प्रिय मासिक पाळी

प्रिय मासिक पाळी,
तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मी चौथीमध्ये होते. 
अवघी १० वर्षांची असेन ....मे महिन्याच्या आसपास तुझ्याविषयी मला खरी ओळख झाली. 
त्या वयात मला काय समजत होतं ? तर काहीच नाही. 
एकेदिवशी वॉशरूम मध्ये गेल्यावर रक्त पडायला सुरुवात झाली आणि अचानक जोरात ओरडून रडायला सुरुवात केली. तेव्हा पप्पांनी जवळ घेतलं, ‘घाबरायचे नाही हे नैसर्गिक आहे’ म्हणून समजावलं.
 
हे रक्त का जातं? पॅड कसा व का लावायला हवा? हे समजलं, याच काळात 'वयात येताना' नावाची विविध पुस्तके घरच्यांनी वाचायला दिली. मला त्यातील प्रत्येक शब्द अनोळखी वाटत होता. हे काय असतं? असंच का? तसंच का? कित्येक प्रश्नांचा कल्लोळ माजला होता. पण पप्पांनी सजग जाणीवा निर्माण करून‌ दिल्या. पुरूष जेव्हा आपल्या मुलीला मासिक पाळी विषयी उघडपणे सांगतो ना,ती फिलिंग किती आनंददायी असते हे मी अनुभवलं आहे. पुस्तक वाचायचे, आईला देखील प्रश्न विचारत सुटायचे. लहान असून वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदलांची नवीकोरी पाटी विविध शब्दांनी भरू लागली होती. मे यातच गेला; जून महिन्यात जेव्हा त्याच तारखेला पुन्हा तू आयुष्यात आलीस तेव्हा परिस्थिती निराळी होती.

मी शाळेत जाऊ लागले होते, आपल्या आसपास असणाऱ्या मुली किती बिनधास्त खेळतात, वावरतात....त्यांना काहीच चिंता नाही. मलाच हे असं का?...याचा राग येऊ लागला. तुझ्यामुळे भयंकर चिडचिड व्हायची. मन अस्ताव्यस्त व्हायचे पण यामुळे तितकाच समजदारपणा येऊ लागला. सोबतच्या मैत्रीणीना नवल वाटू लागलं होतं. खरंतर मलाही या वयात काहीच समजत नव्हतं पण लवकर वयात आल्यामुळे मॅच्युरिटी देखील लवकर आली होती.
स्वतःहून याविषयी बोलू लागले...लिहू लागले...घरात मनमोकळेपणाने संवाद होऊ लागले. खरंच, या काळात संवाद अत्यंत गरजेचा असतो. मी जेणेकरून बिनधास्तपणे सांगू शकेन असंच वातावरण घरच्यानी देखील निर्माण केलं. हळूहळू मासिक पाळी येणं म्हणजे भारी वाटू लागलं. अजूनही मला या काळात आनंदच वाटतो. किती हे भारीये...आपण स्पेशल आहोत ही कायम फिलिंग येत राहते!



हे सकारात्मक चित्र माझ्या घरात होतं, आहे आणि असेलही...पण कित्येक घरात तुझ्याविषयी अजून व्देष दिसून येतो. बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगार गर्भाशय काढून टाकतात कारण मासिक पाळी येऊ नये - म्हणजे त्रास झाला तर सुट्टी घेण्याचा प्रश्नच उरणार नाही. 
नुकतीच झालेली उल्हासनगरमधील घटना माहिती आहे ना - अशा दिवसेंदिवस घटना वाढताना दिसत आहेत. 
शाळा-कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली देखील मासिक पाळी आली आहे, त्रास होतोय किंवा आधाराची गरज आहे हे बोलताना कचरतात.

कित्येक मुली दबावाखाली फक्त आणि फक्त सहन करतात.

सण समारंभ आल्यावर गोळ्या औषधे घेऊन नैसर्गिक चक्र रोखण्याचा हमखास प्रयत्न केला जातो.

कित्येकदा त्यांना पाळी पुढे ढकलायला भाग पाडले जाते.

गाव असो वा शहर कित्येक जणी तुझ्याविषयी बोलताना प्रतिशब्द, कोडवर्ड वापरतात.

अजूनही ही परिस्थिती का?

अजूनही मासिक पाळी शब्द उच्चारला तरी लोक भुवया उंचावतात.

मासिक पाळी ही आनंददायी आहे, हे प्रत्येकामध्ये रूजवणं ही गरज निर्माण झाली आहे.

फक्त इथपर्यंत थांबून चालणार नाही तर या काळात होणाऱ्या त्रासाविषयी, परिणामाविषयी प्रत्येकाला जाण निर्माण होणं आवश्यक आहे. तुझा विषय फक्त स्त्रीच्यापुरता मर्यादित नाहीतर सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. ही भावना जेव्हा वाटेल तेव्हा समाजात विवेकी आणि सकारात्मक बदल घडवून येणे सोपे होईल.

तुझ्याविषयी बिनधास्तपणे बोलण्यासाठी आणि कित्येकांना बोलत करण्यासाठी तूच मला देखील प्रेरणा देतेस....

त्यामुळे अशीच तू दर महिन्याला भेटत जा, नवीन जाणीवा निर्माण करत जा.

तुझीच,

प्रज्वली नाईक

#menstrualhygiene#MHDay2023#EndPeriodStigma

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form