दिल चाहता है ..... मगर !(भाग १ )

गोव्यात नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) भरतो. ‘गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पाहायला जावे’ – असा विचार माझ्या तोंडून बाहेर पडताच,
“गोव्याला चाललीस? कशाला? एकटी?”
“यावर्षीही जायलाच पाहिजे का?तेही इतके दिवस? सगळी गडबड होईल. कसं अॅडजस्ट करणार?”
“आई, मला सोडून तू पिच्चर बघायला चाललीये?”
“फिल्म फेस्टिवलमध्ये पिक्चर बघायला तेही गोव्याला कशाला जायला पाहिजे? मोबाईलवर पण दिसतात की सिनेमे.”
“पोराची तुला माया हाय का न्हाई? एवढ्याशा लेकराला सोडून जातेत व्हय? असलं कसलं बाई तुझं आईचं काळीज?”
“हं, हे कसलं नवीन फॅड? तिथे येणारे तुझे किती मित्र-मैत्रिणी असं लेकराला, नवर्‍याला सोडून येतात?”
अशा असंख्य प्रतिक्रियांच्या पावसाने मी अक्षरशः न्हाऊन निघाले. आधीच यावर्षी जायचा मूड बनत नव्हता आणि वरून असा पाऊस. ‘जाऊ दे, नकोच जायला या वर्षी. पुढच्या वर्षी बघू.’ अशा विचारापर्यंत येऊन पोहोचले. पण ज्या कोल्हापूरच्या मैत्रिणीला ‘आपण जाऊयात’ म्हणून खूप आधी तयार केलेले. आणि एके दिवशी अचानक तिने ‘मी माझे अमक्या तारखेचे तिकीट बुक केले आहे, तुझे कर लवकर’ असा बॉम्ब टाकला. घरी भाची आली असल्याने तिची मदत होणार होती, त्यामुळे सकारात्मक विचार करायला जरा वाव होता. तरी जायच्या आदल्या दिवशीपर्यंत, ‘आपण जाऊ’ - असे वाटत नव्हते. शेवटच्या क्षणाला बसचे तिकीट बुक केले आणि अनेक प्रतिक्रियांना एका गाठोड्यात बंद करून मी बसमध्ये मागच्या सीटवरुन हलत डुलत, जागरण करत एकदाची गोव्याला निघाले.
मैत्रीण आधीच पोहोचलेली. ती अविवाहित आहे. माझ्या मनात आलं - ‘अविवाहित असणं किती बरं असतं!’ (म्हणजे आम्ही समतेवर आधारीत संसार करत असलो, जोडीदार समतेवर विश्वास असणारा आणि वागणारा असला तरी असा विचार डोकावतो मनात अधूनमधून.) पण मैत्रिणीने तिच्या घरी ती गोव्याला जाते आहे, याबद्दल पालकांना जास्त काही सांगितले नव्हते. मी कारण विचारल्यावर म्हणाली, “अगं दर शनिवार-रविवार कांदे पोहे कार्यक्रम असतोच. कंटाळा आलाय मला त्याचा. पण तो कार्यक्रम रद्द करून मी फिल्मफेस्टिव्हल करता जातेय, हे कळल्यावर आईबाबांना वाटेल की आम्ही किती सीरियस आहोत आणि ही लग्नाबद्दल काहीच सीरियस नाहीये.”
मी अतीच भाबड्या विश्वासाने म्हटलं, “अगं मी सोबत आहे म्हणून सांगायचे ना?”
“अगं मग ते म्हणणार की बघ तुझी मैत्रीण, लग्न, मुलं सगळं करून फिरते आहे. आणि तू?”
“मग बॅचलर मैत्रिणी सोबत आहेत म्हणून सांगायचे?”
“अगं तसं सांगितलं तर म्हणणार - तुझी संगतच तसली. फिरा बिन लग्नाचे! अशाने कशी होणार तुमची लग्ने? - त्यामुळे जास्त काही न सांगितलेलं बरं!”
म्हणजे मुलींनी अविवाहित असणंही काही फार बरं आहे असं नव्हे (आपलंच बरं म्हणायचं!), अशा निष्कर्षास आले.
 
 पणजी आपले स्वागत असे विलोभनीय रीतीने करते.
पणजीत उतरल्यावर समुद्र बघूनच वेगळ्या ठिकाणी आल्याची जाणीव झाली. हा माहोल फक्त डोळ्यांनाच गुंतवून ठेवतो असे नाही तर तो मनालाही शांत करतो. आम्ही सिनेमाच्या आधी दोन दिवस फिरायचे असे ठरवलेले. आमचा स्कूटरवर फिरायचा बेत होता, पण पावसाने अचानक धोका दिला. लेकीन हम हारनेवाले कहाँ थे! पाऊस सुरू असतानाही आम्ही बसने प्रवास सुरू केला. पणजीतील अतिशय सुलभ आणि स्वस्त सीटीबस मधून जुनी रोमांटिक गाणी ऐकत मडगावमधील बेणवली बिचजवळ पोहोचलो. पाऊस सुरूच होता. रिमझिम पाऊस, खळाळता बीच, ती पांढरी वाळू, अगदीच बीचवर असणारी सुगंधी हॉटेल्स, रंगीन पर्यटक आणि सोबतीला हॉटेलमधील सुमधुर संगीत ...अहाहा! तो नजारा आम्ही न बोलता फक्त नजरेत सामावत होतो. बराच वेळ नुसतेच समुद्राकडे बघत बसलो. मग मडगाव मार्केट फिरून काही ‘मिडल क्लास् मुलगी’टाईपच्या खरेद्या केल्या आणि घरी पोहोचलो. दुसरा दिवस जुना गोवा, चर्च, मंगेशी मंदिर असे फिरलो. गोव्याला गेल्यावर मस्त 'वनपिस' मिळाला आणि रखडलेली इच्छा पूर्णत्वास आली. 
५०० वर्षे जुनं चर्च, पणजी
आयुष्यात काही गोष्टी करायच्या विनाकारण राहून जातात तसंच माझं वन पिस घालायचं राहून गेलेलं. गोव्यात फ्रॉक किंवा वन पीस हे महिलांच्या रोजच्या पेहरावाचा भाग आहे, त्यामुळे मी वन पीस घातल्यावर कुणाच्या नजरा पायांवर खिळल्या असे झाले नाही. आजवर मी घरात आणि बाहेर बर्मुडाही वापरलाय तरी वनपिसची पहिलीच वेळ असल्याने काही क्षण conscious होण्याची भावना झाली, पण काही क्षणातच नाहीशी झाली. काही गोष्टींची सुरुवात होण्याची गरज असते. पंढरपूर तालुक्यातील तावशी गावच्या माझ्यासाठी लांब केस, अंगभर कपडे ते छोटे केस, शॉर्ट ड्रेस हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. हे फक्त कपडे किंवा केसांशी निगडित नाहीये, मुलींना अजूनही इतक्या छोट्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यासाठी झगडावं लागतं. तेवढ्यानेच मुली सबल होतात, असं नसलं तरी हे करणं म्हणजेही स्वातंत्र्य आहे, हेही तितकंच खरं. लोकांना तुमच्या या गोष्टींशी काही देणे घेणे नसते; आपणच ‘लोक असा तसा विचार करतील’ असा कसलातरी महान विचार करून ठेवलला असतो. स्वतःला घातलेल्या चौकटीतून, संस्कृतीच्या जडत्वातून बाहेर पडून शरीराला,मनाला मुक्त करणं, स्वच्छंदपणे विहरणं ही अनुभूती विलक्षण आहे. ज्या मुली, महिला इच्छा असूनही हे सगळं करू शकत नाहीत त्यांच्या डोळ्यात हे करू शकण्याच्या स्वातंत्र्याचं मोल आणि करू न शकण्याची वेदना सहज दिसेल.
आम्ही एका मित्राच्या मैत्रिणीच्या घरी राहत होतो. सामाजिक कामाची पार्श्वभूमी असणारी आई आणि वकिली शिकत असलेली मुलगी असं ते फारच मनमोकळं कुटुंब. त्यामुळे जेवणाचे, राहण्याचे, रात्री उशीर पोहोचण्याचे दडपण नव्हते. “तू वाईन घेत असशील तर फ्रीजमध्ये आहे, हवी तेव्हा घेशील हं!” अशी वाईन पिण्याची ऑफरही त्यांनी गेल्या वर्षी देऊ केली होती. मी पीत नसल्याने त्यांची ऑफर मी नम्रतापूर्वक नाकारली. गोव्यात दारू ‘समाजमान्य’ असल्यासारखे चित्र आहे (दारुने संसार उध्वस्त होतात म्हणून महिलांचा या व्यसनाला विरोधही आहे असे सामाजिक कार्यकर्तीकडून ऐकले.). फिल्म फेस्टिव्हलसाठी येणारे किंवा स्थानिक, सगळे दारू पिण्याबद्दल नॉर्मल असतात. तिथे पिणार्‍या मुलगीबद्दलही लोक बाऊ करताना दिसत नाहीत. मागच्या वेळी गोव्यात आले होते, तेव्हा एका चोवीस वर्षांच्या मुलीशी ओळख झालेली. एकेदिवशी ती मला तिच्या स्कुटीवरून दारूच्या दुकानात घेऊन गेली. आजवर दारूच्या दुकानाशी माझा धाडसी संबंध सुटे पैसे घेण्याइतपत आणि विविध रंगांच्या आणि आकाराच्या बाटल्या लांबून न्याहाळण्याइतपतच आलेला. तर तिने दुकानदारासोबत गप्पा मारत दारूची बाटली आणि सोडा घेतला. तिथेच दोन्ही बाटल्या फोडून मिक्स केल्या आणि दुकानदाराला पिण्याची ऑफर देत काही घोट घेतले. मी तिला न्याहाळत होते. सिनेमागृहात आल्यावर तिने सिनेमा सुरू असताना गुपचुप सिप घेतले. एकीकडे मला तिचे कौतुकही वाटले आणि काळजीही. ती बिनधास्त सिप घेत सिनेमा पाहत होती. यावर्षी ती फेस्टिव्हलला आली नसल्याने मी तिला मिस केले.
गोव्यात गेल्या वर्षी आणि या वर्षीही मला ‘गोव्यात येणार्‍या मुली ‘एवलेबल’ असतात अशा पुरुषी विचारांचे अनुभव आले. गेल्या वर्षी एका कारवाल्या पुरुषाने लिफ्ट दिली आणि गाडीत बसताच सहज बोलता बोलता मांडीवर हात ठेवला. मग त्याची लाज काढून, भांडून आणि शेवटी त्याच्या गाडीवर लाथा मारल्या. तर्राट गाडी चालवून पळून गेला तो. इथे येणार्‍या मुली सहजपणे सेक्ससाठी तयार होतात, असे काहीसे काही पुरूषांचे विचार दिसले. मग ‘नो’ असा स्पष्ट मेसेज दिला तरी दारूची ऑफर करणे, जेवायला आमंत्रण देणे इ. गोष्टी होतात. ‘हमे इशारा समझ मे आता है भाई! इशारा करने पर कोई ऐतराज नही, जिसे इशारे मे घुलमिल जाना है जाये, जाये, पर हमने ‘ना’ बोला तो ‘ना’ को समझो और उसका सन्मान करो।’
एकदा सिनेमासाठीच्या रांगेत उभे असताना एक मुलगा आमच्याशी बोलायला लागला. तो पूर्णत: दारूच्या धुंदीत होता आणि अवतारावरून आंघोळही केलेली दिसत नव्हती. त्याने त्याचे नाव कृष्णा सांगितले व तो केरळचा असल्याचे सांगितले. जुजबी बोलण्यानंतर मला म्हणाला, “मी गेल्याच्या गेल्या वर्षी तुला पाहिले आहे.”( कसलं सिनेमटिक ना - ‘मैने आपको कही देखा है!’)
“मी गेल्याच्या गेल्या वर्षी आले नव्हते,” असं म्हटल्यावर माझ्या मैत्रिणीला “तुला गेल्या वर्षी पाहिले आहे” म्हणाला.
“ती याच वर्षी आलीये ” म्हटल्यावर, त्याने आमची नावे विचारली. 
मी माझे नाव सांगून ‘मी वाईटाचा नायनाट करते, माझ्यापासून सावध राहा ” असे म्हणून संभाषण संपवले. पण त्यानंतर तो दिसेल तेव्हा आम्ही दोघी “मैने आपको कही देखा है!” असे म्हणून हसत असू. 
एके रात्री सिनेमा संपल्यावर घरी सोडण्यासाठी तो आग्रह करत होता. मी त्याला ठामपणे ‘मी जाईन, थॅंक्स’ असं तीन चार वेळा सांगूनही त्याचा आग्रह सुरूच होता. त्यानंतर मात्र त्याला मी नाराजीच्या सुरात बोलले,तेव्हा एकदाचा तो गेला. त्यानंतर त्याने कधी अशा प्रकारचा इशारा केला नाही. 
सेक्स, दारू या वैयक्तिक बाबी आहेत, आपापला चॉइस आहे. त्याला ‘नैतिक’ बंधनात न अडकवता त्याचा आनंद घ्यावा, ही माझीही भूमिका आहे. आपापल्या विचारांची माणसे जरूर शोधावीत, इशारेही करावेत; मात्र फक्त ‘तसाच’ उद्देश ठेऊन नकोइतकी सलगी दाखवणं किंवा नकार देऊनही सतत प्रयत्न करत राहण्याने त्यातील सौंदर्य नष्ट होते, त्याला ‘बाजारूपणा’ येतो. यात स्त्रीला ‘बाजारू उपभोग्य वस्तू (कमोडिटी)’ समजण्याची वृत्तीही दिसून येते. अशा कृती त्रास देऊन जातात. त्या ‘कृष्णा’ला धडा शिकवल्याचा आनंद आम्ही फेस्टिव्हलभर उपभोगला. या कृष्णाच्या निमित्ताने कुठेतरी वाचलेला ‘महिलांच्या छेडछाडीची सुरुवात देवानेच केली’ हा संदर्भही आठवला.
अजून फेस्टिव्हल मधले बरेच अनुभव बाकी होते, त्याबद्दल लेखाच्या पुढच्या भागात!

(हा लेख ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकात पूर्वी प्रकाशित झाला होता.)

लक्ष्मी यादव.

सामाजिक कार्यकर्ती 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form