ज्येष्ठ नागरिकांचे लिव-इन वगैरे...

ज्येष्ठ नागरिकांचे लिव-इन या विषयावर लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणी साठी 2022 मध्ये मी 24 लेख लिहिले. मला स्वतःला लिव-इनचा अनुभव असल्याने या विषयाबद्दल मला खास जिव्हाळा होता. या लेखांच्या निमित्ताने समाजामधल्या निरनिराळ्या स्तरात असलेली, लिव-इन चा पर्याय स्वीकारलेली जोडपी मला भेटली. त्यांच्याशी मोकळेपणे बोलता आले. या बोलण्यातून लक्षात आलेले काही ठळक मुद्दे.

  • लिव-इनचा पर्याय समोर येण्यात बदललेली सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे. कुटुंब संस्था आता विभक्त नाही तर विकीर्ण व्हायला लागली आहे. कामाच्या निमित्ताने परदेशी गेलेली मुले, आयुष्याचा जोडीदार गेल्यामुळे आलेला एकाकीपणा या समस्येचा विस्तार वाढत चालला आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आयुर्मर्यादाही वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत दोन अपूर्णांकांनी एकत्र येऊन परिपूर्ण जगायचा प्रयत्न करणे ही स्वाभाविक मानवी गोष्ट आहे.
  • स्वाभाविक असली तरी सोपी गोष्ट नाही. कारण साठी पर्यन्त सवयी, जीवन-शैली बरीचशी निश्चित झाली असते. जगण्यामधला, विचारांमधला लवचिकपणा कमी झाला असतो. विशी-पंचविशीत लग्न होते तेव्हा एकमेकांशी जुळवून घेण्याची मानसिकता असते. आताची परिस्थिती वेगळी असते.


  • विवाहसंस्थेच्या परिघा बाहेर पूर्वी सुद्धा नाती होती. पण त्या नात्यांना समाज-मान्यता नव्हती. वास्तवात बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती प्रमाणे वर-वर का होईना कधी जुजबी तर कधी थोडे मोठे बदल करून विवाहसंस्था टिकून आहे. त्या निमित्ताने संस्थांतर्गत पुरुष-प्रधानता, जाती अंतर्गत विवाह ही वैशिष्ठ्ये टिकून आहेत. पुढच्या पिढीत संक्रमित होत राहिली आहेत. सहाजिकच या संस्थेची पुरुषप्रधान आणि जातीय पाळे-मुळे खोल-वर आपल्या मानसिकतेमध्ये-समाजमनात रूजली आहेत. विवाह संस्थेला धार्मिकतेचे वलय आहे. कितीही अंतर्विरोध असले तरी सर्व सामान्य माणसाला आयुष्याला स्थैर्य देणारी, पुढच्या पिढीला जन्म देणारी विवाह संस्था पवित्र वाटत असते. त्यामुळे तिच्या परिघाबाहेरची नाती प्रश्न चिन्हांकित असतात. त्यांना समाज-मान्यता मिळत नाही. आजही लिव-इनला कायद्याच्या परिघात मान्यता असली तरी समाज=मान्यता मिळालेली नाही.

 लिव-इन हा विवाह संस्थेवरचा हल्ला न वाटता 

ते मला विवाहाचे अधिक परिणत आणि प्रगल्भ स्वरूप वाटते. 

  • आज जे ज्येष्ठ या समुदायात आहेत त्यांनी पालक या नात्याने त्यांच्या मुलांच्या आंतर-जातीय किंवा आंतर-धर्मीय विवाहांना विरोध केला आहे. निदान पाठिंबा दिलेला नाही. आज तीच भूमिका त्यांची मुले पार पाडताना दिसतात. अशा विरोधात सहजी दिसणारी कारणे ही वारसा-हक्काबाबत असुरक्षित होणे, मानसिक अस्वस्थता अशी असली तरी खोलात पहाता तरुण पिढी विवाहसंस्थेची पाईक होणे हे महत्वाचे कारण आहे. समाजमान्यता नसलेल्या संबंधाचा कलंक आपल्या पालकांना लागू नये असे वाटणे ही या मध्यम-वयीन तरूण पिढीची उत्स्फूर्त, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया असते. (काही समंजस अपवाद दिसायला लागले आहेत. पण ते थोडे आहेत.)
  • कुटुंब संस्थेचे आपल्या समाजजीवनावरचे अधिपत्य खूप जाणवते. (प्रत्यक्षात संबंध दुरावले असले तरी.) विचार करता विवाह संस्था आणि कुटुंब संस्था अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या ट्विन टावर सारख्या आहेत. त्यावर आक्रमण होण्याची आशंका जरी आली तरी सर्वांच्या मेंदूत लाल दिवे लागतात. दक्ष स्थितीत मानसिकता येते. साठाव्या वर्षी कमी-अधिक गुंतागुंतीचे कौटुंबिक नाते-संबंधांचे जाळे प्रत्येकाचे तयार झालेले असते. अशा दोन व्यक्ति जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या आपले आपले जाळे सुद्धा सोबत आणतात. या व्यक्ति एकत्र येताना या जाळ्याचा विरोध सहन करायची ताकद तरी हवी किंवा कुटुंबाच्या विकीर्ण अवस्थेमुळे हे जाळे दूरस्थ, काहीसे विसविशीत तरी असायला हवे. या जाळ्याचे प्रमुख घटक असलेली आपली मुले काय भूमिका घेतात हे फार महत्वाचे ठरते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींना आपल्याला नेमके काय हवे आहे याचे स्पष्ट भान असले तरच मार्ग निघू शकतो.
  • कौटुंबिक संबंध हा घटक पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या बाबतीत अधिक प्रभावी असताना दिसतो. स्वतःचा व्यवसाय, नोकरी असून सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्याच्या गाभ्यातले संबंध कौटुंबिकच असताना दिसतात. या संबंधात त्यांची खूप मानसिक गुंतवणूक असते. संबंधांची जोपासना करण्यात, त्याचे संस्कृतिक आयाम जपण्यात आयुष्य गेलेले असते. कौटुंबिक नातेसंबंधांची रचनाच अशी असते की तिथे मैत्रभाव परिघावर असतो, किंबहुना नसला तरी चालतो.
  • असे मैत्रहीन संबंध आयुष्यभर निभावल्यावर साठीच्या टप्प्यावर विशेषतः स्त्रियांना मैत्रभावाची उणीव भासायला लागते. सहचर नसला तर सहचाराचा शोध मैत्रभावाच्या तहानेपोटी घ्यावासा वाटतो. इथे नेमकी पुरुषप्रधानतेची चिरेबंदी भिंत आड येते. पुरुष हवा पण पुरुषप्रधानता नको अशी स्त्रीची मागणी असते. तेव्हा तिला स्वतः मध्ये दडलेली पुरुषप्रधानतेची पाळेमुळे दिसायला आणि टोचायला लागतात. आणि हा शोध आणखी गुंतागुंतीचा होऊ लागतो.
  • पुरुषांच्या बाबतीत स्त्रीच्या संबंधात हा मैत्रभाव हवा असतो, पण नव्या संबंधामधली स्वतःची सोय आधी हवी असते. मैत्रभाव हा बोनस असतो. सोय महत्वाची. माझ्या पहाण्यात असे अनेक पुरुष आहेत ज्यांना त्यांची इच्छा असून सहचर मिळू शकली नाही. स्त्रीच्या आणि पुरुषांच्या मागणीमधील—अपेक्षांमधील समांतरता हे त्या मागे महत्वाचे कारण आहे. 
असे खाचखळगे असूनही लिव-इन मध्ये रहाणारी जोडपी आहेत. इथे तरूण जोडपी मी विचारात घेतली नाहीत. साठीच्या पुढचीच जोडपी विचारात घेतली आहेत. माझ्या वाट्याला तरी एकमेकांना अवकाश देणारे परस्परांचा आदर राखणारे नाते आले आहे. म्हणून लिव-इन हा विवाह संस्थेवरचा हल्ला न वाटता ते मला विवाहाचे अधिक परिणत आणि प्रगल्भ स्वरूप वाटते. पण माझे हे मत अजून स्त्रियांचे प्रातिनिधिक मत बनलेले नाही.

या टप्प्यावर एक प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. की सरळ समाजमान्य असा विवाह न करता लिव-इन रिलेशन का? एक असा (गैर)समाज आहे की विवाहासोबत येणार्‍या नातेसंबंधांचे जाळे या जोडप्याला नको असते. म्हणून ते लग्न करत नाहीत. माझे असे निरीक्षण नाही. लिव-इन रिलेशन मधली जोडपी एकमेकांच्या आयुष्यामधल्या नातेसंबंधा बद्दल जबाबदार आणि संवेदनाशील असतात. विवाह न करण्याच्या निर्णयामागे दोन कारणे संभवतात. एक तर प्रस्थापित विवाह संबंधांच्या रचनेतच पुरुषप्रधानता, विषमता अनुस्यूत आहे. लग्नाआधीचा जिवाभावाचा मित्र लग्न झाल्यावर नवरा होतो—मित्र रहात नाही हे सुनीता देशपांडे यांच्या पासून रजिया सुलताना(रजनी ते रजिया या आत्मचरित्राच्या लेखिका) यांच्या पर्यन्त अनेकींच्या अनुभवाचे बोल आहेत. या जवळच्या नातेसंबंधात मैत्रभाव हाच पाया असावा असा आग्रह असणार्‍या जोडप्याला लग्न-बंधन अनावश्यक वाटते.
ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मूल जन्माला घालणे हा विषयच नसतो. त्यामुळे मुलाच्या औरस असण्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता नसते.
आणखी एक कारण म्हणजे कालांतराने या नात्यात जर विसंवाद निर्माण झाला तर एकमेकांना न ओरबाडता आरोप प्रत्यारोप न करता नात्यातून बाहेर पडता येते. समाजमान्य विवाहाचा शेवट हा दुख्खांतच असतो. प्रतारणा, वैधव्य, किंवा घटस्फोट या तीन कारणांनी विवाह संपुष्टात येतो. हे तीनही दुख्खांत शेवट आहेत. पण लिव-इनच्या बाबतीत मैत्रभाव कायम ठेऊन निराळे होण्याचा पर्याय मौजूद आहे. त्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागत नाही. लिव-इनचा प्रचार करणार्‍या अनुबंध फौंडेशन या संस्थेचे नटुभाई पटेल आणि हॅप्पी सिनियर्स या संस्थेचे माधव दामले या उभयतांचेही हे मत आहे. त्यांच्या कामाच्या सुरवातीच्या काळात आलेल्या अंनुभवांमुळे हे मत बनले आहे. लग्न करून विभक्त होण्याची जर वेळ आली तर उतार वयातली अनमोल वर्षे आणि पैसे कोर्ट कचेरी करण्यात वाया घालवू नये असे ते सर्वांना सांगतात. त्यांच्याकडे लिव-इन मध्ये काही वर्षे घालवल्यावर विवाह केलेली काही जोडपी आहेत.

प्रस्थापित विवाह संबंधांच्या रचनेतच पुरुषप्रधानता, विषमता अनुस्यूत आहे. 

पण हे सांगताना असेही संगितले जाते की सध्याचे कायदे स्त्रियांच्या बाजूचे आहेत. या कायद्यांच्या कचाट्यातून सुटका करून घ्यायला लिव-इनचा पर्याय चांगला आहे. ही पुस्ती मला अस्वस्थ करते. कारण नेमक्या या विचारसरणीला माझा विरोध आहे. एक तर स्त्रियांच्या बाजूचे कायदे उगीच झाले नाहीत. त्या मागे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी स्त्रियांची चळवळ आहे. आजही या कायद्यांची अम्मलबजावणी परिणामकारक होत नाही असा अनुभव आहे. थोडक्यात कायदे असूनही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची शिकस्त पुरुष करताना दिसतात.

तेव्हा स्त्रीच्या बाजूने झालेल्या कायद्याच्या कचाट्यातून सुटणे हा जर लिव-इन मध्ये जाण्याचा हेतू बनला तर त्यात स्त्रीचे शोषणच होईल. स्त्री-पुरुष संबंधात मैत्रभाव रुजवणारे लिव-इन हे स्वरूपच नाहीसे होईल. हे लक्षात घेऊन या बाबतीत काही काम करावे असे मला प्रकर्षाने वाटले.

काम करावेसे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे 2021 मध्ये ही मालिका लिहिताना अनेक ज्येष्ठ नागरिकानी माझ्याशी संपर्क साधला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे एकाकी असणे त्यातून मार्ग काढ्ण्याचा त्यांचा प्रयत्न असा मोठा आवाका असलेली ही समस्या आहे हे माझ्या लक्षात आले. आलेल्या प्रतिक्रियावरून तरूण वर्ग मात्र या प्रश्नाबद्दल अनुदार आणि असंवेदानाशील आहे याची कल्पना आली. मालिका संपून 9 महीने झाले तरी मला या संबंधात फोन येत होते. स्त्रियांचे त्यापेक्षा अधिक पुरूषांचे. वैधव्यामुळे पुरुष अधिक हतबल होतात असे माझे निरीक्षण आहे. या सदराच्या लेखनाच्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर काम करणार्‍या संस्थांची कार्यपद्धती मला जवळून पहाता आली होती. या संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी नाही पण लिव-इन रिलेशन किंवा लग्न एकमेकांना अवकाश देणारे, परस्परांचा आदर करणारे असावे, मैत्रभाव जागवणारे असावे असे सांगणारी, ज्येष्ठ नागरिक जिथे मनमोकळेपणे भेटतील, गप्पा मारतील—अशी एक जागा असावी असे वाटायला लागले. त्यावरून 2 ओक्टोबर 2022 रोजी ज्येष्ठ आणि एकट्या नागरिकांसाठी सहज भेट हा मंच स्थापन केला. हा मंच स्थापन करताना माझ्या सोबत राजीव तांबे हे बाल-साहित्यकार आणि विचार वेध चे सक्रिय कार्यकर्ते आनंद करंदीकर होते. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी पंधरा दिवसातून एकदा साधनेचा हॉल वापरायची परवानगी दिली. या सर्वांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन सहज भेट सुरू झाले.

सहज भेटीच्या पहिल्या भेटीला प्रचंड प्रतिसाद होता. हॉलची जागा कमी पडल्याने 25-30 लोकांना परत जावे लागले. तेव्हा पासून फक्त एक अपवाद वगळता दर पंधरा दिवसातून एकदा साधनेच्या हॉलमध्ये भेटी होतात. आज पर्यन्त तीन सहलीही झाल्या. उपस्थिती अंदाजे 20 ते 25 असते. मीटिगचे स्वरूप गप्पा आणि अनुभव असेच असते. त्यातून लिव-इन संबंधात कायद्याची परिस्थिती, लग्न किंवा लिव-इन मधली पुरुष प्रधानता असे चर्चेचे विषय असतात. लिव-इन मध्ये असलेल्या काही जोडप्यांना या मीटिंग मध्ये बोलावले होते. त्याच प्रमाणे लिव-इन मध्ये जाण्या आधी पत्रिका पहाणे, राशीचा विचार करणे असे प्रकार मी बघितले होते. त्यामुळे राजोपाध्ये या फलज्योतिषाचा शास्त्रीय अभ्यास केलेल्या शास्त्रज्ञांना बोलावले आणि त्यांनी पत्रिका हे थोतांड आहे हे शास्त्रीय विवेचन करून पटवून दिले. माझ्या असे लक्षात आले आहे की स्त्रिया स्वतः बद्दल त्या मानाने बर्‍याच मोकळेपणे बोलतात. पण पुरुष मात्र बोलत नाहीयेत. म्हणून आता प्रत्येक भेटीत एका पुरुषाने माझी कहाणी या विषयावर अर्धा तास बोलायचे आहे.

सहज भेटीच्या उपक्रमाला सहा महीने पूर्ण झाल्यावर एक संपूर्ण दिवसाचा मेळावा घ्यावा असे काही सदस्यांनी सुचविले. त्या प्रमाणे 16 एप्रिल रोजी एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे पूर्ण दिवसाचा मेळावा झाला. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि शिल्पा बल्लाळ यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. प्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे हे सुरवातीच्या सत्राला उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत संगितले. नंतर पुण्यामधील प्रसिद्ध समुपदेशक श्री. धरणे यांनी ज्येष्ठांचे लैंगिक जीवन यावर चर्चात्मक सत्र घेतले. जेवणानंतर सहज भेट चे सदस्य कवितके आणि हेमंत जोगळेकर यांनी स्वतःच्या कविता सादर केल्या. तर आनंद करंदीकरांनी ज्येष्ठान्साठी विंदा हा छोटा कार्यक्रम सादर केला. शेवटी जीवन संध्या ही अशोक सराफ आणि किशोरी शहाणे अभिनित फिल्म पाहून मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला 40 लोक कुठलीही प्रसिद्धी न करता उपस्थित होते. 
सहज भेट ही संस्था रजिस्टर करावी का असा प्रश्न पडतो. पण अजून तरी तसे काही केलेले नाही. सहज भेट ही चळवळ व्हावी निरनिराळ्या गावात असे खुले संवाद ज्येष्ठ स्त्री पुरुषात घडणारे गट तयार व्हावेत असे मला वाटते.
लिव-इन मध्ये असायला हवा असा अवकाश, नात्यामधली लोकशाही, हे मुद्दे तर महत्वाचे आहेतच. पण त्याही पलीकडे मुद्दा आहे तो ज्येष्ठांच्या आयुष्याचे उत्तरायण अधिकाधिक अर्थपूर्ण करण्याचा. 60 ते 80 या कालखंडात ज्येष्ठ नागरिक हातीपायी धडधाकट असतात. मनाने तरूण असतात. एकाकीपणामुळे आपली उमेद उत्साह त्यांनी का कमी करावा? या कालखंडात जर त्यांना योग्य जोडीदार मिळाला तर त्यांचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनू शकते. एकमेकांना आधार देणारे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे नाते संबंध नक्कीच संजीवक असतात. वाढलेली आयुर्मर्यादा आणि कुटुंबाचे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन वानप्रस्थाची विरक्त संकल्पना आपण बदलायला हवी. त्या दृष्टीने लिव-इन किंवा समूह-घर अशा नव्या संकल्पनांचा आपण विचार करायला हवा. या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा रेडी मेड ब्लु प्रिंट आपल्याकडे नाही. पण लोकशाही समता या मूल्यांच्या आधारावर आपल्याला अशी नाती घडवायची आहेत—संकल्पनांना आकार द्यायचा आहे. सहज भेट हा उपक्रम त्या दृष्टीने टाकलेले एक छोटे पाऊल आहे.

तर अशा उपक्रमाची सुरवात तर झाली आहे. याबद्दल अजून खूप काही बोलायजोगे आहे. पण पुन्हा कधीतरी.

सरिता आवाड

('हमरस्ता नाकारताना' ह्या पुस्तकाच्या लेखिका)


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form