नाटक ही एक कला असली तरी ती चित्रकला, गायन यासारखी ‘एकल’ कला नाही. अनेकांचे हातभार लागल्याशिवाय नाटक कला आकाराला येत नाही. कल्पना एकाची असली तरी एकटा माणूस ती पूर्ण स्वबळावर साकारू शकत नाही. ती यशस्वीपणे सादर करण्यासाठी अनेकांचे शारीरिक आणि मानसिक श्रम खर्ची पडत असतात. नाटक ही एक ‘कला’ असण्याबरोबर तो एक व्यवहार सुद्धा आहे. नाटकाचा प्रयोग चांगला होण्यात हातभार असणाऱ्या परंतु कधीच नावे पुढे न येणाऱ्या लोकांचाही मोठा गट या संपूर्ण नाट्य व्यवहारात कार्यरत असतो. म्हणूनच अख्खी क्रेडिट लिस्ट संपली तरी, नाटक करणारा गट ‘विशेष आभार’ या शिर्षकाखाली पुन्हा एक मोठी यादी देतो. नाटकाचा प्रयोग आपण केंद्रस्थानी धरला आणि 'या व्यवहारात येणारे घटक कोणते?' असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की नाट्यनिर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार, संगीतकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, इतर नट मंडळी यांना आपण एका कप्प्यात टाकू शकू. या सर्वांच्या कल्पनेतून नाटक आकाराला येतं. जाहिरातीतही यांची नावे आपल्याला दिसतात. एका फळीत येतात प्रयोग लावणारे, तिकीट विक्री करणारे, जाहिरात करणारे आणि प्रयोगाचं आर्थिक गणित सांभाळणारे लोक. तसाच एक गट आहे नाटकाला लागणारे दिवे, साउंड, माईक या गोष्टी पुरवणाऱ्या आणि त्याची व्यवस्था बघणाऱ्या लोकांचा. त्यानंतर येतात सेट लावणारे, कपडेपट सांभाळणारे आणि नेपथ्य ऑपरेट करणारे. यांना आपण ‘बॅकस्टेज आर्टिस्ट’ म्हणतो. पण या सर्व व्यवहारातील कधीच फार लक्ष दिला न गेलेला घटक म्हणजे नाट्यगृहाच्या साफसफाईची जवाबदारी असणारा सफाई कामगार हा घटक ! नाट्यव्यवहारातील या घटकाकडून अपेक्षित वर्तन न झाल्यास इतर घटकांना बोंबाबोंब करताना आपण पाहतो. नाट्यगृहात असलेल्या अस्वच्छतेबद्दलच्या बातम्याही वर्तमानपत्रात अधून मधून येत असतात. पण ह्या सफाई कामगारांना ही नाटकं, नाट्यगृह, ते वापरणारे लोक, त्यांची वागणूक, नाट्यगृहांचे व्यवस्थापक याबद्दल काय वाटत असेल याचा कधी फारसा विचार केला जात नाही. या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा एक प्रयत्न म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी नाट्यगृहातील सफाई कर्मचाऱ्यांशी बोलून, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातूनच हा लेख तयार झाला आहे.
मुळात शहरातली बहुतांश मोठी नाटयगृहं या सरकारी वास्तू आहेत. कोणतेही नाट्यगृह बांधण्याच्या आधी जरी ते बांधण्याचा हेतू उदात्त वगैरे असला तरी नंतर ते व्यवस्थात्मक पातळीवर चालवताना इतर सरकारी इमारतींसारखी आणखी एक इमारत यापलीकडे तिचे काही वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यामुळे एखादा बडा सरकारी अधिकारी किंवा मंत्री येईल तेव्हाच स्वतः जातीने उपस्थित राहून तिथली साफसफाई आणि स्वच्छता केली जाते. अन्यथा बाकी काळासाठी साफसफाईचे टेंडर काढून, एखाद्या किमान रक्कम Quote करणाऱ्या कंपनीवर ती जवाबदारी टाकून सरकार रिकामे होते. साधारणत: ही कंपनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या माणसाचीच असते. नाट्यगृहात काम करणाऱ्या इतर यंत्रणा उदाहरणार्थ लाईट्स, साउंड, पार्किंग सुद्धा अशा पद्धतीनेच राबवल्या जातात. टेंडर मिळालेली कंपनी साफसफाई करण्यासाठी पगारी माणसं नेमते. जर अपेक्षेप्रमाणे स्वच्छता नसली तर कलाकार जेव्हा सरकारच्या नावाने खडेफोड करतात तेव्हा सरकार 'आम्ही अमुक अमुक कंपनीला साफसफाईचं टेंडर दिलं आहे' असे म्हणून हात झटकते. ती कंपनी नेमलेल्या माणसांना धारेवर धरते, त्यांचे पगार थांबवते किंवा कपात करते. प्रत्यक्ष साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार किती मिळतो, मिळतो की नाही, काम करताना पुरेशी आरोग्य विषयक काळजी घेतली जाते की नाही - याविषयी सरकारला काही घेणेदेणे नसते. एखादा बरा ठेकेदार असेल तर तो बरी वागणूक देतो, एखादा देत नाही. पण ठेकेदार योग्य वागतोय की नाही यावर लक्ष ठेवणारी कोणती यंत्रणा अस्तित्वात नाही. मला तरी कुठल्याही नाट्यगृहात कंपनीचा सुपरवायझर दिसला नाही.
साफसफाई करण्यासाठी कंपनीने नेमलेल्या माणसांमध्ये सगळ्या स्त्रिया आहेत. पुण्यातील नाट्यगृहांमध्ये तर 100% स्त्रिया आहेत. यातल्या बऱ्याच एकल महिला आहेत. घरात त्या एकट्याच कमावत्या आहेत. मुलांची शिक्षणे त्यांच्या कामावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा या कामात अगदी तुरळक कुठेतरी पुरुष दिसतील. ‘पुरुष हे काम करत नाहीत का?’ असे विचारले असता एक ताई म्हणाल्या, 'ज्याची मजबुरी असते तो काम करतो, आता तुम्हीच ठरवा पुरुष का काम करत नाहीत ते!’

‘नाट्यगृहाबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ ह्या प्रश्नावर एका सफाई मैत्रिणीने सांगितले, ‘नाट्यगृहात नाटक कमी आणि मिटिंगस् , राजकीय आणि इतर सभा, समारंभच जास्त होतात.’ दुसरी एक जण म्हणाली, "सभा घेण्यासाठी शहरात सभागृह आहेत. 'नाट्य'गृह जर तुम्ही म्हणत असाल तर तिथे इतर गोष्टींपेक्षा नाटक अधिक व्हायला हवे. "लग्नात जशी वऱ्हाडी मंडळी येतात आणि वाट्टेल तसा वापर करून खरकटं वगैरे तसंच टाकून निघून जातात तशीच परिस्थिती साधारण नाट्यगृहाची आहे” असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे एक सफाई मैत्रीण तर असं म्हणाली की - "हे आम्हाला नाटयगृह कमी आणि मंगल कार्यालयच जास्त वाटते." त्यातल्या त्यात नाटकाला जरा बरा, स्वच्छतेची जाण असणारा प्रेक्षक येतो अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
‘तुम्ही कधी नाटक बघता का?’ या प्रश्नावर सर्वांनी एकमताने 'हो' असं उत्तर दिलं. अनेकदा काम असल्यामुळे सलग बघता येत नाही,त्यामुळे तुकड्या तुकड्यात आम्ही बघतो असं त्या म्हणाल्या. आत्ता सुरू असलेलं आवडतं नाटक विचारल्यावर जवळपास सगळ्याच नाट्यगृहांमधील सफाईताईंचं आवडतं नाटक प्रशांत दळवी यांचं ' चारचौघी' होतं. या नाटकावर गप्पा मारताना कळलं की त्यांना या नाटकातील राजकारण पूर्ण आकळलं होतं. मी या नाटकाच्या प्रयोगानंतर तिकीट काढून नाटक पाहिलेल्या काही सामान्य प्रेक्षकांसोबतही नाटकाच्या बाबतीत चर्चा केली होती. त्या प्रेक्षकांपेक्षाही या स्त्रियांची समज अधिक गहिरी आहे, असं मला त्यांच्याशी बोलताना वाटून गेलं.
‘नाट्यगृह व्यवस्थापनाबद्दल काय वाटते?’ असं विचारलं असता नाट्यगृह व्यवस्थापन आणि आमचा काहीच संबध नाही असे सांगितले. या प्रश्नावर मला या सर्वांनी पुन्हा एकदा आम्ही याला मंगल कार्यालय का म्हणतो याची जाणीव करून दिली. ही फक्त मंगल कार्यालयासारखी एक बिल्डिंग आहे. इथे तुम्हाला तुमचे लग्न लावायचे असेल -- म्हणजे प्रयोग करायचा असेल तर इथे काही भटजी, आचारी, फुलवाले, नेमून दिलेले आहेत..ते तुम्ही वापरू शकता ..इथला पटत नसेल तर स्वतःचा पर्सनल भटजी,आचारी देखील घेऊन येऊ शकता अशी मजेशीर तुलना करून सांगितली. ज्यांना स्वतःच्या कार्यक्रमाचा दर्जा राखायचा असतो ते लोक स्वतः पैसे खर्च करून त्या कार्यक्रमाच्या काळापुरती साफसफाई पासून सर्वच बाबतीत स्वतः वेगळ्या खासगी कंपनीची नेमणूक करतात. बाहेरील राज्यातील किंवा देशातील प्रेक्षक किंवा पाहुणे जेव्हा येणार असतात तेव्हा साधारण ही नीती अवलंबली जाते.
या सफाई कामगारांच्या पैकी कोणीच महानगरपालिकेची कर्मचारी नाही. अनेकदा यांचा पगार वेळेवर होत नाही. कोरोना काळात बॅकस्टेज आर्टिस्टला अनेकांनी आर्थिक आणि इतर मदत केली कारण सर्व कलाकार मंडळी त्यांना ओळखत होती. शिवाय बॅकस्टेज आर्टिस्ट संघटीत आहेत. रंगभूमी सेवकसंघ नावाची संघटना त्यांच्यासाठी लढते. नाट्यगृहातले सफाई कामगार हे असंघटित आहेत. “आम्हाला नाट्यगृह सुरू झाली नाहीत तोपर्यंत पगारही मिळाला नाही आणि संघटीत नसल्यामुळे नाटक व्यवहाराशी निगडित कोणाची मदतही आमच्यापर्यंत पोहचली नाही” - असे एका जणीने सांगितले. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही ठोस उपाय योजना नाहीत. आरोग्य विमा, आरोग्य तपासणी वगैरे सारख्या सुविधाही त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत.

“आम्हाला नाट्यगृह सुरू झाली नाहीत तोपर्यंत पगारही मिळाला नाही
आणि
नाटक व्यवहाराशी निगडित कोणाची मदतही आमच्यापर्यंत पोहचली नाही”
त्यांच्यावर असलेल्या जवाबदाऱ्या विचारल्या असता पार्किंग पासून तिकिट खिडकी, नाट्यगृहाबाहेरचा पूर्ण परिसर, प्रेक्षकगृह, बाल्कनी, प्रेक्षागृहाबाहेरचा पॅसेज, टॉयलेट्स, रंगमंच, ग्रीनरूम्स , कलाकारांसाठीचे टॉयलेट्स हे सगळं रोजच्यारोज प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी साफ करण्याची जवाबदारी 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर मिळून असते. हे काम शिफ्टस्मध्ये चालते. सकाळी 8 ते 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 अशा साधारण दोन शिफ्ट असतात. कधी कोणी सुट्टीवर गेलं तर दोन्ही शिफ्ट मध्ये एकाच जणीला काम करायला लागतं. सफाईसाठी लागणारी साधने कोणती आहेत हे पाहायला मी गेलो असता अतिशय खालच्या दर्जाचे लोकल बनावटीचे नावही नसलेलं कोणतं तरी लिक्विड सोप मला दिसलं. सफाईच्या साधनांची संख्या मात्र पुरेशी होती.
‘नाट्यगृहात काम करताना कायकाय अडचणी जाणवतात?’ या प्रश्नावर तर खूप वेळ चर्चा झाली.
‘नाट्यगृहात काम करताना कायकाय अडचणी जाणवतात?’ या प्रश्नावर तर खूप वेळ चर्चा झाली.
'गुटखा खाऊन थुंकणारे प्रेक्षक' ही जवळपास सर्वच नाट्यगृहांमधली तक्रार होती. गुटख्याच्या थुंकी ताजी असेल तर त्याचा अतिशय उग्र आणि गलिच्छ वास येतो. खुर्चीच्या खाली, जिन्याच्या कोपऱ्यात, डस्टबिन मध्ये, भिंतींच्या कोपऱ्यात, दाराच्या मागे, पार्किंगमध्ये अशा जागा सराईत प्रेक्षकांनी शोधून काढलेल्या आहेत. ही थुंकी ओली असेल तर ती ओल्या फडक्याने हाताने पुसावी लागते. हे काम करताना अतिशय किळस वाटते. कधी एकदा काम संपवतो असे होऊन जाते असे एक ताई म्हणाल्या. टॉयलेट साफ करण्याचे कामही याच कर्मचाऱ्यांकडे असते. कितीही घट्ट कापड बांधले, मास्क घातले तरी पुरुषांच्या टॉयलेट मध्ये अतिशय घाण वास येतो असे सगळ्या सांगत होत्या. पुरुष प्रेक्षक गुटखा खाऊन मुतारीच्या भांड्यात थुंकतात. वाळलेले गुटख्याचे डाग फक्त ब्रशने निघत नाहीत. भांड्यात हात घालूनच कपड्याने ते पुसून घ्यावे लागते. कधीकधी गुटख्या सोबत थुंकलेली सुपारी अडकते, त्यामुळे केलेली लघवी पाईप मधून खाली जात नाही. तेव्हा या पुरुषांच्या लघवीने भरलेले भांडे आम्ही आधी कसेबसे रिकामे करतो.मग भांड्याच्या खाली असलेल्या भोकात हात घालून ते सुपारीचे तुकडे काढावे लागतात, असा विदारक अनुभव एका ताईंनी सांगितला. ते ऐकताना माझी मान खाली गेली होती. मी त्यांची माफी मागितली. गुटखा खाऊन थुंकणारा प्रेक्षक हा नाटकाला येणारा आहे की इतर कार्यक्रमाना येणारा प्रेक्षक आहे असे विचारले असता नाटकापेक्षा इतर कार्यक्रमांच्या वेळी जास्त त्रास होतो असे सांगून नाटकाला येणारा प्रेक्षकही थोड्या फार प्रमाणात असंच वागतो असं त्यांनी सांगितलं.
प्रेक्षक म्हणून नाट्यगृहातल्या स्वच्छते विषयी
आपली काही जबाबदारी आहे की नाही?
‘सर्वाधिक त्रासदायक प्रेक्षक वर्ग कोणता?’ असं विचारल्यावर पुण्यातील एका प्रतिष्ठित नाट्यगृहातील सर्व सफाई ताईंनी एकमताने 'लावण्यांचे कार्यक्रम बघायला येणारा प्रेक्षक' असे उत्तर दिले. लावण्यांचा कार्यक्रम असेल त्यादिवशी कामाचा भार चौपट होतो. महाराष्ट्रामध्ये डान्सबार वर बंदी टाकल्याच्या नंतर डान्सबार मध्ये जाणारी पुण्यातली सगळी गिऱ्हाईके एका प्रतिष्ठित (?) आणि नामवंत नाट्यगृहात होणाऱ्या लावण्यांच्या कार्यक्रमाकडे वळली असे एका अनुभवी कर्मचाऱ्याने सांगितले. बारमध्ये जाऊन दारू पिणे आणि मग डान्स बघायला नाट्यगृहात येणे - असं त्यांनी स्वतःचं रुटीन लावून घेतलेलं आहे. लावण्यांच्या कार्यक्रमाला येणारे 90% प्रेक्षक हे दारू पिऊन येतात. प्रचंड दंगा करतात. "लावण्यांचा कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही सर्व महिला कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच सर्व साफसफाईची कामे आवरून नाट्यगृहाच्या बाहेर जातो आणि कार्यक्रम संपल्यावर अर्धा तास नंतर पुन्हा आत येऊन प्रेक्षकांनी केलेली घाण पुन्हा साफ करतो." असे आम्हाला या सफाई ताईंनी सांगितले. 3 तासापूर्वी चकाचक केलेल्या फरशीवर आणि नाट्यगृहाच्या आवारात गुटख्याच्या पिचकाऱ्या, दारूच्या बाटल्या, सिगारेट बिड्यांची थोटके, तंबाखूची पाकिटे, अर्धवट खाल्लेले पाव, रॅपर, चहाचे कप, सांडलेला चहा असा यथेच्छ पसारा पडलेला असतो. पुढील कार्यक्रम सुरू व्हायच्या आत हे सगळं पुन्हा चकाचक करणे ही या कर्मचाऱ्यांची जवाबदारी असते. पार्किंग पासून ते रंगमंचामागील ग्रीन रूम पर्यंत पुनः सर्व नाट्यगृह स्वच्छ केलं जातं.हे सगळं ऐकून माझ्या मनात आलं की, प्रेक्षक म्हणून नाट्यगृहातल्या स्वच्छते विषयी आपली काही जबाबदारी असते की नाही? गिर्यारोहणाच्या जगात ट्रेक किंवा मोहिमेला जातात तेव्हा Leave No Trace (LNT) हे तत्व पाळले जाते. म्हणजे आपण निसर्गात ज्या ठिकाणी असू ती जागा सोडताना आपण तिथे आलो होतो, याचा कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. म्हणजे नंतर तिथे येणाऱ्या लोकांना ती जागा मुळात जशी होती तशीच्या तशी अनुभवायला मिळेल. हे LNT तत्व पाळण्यासाठी निसर्गात गेल्यावर काय करायचे आणि काय नाही याचे मार्गदर्शक नियमही आहेत. असे Leave No Trace तत्वाचे नियम नाट्यगृहाच्या वापराबाबतीत प्रेक्षक आणि कलाकारांसाठी तयार करायचे झाल्यास असे तयार करता येतील. उदाहरणार्थ,
१. नाट्यगृहात थुंकणे टाळावे.
२. कचरा कचरापेटीतच टाकावा.
३. टॉयलेटचा वापर झाल्यावर पुरेसे पाणी टाकावे.
४. नाट्यगृहाच्या आवारात मादक पदार्थांचे सेवन करू नये.
५. ग्रीनरुम, रंगमंच आणि एकूणच नाट्यगृह यांची आपल्या स्वतःच्या घरासारखी काळजी घ्यावी.
६. आपण नाट्यगृहात आणलेल्या वस्तू आपल्यासोबतच बाहेर जातील याची काळजी घ्यावी.
७. आपल्याकडून परिसर अस्वच्छ होणार नाही असे नियोजन कलाकार आणि प्रेक्षक यांनी नाटय गृहात येतानाच करावे.
८. स्वच्छता कर्मचारी नाट्यगृहाच्या स्वच्छतेसाठी आहेत. आपण केलेली घाण झाडत बसायला नव्हेत हे कलाकार आणि प्रेक्षकांनी समजून घ्यावे.
९. आपण निघून गेल्यावर लगेच तिथे कोणीतरी येणार आहे हे गृहीत धरून आपले वर्तन असावे.
खरंतर हे किती साधे नियम आहेत. शाळेत जाणारी लहान मुले देखील हे नियम पाळतात. परंतु नाटकवेड्या महाराष्ट्रातील “रसिक, मायबाप” वगैरे म्हणवून घेतलेल्या प्रेक्षकांना गेल्या अनेक दशकांपासून हेच नियम सांगावे लागताहेत. हे कर्मचारी राबत असतात, म्हणून आपल्याला कलेचा आस्वाद घेता येतो. सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने काम करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना दिला आहे. हे अधिकार प्रत्येकाला मिळवून देण्याची जवाबदारी देखील आपण घेतली आहे. त्यामुळे आपलं बेताल वागणं कोणाच्या तरी सन्मानाने जगण्याच्या आड येतंय हे लवकरात लवकर प्रेक्षकांना समजायला हवे. या सफाई मैत्रिणींना सन्मानाने त्यांचे काम करता यायला हवे याची जवाबदारी आपण स्वीकारायला हवी.