संवाद करत होते ! तरीही महिलांबाबतची बुरसटलेली विचारधारा, मानसिकता पिढ्यान् पिढ्या पासून चालत आलेली दिसत होती… विशेषत: महिलांना जेव्हा आपली स्पेस मिळते तेव्हा ती - वर्तमानात काय आहे, भूतकाळात काय होती आणि भविष्य तिला कसे पाहिजे त्यासाठी तिला कुठं रोखलं जातं? अशा अनेक गोष्टींचा ती खुलासा करते. सुशिक्षित घराण्यात पैसा-पाणी सर्व काही असताना तेथील महिलांना मोकळेपणाने श्वास घेण्याचा अधिकार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांनाही तेच योग्य वाटते!

प्रियंका आव्हाड

न्यूज स्क्वेअर मराठी या युट्यूब चॅनलच्या संपादक

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form