सीमा विस्तारताना

लहानपणी खानाखजाना पहायला मला प्रचंड आवडायचं. कॉलेजला असताना कधीतरी भूकेसाठी त्यातले सोपे पदार्थ प्रयोग करत बनवायला लागली. पण स्वयंपाकघरातली आवराआवर, भांडी घासणं हे मला कधीच आवडायचं नाही. आईच्या आजारपणामुळं किचनमधला वावर वाढू लागला. कोकणातल्या पद्धतीचं रोजच जेवण मला नीट यायचं. आवराआवरीकरता मदतनीस असायची. पुढं मग स्वयंपाकाकरताही मदतनीस आली तरी माझ्या कामाच्या वेळांमुळं, मला माझं शॉर्टकट हेल्दी फुड स्वतःच करायला लागायचं. वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं खायला, करायला, खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला मला आवडत असलं; तरी किचनमध्ये फार वेळ घालवायला दोघांनाही अजिबात आवडत नाही. खूप सामान आणि वेळ लागणारे पदार्थ करण्याच्या भानगडीतही पडतच नाही. मूड असला की पानभर पदार्थ आणि नाहीतर सरळ खिचडी, दहीभात असतो. रात्री हलका आहार असल्यानं सकाळचा नाश्ता मात्र दणदणीत लागतो. त्याकरता दूध-पोहेही चालतात. नवरा लग्नापूर्वी एकटा राहत असला तरी स्वयंपाक आणि चकचकीत स्वच्छता यात एकदम पटाईत. त्याच्या ‘आपल्या दोघांचं घर तर कामंही दोघांचं’ या स्वभावामुळं माझ्याही सर्व अंगवळणी पडलं. आमच्याकडं मदतनीस नाही. दोघं मिळून कामं केल्यानं काम चटकन होतात. तयारी, स्वयंपाक आणि त्यानंतरची स्वच्छता याकरता १ तासापेक्षा जास्त वेळ आम्ही दोघंही देत नाही. मी किंवा तो सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं सकाळी या एका तासातचं करतो. रात्रीकरताही वन पॉट मीलकडं आमचा भर असतो. हे तर झालं माझ्या इथल्या घरापुरतं. आमच्या आंतरजातीय आणि आंतरराज्य लग्नामुळंही गोड-तिखट अनुभव आले. चांगली गोष्ट म्हणजे गोड अनुभव आणि माणसांचं पारडं जड आहे.
मी महाराष्ट्रीय आणि सुधाकर कन्नड. गावात सुधाकरच्याच ज्ञातीतल्या लोकांची वस्ती आहे. माझं आणि सुधाकरचं लग्न ठाण्यात झाल्यावर गृहप्रवेश गावी झाला. आमच्या गृहप्रवेशाच्या दिवशी पंगतीत मी हौसेनं वाढायला गेले. हिंदी शिक्षक असणारे एक महाशय अडून बसले. म्हणे, “इसको हव्याकामें क्या कहते हैं बोलो फिर परसो”. मला क्षणभर सुचेना काय करावं. इतक्यात मागनं माझे दिर आले आणि हिंदीत म्हणाले, “अण्णा आपको चाहिए तो लिजिए, हमारी नयी बेटी को तंग मत किजीए” हे ऐकल्यावर आपल्याला या घरात जड जाणार नाही हा विश्वास आला. सख्खे ९ भाऊ, ४ बहिणी असं मोठ्ठ कुटुंब. माहेरी आम्ही सख्खी चुलत भावंड मिळून हा स्कोर आहे. माहेरी एक चुलत वहिनी आमच्याच ज्ञातीतली असली तरी देशावरची. मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या या वहिनीला स्वयंपाकावरून अजूनही टोचतात. माझ्या बाबतीत तर प्रांत आणि ज्ञातीही वेगळी त्यामुळं काय होईल ही शंका मनात होतीच.

११ वर्षांपूर्वी भाषा येत नसल्यामुळं मला सासरी काय बोलायचे हे कळायचं नाही. तिथली भाषा आणि संस्कृती शिकल्याशिवाय या घरातली होणार नाही, या विचारानं मी कर्नाटक-केरळ बॉर्डरवर असणाऱ्या आमच्या गावी एकटीच राहायला आले. घरात सासूबाई, सर्वात मोठे दिर आणि जाऊ. बाकी सर्व कामाच्या ठिकाणी. सुदैवानं दोन्हीकडं भात आणि नारळ मुख्य आहार असल्यानं जेवणाची पद्धत वेगळी असूनही, मला फार अडचण नाही आली. उलट मी नारळ खोवताना वगैरे त्यांच्या तोंडावर आश्चर्य असायचं. अरे हिला नारळ खोवता येतो! खाणा-खूणा, निरिक्षण यातून त्यांच्या पद्धतीच्या पाककृती समजून घेत होते. सासूबाईंनी घरातून पूर्ण निवृत्ती घेतलेली. त्यामुळं सगळा कारभार मोठ्या जावेकडं. ती माझ्या आईच्याच वयाची. तिच्याकरता महाराष्ट्र उत्तर दिशेला. उत्तरेकडचे लोक खूप तिखटजाळ, तेलकट खातात असा तिचा समज होता. त्यामुळं ती मला प्रत्यक्ष स्वयंपाक बनवू द्यायची नाही. खोबरं खोवणं, चिराचिरी याकरताची मदत घ्यायची. या सुरवातीच्या काळात माझी मोठी नणंद मला काही दिवसांकरता तिच्याकडं घेऊन गेली. तिचे 75 वर्षांचे सासरे म्हणाले, “रोज संध्याकाळी तुझ्या माहेरच्या पद्धतीचा नाश्ता किंवा जेवणाचा पदार्थ बनवायला लागेल. सामान काय लागेल ते आणून देऊ” - मी रुळण्याकरता त्यांची ही आयडीया. माझी कळी खुलली कारण तोवर मला गावी येऊन महिना झाला होता. कितीही ठरवलं तरी आपल्या जेवणाची आस असतेच ना. तिथं असेपर्यंत मला माझ्या पद्धतीचा पदार्थ या घरी रोज खाता आला. आपल्या पदार्थांना ते उत्स्फुर्त दादही द्यायचे. श्रीखंड, कोथिंबीर वडी, भरल्या मिरच्या, उसळी, गोडं वरण, टोमॅटोची भाजी, चपातीचा लाडू हे पदार्थ त्यांच्या घरच्या मेन्यूमध्ये आजही बनतात.

दर ४-५ महिन्यांनी मी गावी जाणं सुरूच ठेवलं. सासरच्या पद्धतीचे पदार्थ शिकताना त्यासंबंधीची इतर माहितीही मी घ्यायची. कदाचित माझ्या पेश्यामुळं ही सवय लागलेली. माझ्या उत्सुकतेमुळं माझ्या सासूबाई, नणंदा, जावा आणि घरातल्या पुरुषांनीही हातचं राखून ठेवलं नाही. त्यांची भाषा, संस्कृती, माहिती, माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तर द्यायचे. त्यामुळं लग्नानंतर वर्षभरातच मी घरात चांगली रुळले. रोजच्या सोबत समारंभाचं जेवणंही बऱ्यापैकी बनवू लागले. ठाणे, बंगलोरच्या आमच्या घरी आलेले नातेवाईक ‘हव्याका’ पदार्थ उत्तमपणे जमत असल्याचं आवर्जून सांगू लागले. 
आता मी मराठी पाहुण्यांकरता कन्नड पद्धतीचं आणि कन्नड पाहुण्यांकरता मराठी स्वयंपाक बनवते. पण गावच्या मुख्य घरात मला प्रत्यक्ष स्वयंपाक करायला 4 वर्ष जाऊ द्यावी लागली. जरा मुरल्यावर मीच पुढाकार घेऊन तिथल्या वास्तव्याच्या काळात रोज एखादा पदार्थ करायला सुरू केलं. मला एक पक्क माहित होतं, मी विहिरीच्या आतली बेडूक नाही. माझं जग विहिरीच्या बाहेर आहे. या जगात माझी खूप चांगली माणसं आहेत. १-२ व्यक्तींमुळं आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणि खरंच माझ्या सासूबाई, इतर जावा, नणंदा व त्यांच्या कुटुंबीयांशी खूप छान स्नेह निर्माण झाला. मोकळ्या मनानं मला सर्व काही देतात. कोकणी मसाला, मुरांबा, वेगवेगळ्या वड्या आणि उसळींची गावी स्पेशल फर्माईश असते.

मी पक्की मत्स्याहारी आणि सासर पूर्ण शाकाहारी. माझं मत्स्याहारी असणं मी लपवलं नाही. एवढ्या मोठ्या कुटुंबात सर्वच गोड कसं असणार. तर तिखटाकरता मला दोन जावा आहेत. या दोघी माझ्या मांसाहारावरून कायम टोमणे देत. गंमत म्हणजे मोठ्या जावेचा मुलगा शहरात कोंबडीची हाडं चावायचा. लग्नानंतर ४ वर्षांनी आम्ही बंगलोरला शिफ्ट झाल्यावर तिथल्या दिर-जावांना पहिल्यांदा घरी जेवायला बोलावलं. एक जाऊ मराठी स्वयंपाकाच्या वासानं ‘कसंतरी होतंय’ असू म्हणू लागली. जेवण वाढल्यावर अगदी चमचाभर घेतलेलं जेवण नंतर दाबून खाल्लं. कोकणी पद्धतीच्या घरगुती तिखट मसाल्याला नाकं मुरडलेली आता मागून नेते.

या प्रकारांसोबत एक वेगळीच गोष्टही सुरवातीला घडली. धाकट्या नणंदेच्या घरी एका पूजेकरता मी गेले होते. जेवणाच्या पंगतीत शेजारी बसलेल्या बाईनं मी कोण, माहेर कुठलं ही चौकशी सुरू केली. मी महाराष्ट्रातली आहे सांगितल्यावर म्हणजे ‘ओ माऱ्हाटी’ असं म्हणत पंगतीतून उठून गेली. माहेर कळल्यावर असे तुच्छतेचे कटाक्ष 4-5 वेळा मिळाले. मी शेवटी घरात विचारलं काय भानगड आहे? तर कळलं की दोन-तीनशे वर्षांपूर्वी युद्धाकरता महाराष्ट्रातून आलेले काही सैनिक इथचं स्थायिक झालेत. हे लोक इथल्या वाड्यांमध्ये गडी म्हणून काम करतात. त्यांना इथं ‘माऱ्हाटी’ म्हणतात. या चौकटीतल्या लोकांकरता महाराष्ट्रातले सर्व लोक ‘माऱ्हाटी’ आहेत. शहरात वाढलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेल्या माझ्याकरता हा अनुभव विचित्र होता. पुस्तकात, लेखात वाचलेली अस्पृश्यता मी प्रत्यक्ष अनुभवली. ह्या नणंदोईंना हा प्रकार कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं. माझ्याकडं सुरवातीला म्युझियममधल्या वस्तूसारखं बघणाऱ्या नजरा; लग्नाच्या 3-4 वर्षात बदलल्या. या नजरांमध्ये माझ्याबद्दल कौतुक आणि मान असतो.

साधना तिप्पनाकजे

मुक्त पत्रकार 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form