आपल्याकडे असं असतं

 ‘आपल्याकडे असं असतं’, हे वाक्य लग्नानंतर जवळपास वर्षभर तरी मी ऐकतच होते. मुळातच त्या आपलेपणात आपल्याला सामवून घेतलं जातंय याचं समाधान असल्यामुळे माझ्या स्वभावाविरुद्ध करावे लागत असलेले सगळे बदलही मला काही काळ आपलेसे वाटत होते. पण हळूहळू या आपलेपणाच्या नादात फक्त आपणच बदलतोय हे जाणवू लागलं.


मी लग्न करून ४०० किलोमीटर दूर नाशिकला आले. एकाच जातीत लग्न करूनही खूप फरक आहे अनेक पद्धतींमध्ये. अगदी औक्षण करण्यापासून भाजीला वाटण कसं आणि कोणतं लावायचं इथपर्यंत. लग्न झाल्यानंतर नवीन गोष्टी जाणून घेण्याची, शिकण्याची थोडी हौस वाटली म्हणून शिकत गेले. पण आता १० वर्षात मागे वळून पाहताना कधीकधी वाटतं - अनेक बदल मनाला अजिबातच पटत नसतानाही मी केले आहेत. काही पद्धती मला मनापासून आवडलेल्या असल्या, तरी काही निव्वळ कान, डोळे बंद करून मी स्वत:वर लादलेल्या आहेत हे आज शंभर टक्के सांगू शकते. न पटणाऱ्या गोष्टी नाकारण्याची हिंमत असतानाही मी त्या केल्या. कारण काय तर, आपल्या घरचे लोक आपल्यावर प्रेम करतात, सगळं स्वातंत्र्य देतात, मग काय हरकत आहे बदलायला, हा विचार! मला वाटतं बदल करण्याची, जुळवून घेण्याची वृत्ती मुलींमध्ये झिरपत गेलीये. त्यामुळे आपण किती लहान-सहान तडजोडी करतोय हे लक्षातही येत नाही. माझ्याबाबतीतही तेच झालं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी अशाच घरात वाढले जिथे आईने स्वत:मध्ये केलेले अनेक बदल मी पाहिले. चार माणसांनी बदलण्यापेक्षा एकाने बदलणं कधीही चांगलं, हेच सबकॉन्शस माईंडमध्ये कुठेतरी पक्क बसलं होतं. ही बदल करणारी व्यक्ती नेहमीच त्या घरातली सून असते!

पुरण केलं की भजी करायचीच, दिवाळीपूर्वी कराष्टमीच्या पूजेनंतर रात्री १२ ला जेवायचं. भाजीला शेंगदाण्याचा नाही तर तिळाचाच कूट लावायचा. कढीला वरून तुपाची फोडणी, त्यात हळद नाही. लाल भोपळ्याला डांगर म्हणायचं, घोसाळ्याला गिलकं म्हणायचं, पोह्याच्या चिवड्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, मोदकाच्या सारणात खवा हवाच असं आणि बरंच काही. , हे तुला करायलाच हवं – असा माझ्यावर थेट कोणताही दबाव नव्हता. पण लग्न होऊन आपण ज्या घरात गेलो आहोत त्या घरातील पद्धती आपल्या आहेत, ही एक मुलींमध्ये त्यांच्याही नकळत भिनलेली गोष्ट असते. मग त्या पटोत अथवा न पटोत आपण स्वीकारतो. तशा मी सुद्धा स्वीकारल्या. एक-दोन वेळा पद्धत बदलली. माझ्या पद्धतीने केलं तर, ‘आपल्याकडे या पद्धतीने इतर लोकांमध्ये करतात’ असं ऐकल्यावर मी धन्यच झाले! आता मी या बदलांना सरावलेले असले, तरी मुळात हे बदल मी केलेच का? असा विचार अनेकदा अस्वस्थ करतो. मग माहेरी गेल्यावर आईच्या हातचे पदार्थ यथेच्छ खाऊन मी ही अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला उत्साहाच्या भरात खाण्या-पिण्याच्या या बदलांचा मला झालेला फायदा एकच, की मी अनेक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतींनी बनवू शकते.

खाण्या-पिण्यासोबतच इतर प्रथापरंपरा हासुद्धा घरच्या सुनांसाठी मोठा विषय आहे आणि मला वाटतं तो जरा अधिक त्रासदायक आहे. माझ्या सासरी तुळशीचं रोप लावण, वाढदिवस किंवा अन्य सणांना औक्षण करणं, बारसं करणं, वाढदिवस करणं हे सगळं कित्येक वर्षे चालत नसे. कारण त्याचा संबंध काही दुर्घटनांशी जोडला गेला होते. याउलट माझ्या माहेरी मात्र या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आले होते. अखेर माझ्या पुतण्याचं बारसं घरात करून आणि कुंडीत तुळशीचं बी पेरून माझ्या सासुबाईंनी तब्बल ३५ वर्षांनी या प्रथा मोडल्या. सोमवारी नारळ वाढवायचा नाही, डोक्यावरून अंघोळ करायची नाही, शनिवारी मीठ आणि तेल आणायचं नाही, तेल आणि तूप एकत्र आणायचं नाही - असे अनेक नियम माझ्या घरी आजही आहेत. कारण मी लग्न झाल्यापासून सासू-सासऱ्यांसोबत राहते. आपण जेव्हा विभक्त कुटुंबात राहतो तेव्हा आपल्या मनाने काही गोष्टी करण्याची आपल्याला मुभा असते. पण जेव्हा एकत्र कुटुंबात असतो, तेव्हा मात्र तो संसार आधीपासूनच कोणाचातरी असतो. आपण तिथे फक्त फॉलोअर्सच्या भूमिकेत असतो. मुळात अशा प्रथा, परंपरा माझ्या माहेरी नव्हत्या का? - तर नक्कीच होत्या, आहेत. माझ्या माहेरच्या सुनेलाही त्या पाळाव्या लागत असतीलच! कारण बदल करण्याची वृत्ती आपणच पोसली आहे.

पत्रकार म्हणून काम करताना स्त्री स्वातंत्र्य वगैरेवर मी बरंच लिहिलं आहे. पण आचरणात आणणं प्रचंड कठीण काम आहे. कारण तुम्ही ‘मला हे जमणार नाही’, हे वाक्य बोलणं म्हणजे एखाद्या घराचे संस्कार नाकारणं असं समजलं जातं. मग नात्यांमधल्या इतर घरातल्या सुना हे सगळं कसं उत्तम पद्धतीने करतात याची उदाहरणं तुम्हाला ऐकवली जातात. माझ्यापुरतं बोलायचं तर मी केलेले अनेक बदल मला मान्य नसले, तरी मी ते घरच्यांच्या प्रेमापोटी केले. कारण नोकरीसाठी आणि माझ्या स्वत:च्या म्हणून काही गोष्टी आहेत, त्यासाठी मला सासरच्यांचा नेहमीच खूप मोठा आधार मिळाला (जो अनेक मुलींना अजिबात मिळत नाही). आपल्या कोणत्याही जबाबदाऱ्यांमध्ये आपण एकटे नाही आहोत, ही जाणीव तुम्हाला दुप्पट बळ देते. अगदी गुंतागुंतीच्या बाळंतपणापासून आठ महिन्यांची मुलगी सासू आणि नवऱ्याजवळ सोडून सहा दिवस ट्रेनिंगला जाण्यासारख्या अनेक गोष्टीत मला कुटुंबाची साथ मिळाली. त्यामुळे हे बदल नकोसे वाटत असले, तरी काही प्रमाणात मी स्वीकारले. हे एका पद्धतीचं निगोशिएशनच म्हणावं लागेल! पण मला न पटणाऱ्या काही गोष्टीही मी कराव्यात ही घरच्यांची अपेक्षा मला आजकाल सतत जाणवत होती. तेव्हा लक्षात आलं, की आपल्या बदल करण्याच्या सवयीला गृहित धरलं जातंय! त्यामुळे लग्नाच्या दशकपूर्तीनंतर मात्र बदल किती स्वीकारायचे आणि किती नाकारायचे याबाबत काही गोष्टी मी स्वत:शी ठरवून घेतल्या. खरंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण खूप गरजेचं आहे!

गायत्री कुलकर्णी



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form