लॉकडाउन काळात बघितलेल्या सिनेमांमधील दोन सिनेमे पक्के लक्षात राहिले.कारण या दोन्ही सिनेमांमध्ये दोन वेगवेगळ्या बायकांच्या जोड्यांची गोष्ट सांगितली आहे. या जोड्या अतिशय भिन्न आहेत, सामाजिक – कौटुंबिक स्तरापासून ते मानसिक-वैचारिक स्तरापर्यंत या जोड्यांमध्ये समानता नावालाही नाही. सारखेपण शोधायचेच तर या जोड्या त्यांच्या त्यांच्या परिघात अगदी सामान्य, सर्वसाधारण अशा आहेत. तरिही या जोड्यांची कथा त्यांच्या लेखक - दिग्दर्शकांना सांगाविशी वाटली आणि त्यांनी ती कुठलाही आविर्भाव न आणता सांगितली आहे, यामुळेच हे सिनेमे लक्षात राहिले.
यातला ‘पटाखा’ हा सिनेमा सप्टेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला आहे; तो मी एप्रिल २०२० मध्ये बघितला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे विशाल भारद्वाज यांनी. सिनेमाची माहिती बघताना कळलं की हा सिनेमा ‘चरणसिंग पथिक’ यांच्या ‘दो बहने’ या कादंबरीवर आधारीत आहे. जेंव्हा एखाद्या साहित्यिकाने लिहिलेल्या साहित्यकृतीवर सिनेमा आधारलेला असतो तेंव्हा आपोआप,कथानक,व्यक्तिरेखाटन या बाजू तगड्या असतात. ‘पटाखा’ ही दोन बहिणींची कथा आहे. राजस्थानमधल्या एका लहानशा गावातल्या छुटकी आणि बडकी या दोन सख्ख्या बहिणी. 'सख्खे भाऊ पक्के वैरी' - या म्हणीचे फिमेल वर्जन म्हणजे छुटकी आणि बडकी.लहानपणापासून त्या एकमेकींशी फक्त भांडतात! यांना भांडायला खास कारण ही लागत नाही, चोरून विड्या ओढण्यापासून ते एकमेकींचा ड्रेस ढापून वापरण्यापर्यंत काहीही कारण पुरते. शिवाय एकीने केलेल्या भाजीत दुसरीने डब्बल तिखट घालणे, एक आंघोळीला गेल्य़ावर दुसरीने तिचे कपडे पळवणे असा गनिमी कावा तर या भगिनींसाठी रोज की बात असते. आईवेगळ्या या बहिणी वाढवणाऱ्या बापाचे मात्र यांच्या भांडणात हाल होत असतात.या कथेतील एक खास,महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे ‘डिप्पर’. त्याचा मुख्य ‘बिझनेस’ असतो छुटकी आणि बडकीत भांडण लावून गंमत पाहणं,मग त्यात कधीतरी स्वतःवर शेकलं तरी त्याला पर्वा नसते.पण या दोघींची स्वतःच्या मनात जपलेली स्वप्नंही आहेत. छुटकी म्हणजे गेंदा कुमारीला व्हायचंय इंग्रजीची टिचर आणि चंपाकुमारी म्हणजे बडकीला सुरू करायची आहे स्वतःची डेअरी. यथावकाश एकमेकींच्या झिंज्या उपटत आणि एकमेकींना लाखोली वाहात दोघी बहिणी तरुण होतात.एकिने आपला जोडीदार शोधल्याचं लक्षात येताच दुसरीपण जोडीदार शोधते. दोघी बहिणी आपापल्या हिरोंबरोबर पळून जाऊन लग्न करतात आणि मग त्यांना कळतं - की आता त्या सख्ख्या जावा झाल्या आहेत. इथून तर खरी गोष्ट सुरू होते. त्या दोघी आपल्या बापूला दिलेलं कधीही न भांडण्याचं वचन पाळतात का ? डीप्पर त्यांच्या सासरी येऊन पुन्हा काड्या घालतो का ? आणि त्या दोघींनी मनात जपलेल्या स्वप्नाचं काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पटाखे पाहायला हवा.
विशाल भारद्वाज याने अतिशय साधेपणाने, कोणतिही गिमिक्स न वापरता गोष्ट पडद्यावर सादर केली आहे. ती सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते,कारण दिग्दर्शकाने कथेच्या नैसर्गिक प्रवाहाला उगाचच व्यावसायिक वळणे दिलेली नाहीत( म्हणूनच बहुदा तिकीटबारीवर पिक्चर जरा गडबडला असावा).विशाल भारद्वाजचा सिनेमा म्हणजे गुलजारजींची गाणी हे समिकरण इथेही आहेच,रेखा भारद्वाज,सुनिधी चौहान,अर्जित सिंग,विशाल भारद्वाज,सुखविंदर सिंग यांच्या आवाजातली ही गाणी गोष्ट पुढे न्यायचं काम करतात.दिग्दर्शकाबरोबर कलाकारांचा वाटा तितकाच मोठा आहे. छुटकी साकारली आहे सन्या मल्होत्रा हिने तर बडकी झाली आहे राधिका मदन. या दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या बरोबरीने या चित्रपटातील (बेचारे) बापु आणि टिप्पर या दोन पुरुष व्यक्तिरेखा देखिल लक्षात राहातात.यातला बापु केला आहे विजयराज ने तर टिप्पर बनला आहे सुनिल ग्रोव्हर. सुनिल ग्रोव्हरला टिप्परच्या रुपाने लाइफटाईम रोल मिळालाय. या बहिणींना तो जसा उचकवतो, डिवचतो तसाच तो त्यांना मदतही करतो त्यामुळे टिप्परचा प्रेक्षकांना राग येत नाही,जरी तो काड्या घालत असला आणि या बहिणींच्या भांडणाला तडका देत असला तरी तो व्हिलन वाटत नाही. हे यश जितकं लेखक-दिग्दर्शकाचं तितकंच सुनिल ग्रोव्हरचं आहे.
राजस्थानमधल्या एका छोट्या गावातल्या ‘या दोघीं’चा सिनेमा बघितल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने महानगरी मुंबईतील ‘त्या’ दोघींचा सिनेमा बघितला. या सिनेमाचं नाव आहे ‘टिकली ॲन्ड लक्ष्मी बॉम्ब ’. योगायोग म्हणजे हा सिनेमा पण एका कादंबरीवर आधारित आहे,कादंबरीकार आदित्य क्रिपलानी यानेच आपल्या कादंबरीला पटकथेचं रुप देऊन सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्ससाठी २०१७ मध्ये तयार करण्यात आला होता.
ही मुंबईच्या वेश्या व्यवसायातील दोघींची गोष्ट आहे. मायानगरी मुंबईतील स्त्रीदेहाचा हा सगळा व्यापार पुरुषांच्या नियंत्रणाखाली आहे. मुंबईच्या उपनगरात लक्ष्मी मालवणकर ही सुमारे वीस वर्षे देहविक्रय करुन जगतेय. आता ती साधारण चाळीशीच्या आसपास आहे,त्यामुळे आपोआप तिच्याकडे ‘अम्मा’ ची भूमिका आलेय. लक्ष्मी आणि तिच्या बरोबरच्या बाकीच्या वारांगना हा धंदा करतात तो म्हात्रेच्या संरक्षणाखाली. म्हात्रेने अनेक जणींना या बाजारात आणून उभं केलं आहे. लक्ष्मी सिनिअर आणि विश्वासातली असल्याने नव्याने आलेली मुलगी तिच्याकडेच देऊन म्हात्रे निर्धास्त राहात असतो. म्हात्रेचा पंटर रिक्षा घेऊन या सगळ्याजणींवर लक्ष ठेवायला,लागली तर त्यांना मदत करायला कायम हजर असतो. एकदा पुतुल ही विशी बाविशीतली बांगला देशी छोकरी आणून म्हात्रे लक्ष्मीच्या स्वाधिन करतो. ती आल्यापासून लक्ष्मीला प्रश्न विचारुन भंडावून सोडते. म्हात्रे या सगळ्या जणींकडून महिन्याचा हप्ता घेऊन पोलिस स्टेशनला देत असतो,तरी मग अधून मधून पोलिस रेड का टाकतात आणि मुलिंना उचलून का नेतात ? जर आपण गिऱ्हाइक उरावर घेतो तर आपल्या कमाईतला मोठा हिस्सा म्हात्रेला का द्यायचा? असे बंडखोर सवाल पुतुल कायम लक्ष्मीला विचारत असते. लक्ष्मीने या धंद्यात आयुष्य घालवलेलं असतं,त्यामुळे हा धंदाच नाही तर हे सगळं जगच पुरुषांचं आहे आणि पुरुषांच्या तालावर चालतं हे तिने स्विकारलं आहे. पुतुल नवीन आहे,तिच्या टिकल्या सुरवातीला वाजतील पण नंतर थंड पडेल असं लक्ष्मीला वाटत असतं. मात्र एका घटनेमुळे लक्ष्मी अस्वस्थ होते आणि पुतुलच्या म्हणण्याचा विचार करु लागते. मग सुरू होते क्रांती .. टिकलीने (पुतुलने) लक्ष्मीसह सुरू केलेली क्रांती ! या टिकली-आणि लक्ष्मी बॉम्बचा चांगलाच धमाका उडतो. आधी विचार करायची आणि येणाऱ्या संकटांमधून मार्ग काढायची जबाबदारी लक्ष्मी टिकलीवर टाकत असते -‘तेरी क्रांती है .. तू सोच ..’ पुतुलही एका पेक्षा एक भन्नाट आयडिया लढवते आणि म्हात्रेला टक्कर देउन सगळा बिझनेस आपल्या हातात घेऊन दाखवते. पण पुरुषांच्या जगात स्त्रियांची बंडखोरी टिकते का ? टिकली आणि लक्ष्मी बॉम्बची क्रांती यशस्वी होते का ? हे सारं पडद्यावर बघायला हवं.मुळात शोषितांच्या जगातल्या कोणालातरी बंडखोरी कराविशी वाटणं,त्याने इतर शोषितांची साथ मिळवणं आणि यंत्रणेनं ते बंड चिरडण्यासाठी कसून प्रयत्न करणं हे काही नवीन नाही.इथे नवीन आहे ती या गोष्टीतल्या स्त्री व्यक्तिरेखांची मानसिकता. त्यांनी मिळालेलं आयुष्य स्विकारलंय,त्या आयुष्याकडून त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत, आपल्याला संरक्षण देणारे पुरुषच आपला उपभोग घेणार हे त्यांनी स्विकारलेलं आहे, हे जग पुरुषांच आहे आणि स्त्री ही कायम दुय्यम भूमिकेत असणार हे त्यांना मान्य आहे.त्यामुळेच आधी टिकलीचा विचार त्या हसण्यावारी नेतात,पण टिकलीचा विचार धोकादायक असला तरी प्रत्यक्षात येऊ शकतो आणि आपण आपल्यावर हुकुमत गाजवणाऱ्या पुरुषांना नामोहरम करू शकतो हे लक्षात आल्यावर मात्र त्या टिकलीच्या क्रांतीत सामील होतात. या चित्रपटातील स्त्रीया आणि त्यांच जग आपल्या परिघाबाहेरचच नाही तर आपल्यासाठी त्याज्य,कदाचित घृणास्पद विश्व आहे पण चित्रपट बघताना आपल्याला टिकली,लक्ष्मी आणि त्यांच्या गँगबद्दल प्रेम (सहानुभूती नाही हं ) वाटू लागते.एखाद्या कष्टकरी समूहातील महिलांनी दिलेला शोषणाविरुध्दचा लढा जसा आपल्याला त्या महिलांबद्दल आपुलकी निर्माण करायला कारणीभूत होतो तशीच टिकलीची क्रांती आपल्याला पटते,आवडते आणि आपण तिच्या पार्टीचे होऊन जातो. मला वाटतं हेच या सिनेमाचं यश आहे.
त्याचं निम्म श्रेय जातं ते कलाकारांना.यातली पुतुल म्हणजे टिकली साकार केली आहे चित्रांगदा चक्रवर्ती हिने. तिचा हा पहिलाच सिनेमा होता.फॅशनेबल आणि बडबडी पुतुल- टिकली तिने मस्त रंगवली आहे. टिकलीचा बंडखोरपणा,टिकलीचा दागिन्यांचा आणि फॅशनेबल राहाण्याचा सोस,लक्ष्मीबरोबर उडणारे खटके हे सगळं तिने समजून उभं केलंय.टिकलीची अवखळ, बंडखोर व्यक्तिरेखा उठून दिसते ती विभावरी देशपांडेने साकारलेल्या लक्ष्मीमुळे. देहबोलीपासून ते मुद्रेवरील आविर्भावांपर्यंत लक्ष्मी मालवणकर विभावरीने जिवंत केली आहे.तिच्या लहान सहान प्रतिक्रिया, आविर्भाव, वावर यातून ती जे बोलते त्यामुळे एक काल्पनिक व्यक्तिरेखा हाडामासाची बनून उभी राहाते. म्हात्रेची व्यक्तिरेखा म्हणजे देहविक्रयाच्या बाजारातील टिपीकल भडव्याची व्यक्तिरेखा. म्हात्रेचा माज,त्याची अगतिकता,त्याची संधीसाधू वृत्ती हे म्हणजे उपेंद्र लिमयेसाठी रेडिमेड पॅकेज होतं. या सिनेमाचा विषयच देहविक्रयाचा बाजार आणि त्यातील व्यक्तिरेखा आहे त्यामुळे भाषाही अर्थातच तशी रांगडी आहे मात्र धंदा करणाऱ्या बायकांची गोष्ट सांगताना आणि ओ टि टी प्लॅटफॉर्मवरचा सिनेमा असूनही विनाकारण देह प्रदर्शन किंवा अंगावर येणारे सेक्सचे प्रसंग नाहीत. हा चित्रपट केवळ देहविक्रय करणाऱ्या महिलांचं दुःख दाखवून थांबत नाही. तो त्या जगाकडे आपल्याला वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडतो आणि ती वेगळी नजर आपल्याला या परक्या जगाशी जोडते.
लॉकडाउनकाळात बघितलेले हे दोन सिनेमा. दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा प्रधान, पण दोन वेगळ्या जगातल्या स्त्रीयांची गोष्ट सांगणारे! अजिबात ग्लॅमरस नसलेली गोष्ट तितक्याच साधेपणाने सांगणारे दिग्दर्शक आणि अस्सलतेने साकरणारे कलाकार यामुळे लक्षात राहिलेले. अशा व्यक्तिरेखा हिंदी सिनेमांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात आणि म्हणून मनात ठसून राहातात.
मकरंद जोशी
पुस्तकं, सिनेमा आणि प्रवास यावर प्रेम करणारा
पर्यटन आणि कॉपी रायटिंग या क्षेत्रात कार्यरत