गेल्याच आठवड्यात पॉक्सोसंदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार उत्तर प्रदेशात मुलांच्या छळासंदर्भात तब्बल ६७,२०० खटले सुनावणीविना न्यायालयात पडून असल्याचं म्हटलं आहे. त्यात २८ टक्के खटले पॉक्सोअंतर्गत आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ३३ हजार खटले प्रलंबित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
पॉक्सोखाली न्यायालयात प्रचंड संख्येनं प्रलंबित असणाऱ्या खटल्यांची कारणं, उपाय यावर चर्चा होत राहील, पण दुसरीकडे एवढ्या मोठ्या संख्येने खटले दाखल होत आहेत, हीदेखील चांगली बाब म्हणायला हवी. कायद्याचा आधार घेऊन मुलांवर होणाऱ्या लैंगिक छळाला वाचा फोडली जात आहे - हे या कायद्याबाबत जागरुकता वाढली असल्याचं निदर्शक आहे.
या संदर्भात विचार करताना नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्तानेही घडलेल्या दोन घटनांची आठवण पुन्हा होते आहे, त्या घटना जरा वेगळ्या होत्या; वाचता, ऐकताना मनावर खोल चरे उमटवणाऱ्या होत्या. त्या एकाच आठवड्यात दोघींनी त्यांच्या लहानपणी घडलेल्या गोष्टी जाहीरपणे सांगितल्या. दक्षिण भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य खूशबू सुंदर यांनी वडिलांनी लहानपणी त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं. केवळ आठव्या वर्षी त्यांना हा भयंकर अनुभवातून जावं लागलं. सोबत मारहाण आणि शिवीगाळ होतीच. जे घडत होतं, त्याला विरोध करायला सात वर्षं जावी लागली. काहीही घडलं तरी पतीला देवता समजण्याच्या त्या काळात आईही काही बाेलली नव्हती. तीही मार खात होती…पंधराव्या वर्षी समज आल्यावर मात्र जिवाच्या आकांताने त्यांनी विरोध केला तेव्हा बाप सरळ घर सोडून निघून गेला.
त्यानंतर आठवडाभरातच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनीही त्यांच्या वडिलांवर असेच आरोप केले. चौथ्या इयत्तेत जाईपर्यंत त्यांना या भयंकर अनुभवातून जावं लागलं. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलं. स्वाती म्हणाल्या, ‘वडिलांची इतकी भीती होती की ते घरात येताच मी पलंगाखाली लपून बसायचे. किती तरी रात्री मी पलंगाखाली जीव मुठीत धरून काढल्या असतील. वडिलांची चाहूल लागताच मी थरथर कापायचे. ते लैंगिक छळ करून थांबायचे नाहीत, मारझोडही करायचे. वेणी पकडून ते माझं डोकं भिंतीवर आपटायचे. डोक्याला खोक पडायची. रक्त ठिबकू लागायचं… माझी आई आणि इतर नातेवाईक सोबत नसते तर मोठी झाल्यावरही मी यातून बाहेर येऊ शकले नसते.’
... महिला आयोगाच्या पदाधिकारी असलेल्या दोन महिलांनी नोंदवलेले हे अनुभव. महिला दिन साजरा होत असताना त्या दोघींनी हे जाहीरपणे सांगितले म्हणून लोकांनी किमान याची दखल तरी घेतली, पण आपल्या देशात या घटना अजिबातच दुर्मिळ वगैरे नाहीत.
आपली कुटुंबव्यवस्था परंपरेनं अत्यंत कडेकोट आहे. ‘घरातल्या गोष्टी घरात’ हे इतकं ठोकून मनावर बिंबवलेलं असतं की, चार भिंतीआड घडणाऱ्या दररोजच्या शारीरिक, मासिक, भावनिक आणि अगदी लैंगिक हिंसाही बंद दाराआड राहतात. बदनामीच्या भयानं कधी त्याचा उच्चार करायची हिंमत होत नाही, तर कधी समजूत काढून, कधी धाकदपटशाने त्या दाबून टाकल्या जातात, त्यावर पांघरुण घातलं जातं. अनेक घरांत हे गलिच्छ प्रकार घडतात. राजरोसपणे पुरुष कुटुंबातल्या, जवळच्या नात्यातल्या मुलांना त्यांच्या पिसाट लैंगिक वासनांचे बळी बनवतात. एकदा, दोनदा नव्हे तर वर्षानुवर्षे हे प्रकार घरांत घडत राहतात. पुष्कळदा हे करणारे पुरुष घरातले कर्ते, आर्थिक नाड्या हातांत असलेले, आपल्या तालावर सगळ्यांना नाचवणारे असतात, तर कधी अगदीच जवळचे, सख्ख्या नात्यातले असतात. जेवढ्या संख्येने हे गुन्हे नोंदवले जातात त्याच्या कितीतरी पटीने ते ओठांआड, दारांआड बंद राहतात. या मुलांचे हुंदके आणि आक्रोश कधीही बाहेर येत नाहीत. खुशबू सुंदर किंवा स्वाती मालिवाल यांसारख्या हिंमतीच्या बायका, अपवादाने एखादा पुरुष अनेक वर्षांनी त्याला वाचा फोडतात, पण तोवर खूप उशीर झालेला असतो.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आकडेवारीनुसार तब्बल ९६ टक्के गुन्ह्यांमध्ये लैंगिक छळ करणारी व्यक्ती मुलांच्या माहितीतली असते, अर्थात कुटुंबालाही परिचीत असते. २०२० च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर दिसतं, पॉक्सो कायद्याखाली नोंदवलेल्या गुन्ह्यांत बहुतेक आरोपी कुटुंबातले सदस्य होते, स्नेही होते, शेजारी होते किंवा शिक्षक, सहायक होते. म्हणजे - ना घरं सुरक्षित आहेत ना शाळा! २०२० मध्ये २,५५६ व्यक्तींनी कुटुंबातल्या मुलांचा लैंगिक छळ केला होता, तर त्याच्या आदल्या वर्षी ही संख्या २,१५३ होती. २०२० मध्ये मुलांचा लैंगिक छळ झाल्याचे २८,०६५ गुन्हे नोंदवले गेले त्यातील तब्बल २६,९३४ गुन्हेगारांना मुलं ओळखत होती.
मुलगे आणि मुली दोघांचेही लैंगिक छळ होतात, पण अर्थातच मुलींची संख्या कितीतरी अधिक आहे. ही श्वापदं इतकी वखवखलेली असतात की, ६४० घटनांमध्ये हा प्रसंग ओढवलेली मुलं सहा वर्षांहून लहान होती. दोन वर्षांपूर्वी करोनाकाळात लॉकडाऊन लागल्यावर मुलं घरांत अडकून पडली. पहिल्या ११ दिवसांतच ‘चाइल्डलाइन’ या हेल्पलाइनवर तब्बल ३.०७ लाख कॉल आले. त्यातले ९२,१०५ कॉल हे लैंगिक आणि शारीरिक छळ झाल्याची तक्रार करणारे होते. सारं जग विषाणूशी लढत असताना ही मुलं घरांतल्या श्वापदांची शिकार होत होती.
जगातल्या एकूण मुलांपैकी १८ टक्के मुलं भारतात राहतात. देशातल्या निम्म्याहून अधिक मुलांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा लैंगिक छळ सहन केलेला असतो आणि अर्थातच लैंगिक छळ झालेली सर्वाधिक मुलं आपल्या देशात राहतात. महिला आणि बालविकास मंत्रालयाने काही वर्षांपूर्वी १३ राज्यांतल्या सव्वा लाख मुलांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार ६६ टक्के मुलांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे हिंसेचा सामना करावा लागतो, हे समोर आलं. त्यांतलं लैंगिक हिंसेचं प्रमाण ५० टक्के आहे. मुलांवर बलात्कार होतात, त्यांच्या खासगी अवयवांना स्पर्श केले जाता, त्यांना पॉर्न फिल्म, क्लिप्स दाखवल्या जातात, नग्न केलं जातं, त्यांचं तशा अवस्थेत चित्रीकरण कलं जातं, ते ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं जातं आणि हे सगळं करायला लावणारे बहुसंख्य मुलांचे परिचीत, कुटुंबांतले असतात.
अशा हिंसेला सामोरं जाणाऱ्या मुलांना प्रचंड मानसिक धक्का बसतो. मुलांच्या आयुष्यावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. मुलं ते प्रसंग विसरू शकत नाहीत. ती प्रचंड तणावात राहतात. आत्मविश्वास हरवून बसतात. दीर्घकाळ याच स्थितीत राहिल्याने नैराश्यात जातात, आत्महत्येचे विचार, स्वत:च्या शरीराबद्दल घृणा, भीती, अनिश्चतता, लाज, अपराधगंड, असहाय वाटणं, शरीरसंबंधांबद्दल किळस… हे परिणाम तात्पुरते, काही काळासाठी किंवा दीर्घ काळही राहू शकतात.
कुटुंबात होणारी लैंगिक हिंसा ही चिंताजनक बाब आहे. अनेकदा मूल याबद्दल सांगत असूनही त्याला गप्प बसायला भाग पाडलं जातं, लैंगिक छळ करणारी व्यक्ती दररोज सोबत रहात असते. अनेकदा एकाच घरात राहून मुलांना वर्षानुवर्षे त्याच छळाला सामोरं जावं लागतं. मुलांवर विश्वास ठेवणं, मुलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करणं, जे घडलं त्यात तुझी चूक नाही, याबाबत विश्वास देणं महत्त्वाचं असतं. मुलांना त्रास देणारी व्यक्ती नात्यानं कितीही जवळची असली तरी त्या नात्यापेक्षा मुलाचं संरक्षण अधिक महत्त्वाच मानलं गेलं पाहिजे. कुटुंबाने ठामपणे मुलासोबत उभं राहायला हवं.
या गोष्टी टाळण्यासाठी तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यांतला फरक समजावणं, शरीराच्या खासगी भागांबद्दल सांगणं, त्याहून मोठ्या मुलांना मुलं आणि मुली यातला शारीरिक फरक समाजावणं. कुमारवयीन मुलांना शरीराचं काम कसं चालतं ते सांगणं, शरीरसंबंधांबद्दल, गर्भनिरोधक याबद्दल माहिती देणं या गोष्टी निरोगी आणि सुदृढ समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. मुलांचं बालपण सुरक्षित, आनंदी राहावं यासाठीही ते गरजेचं आहे.
सुदैवाने या गुन्ह्यांना कडक शिक्षा देणारा पॉक्सो कायदा आपल्याकडे आहे. गेल्या काही वर्षांत या कायद्याखाली गुन्हे नोंदवण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आरोपपत्रंही वेगाने दाखल होऊ लागली आहेत. शिक्षा होण्याचं प्रमाणही आशादायक आहे, पण दुर्दैवाने हे खटले चालवण्याचा वेग मात्र भलताच मंद आहे. हे लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या आकडेवारीवरून ध्यानात येतं.
घर म्हणजे आत्यंतिक विश्वास आणि प्रेम मिळतं ती जगातली सर्वांत सुरक्षित जागा… हा विश्वास विस्कटून त्यांच्यावर हल्ले करणाऱ्या श्वापदांना वेळीच रोखायला हवं. वेळप्रसंगी कायद्याच्या ताब्यात देईपर्यंतचा कठीण प्रवास मनावर दगड ठेवून करायला हवा आणि त्या कठीण प्रसंगातून गेलेल्या कोवळ्या जीवाला आश्वस्त करायला हवं की, जे घडलं त्यात तुझी काहीही चूक नाही. आमचं तुझ्यावर प्रेम आहे…
प्रगती बाणखेले
पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स
भयंकर
ReplyDelete