आज 19 नोव्हेंबर अर्थात – ‘जागतिक पुरुष दिवस’ आहे म्हणे! हे कधी, कोणी ठरवलं, त्याला संयुक्त राष्ट्रसंघाची संमती आहे का - असले काहीही प्रश्न न विचारता - आजच्या दिवशी सगळ्या पुरुषांना सरसकट शुभेच्छा द्यायच्या,पुरुषांचं कवतीक करायचं अशी प्रथा गेल्या पाचसहा वर्षांपासून सुरू झालीये. वेगवेगळ्या चॅनल वरून ह्या नव्या सणाचे स्पेशल रिपोर्टस दिसतातच. बातम्यांमध्ये काही “पुरुष हक्क संघटना” नवऱ्यावर अत्याचार करणाऱ्या बायकांच्या विषयी राग व्यक्त करताना दिसतात, एखादी संस्था बायकांच्या फोटोला चपलांनी बडवते, संन्याशाच्या वेषातल्या ‘पत्नी पीडित’ पुरुषांचा एखादा मोर्चा निघालेला दिसतो. थोडक्यात काय तर जणूकाही स्त्रियाच पुरुषांच्या शत्रू आहेत की काय – असं वाटावं अशा प्रकारे हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा होताना दिसतो. Saveindianfamily foundation सारख्या संस्थांच्या वेबसाइटवर पुरुषांवर स्त्रीयांकडून होणाऱ्या “अन्याया”चे अनेक नमुने वर्षभर मांडून ठेवलेले बघायला मिळतात. पण त्या बरोबरीने पुरुषांचं एकमेकांमधलं जे शत्रुत्व असतं – त्याच्या विरुद्ध मात्र “जागतिक पुरुष दिवसा”च्या निमित्ताने कुठेही काही बोललं जाताना दिसत नाही! त्यामुळे पुरुषांना पुरुषांनीच एकमेकांवर केलेल्या हिंसेचा आणि अन्यायांचा विसरच पडलेला असतो की काय - असा मला प्रश्न पडतो.
खरंतर ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ किंवा अगदी “ट्रान्सजेंडर” ही काही व्यक्तीची एकजिनसी ओळख असूच शकत नाही. उलट जात, धर्म, भाषा, आर्थिक वर्ग, वर्ण – असे अनेक स्तर त्यात असतात. आणि त्यामुळेच माणसामाणसांत वैविध्य असतं आणि विषमता देखील असते. स्त्री-पुरुषांमधली विषमता हा तर त्यातला फक्त एकच पैलू आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काही चर्चा सुरू असेल तर बरेचदा – “स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू आहे!” ह्या वाक्यावर ती चर्चा येऊन ठेपते. मात्र पुरुषांवरच्या अन्याय विषयीच्या चर्चेत “पुरुषच पुरुषाचा खरा शत्रू आहे” – असं कधी म्हटलेलं ऐकू येत का? तर कधीच नाही! उलट जर एखादी बाई असं म्हणालीच तर तिलाच “फेमी-नाझी” ठरवलं जाईल.
पण खरंतर रोजच्या बातम्या पाहून सुद्धा लक्षात येईल की पुरूषांच्या एकमेकांशी असलेल्या शत्रुत्वाचं प्रमाण किती मोठं आहे. पुरुष एकमेकांशी रस्त्यावर हाणामाऱ्या करतात, शेताच्या मालकीवरून कोर्टात वर्षानुवर्ष भांडत राहतात, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांवर किंवा बॉसवर बढती-बदलीच्या कारणांवरून राग ठेवतात, कुटुंबातल्या अपंग पुरुषांना त्यांचे हक्क नाकारले जातात, धंद्यातल्या स्पर्धेपायी पुरुष एकमेकांच्या खुनाचे कटदेखील रचतात. एवढंच नाही तर रस्त्यावरून वाहन चालवताना अनोळखी पुरुष देखील एकमेकांशी विनाकारण स्पर्धा करून अपघात ओढवून घेतात. अनेकदा संतापाच्या भरत स्वत:वरच राग काढून स्वत:ला इजा करून घेतात. जागतिक पातळीवर विध्वंसक शस्त्रास्त्र तयार करून देशांच्या सीमेबद्दल युद्धखोरी करतात. सैन्यात एका देशाने दुसऱ्या देशावर मिळवलेला विजय प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्या देशातल्या स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष सैनिकांवरसुद्धा बलात्कार केले जातात. इतकंच नाही तर सैन्यातील अधिकारी स्वत:च्या हाताखाली काम करणाऱ्या सैनिकांवर देखील मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसा करतात असे दिसून आलेले आहे. Pentagon च्या एका अहवालानुसार दरवर्षी सरासरी 10,000 पुरुष सैनिकांवर लैंगिक अत्याचार केले जातात. पोलिस कस्टडीत किंवा तुरुंगातल्या कैद्यांना प्रचंड मारहाण केली जाते, हे तर सर्वांना माहीतच असते. अनेकदा त्यात कैद्यांचे मृत्यू ओढवतात. असे एकनादोन असंख्य प्रकारचे हिंसाचार अन्याय विविध सामाजिक पातळ्यांवरचे पुरुष एकमेकांवर करत असतात. स्त्रीयांनी पुरुषांवर केलेल्या अन्यायापेक्षा, हिंसेपेक्षा पुरुषांनी पुरुषांवर केलेले अन्याय आणि हिंसा कितीतरी जास्त प्रमाणात आहे - हे NCRB (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो)च्या अहवालातल्या आकडेवारीकडे बघून सुद्धा लक्षात येईल. पण ‘जागतिक पुरुष दिनाच्या’ निमित्ताने केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये यातल्या कशाबद्दलही आवाज उठवला जात नाही. त्याऐवजी पुरुष हक्क समिती सारख्या संस्था - ‘पुरुषांवर स्त्रियांकडून झालेल्या हिंसेची’ तुरळक उदाहरणे देत राहतात आणि देशातले ‘महिला धार्जिणे’ कायदे बदलायची मागणी करतात. त्यातली सगळीच उदाहरणं खोटी असतील, असं मला अजिबात सुचवायचं नाही! पण शेकडो वर्षांची पितृसत्ता मुरलेल्या आपल्या देशात पुरुषांवर हिंसा करण्या इतकी ताकद किती टक्के बायांमध्ये असु शकते, याचा तरी विचार करायला हवा की नाही?
आपल्या देशात महिलांनी पुरुषांवर केलेली हिंसा याविषयावर फारसे अभ्यास झालेले नाहीत. पण युरोप आणि इतर पाश्चिमात्य देशातल्या संशोधनांमध्ये हे प्रमाण जेमतेम 1 ते 2 टक्के एवढंच दिसून आलंय. दोन वर्षांपूर्वी हरयाणा मध्ये 21 ते 50 वर्ष वयोगटातल्या 1000 पुरुषांच्या सोबत केलेल्या एका संशोधनाचा अहवाल सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यात असं दिसून आलं की 51.5 % पुरुषांना आयुष्यात एकदा तरी बायको किंवा प्रेयसी कडून हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी 10.5 % पुरुषांना सर्वेक्षणाच्या आधीच्या वर्षभरात अशा हिंसेचा अनुभव आला होता. यापैकी पन्नास टक्क्याहून थोडा अधिक प्रकरणांत मानसिक हिंसाचार करण्यात आला होता आणि 1/10 प्रकारात शारीरिक बळाचा वापर झाला होता. यापैकी अर्ध्या प्रसंगात पुरुषांकडून शारीरिक आणि मानसिक हिंसेला सुरुवात केली गेलेले होती. थोडक्यात, शारीरिक हिंसेच्या बाबतीत बायकांनी केलेली हिंसा अत्यल्प म्हणता येईल इतकीच होती - असे दिसले आहे. याउलट बायका जेव्हा कौटुंबिक हिंसेच्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा अनेकदा त्यांची हाडं मोडलेली असतात किंवा अंगावर माराचे वळ असतात - हे आपल्याला माहीतच आहे. भारतातल्या इतर राज्यांमध्ये खूप वेगळी परिस्थिती असेल असं मला तरी वाटत नाही. पुरुषांनी एकमेकांवर किंवा स्त्रियांवर केलेल्या हिंसेच्या तुलनेत स्त्रियांनी पुरुषांवर केलेल्या हिंसेचे प्रमाण किती कमी आहे - ते यातून पुरेसं स्पष्ट होत आहे.
जरी काही पुरुषांना काही महिला त्रास देत असतील तरी समाजातली एकूण पितृसत्ता मात्र तशीच राहते. हीच पितृसत्ता पुरुषांना ‘मर्दानगी’च्या चुकीच्या कल्पनांमध्ये अडकवून त्यांच्यातली कोमलता, संवेदनशीलता हिरावून घेते. पुरुष अनेकदा ‘मर्दानगी’ विषयी चुकीच्या कल्पनेतून निष्कारण जोखीम घेतात, ताणतणाव ओढवून घेतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ अशी जी पुरुषाची प्रतिमा तयार झालेली आहे - त्या प्रतिमेच्या प्रेमातून पुरुषांनी बाहेर पडायला हवं. म्हणजे कदाचित तो स्वत:ला आणि दुसऱ्या पुरुषांनाही त्रास देणं आणि त्यांच्यावर हिंसा करणं कमी करू शकेल. पुरुषांमधला वैरभाव कमी होऊन आपुलकी जागी होऊ शकेल. त्याकरता ‘आपली कमजोरी काय आहे किंवा बलस्थान काय आहे’, ‘आपल्या पुरुषीपणाच्या कल्पना काय आहेत’ त्याबद्दल सामूहिक चर्चा करायची, आत्मपरीक्षण करायची संधी पुरुषदिना निमित्त पुरुषांनी घेतली पाहिजे.
वंदना खरे
संपादक
'पुन्हास्त्रीउवाच'