आई, आजी आणि जेवण बनवायला आवडणारी मोठी बहीण माहेरी असल्यामुळे माझा जेवण बनवण्याशी फारसा कधी संबंध आला नाही. मासे साफ करून देणं, शिंपल्या विळीवर चिरून देणं, फणसाची भाजी करायची असेल तर तो चिरून देणं, ताडगोळे पाणी बाहेर न येता सोलणं, फळे चिरणं - ही थोडीशी अवघड आणि कौशल्याची कामं करायला मी नेहमी तयार असायचे; पण गॅसजवळ उभं राहून रोजचं जेवण किंवा साग्रसंगीत स्वयंपाक यात कधी रस नव्हता. आई पण नोकरी करणारी असल्याने, लहानपणापासून पोळ्या करायला बाई होती. सकाळी सगळ्यांच्या डब्यासाठी पोळी आणि सुकी भाजी असायची. रविवारी मासे. पप्पा मासे खात नसल्याने त्याच्यासाठी वेगळं व्हेज जेवण बनायचं. माझी आई सारस्वत, वडील कऱ्हाडे, वडिलांची आई - पंढरपूरला राहणारी कोकणस्थ ब्राह्मण, तर आजोबा कोकणांत वाढलेले - हे यासाठी सांगतेय की जेवणाचे अनेक वेगवेगळया पद्धतीचे पदार्थ मला लहानपणापासून पहायला चाखायला मिळाले. घरात ह्याच प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे कुठलीच भानगड नव्हती. दिवाळीचा फराळही आम्ही बाहेरून आणायचो, फक्त चिवडा किंवा शन्करपाळे घरी करायचो. देवाचं वगैरे पाळणं असलं काहीच नसल्याने - चतुर्थीला मोदक किंवा नैवेद्य वगैरे सगळ्यावर काट होती. घरी कधी हळदीकुंकू, सत्यनारायण, गणपती, नवरात्र असले काहीच नसल्याने - भरपूर लोकांसाठी स्वयंपाक करणं वगैरेही नव्हतं.
ह्या सगळ्या अनुभवातून, मी लग्न झाल्यानंतर जेवण बनवायला लागले तेव्हा मी माझ्यापुरत्या काही गोष्टी पक्क्या केल्या होत्या. किचन ही फक्त माझी जबाबदारी नसेल हे मी आधीच माझ्या जोडीदाराशी बोलले होते. आजही जेव्हा त्याची सुट्टी असते तेव्हा जेवण तो बनवतो. पोळ्या करायला मला खूप कंटाळा येतो . त्यामुळे पोळ्या करायला आमच्याकडे बाई येतात. त्यांची सुट्टी असेल तर मी थालीपीठ, आंबोळ्या, खिचडी काहीही करते पण पोळ्या लाटत बसत नाही. मला स्वयंपाकाची विशेष आवड नसल्याने ( फक्त माश्याचे जेवण हा अपवाद ) मी झटपट होणाऱ्या भाज्याच करते . भांडी लावायला मला कंटाळा येतो, जेवण झाल्यावर ओटा पुसणे, शेगडी पुसणे, पोतेरं फिरवणे ही माझी दोडकी कामं आहेत. ती शक्यतो नवरा करतो. आता माझा ६ वर्षांचा मुलगा पण - ताटं घेणे, पोतेरं फिरवणे - वगैरे कामे करतो. काहीवेळा जेवण बनवता बनवता मल्टी टास्किंग करतेय असं स्वतःला सांगून मी भांडी लावून टाकते. लग्नाला ७ वर्ष होऊन गेलीत तरी मी अजून घरी पुरणपोळी, गुळपोळी, मोदक, बिर्याणी, श्रीखंड, फराळ असले वेळखाऊ आयटम बनवलेले नाहीत. बाहेर घरगुती पद्धतीने बनवलेले हे पदार्थ आणून आपला किचनमधला वेळ वाचवावा आणि एखाद्या बाईला पण त्यातून रोजगार मिळावा हे मला आवडतं. हे ही लग्नाआधीच स्पष्टपणे बोलले होते. सासूची जेवण बनवण्याची पद्धत व माझी यात खूप फरक आहे. त्या किंवा मी एकमेकींकडे जातो तेव्हा - मी बनवेन तेव्हा माझी पद्धत आणि त्या बनवतील तेव्हा त्यांची ! इतका साधासोपा मार्ग काही न बोलताच ठरून गेलाय. उलट एकमेकींना वेगळ्या काही रेसिपी विचारून कधीतरी केल्याही जातात.