माझ्या स्वयंपाकाची टिमकी

मला किचनमध्ये काम करताना पाहून आई खूप चिडायची. मुलांनी इकडे लुडबूड करण्याची गरज काय? असा तिचा प्रश्न असायचा. कॉलेजमध्ये असताना पुढे चहा, मॅगी करण्याची मुभा मिळाली. नंतर कधीतरी एखादी नवीन रेसिपी करून बघुयात, म्हणून किचनमध्ये गेलो कि तिचं नेहमीच पालुपद चालू व्हायचं - हा भांडी खूप काढणार, किचनमध्ये सगळा पसारा होणार, पाणी खूप उपसणार, तेल सांडवून ठेवणार वगैरे वगैरे. एकदा घरी मित्र-मॆत्रिणी आले होते, त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचा प्लॅन होता, ते सगळे हॉलमध्ये बसून आहेत आणि मी किचनमध्ये घुसून बसलोय म्हणून तिला राग आला, "घरातल्या बायका बसून आहेत आणि तू बाईसारखा जेवण बनवतोय" ती माझ्यावर ओरडली. मला तेव्हा झालेल्या अपमानाचा खूप राग आला आणि लाजिरवाणं पण वाटलं. मग दुसऱ्या शहरात रहायला गेल्यावर एकटा राहून आपला मुलगा बिचारा जेवण (म्हणजे दररोज खिचडी) करून खातो, हे ऐकून तिला उमाळे यायचे.


पण मी काही जेवण बनवणं थांबवलं नाही. एक म्हणजे रोज बाहेर खाण्यासाठी पैसे नव्हते आणि दुसरं कारण म्हणजे खानावळीतला डब्बा खूपच कंटाळवाणा झाला होता. त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण म्हणजे मला माझ्या हातांनी जेवण बनवायला आवडायला लागलं होतं. मग हळू-हळू आमच्यात जेवण हा एक फोनवर बोलण्याचा मुद्दा झाला. ‘कसा आहेस’ आणि ‘जेवलास का?’ या फोनवरच्या दररोजच्या अपडेट्समध्ये 'मग आज काय खाल्लं?' याची भर पडली. मी तिला कधी-कधी फोन करून तिच्या रेसिपीज विचारू लागलो, रात्रीच्या उरलेल्या चपात्यांचा चिवडा तर बेस्टच असतो तिचा, मी व्हिडिओ कॉलवर तो एकदा शिकून घेतला. ती मसाले कशी बनवते? घरात अख्खे धने नसतील तर त्याच्या जागी काय घालायचं पासून ते फ्रिजमध्ये भाज्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून ती काय युक्त्या वापरते; असं थोडं-थोडं ती शिकवत राहिली.

 हे देखील वाचा - "मेल्या पीठ नीट मळ घसरा देऊन"    

आपला मुलगा घरापासून लांब राहतोय पण तरीही माझ्या हातच्या जेवणाची त्याला आठवण येत राहते आणि त्याला आपण आपल्या खास रेसिपीज शिकवतोय याचा तिला आनंद व्हायचा खरा. पण हे सगळं त्याला ऑफिसचं काम सांभाळून, किचन लावून-आवरून करावं लागतंय याची खंत वाटायची. तिचं हळहळणं आजही सुरुच असतं. पण आमच्या इतर नातेवाईकांना ती अभिमानाने मी कसा व्यवस्थित स्वतःचं स्वतः करू शकतो, तो कुठं ही गेला तरी त्याचं जेवणाचं अडत नाही असं सांगत राहते. आणि खरंच माझं अडत नाही, मी फिरायला बाहेर गेलो किंवा दुसऱ्या देशात-शहरात असलो तरी आनंदाने पोटापुरतं बनवून खातो आणि सोबत असणाऱ्या लोकांना खाऊ घालतो. माझ्या आफ्रिकेतल्या मित्रांना मी वांग्याची मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलेली भाजी खायला घातली. मी शिकवलेली मसूरची डाळ, चिकनकरी अजूनही तिथली आफ्रिकन मैत्रीण कधीतरी बनवते, मला तिच्या जेवणाचे फ़ोटो पाठवते. आम्ही मस्त गप्पा मारतो. तिला आणि तिच्या पार्टनरला आता इंडियन रोटी शिकायची आहे. (आणि मग ती शिळी करून त्यांना चपातीचा चिवडा कसा करायचा हे पण मी शिकवेन, कदाचित ते आपली हि एकदम exotic dish म्हणून खातील!).
मला जेवण बनवायला, खायला, खायला घालायला आवडतं. जेवण बनवणं, किचन आवरणं, ते नीट लावणं, भांडी घासणं, वाणसामान आणणं मला आवडतं. त्याचं ओझं न वाटता रिलॅक्स होण्याची एक ऍक्टिव्हिटी म्हणून मी एन्जॉय करतो. बनवलेल्या पदार्थांचे फोटो-व्हिडीयो काढून त्यामार्फत कौतुक मिळवतो. पण हे करण्यात मला सहज लाभलेले पुरुष असण्याचे प्रिव्हिलेजेड किती आहेत याचा मी विचार करतोय !
 एक तर जेवण शिकलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे अशी माझ्यावर कोणी कधी सक्ती केली नाही. मी बनवून खाल्लं पाहिजे अशी अपेक्षाही नाही आणि तशी अपेक्षा नसताना सुद्धा मी जेवण बनवतोय याचं अप्रूप असल्यामुळे मी करपवून टाकलेल्या चपातीची पण वाहवा केली जाते. मी आता वर्क फ्रॉम होम, ऑफिस टेन्शन, कॉल्स सगळं सांभाळून रोज घरी संपूर्ण जेवण करून खातोय याचं तर किती कौतुक! बाजरात असताना, मला कोणाला काय आवडतं याचा विचार करून कधी खरेदी करावी लागत नाही. जे मला आवडतं ते मी मस्त विकत घेतो आणि ते घेताना काटकसर, महिन्याचं बजेट वगैरेचा असासुद्धा जास्त विचार नसतो. अशा आणि इतर खूप साऱ्या मोकळीकीमुळे कदाचित माझ्यासाठी जेवण बनवणं हि एक रिलॅक्स करणारी गोष्ट झालीये. मी मस्त गाणी लावून किंवा युट्युबवर काही-बाही बघत जेवण बनवून घेतो. वीकेण्डला फोनवर मित्रांशी गप्प्पा मारता-मारता जेवण कधी बनवून होतं ते कळत देखील नाही. पण माझी ही मोकळीक जर काढून घेतली आणि सक्तीने जेवण बनवणं हे माझ्या वाटणीचं काम झालं तर मला ते ओझं होणार नाही, याची खात्री नाही.

व्यंगचित्र -शुभा खांडेकर 
रोज लवकर उठून चहा-नाश्ता, डबे, दोन-वेळचं जेवण आणि ते सुद्धा इतरांच्या आवडी-निवडी, वेळा, पथ्य सांभाळून बनवणं किती टेन्शनचं आणि जबाबदारीचं काम आहे. माझी आई आणि ताई हे कित्येक वर्ष करत आल्यात, करताहेत. पण बहुतेक वेळा त्यांची कामं अदृश्य राहतात. मला आठवतंय लहानपणी एखाद दिवशी जेव्हा आम्हाला शाळेसाठी डब्बा मिळायचा नाही तेव्हा आम्ही भावंड किती रागाने फणफणत घरा बाहेर पडायचो आणि आईचा संपूर्ण दिवस अपराधी भावनेत जायचा. आपण चांगली आई नाही - हे तिने स्वतःला दिलेलं दूषण तिला त्रास देत राहायचं.
गेल्या वर्षीच्या लॉकडाउन मध्ये मी एकदा घराच्या साफ-सफाईचं काम काढलं, किचनच्या तेलकट, चिपचिपित भिंती आणि स्वीचबोर्डवरचा मळ जेव्हा रगडून स्वच्छ पुसून काढला, भिंती चकाचक झाल्या, बोर्ड पांढरा दिसू लागला, त्याच्या बटणांवर ऑन-ऑफ लिहिलेली अक्षरं वाचता येऊ लागली. मला खूप आनंद झाला. ते काम करायला सगळा पसारा खाली काढून वर चढून तासभर मेहनत करावी लागली होती. पण आई-ताई वर्षानुवर्षे त्या भिंती, शेगड्या, काचेच्या खिडक्या, तेलाच्या बरण्या, गॅस-सीलिंडरच्या तळाच्या गंज लागत राहणाऱ्या फरश्या, मांडणीतल्या तांब्या-पितळाची भांडी, असं स्वच्छ करतच राहिल्यात आणि हे अधिकचं काम आहे आणि याची नोंद केली पाहिजे असं सुद्धा वाटलं नाही. आमच्या तर कधी हे काम लक्षात सुद्धा आलं नाही. मला प्रश्न पडतो, असलं सहज रोजच्या जेवण बनवण्याचा भाग म्हणून मी ही बारीक-सारीक कामं करेन का? आणि केलीच तरी त्या कामाची नोंद सुद्धा घेतली गेली नाही याचा किती राग येईल.
खरं म्हणजे जेवण बनवणं, ताटात वाढलं जाणं, त्याचे इंस्टाग्रामवर फोटोज पाहणं ही जेवण प्रकियेची छानशी दिसणारी बाजू आहे. थोडीशी गुलाबजाम सिनेमातल्या हिरो सारखी ! तिथला हिरो परदेशातून भारतात स्वतःचं पॅशन शोधायला येतो, इथलं 'अस्सल' जेवण एका खाणावळ चालवणाऱ्या बाईकडून शिकतो, त्याला सुंदर स्वरूप देतो आणि मग त्याचं स्वतःचं रेस्तराँ अमेरिकेत सुरु करतो. जेवण बनवणं किती प्रणयरम्य आहे वगैरे दाखवलं जातं. पण जेवण-प्रकियेची दुसरी बाजू आहे जी आपल्याला दिसत नाही. ‘आपल्याला’ म्हणजे बहुतेक पुरुषांना दिसत नाही, ती बाजू असते ताटातल्या त्या सुंदर जेवणामागच्या पसाऱ्याची! 
जेवण झाल्यानंतर किचनसिंकमध्ये जमा झालेल्या उष्ट्या भांड्यांची, भाज्यांच्या साली, दांड्या, टरफलं यांनी भरून गेलेल्या कचऱ्याच्या डब्याची, दुधाच्या पिशव्या, दळणं, मसाले यांच्या आठवणींची, किराण्याच्या सामानाच्या याद्या, त्यांची बिलं नीट एकत्र करून फ्रिजवरच्या सुंदर विणलेल्या रुमालाखाली जपून ठेवलेल्या घड्यांची. ही दुसरी बाजू अदृश्य असते, आकर्षकतेच्या भासाच्या खाली ती दडपवून टाकलेली असते. ही बाजू घामाने भिजलेली, कोंदट आणि दमलेली असते. नीरज घायवान याने दिग्दर्शित केलेल्या 'ज्यूस' लघु-चित्रपटात ही बाजू उत्तमपणे मांडलेली आहे. किचनमध्ये घामाघूम झालेली, वैतागलेली नायिका हॉलमध्ये येऊन कुलरची थंडगार हवेचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेली आहे. तर या वर्षीच्या गाजलेल्या मल्याळम 'द ग्रेट इंडियन किचन' चित्रपटातली नायिका किचन बेसिनच्या खराब नळाने त्रस्त झालीय. तिथून सारखं सांडपाणी बाहेर येत राहतं, तो तुंबत जाणारा सिंक आणि त्याचा येणारा घाणेरडा वास सगळं तिच्या सहनशक्ती पलीकडे जातंय . हे दोन्ही सिनेमे पाहताना, पुरुष असल्यामुळे मला मिळालेले ट्रम्पकार्ड किती पॉवरफुल आहे हेच अधोरेखित होत गेले. या प्रिव्हीलेजसना वेगळं करून मला माझा किचन मधला वावर सहज करता येईल का? जेवण, किचन आणि घर सांभाळणे हे एक अनेक जीवन जगण्याचे कौशल्यांपैकी एक म्हणून शिकता-शिकवता येईल? इतरही ते तसेच जेंडर-विरहित पाहू शकतील? असे प्रश्न या निमित्ताने पुढे आले. मला वाटतं, स्त्री-पुरुषांच्या कप्प्यांमध्ये विभागलेल्या कामांना बदललं गेलं पाहिजेच पण त्यासोबतच या लिंगभेदाच्या मुळाशी असलेल्या पितृसत्तेला उपटून टाकता आले पाहिजे. या सत्तेने स्त्रियांना जशी ही कामं आपलीच आहेत म्हणून त्यांना निभावत राहायला भाग पाडलंय तसंच पुरुषांना किचन पासून लांब ठेवलं. हे तेव्हाच बदलेल जेव्हा माझ्या घरातली नवीन पिढीतली मुलं-मुली सगळीच काम लिंगभावाचा कुठलाही चष्मा न घालता सहजपणे करू शकतील. आणि हे होऊ शकतं याचा मला विश्वास आहे.
ता.क. - पॉवरची पण किती गंमत असते! मी प्रिव्हीलेज्ड भूमिकेतून जेव्हा हे सगळं लिहितोय, माझ्या पॉवरची कबुली देतोय तेव्हा त्याचंपण कौतुक केलं जाणार हे माहित असल्यामुळे असं लिहिणं, व्यक्त होणं सोप्पं तर आहेच पण त्याहीपेक्षा नवीन कौतुक मिळवण्यासाठी उपयुक्तपण आहे.

सुनील गंगावणे 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form