इफ्फीमध्ये जगभरातले सिनेमे दाखवतात. हे सिनेमे पाहताना आपलं विश्व, आपल्या समस्या, आपल्या भावना, यांच्याकडे किती वेगळ्या पद्धतीने पाहता येऊ शकते हे लक्षात येते. हे सिनेमे पाहताना एक अद्भुत जग समोर उभं राहतं. आपल्या स्वत:च्या आणि सिनेमातल्या विचारांवर कधी प्रश्न करत, तर कधी सहमती दर्शवत एका वेगळ्या विश्वाची आपण सफर करतो. सिनेमाचे विषय, मांडण्याच्या पद्धती किती अफाट असतात असा मनात विचार येतो. काही सिनेमे त्याच्या सिनेमॅटोग्राफीसाठी निखळ आनंद देऊन जातात. नाझींच्या अत्याचारांचे सिनेमे भारतातील काही घटनांशी साधर्म्य दाखवतात. काही देशातील संस्कृती, परंपरा ध्यानात घेतल्या तरीही एकंदर सर्वच्या सर्व सिनेमातील पौरुष दाखवण्यासाठी सिगरेट, दारू यांचं केलेलं उदात्तीकरणही खटकतं. (खास करून पुरुषाला आलेलं नैराश्य असो की मिळवलेला विजय असो, दोन्हींच्या सेलिब्रेशनसाठी). युद्ध सिनेमे स्तब्ध करतात, क्रूरता किती वेदनादायी आणि विद्रूप असू शकते याचे उघड दर्शन घडवतात आणि तुमच्या ह्रदयाची सहनशीलता तपासतात.
हे सिनेमे पाहताना मनाच्या तळाशी साचलेल्या, घटना, जपून ठेवेलेल्या आठवणी, भावना उफाळून वर येतात. जणू काही या सिनेमांच्या निमित्ताने स्वत:शी स्वत:ची झालेली भेट... इफ्फीचा माहोल आपणाला हवेत तरंगायला लावतो. तो पंडाल, दिव्यांची रोषणाई, येणारे हौशेनवशे प्रेक्षक, रेड कार्पेट आणि कार्यक्रम स्थळासमोरील समुद्र. आपण आठवडाभर वेगळ्याच धुंदीत असतो. इथे येणारे प्रेक्षक बहुतेक करून दिग्दर्शक, सिनेमा शिकणारे, पत्रकार आणि हौशी असतात. स्त्रिया व लैंगिक वैविध्य असणारे लोक कमीच दिसतात इफ्फीमध्ये. इथे सहसा कुणी तुम्हाला ‘जज’ करत नाहीत, तुम्ही इथे फक्त ‘प्रेक्षक’ असता आणि सगळे आठवडाभर सिनेमावरच बोलत असतात.
पर्यटनाच्या निमित्ताने का होईना, पणजीत पुरातन वास्तूंचे जतन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. इथली जुन्या पद्धतीने बांधलेली घरं, चर्च, मंदिरं, हॉटेल्स, सरकारी कार्यालये, मैदाने, बागा इ. अतिशय चांगल्या अवस्थेत जतन होताना दिसतात. सकाळी सकाळी पणजीतील घरे बघत फिरायला जाणे म्हणजे नेत्रसुखच जणू! आजही या वास्तू तोर्यात उभ्या आहेत. आम्ही एका चर्चमध्ये रविवारची प्रार्थना सुरू असताना ‘कुणी काही म्हणेल का,’ अशा विचाराने जरा घाबरतच प्रवेश केला. थोडा वेळ तो माहौल अनुभवला आणि मनात शांतता घेऊन बाहेर पडलो. इथे फिरताना प्रचंड सुरक्षित वाटतं, ही जमेची बाजू. पण बीचवर फिरताना मात्र घरच्यांची खूप आठवण येत होती. ‘कबीरला (मुलाला) आणलं असतं तर त्याने खूप मस्ती केली असती, घरातले आले असते तर...’ अशी अपराधी भावना मनात येऊन गेली तरी मी तिला ठरवून पळवून लावले. विडिओ कॉलवरून बीचची, फेस्टिव्हलची सफर घडवून स्वत:ला आणि त्यांनाही सोबत नसण्याच्या ‘गिल्ट’ च्या भावनेतून मुक्त केले. | खामोशी में सुकून |
माझ्या आईला नेहमी वाटतं की बाकीचे आनंदी तर ती आनंदी. ती नेहमीच कुटुंबियांना, आप्तांना खुश ठेवण्यात दंग असते, पण ‘फक्त स्वत:चा’ असा आनंद घ्यायला तिचं मन धजत नाही. इतरांच्या आनंदावर आपला आनंद अवलंबून ठेवल्याने तिला आनंदी किंवा दु:खी करणं इतरांच्या वागण्यावर असतं. आणि मग जेव्हा इतरांमुळे ती दु:खी होते, तिला तेव्हा प्रचंड त्रास होतो. कधीकधी ज्यांच्यासाठी तिने स्वत:चा आनंद पाहिला नाही त्यांच्याकडून प्रश्नही उपस्थित केला जातो, “आम्ही नव्हतो तुला त्याग कर म्हणालो, तूच स्वत: केला त्याग.” मग ती दोनदा दु:खी होते. आधी त्याग करून दु:खी, इतरांनी आपल्या त्यागाची जाणीव ठेवली नाही म्हणून दु:खी. त्यामुळे ज्या त्या वेळी आपण आनंदाची अनुभूती घ्यावी. आयुष्याच्या उत्तरार्धात ‘आपण स्वत:साठी जगलोच नाही’ ही खंत मनात आली नाही पाहिजे आणि आलीच तर त्यासाठी फक्त आपणच जबाबदार असू.
फेस्टिव्हलमधील स्त्री प्रेक्षकांचा अत्यल्प सहभाग |
गोव्यात जाण्यापूर्वी, असताना, आल्यावर अनेक मैत्रिणींचे फोन, मेसेज आले. त्यांचीही अशी फिरण्याची इच्छा होती. मात्र मुलं आणि घरच्यांच्या जेवणाची सोय कशी करणार हा त्यांच्यापुढे न सुटणारा प्रश्न होता. थोडक्यात काय तर, बाया शिकल्यात, नोकरी करू लागल्यात तरी आयुष्यभर मूल आणि चूल या जबाबदारीतून मोकळ्या होऊ शकत नसल्याने ‘फक्त स्वत:साठी’ वेळ काढू शकत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या घरातील ‘समता’ हे तर अवघड जागचं दुखणं असतं.
एक समाजकार्य शिकलेली व नोकरी असलेली मैत्रीण म्हणाली , “मला खूप यावसं वाटतं गं. लग्नाआधी खूप फिरायचे मी. पण आता एक तर घरचे येऊ देणार नाहीत. आणि ते जा म्हणाले तरी मुलांचं सगळं कोण बघणार? नवर्याला जेवण बनवता येत नाही. सासूबाई पण चिडचिड करतील. सगळ्यांना सांगत बसतील सगळं सोडून गेली म्हणून. मी आले तर नातेवाईकांच्यात फेमसच होईन. फोनवर फोन करून परेशान करून टाकतील मला. आणि माझ्या सगळ्या सुट्ट्या तर सणावारात, लग्नांमध्ये आणि घरातल्यांच्या आजरपणात जातात. आणि असंही वाटतं की एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी घरात वाद कशाला? माझाच पाय निघत नाही बघ घरातून बर्याचदा. तुझं बरंय बाई. कसं करतेस मॅनेज?”
“अगं सोप्पंय! अशावेळी मी एकच विचार करते, मी मध्येच गचकले तर काय होईल?”
“असं काय वेड्यासारखं बोलतेयस?”
“खरंच. कल्पना करून बघ. मध्येच आपली विकेट उडली तर? आपलं जगायचं तर राहीलच, पण माझ्या मागे सगळे करतीलच ना मॅनेज? असा विचार केला की बळ मिळतं. गिल्ट कसला? कधीतरी आपल्या मनासारखं वागून बघूया की! स्वत:साठी निवांत वेळ काढणं, कामाच्या रगाड्यातून ब्रेक घेणं ही क्षुल्लक बाब नाही ना ? तसंही बाकी सगळे त्यांचे त्यांचे आनंद शोधत असतातच की. फक्त आपण बायकांनी शोधला तर आपण स्वार्थी कसे ? आणि इतरांवर होणार्या अन्यायाविरुद्ध लढणार्या आपण, स्वत:च्या हक्कांसाठी कधी लढणार? ”
“खरं बोलतेय तू. पण हे सगळं घरच्यांना कोण सांगणार?”
“अगं, आपणच सांगणार. आधी स्वत:ला सांगणार, मग घरच्यांना. आपणच आपल्या मुलांसमोर हा आदर्श उभा करणार की आईलाही स्वत:साठी वेळ हवा असतो, तिला आवडतं ते करण्यासाठी. मुलांना, घरातल्यांना थोडी कामे वाटून दे. सणवारांच्या सुट्ट्या कमी कर, मग वेळ मिळेल. आणि मागच्या महिन्यात नवर्याचे गेट टुगेदर, सासुबाईंची सीनियर सिटीज़न टूर होती तर किती आनंदाने पाठवलं होतस दोघानांही. हर कोई अपने अपने हिस्से की जिंदगी जी लेते है, हम भी जी ले।”
“सगळं पटतय गं तुझं. बायको, सून, आई म्हणून काही जबाबदार्या आम्ही बायांनी ओढवून घेतलेल्या असतात. बोलते नवर्याशी. मलाच धाडस करायला लागेल. मी तरी कधी जगू, मला हवं ते कधी करू? आता मी स्वत:लाच सांगणार आहे, ‘दिल चाहता है’ ते करायचं ‘मगर’ मध्ये नाही आणायचं!”
माझ्या अनुपस्थितीत कुटुंब अस्ताव्यस्त झालं, असं काही झालं नाही; काही गमती जमती झाल्या, तारांबळ उडाली. पण कुटुंबात तसं सगळं सुरळीत होतं. शाळा, ऑफिस. कबीरचा (मुलाचा) बाबा तसं घरातील आणि कबीरच्या जबाबदार्या नेहमी घेत असतो; पण ऑफिस व्यतिरिक्त वेळात, सुट्टीच्या दिवशी जेवढ्या घेता येतील तेवढ्याच! एरवी मी कबीरचा अभ्यास घेत असल्याने बाबाला अंधुकसे माहिती होते की ऑनलाइन अभ्यास कुठे असतो, कोणत्या वहीत कोणता अभ्यास घ्यायचा. पण शिकला तो. सबमीशनच्या गडबडी झाल्या. मुलाकडून अभ्यास करवून घेताना बाबाची दमछाक झाली. त्याचे जेवण, आंघोळ आणि इतर बाबींसाठी बाबाला खूप ऊर्जा, संयम आणि सोशिकता लागली (आणि म्हणे बाया सोशीक असतात. आम्ही जन्माने नाही तर परिस्थितीने सोशीक बनतो.)‘गोड बाबा’ ते ‘अंग्री बर्ड बाबा’ - असा बाबाच्या प्रतिमेचा प्रवास झाला. सात वर्षांच्या मुलाबरोबर बाबाची चक्क कडाक्याची भांडणेही झाली. “मला माझ्या आईकडे नेऊन सोड!” अशी दमदार धमकीभरी मागणीही करण्यात आली. इतरवेळी बाबाला समजत असतं की मुलाला सांभाळण्यात आव्हाने आहेत, म्हणून घरातील व मुलाच्या काही गोष्टी तो करतोही...पण यावेळी प्रत्यक्ष अनुभवातून बाबानं आईसमोर प्रामाणिकपणे मान्य केलं की प्रदीर्घ काळासाठी लेकराला सांभाळणं फार अवघड आहे. पालकत्वातील आईच्या वाट्याचे ‘दैवतीकरण’ झाल्यानं त्याचं वास्तविक मूल्य दुर्लक्षित होतं. मुळात मुलांची जबाबदारी आईचीच समजली जाते, त्यामुळे ती विशेष काही करते असं इतरांना आणि कधीकधी तिलाही वाटत नाही. पुरुषाकडे तो नोकरी करणारा आणि मुख्यत: बाहेर काम करून पैसे मिळवणारा असं पाहिलं गेल्याने त्याच्याकडे पालकत्वाच्या खूप मर्यादित जबाबदार्या येतात. त्यामुळे घर, काम सांभाळून मुलांची जबाबदारी किती आव्हानात्मक असू शकते याची त्याला कल्पनाही येत नाही. आणि बायकोच्या संसारातील सहभागाला, त्यातील आव्हानांना जाणून, ‘तिच्या’ समजल्या जाणार्या जबाबदार्या वाटून घेण्याला ‘पुरुषत्व’ समजलंही जात नाही.

| घरवापसी |
‘दिल चाहता है’ ते करायचं ‘मगर’ मध्ये नाही आणायचं!
(हा लेख ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकात पूर्वी प्रकाशित झाला होता.)
लक्ष्मी यादव
सामाजिक कार्यकर्ती