मदत नव्हे भागीदारी

फोटो - श्रीनिवास पतके 
 एक पक्षी त्याच्या उडायला शिकलेल्या पिल्लाला चोचीने भरवत होता. लेक म्हणाली, “बघ. पक्षी सुद्धा मोठ्या झालेल्या पिलाना भरवतात. तुला कधीतरी सांगितलं तरी भरवत नाहीस.” तिला म्हटलं, ‘पक्षी करतीलही पिलांना भरवण्याचे लाड. त्यांना काय शिजवायचं, भाजायचं, तळायचं नि लाटायचं; थोडक्यात स्वयंपाकाचं काम थोडंच असतं?’ स्वयंपाक म्हणजे साहित्याची जमवाजमव, नसेल त्याचा पर्याय शोधणे, पदार्थ बिघडू लागला तर त्याला रेसिपीत नसलेल्या कृतींचा टेकू देणे आणि नंतरची आवराआवरसुद्धा.

पोहे व बटाट्याची भाजी एवढीच स्वयंपाककलेची शिदोरी घेऊन मी सासरी आले. माहेरी काही भाज्यांमध्ये चवीपुरता गूळ आणि पक्वाने बेताची गोड, सासरी भाजीत गूळ नाही मात्र पक्वान्ने प्रचंड गोड. आजी पुरणपोळीत जाणवण्याइतपत सुंठ घालायची. आजीच्या कोकणी स्वयंपाकातला हिंग सासरी परभणीकरांनी “कसा वास येतोय? यॅक” म्हणून नाकारला. माहेरी भात मुख्य आणि वेगवेगळ्या आमट्या असायच्या. कांदा खोबऱ्याच्या वाटपाच्या कडधान्यांच्या आमट्या; हिरवी आमटी म्हणजे मिरची, लिंबूपाणी, शेवग्याच्या शेंगा, करकरीत भेंडी अश्या कश्यालाही हिंग मोहरीची फोडणी देऊन ओल्या नारळाचं वाटप व चिंच गूळ घालत. पण सासरी डाळ एके डाळ आणि भाकरी चुरून खाण्यासाठी पातळ भाजी. लहानपणापासून बघितलेले फुलके लगेच जमले. पण सासरी घडीच्या ‘त्रिकोणी’ पोळ्या. अगदी छान, चारही पदर सुटलेले त्रिकोण. नवऱ्याने उलगडून सांगितलेलं, “आई माहेरी गेली की नाना स्वयंपाक करायचे. चपात्या त्रिकोणी करायचे. मग तश्याच कर म्हणून आम्ही आईच्या मागे लागायचो. हळूहळू त्रिकोणी चपात्या हा आमच्या घरचा ट्रेडमार्क झाला.” माहेरी मटणासोबत आंबोळी हा खास पाहुण्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या कोकणी मेन्यूपैकी एक. सासरी मटणाला भाकरीचीच जोड लागते. भाकरी ऐनवेळी करावी लागते, बिघडूही शकते त्यापेक्षा आंबोळी सेफ वाटते. पण एरवी आंबोळी प्रचंड आवडणाऱ्या नवरोजींना मी पाहुण्यांसाठी मटण-आंबोळी करते म्हटलं की पाहुण्यांच्या अपमानाचाच घाट घातलाय असं वाटतं.

स्वयंपाक हा आता माझ्या नैमित्तिक कामापैकी एक झालाय. माझं सर्वात उशीरा जेवून होतं. त्याचा फायदा घेत उरलेलं काढून ठेवणं, भांडी मोरीत टाकून भिजवून ठेवणं ही कामं मी घरातल्या मेंबरांकडून करून घेते. जेवल्यानंतरचा थोडा वेळ टिव्ही, फोनाफोनी, गप्पा यांना दिला की आवराआवरी करते. त्यामुळे आपण एकटेच काम करतोय आणि बाकीचे जेवून गप्पा हाणतायत याने होणारी चिडचिड होत नाही. बरेचदा गप्पांच्या नादात नवरा, मुलगी मदतीलाही येतात. पदार्थ करणं, खाऊ घालणं यात मी अप्रूप वाटून घेते मात्र वेळखाऊ प्रकार मला आवडत नाहीत.
बाई लेकरू जन्माला घालते, स्तन्य देते. ही जैविक जबाबदारी विस्तारत पोटाला करून घालण्याचं काम जीवनभर तिच्या मागे लागतं. आपलं नाव लावणाऱ्या लेकराच्या पोटाला करून घालायची अर्धी जबाबदारी पुरुषांनी स्वतंत्रपणे का पेलू नये? खरं तर स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी महिन्यातले पंधरा दिवस वा वर्षाआड पुरुषांची, असा नियम असायला काय हरकत आहे? कोणाच्या हाताशी हवं ते साहित्य, तर कोणी पाण्याला फोडणी देतं पण प्रत्येक स्वयंपाकघर रोज उत्पत्ती स्थिती लय चक्रावर स्वार होत असतं. स्वयंपाकात किती काम अंतर्भूत असतात याला साक्षी असतं. स्वयंपाकघरातील अशी बहुपेडी जबाबदारी निभवायला लागल्यास पुरुषांच्या नसत्या अपेक्षांवर आपोआप बंधने येतील. जबाबदारीचे केवळ वाटप नव्हे तर ती पूर्ण पेलण्यातील भागीदारी नवरा बायकोतील सख्य वाढवेल. स्वयंपाक हे काम मनाला सतत कार्यरत ठेवतं. त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागल्याने मनाला रिकामे रहाण्याची सक्ती नसण्याचा अनुभव मिळेल. इगो, स्वप्नरंजन यांचे पुरुषी मेंदूंवरील शेवाळ दूर होईल, भावनांचा निचरा होईल, व्यक्तित्व विकासाला दिशा मिळतील. प्रत्येक संसारातील जेवणाची जबाबदारी पेलण्यातील भागीदारी निभावण्याचा नियम मानवजातीच्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाल्यास जगातील गुन्हे किमान निम्म्याने कमी होतील हे नक्की!

अंतरा आनंद

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form