गावाकडच्या झोपड्यातलं किचन

‘पुन्हास्त्रीउवाच’ची किचन संदर्भातील पोस्ट वाचली. त्यामध्ये फोटोत एका फ्लॅटमधील किचन जे अतिशय मोहक सुबक पद्धतीने सजवलेलं दिसलं. फक्त जेवलेले खरकटे भांडे एवढंच विस्कळीत दिसलं. पण आमचं जे किचन होतं ते असं नव्हतं! आम्ही जिथं खाल्लंपिल्लं ती जागा एवढी सुबक,स्वच्छ, जिथल्यातिथं ठिवलेल्या वस्तु - असं काही कधी नव्हतंच. जिथं चूल असायची त्या झोपड्याचा कूड वारं आल्यास चुल ईझु नये म्हणून मातीच्या चिखलानं लिपल्याला असायचा. मी एकदा कुडाला टेकन देऊन झोपले रातरचं, अन माय पाटल्यावर वाटण वाटायला गेल्याली; तवर मह्या केसाच्या झुंग्यात नाग येटाळा घालून बसला होता अन आम्ही पाळल्याला बोका त्याला पंजे मारीत होता. मायनं आयड्यानं त्यो नाग काढला होता.
आमचं घर अन किचनचं जर वर्णन आणि आम्ही सैपाक करताना आम्हांला आलेले अनुभव ईथं सांगायचं म्हणलं, तर आमची खोली मातीच्या भितीची असायची. त्याच घराच्या पुढं एक झोपडं कधी एक पाख्ख्याचं तर कधी दोन पाख्याचं - त्या झोपड्यातच पांढऱ्या मातीची चूल असायची. तुर्हाट्या पळ्हाट्यानं शेकारल्यालं जे झोपडं असायचं ना त्या झोपड्यातुन चुलीचं धुपन निघुन जायचं. चुली भवतालचं अंगण शेणानं सारविल्यालं असायचं. आमची चूल घरात नसायची कारण पत्रे काळे व्हायचे. घरातले कपडे, दोनचार डब्बे काळे व्हायचे अन एकच दरूजा असल्याने घरात सारं धुपन कोंडुन रहायचं. पण पावसाळ्यात झोपडं गळायला लागलं की मंगच चूल घरात असायची. तच्यामुळं डोळ्यात लय पाणी यायचं, डोळे दुखायचे.
माईला मटनाचा खेमा आवडायचा. मंग तच्यात मेथीची भाजी टाकून माय लय नादर बनवायची. तिला तव्यात केल्याली मेथीची भाजी हमखास आवडायची. आमच्या घरात तवा साधं कुकर पण नसायचं. तच्यामुळं मटण म्हणलं की यरवाळीच चुलीवर शिजु लावावं लागायचं. तच्यासाठी भगुण्याला माती लाऊन ते चुलीवर ठिऊन चुलीला ढणढण जाळ पेटु लावला की मंग दोनचार घंटे शिजायला लागायचं. ह्या यरवाळी मटण शिजविण्याच्या नादात मह्या एकुनत्या एक भावाचा चुलीतल्या जळत्या लांबलचक काडीवर पाय पडुन ती पेटती काडी तच्या नड्डयाला चिटकुन भाऊ लय जळाला होता. 
मटण शिंदण्याला जास्त येळ लागत नसं. वजडी शिंदायला लय येळ लागायचा. म्हजी सारविलेल्या अंगणात घागरभर पाणी दोन भगुने घेऊन ती वजडी निटनाटकी कराव लागयची. त्याचे इळकीला चिकटलेली चाटीबोटी मांजरीला खाऊ घालायचे. मटण शिंदीतानी चाटीबोटी काढताना इळकी लागायची अन बोटं कापायचे. मग कवा तच्यात हळद तर कवा माय हटकुन पाटल्यावर वाटायला लावायची. का? तर त्यानंच जखम रहायची, असं ती म्हणायची. मटणाच्या कोड्डयाश्यात भाकर चुरून काला करून खाल्लं की, कापल्याल्या बोटात तिखट रसा जाऊ नये म्हणून ते बोट वर करून खायचोत.
आमच्याकडं फ्रीज, मिक्सर, ग्रायंडर असं नव्हतं; सरळसरळ पाटल्यावरचं वाटण वाटुनघोटून कोड्डयाश केलं जायचं. फ्रीज नसल्यानं रातरचं उरल्यालं शिळं कोड्ड्याश इटु नये, म्हणुन माय टोपल्यात पाणी टाकुन त्यात ते भगुनं ठिवायची. कवाकवा फेस आल्याल्या कोड्डयाश्याचा वास घरात सुटायचा अन मंग ते उकाड्यांवर फेकून द्यायचो.
आमच्या सैपाक घरात कुडाच्या शेजारी एक माचुळी तच्यावर सरपण त्याच कुडाला एक लाठणं, पिठलं हालवायची तुर्हाटीची तिन फनगड्याची काडी खोसल्याली असायची. बाजुलाच एक मातर्याच्या जवारीच्या कनिगं एक पिठाचा डब्बा, लाल मिरच्याची पिशवी, मीठमिरच्याचे सामान. घरात चारदोन लोटके, उतरंडीला मीठ मसाल्याचे गाडगे अन त्या खड्याच्या मीठात चार दोन रूपये लपून ठिवलेले. 
पण मायीच्या पेटीत दोन पितळाचे ताटं,दोन लोट्या एक मोठं भगुनं एक पळी असायची. पाण्याची एक गंगाजमुना घागर असायची. माय ह्या वस्तु घरात कमी पण गहान ठुयला जास्त वापरायची. एक घागर,एक मोठं भगुनं असच गावातल्या सावकाराकडं डुललं होतं म्हणं. 
तर आमच्या घरात सैपाकासाठी जे भांडे असायचे ते लयमटे नसल्याने तेचतेच धुऊन घासून वापरायचोत. जे खरकटे भांडे घासायला पडायचे, खासकरून मटणाने आळलेले - ते घासायचा लय कटाळा यायचा. मी घाशीन का बहिण घाशीन, यावरून लय भांडणं व्हायचे अन ह्या नादात तेच भांडे कुतरे चाटुन जायचे. कारण चुलीवरचे काळेझर झालेले भगुने घासुच वाटत नसत कारण हातं काळे होयचे. उजव्या हाताचे नखं तुटुतुटु अर्धैच रहायचे. आजही गावाकडच्या बायांचे नखं बघीतल्यावर हे दिसतं. अन हे खरकटे भांडेबासणं घासण्यासाठी आजच्या सारखे विम बार, एक्सपर्ट, पिंताबरी न् निरनिराळ्या घासण्या असलं कुठं काय होत आमच्या घरात? नारळाच्या शेंडींची चोळणी चुलीतली राख,बारीक कुटलेल्या कोळशाचा भुगा,जून्या चौकटी इटकरीचा भुगा त्यात जरासा सोडालिंबु टाकुन भांडे घासायचोत.आज बी कोळश्यानं जर्मलचे भगूने, इटकरीनं पितळाचे, राखानं इस्टीलचे भांडे घासले की चमाचमा चमकतेत.
आज थोडासा बदल घरात झालाया म्हणा! गावाकडच्या बाया चुलीवर भगूने काळे होऊ नयेत म्हणुन चूलीवर घडगी ठेवत्यात त्यानं भुगुण्याचं फक्त बुडच काळे होते. आजपण बाया पाटल्यावर वाटत्यात, पण मिरच्याऐवजी भुरकी असते मसाल्यासोबत वाटायला. आज मी जास्त भांडे घासत नाही. मी मटनही शिंदीत नाही. माझा नवरा मला ह्यात मदत करतो. आमचं किचन शहरातल्या, श्रीमंत बायांच्या किचनसारखं सुखसुविधानं भरलेलं नसायचं. जसं होतं तश्यातच दिवस काढुन मोठे होऊन जगत आलोत. आज दोघं नवरा बायको दोघं ही ज्याला जे जमतंय ते सैपाक घरातलं काम करतोत.

सत्यभामा सौंदरमल

सचिव,
निर्धार सामाजिक संस्था
बीड

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form