आपल्या देशात – ‘मुलगा हवा तोच वंशाला दिवा’ हे लोकप्रिय असले तरी मुलगी झाली की आनंदी होणारे लोकही कमी नाहीयेत. पण तरीही एकूणच मुलीचे संगोपन मुलापेक्षा वेगळ्या प्रकारेच होते. अशा विचारांचा प्रभाव तिच्या वैयक्तिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही पडतो.
National Family Health Survey (NHFS) 2019-20 मध्येही असं दिसून आलं आहे की देशातली 50% हून जास्त महिला आणि मुलं अनिमिक आहेत. Nanhi Kali आणि Naandi Foundation यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी जो सर्वे (Teen Age Girls report) नुकताच प्रकाशित केलाय त्या अहवालानुसार भारतातल्या 50% मुलींचं वजन अवश्यकतेपेक्षा कमी असतं आणि 52% मुली तर अनिमिक असतात. त्याबरोबरच 39% मुलींना उघड्यावर शौचाला जावं लागतं आणि 46% मुलींना मासिकपाळी दरम्यान आरोग्यपूर्ण पद्धती वापरायला मिळत नाहीत. Naandi Foundation च्या मुख्य अधिकारी रोहिणी मुखर्जी म्हणतात की कुटुंबातलं बायकांचं दुय्यम स्थान, आरोग्या विषयीचं अज्ञान आणि अंधश्रद्धा अशी सगळी कारणं ह्या अवस्थेला कारणीभूत आहेत.
कुटुंबातून आणि प्रसार मध्यमातल्या प्रतिमांमधून मुलींच्या मनावर असं बिंबवलं जातं की तू मुलगी आहेस म्हणजे तू नाजूकच असले पाहिजेस. काही मुली छान उंच असतात, खरी तर ही अभिमानाची गोष्ट असु शकते. पण बरोबरीच्या मुली बुटक्या असल्याने त्या पोक काढून चालतात. किशोरवयात स्तनांची वाढ होऊ लागली की तेही काही मुली लपवायला बघतात. मजबूत शरीरयष्टीच्या सुदृढ मुलींकडे – ‘काय ही पुरुषी आहे, कसे लग्न होणार हिचे?’ अशा दृष्टीने बघितले जाते. ‘तू किती जाडी आहेस’ वगैरे घरच्यांनी सतत म्हटल्यामुळे त्या गरजेपेक्षा कमी खाऊ लागतात आणि कधीकधी त्यांना बुलिमिया सारखे आजारही होतात.
बहुतेक घरांत आधी पुरुषांना वाढले जाते आणि मगच मुलगी आणि आई जेवतात. बरेचदा पौष्टिक पदार्थ संपूनच जातात. अनेक ठिकाणी महिलांनी मांसाहार करू नये – अशी पद्धत असते. शाकाहारी महिलांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्तच वाढतो. आई करते तसे सगळे उपास, व्रतवैकल्य मुलीने करावी अशी अपेक्षा केली जाते त्यामुळे मुलींनाही असे उपास करण्यात मोठेपणा वाटू लागतो. ह्या सगळ्यामुळे मुलींमधले कुपोषण वाढत जाते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
बऱ्याच घरांमधे अजूनही पाळी सुरू झाली की मुलीला बाजूला बसवले जाते. काहींना त्या काळात पोटात खूप दुखते, किंवा खूप रक्तस्त्राव होतो. बऱ्याच मुलींचे महिन्यातले चार दिवस ह्या कारणांनी फुकट जातात. काही महत्वाचे इव्हेंट, परीक्षा ह्या कारणांनी बुडतात. त्या शिक्षणात मागे पडायला लागतात. आधीच घरातून काही प्रोत्साहन नसते. अश्या मुली आयुष्यात काही उच्च ध्येय कसं ठेवणार?
बहुतेक वेळा मुलींची मानसिकता लग्न ह्या एकमेव ध्येयासाठी तयार केली जाते. त्यादेखील त्या दृष्टीनेच स्वत:ला तयार करायला लागतात. लग्नासाठी आपल्या देशात गोरा रंग हे सौंदर्याचे परिमाण आहे. पण बहुसंख्य मुलींची त्वचा तर सावळी असते. मग ह्या सावळ्या मुली ‘गोरं’ होण्यासाठी वेगवेगळी क्रिम वापरून आपली त्वचा खराब करून घेतात. पिंपल आल्यावर ते फोडून किंवा सतत हात लावूनही चेहरा खराब करून घेतात. किंवा खूप मेक अप, लिपस्टिक, नेल पॉलिश वापरून त्वचा ओठ, नखे खराब करून घेतात. नंतर त्यांना चारलोकांत मिसळण्याचा आत्मविश्वास राहत नाही.
पाळी सुरू झाली की मुलांपासून लांब राहा एवढेच सांगितले जाते. तसेच जननेंद्रियांची पुरेशी स्वच्छता न राखल्याने इन्फेक्शन सुद्धा होतात. मुलींना सेक्स विषयी कुतूहल असतंच. तरी घरून शारीरिक संबंधाविषयी काहीही माहिती दिली जात नाही. मग त्या मित्र किंवा कोणाही पुरुषाच्या आहारी जाऊ शकतात. आणि गरोदर सुद्धा राहू शकतात. असुरक्षित संबंधातून एचआयव्ही चा धोका सुद्धा असतोच. पण पुरुष बहुतेक वेळा कंडोम किंवा इतर गर्भनिरोधक साधनांना नकार देतात. आता गर्भपात हासुद्धा गर्भनिरोधनाचा एक मार्गच होऊन बसलाय. पण प्रत्येक अबोर्शन नंतर स्त्रीचे आरोग्य ढासळत जाते तसा तिला मानसिक धक्काही बसायची शक्यता असते.
ग्रामीण भागातल्या मुलींच्या बाबतीत तर ह्या समस्या खूपच उग्र स्वरूप धारण करू शकतात. ग्रामीण भागातल्या अनेक शाळांत मुलींसाठी स्वच्छता गृह नसल्यामुळे मासिक पाळीच्या काळात मुली शाळेत जातच नाहीत. अनेक शाळांत तर अशी अवस्था आहे की टॉयलेटच्या चार भिंती उभ्या असल्या तरी ते वापरण्याच्या अवस्थेत नसते. काहीनाकाही कारणाने मुलींन शाळेत जाता आलं नाही की त्या अभ्यासात मागे पडत राहतात. अनेकदा 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अंत त्यांचं लग्न उरकून टाकलं जातं. करोनोत्तर काळात अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ग्रामीण मुलींना गरीबीमुळे लहान वयातच रोजगारासाठी कामाला जावे लागते. ह्यामुळे एकप्रकारे ह्या मुलींच्या हाती पैसा येतो आणि थोडंसं स्वातंत्र्य मिळत असलं तरी तिथे त्यांची पिळवणूक होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. काहीवेळा घरातून मुलीची हेळसांड झाल्याने त्या पळून जाऊन वाईट माणसांच्या तावडीत सापडून वेश्याव्यवसायात ढकलल्या जाऊ शकतात.
थोडक्यात, आपल्या देशातल्या मुलींच्या सर्वच प्रकारच्या आरोग्याच्या हक्कांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होते आहे. आज जागतिक बालहक्क दिवसानिमित्त ह्याची जाणीव करून द्यावीशी वाटते. कदाचित ही जाणीव आपल्याला आपलं सामाजिक पालकत्व निभावण्यासाठी उद्युक्त करेल!