हे देखील वाचा – अन्न, स्त्रीवाद आणि मी
माझ्या दुर्दैवाने माझे लग्न एका मागास विचारांच्या कुटुंबात झाले, आणि तिथे जाऊन स्वयंपाकच सगळ्यात महत्त्वाचा ठरला! त्यात हे लग्न भिन्न जातीमध्ये झाले ... मी ब्राम्हण घरातली ... लग्न झाले मराठा कुटुंबात ...त्यात सासरकडचे कट्टर शाकाहारी आणि मी मांसाहारी (यातील विरोधाभास लक्षणीय म्हणावा लागेल). इतकेच नव्हे तर माझे सासूसासरे कांदा, लसूण खात नाहीत त्यामुळे मला काही पदार्थ बनवायला अडचण यायची. आईने बऱ्याच युक्त्या दिल्या - फोडणीत जिरे घाल, जिरेमिरचीखोबरं वाटून घाल, कोथिंबिरीचा वापर जास्त कर. पण मला काही पदार्थ बिना कांदालसूण अजिबात आवडत नाहीत, मग प्रत्येक गोष्ट दोन वेळा बनवणे ... दोन वेगळ्या फोडण्या, हे सगळे मला नकोसे व्हायला लागले आणि मी सरळ सगळ्यांच्या स्वयंपाकाला आचारी ठेवला.
मग काय आधीच थोड्याफार विरोधातच लग्न झाले होते, परजातीची सून नावडती व्हायला किती वेळ लागतो ? घरातले सगळे बघून, पुढे मुलांना सांभाळून नोकरी करून, नवऱ्याचे फिरतीचे शेड्युल सांभाळून सगळी गाडी रुळावर ठेवताना, इतर कामासाठी बाया ठेवणे अनिवार्य होत गेले. यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली - माझ्यात इतर खुप गुण आहेत, मनमिळाऊ स्वभाव, गाण्याची आवड, लिखाणाची आवड, मुलांचे लाड ... पण “स्वयंपाकात रस नाही”, हा अवगुण या सर्व गुणांपेक्षा मोठा ठरला. खाणाऱ्यांच्या टीकास्त्रांना घाबरून मी स्वयंपाक घरापासून आणखी लांब गेले.
हे देखील वाचा – स्वयंपाक माझ्या नावडीचा
आता मी आणि माझ्या मुली अशा तिघीच राहतो आणि नोकरी सोडून मी कन्सल्टन्सी करते. माझ्या मुलींना जेव्हापासून खाण्यात रस निर्माण झालाय आणि मला थोडा फावला वेळ मिळायला लागलाय तेव्हापासून स्वयंपाकात पुन्हा रुची निर्माण झालीये ... पदार्थ ब्राह्मणी असो, मराठा असो, किंवा अगदी इटालियन असो, करून बघायला काय हरकत आहे? असे म्हणून आम्ही बनवतो. lockdown मध्ये तर पोळ्या पण ठीकठाक जमायला लागल्या आणि खूप नवनवीन पदार्थ केले. मला मुलींना धडा द्यायचा आहे कि स्वयंपाक येणे हे दुय्यम आहे! त्यांनी उगीच माझ्यासारखं अनेक वर्षे या बाबतीत गण्ड बाळगून राहू नये आणि सुपरवूमन व्हायला जाऊ नये …
रेणुका मुकादम