मी स्वतःचा सूर्य आहे!

सुष्मिता सेन मला एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व वाटतं. तिचं रूप, हसणं, आवाज, विचार, जीवनदृष्टी मला तिच्या क्षेत्रातल्या इतरांपेक्षा खूप निराळी वाटते. इतकी वर्षं मला तिच्याबद्दल अप्रूप असं कधी वाटलं नाही. पण 'आर्या' चे दोन सिझन्स पाहिल्यानंतर मात्र तिच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं.तिचा ट्विंकल खन्नाने घेतलेला एक इंटरव्ह्यू नुकताच यूट्यूबवर आला आहे. अगदी जरूर पहावी अशी मुलाखत आहे! सुष्मिताने फार कमी वयात पहिली मुलगी दत्तक घेतली होती. त्यासाठी तिने बराच संघर्ष केला. काही वर्षांनी ती दुसऱ्या मुलीची पालक झाली. या मुलाखतीत तिने आपल्या आईपणाचा प्रवास उलगडून सांगितला आहे. त्यात एक प्रश्न ट्विंकल खन्ना विचारते, की तू या मुलींची नैसर्गिक आई नाहीस.. मग तुझं 'आईपण' तू कसं निभावतेस? 
त्यावर सुष्मिताने एक असा प्रसंग सांगितला ज्यात फक्त तिला कळलं होतं की तिचं बाळ गंभीररित्या आजारी आहे. तिने तिच्या मुलीला त्या क्षणी हॉस्पिटलमध्ये भरती केलं नसतं तर तिचा जीव धोक्यात आला असता. सुष्मिता म्हणते, ' मी तिची खरी आई नाही. पण मला सगळं कळलं. नाळ आपोआप तर नाही जुळली जात.. पण कधीतरी ती जुळते."ती पुढे म्हणते, " माझी दुसरी मुलगी मला म्हणते की रेने दिदी (सुष्मिताची मोठी मुलगी) तुझ्यासारखी दिसते. मी का नाही दिसत?" त्यावर सुष्मिता तिला म्हणते " she looks like me, but you are more like me".. या दोघींनीही तिचा अंश थोडाथोडा का होईना, पण घेतला आहे, असं ती अभिमानाने म्हणते. ती तिच्या मोठ्या मुलीला सांगते, कि माझ्यासारखं उंच व्हावं अशी असं स्वप्न बघू नकोस. ते फारच लहान स्वप्न आहे. तू तुझ्या कर्तृत्वाने उंच हो.. स्टँड टॉल!
मला हे सगळं विशेष वाटतं. आपल्याकडे लग्न करणं आणि लग्नानंतर(च) मूल जन्माला घालणं, आणि त्यानंतर नैसर्गिकपणे येणारं 'आईपण' यांचं प्रचंड उदात्तीकरण केलं जातं. अनेकदा या आई झालेल्या बायकाही आई नसणाऱ्या बायकांना सहजपणे बऱ्याच गोष्टी बोलून जातात. " तू आई नाहीस ना, तुला नाही कळणार" हे पठडीतले वाक्य प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे ऐकवले जाते. जग इतकं पुढे गेलं, पण आईपणाचे - बाईपणाचे- पालकत्वाचे बदलते आणि विस्तृत आयाम इथल्या मंडळींच्या फारसे पचनी पडत नाहीत.

हा लेख देखील वाचा - दिल है छोटासा

सुष्मिता या सगळ्याला अगदी सहज फाटा देते. ती वय लपवत नाही, तिची अफेअर्स लपवत नाही, तिला लग्नायोग्य कोणी पुरुष कधी भेटला नाही हे मोकळेपणी सांगते. तिच्या दत्तक मुलींमुळे कदाचित तिचं लग्न कधीच होणार नाही, ही शक्यता तिने आधीच स्वीकारली होती. आई होण्यासाठीच्या नियम आणि अटी तिने धुडकावून लावल्या, आणि त्याचा यथायोग्य अभिमानही बाळगला.

आपल्याकडे 'कुटुंब' म्हटले की आई- वडील व एक किंवा दोन मुले, फारतर आजी व आजोबा असे एक पठडीतले चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. एकमेकांमध्ये असणाऱ्या रक्ताच्या नात्याला महत्त्व असते. यात बहुतेकदा घरातील पुरुष महत्वाचे निर्णय घेतो, त्याच्याभोवती घर फिरत असते. या पठडीबाहेरच्या परिवारांना खऱ्या अर्थाने 'कुटुंब' म्हटले जाते का हा प्रश्न आहे. कुटुंबांचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, आणि प्रत्येक वेळेस ते रक्ताच्याच नात्यांनी बनलेले असेल असे नाही वगैरे विचार आपल्याइथे अजूनही रुळलेले नाहीत. … अशा परिस्थितीत सुष्मितासारखी व्यक्ती अगदी लहान वयात आई व्हायचा निर्णय घेते, तेही 'नैसर्गिकरित्या' नाही तर मूल दत्तक घेऊन ! मुलाखतीत ती म्हणते, की "मी तेविसाव्या वर्षी मूल दत्तक घेतले, त्यालाही खरंतर उशीरच झाला होता. माझ्यात ती 'नर्चरिंग' करायची इच्छाशक्ती खूप आधीपासूनच होती. मी आधीपासूनच तयार होते." कदाचित याच जबरदस्त इच्छेमुळे ती तिच्या पहिल्या मुलीसाठी कायदेशीर लढा देऊ शकली. यात सुष्मिताच्या आई वडिलांनीही तिला साथ दिली. हेही विशेष आहे, कारण अशा निर्णयानंतर सुष्मिता कदाचित ' नॉर्मल ' आयुष्य जगू शकणार नाही याची त्यांना कल्पना होती. सुष्मिता हा लढा जिंकली आणि तिने एक मोठा पायंडा पाडला. एकल महिलांना मुलं दत्तक घेण्यासाठीचा मार्ग थोडा सोपा झाला. यामुळे तिला स्वतःलासुद्धा तिची दुसरी मुलगी दत्तक घेताना तितकेसे अडथळे आले नाहीत. या दोघींना - म्हणजे रेने आणि अलीसाला तिने स्वतःचे नाव दिले. आपल्या पारंपरिक पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत एखाद्या बाईची ही छोटी कृतीही मोठी ठरते.

मुलाखतीच्या शेवटी ती म्हणते," मला वाटतं लग्न झालेलं असो वा नसो, बहुतेक मुलांना एकच पालक असतो. ती एकच व्यक्ती मग अनेक जबाबदाऱ्या पार पाडते." सगळ्यांनीच विचार करावा असं हे वाक्य आहे.

हा लेख लिहीता लिहिताच सुष्मिता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. बिझनेसमन असलेल्या आणि वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या ललीत मोदीने सोशल मीडियावर त्याच्या आणि सुष्मिताच्या नात्याबद्दल लिहिले आणि काही फोटो टाकले. त्यानंतर अभूतपूर्व गदारोळ माजला. ट्रोल्स आणि मिमर्सना नवा विषय सापडला आणि सगळीकडे सुष्मिताच्या या 'नव्या' नात्याबद्दल चर्चा होऊ लागली. या चर्चांची पातळी (नेहमीप्रमाणे) घसरली आणि सुष्मिताच्या चारित्र्यावर, तिच्या निवडींबद्दल आणि एकूणच अस्तित्वावर, कर्तृत्वावर प्रश्न उभे केले जाऊ लागले, विनोद आणि टवाळीने परिसीमा गाठली. बाहेरून अतिशय आधुनिक दिसणाऱ्या आणि पुढारलेल्या मंडळींच्या मनात खोलवर रुतलेली पुरुषप्रधानता बाहेर येऊ लागली. 'तिने वयाने किती मोठा पुरुष निवडला आहे' 'शुगर डॅडी गटवला आहे' 'सुष्मिता ‘गोल्ड डिगर' (पैसा पाहून पुरुषांना जाळ्यात ओढणारी स्त्री) आहे' 'सुष्मिता मुलींना विसरली' 'सुश्मिताने गद्दारासोबत लग्न केले' अशा काहीही वावड्या उठू लागल्या. सर्वानुमते 'नॉर्मल' नसणाऱ्या नात्यामुळे नेहमीप्रमाणे त्यातल्या स्त्रीलाच सगळ्या जगाकडून ऐकून घ्यावे लागले. ललित मोदीच्या व्यवसायातील चुकांचे खापर तिच्यावर फोडले गेले. तिच्या एकूण कर्तृत्वाला शून्य ठरवून तिने केवळ पैश्यासाठी हे नाते जोपासले असेल असे म्हटले गेले. सुष्मिता एक सेलिब्रिटी असणं, अभिनेत्री असणं, यशस्वी एकल पालक असणं यापेक्षा ती एक 'बाई असणं' ऐरणीवर आणलं गेलं. जणू काही तिची बदनामी कशी होईल याची सगळेजण वाटच पहात होते.
आपल्याकडे एखाद्याला एका विशिष्ट साच्यात बसवलं कि ते कायमचं असतं. त्यात ती स्त्री असेल तर काही बघायलाच नको. म्हणजे सुष्मिताची ओळख आहे - 'लग्न न केलेली यशस्वी एकल पालक' ! जणू काही ती तिची ठरलेली चौकट आहे. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन तिने काहीही केले तर तिची बदनामी ठरलेली. अगदी सुसंकृत म्हणवणारे लोकही अशावेळी अश्लाघ्य टीका करताना मागेपुढे पाहत नाहीत. सुष्मिता सेनला स्वतःची निवड करण्याचा अधिकार आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या या निर्णयाचा इतर सामान्य माणसांवर कसलाही परिणाम होणार नाही आहे, हे सरळसाधं लॉजिक समजून घेण्याच्या मन:स्थितीत लोक दिसत नाहीत.

यात माझं लक्ष वेधलं गेलं ते 'गोल्ड डिगर' या शब्दाकडे. सुष्मिता अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे आणि अर्थात आर्थिकदृष्ट्याही समृद्ध आहे. पण तरीही तिच्यासाठी हे विशेषण सर्रास वापरले गेले. हीच गोष्ट जर उलट घडली तर? एखाद्या पुरुषासाठी हेच विशेषण पदोपदी वापरले जाईल का? याचे उत्तर आपणा सर्वांना माहित आहे. सुष्मिताने या आरोपाला खणखणीत प्रत्युत्तर दिलेले आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, " I dig deeper than gold.. आणि मला नेहमीच सोन्यापेक्षा हिरे जास्त आवडत आलेले आहेत. आणि हो, ते मी स्वतः विकत घेते " ती पुढे म्हणते, " मी कधीही बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहिलेले नाही. मी स्वतःचा सूर्य आहे. स्वतःच्या जगाच्या केंद्रस्थानी आहे."

तिने आणि तिच्यासारख्या सगळ्याजणींनी नेहमीच असं स्वतःच्या जगाच्या केंद्रस्थानी असावं, यासाठी सदिच्छा !

हा लेख देखील वाचा - 4 ऑगस्ट कशासाठी साजरा करायचा?

गायत्री लेले

सहाय्यक प्राध्यापक, 

राज्यशास्त्र विभाग,

मुंबई विद्यापीठ

 

 

3 Comments

Previous Post Next Post

Contact Form