आढावा आणि आवाहन

प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, 


उद्या नवीन वर्ष सुरू होईल, म्हणून दरवर्षी प्रमाणे आजही जानेवारी ते डिसेंबर 2022 वर्षभराचा आढावा आणि पुढच्या वर्षीची रूपरेषा तुम्हाला सांगायची आहे. खास करून येणाऱ्या वर्षातल्या एका नवीन उपक्रमाविषयी सांगायचं आहे. ह्या नवीन उपक्रमांबद्दल तुम्हाला काय वाटतंय, ते समजून घ्यायची मला खूपच उत्सुकता आहे. पण त्या आधी थोडक्यात, ह्या वर्षात ‘पुन्हास्त्रीउवाच’ मध्ये कायकाय करता आलं, काय राहून गेलं आणि येणाऱ्या वर्षात काय करणार आहे – त्याबद्दल सांगते. 

आढावा  

या वर्षी एकूण 55 पोस्ट केल्या. त्यापैकी 5 व्हिडिओ च्या रूपात आणि बाकी 50 लेखांच्या स्वरूपात होत्या. येणाऱ्या वर्षात व्हिडिओ चं प्रमाण नक्की वाढेल. ह्या सगळ्या पोस्टस् चे विषय तत्कालीन सामाजिक, राजकीय घडामोडींशी जोडलेले होते. उदाहरणार्थ, जानेवारीत ‘पुष्पा’ फिल्म गाजत असताना, त्याबद्दलचा लेख प्रकाशित केला होता, तर फेब्रुवारीत हिजाब विषयीचा वाद सुरू असताना त्याविषयीचा लेख प्रकाशित झाला होता. लग्नसराईच्या दिवसात एप्रिल-मे या दोन महिन्यांतल्या दहा लेखांमध्ये विवाहसंस्थेच्या विविध पैलूंचा वेध घेतला होता. शिवाय ऑगस्ट महिन्यात ‘एकल महिला’ ह्या विषयावर एक लेखमाला सलग दहा दिवस सुरू होती. 

या व्यतिरिक्त 'अपूर्णांकाची बेरीज', 'दृष्यअदृष्य', 'आरोग्यवती', 'कहाणी मे ट्विस्ट' ह्या सदरांतून अपंगत्व, प्रसारमाध्यम आणि आरोग्य ह्या विषयांचा वेध घेतला जात होता. हे सगळे लेखन विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले लेखकांनी केलं आहे. त्यात विशेषज्ञ असतात, नावाजलेले साहित्यिक असतात , चळवळींचे कार्यकर्ते असतात – त्यासोबत अगदी प्रथमच लिहिणारे लेखक देखील असतात. हे सर्व लेखक 'पुन्हास्त्रीउवाच'साठी विनामूल्य लेखन करतात.  गेल्या साडेतीन वर्षांपासून अनेक लोकांच्या कष्टामुळे 'पुन्हास्त्रीउवाच' चे सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध होऊ शकले आहे. 

सोशल मीडिया 

प्रत्येक लेख किंवा व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याची लिंक मी फेसबुकवर देते. तसंच अनेकांना whatsapp मेसेजवर लिंक पाठवते. दोन्ही ठिकाणी तुमच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळतो. फेसबुकपेक्षा whatsapp च्या माध्यमातून जास्त प्रमाणात प्रतिसाद माझ्यापर्यंत येतात आणि लेखातल्या मुद्यांवर थोडीफार चर्चा देखील होते.अशा वैयक्तिक देवाणघेवाणीमधून लिंगभाव समतेचा विचार काही पावलं पुढे जातो. सोप्या भाषेत समतेचा विचार पोचवणं हाच तर  ‘पुन्हास्त्रीउवाच’ चा मुख्य उद्देश आहे. 

ह्या देवाणघेवाणी मधून अनेक वाचकांशी मैत्रीचे नाते तयार झाले आहे. ह्यावर्षी एकदा अचानक 'पुन्हास्त्रीउवाच' चे पोर्टल इंटरनेट वरती दिसेनासे झाले होते. तेव्हा अनेक वाचकमित्रांनी मदतीचा हात पुढे केला. अखेर सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मी पुन्हा पोर्टल सुरू करू शकले. आपले हे नाते आणि आपल्यातला संवाद वाढत रहावा यासाठी काही नवे उपक्रम आखले आहेत. 

नवे  उपक्रम 

येणाऱ्या वर्षात ‘पुन्हास्त्रीउवाच’ मसालेदार पॉडकास्ट घेऊन येते आहे. 

त्याशिवाय स्वत:च्या आयुष्यात लिंगभाव समतेसाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचे अनुभव मांडणारे एक सदर जानेवारी पासून सुरू होणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये नंदिनी आत्मसिद्ध यांनी लिहिलेले स्त्रीयांच्या आत्मचरित्रांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचे सदर सुरू झाले आहे. ते 2023 मध्ये देखील सुरू रहाणार आहे. 

वाचकांच्या सोबत असलेला संवाद आणखी वाढत रहावा यासाठी 2023 च्या वर्षात ‘पुन्हास्त्रीउवाच’ काही कार्यशाळा आयोजित करणार आहे. ह्या कार्यशाळा विषयांच्या गरजेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे होतील. हे विषय आजवर वाचकांशी सोशल मिडियावर झालेल्या interaction मधूनच समोर आलेले आहेत. उदाहरण द्यायचं तर मानसिक स्वास्थ्य, नातेसंबंध, पोषक आहार, लैंगिकता या विषयांच्या काही पैलूंवर या कार्यशाळा आधारलेल्या आहेत. आजवर ‘पुन्हास्त्रीउवाच’ च्या सगळ्या पोस्टस् ना तुम्ही जसा प्रतिसाद देता तशाच उत्साहाने ह्या कार्यशाळांच्या उपक्रमाला देखील प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. 

फेब्रुवारी 2023 पासून  डिसेंबर 2023 पर्यन्त एकूण 6 कार्यशाळा होतील. प्रत्येक कार्यशाळेच्या तपशिला बद्दल किमान एक महिना आधी माहिती दिली जाईल. 

जानेवारी मध्ये रु. 1000/- वर्गणी भरून ‘पुन्हास्त्रीउवाच’चे सदस्यत्व घेतले की ह्या सहा कार्यशाळामध्ये सहभागी होता येईल. 

‘पुन्हास्त्रीउवाच’चे सदस्यत्व घेण्यासाठी पोर्टलवरच्या Subscribe बटणवर क्लिक करा. वर्गणी पाठवण्यासाठी म्हणजेच पैसे transfer करण्यासाठी 9975783272@upi हा कोड वापरा. याच नंबरवरती  'पुन्हास्त्रीउवाच' साठी देणगी देता येईल.  'पुन्हास्त्रीउवाच'ला आर्थिक पाठबळाची गरज आहे. 

यात काही अडचण आली किंवा काही प्रश्न असेल तर 9975783272 ह्या नंबरवर सकाळी 10.0 ते संध्याकाळी 5.0 यावेळेत फोन करावा.  

येणाऱ्या वर्षासाठी खूप सदिच्छा !

वंदना खरे
संपादक 'पुन्हास्त्रीउवाच'


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form