भेंडीची भाजी... ते... 'मॉडर्न लव'

फोटो - श्री पतके 
मी अकरावी बारावीत असताना आमच्याकडे मेस होती. इंजिनिअरिंग कॉलेजची बॅचलर मुलं आमच्याकडे जेवायला यायची. मुंबईतलं आमचं ते चाळीतलं छोटंसंच घर असलं तरी बहुतेक मुलं घरी येऊन जेवायची, डबे क्वचित काही जणांना जायचे. रोज घरातल्या सगळ्यांचा आणि मेसचा असा मिळून पंचवीस, तीस लोकांचा स्वयंपाक असायचा. आम्ही पाच बहिणी आणि आई अशा सहाजणी असल्याने कामं वाटून घेतली जात. पण माझी ‘पाकप्रतिभा’ बघता मला लसूण सोलणे, भाज्या निवडून देणे, भांडी घासणे, पीठ मळून देणे अशी लिंबूटिंबू कामं दिली जात. पण एकदा काही तरी कारणाने भाजी करायची वेळ माझ्यावर आली. समोर होती भेंडी! भरलेली भेंडी करणे मला शक्य नसल्याने मी चिरुन भाजी करायचं ठरवलं. भेंडी धुवून पुसून घेतली, नीट कोरडी झाल्यावर चिरली. त्याला खमंग फोडणी दिली, त्यात भेंडी नीट परतून घेतली. अंदाजे मीठ, हळद वगेरेही घातलं होतं. आता भाजी शिजायला पाणी तर घालावंच लागेल ना...असं म्हणत मी त्यात तांब्याभर पाणी ओतलं आणि झाकण ठेवलं. तोवर माझ्या बहिणीची कोशिंबिर करून झाली आणि पाचेक मिनिटांनी तिने कढईवरचं झाकण काढून पाहिलं तर त्यात तो शेंबडासारखा चिकट द्रव! मला ज्या काही शिव्या बसल्या की काही विचारू नका. प्रसंगावधान राखत माझ्या बहिणीने पटकन सुकं पिठलं केलं ... पण सगळी भावंडं मला इतकी चिडवू लागली की बास्स! नेमकं तेवढ्यात माझा क्रश असलेला मुलगा जेवायला आला. घरातल्या सगळ्यांनीच त्याला माझा प्रताप सांगून ती कढईच दाखवली. तो पण इतका हसत  सुटला... जेवताना त्याला दोन तीनदा तरी ठसका लागला असेल. माझ्या बहिणीनी त्याच्यासमोर माझा पचका केल्याने माझा अस्सा पापड मोडला होता की दोनचार दिवस मी त्याच्यासकट कुणाशीच बोलले नाही.
नंतर तो माझ्यासाठी मेतकूट घेऊन आला आणि माझा राग शांत झाला. आमच्या घरचाच एक सदस्य झालेला हा मित्र बऱ्याचदा रात्री आमच्या घरी गप्पा मारत थांबायचा. मग गप्पा मारता मारता लसूण सोलून द्यायचा, भाजी निवडायला मदत करायचा. त्याची अशी स्वयंपाकातली लुडबूड मलाही आवडायची, तो कधी कधी त्यांच्याकडच्या खानदेशी रेसिपीही सांगायचा. आमचं 'काही तरी खास सुरू आहे' असा अंदाज मेसवर येणाऱ्या आमच्या काही कॉमन मित्रांना आला होता, तर ते त्याला डबेवाली म्हणून अधून मधून चिडवत असत, तेही मला फार गोड वाटायचं. खरंतर खूप गप्पांव्यतिरिक्त आमचं खास काही सुरू नव्हतं, कदाचित झालं असतं पण तोवर त्याचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष संपलं आणि पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तो पुण्याला गेला आणि आमच्या किचनमधल्या खास मैत्री कम पोन्टेशियल लव्हस्टोरीचा तिथेच अगदी फिल्मी दि एन्ड झाला!

पुढे मग लहान बहिणीने, आईने शाळा घेतल्यावर काही भाज्या वाफेवरच शिजतात, त्यासाठी पाणी घालण्याची गरज नसते, याचा साक्षात्कार झाला. पण तरीही पुढे मला कोणतीच भाजी बनवण्याची जबाबदारी कोणी दिली नाही. असंही मला स्वयंपाकाची खास आवड नाहीच. पण वेगवेगळ्या पदार्थांबद्दल माहिती, पाककृती, खाद्यसंसंस्कृती बद्दल वाचायला मात्र मला आवडतं. स्वयंपाकाबद्दल वाचणं माझ्यासाठी स्ट्रेसबर्स्टर आहे. आता मला वरण, काही आमट्या, भात, भाज्या, खाण्या लायक चपात्या, छोट्या भाकरी बनवता येतात. रोज करत नसले तरी जेव्हा कधी स्वयंपाक बनवण्याची वेळ माझ्यावर येते, तेव्हा मी तो विनातक्रार आणि बरा करते. तीनचार वर्षे पुण्यात एकट्याने राहताना बऱ्याचदा स्वतः स्वयंपाक करण्याला काही पर्यायही नव्हता. 
मग मी काही युक्त्या शोधून काढल्या. पौष्टिक आणि कमी वेळात, कमी घटकांत बनणारे वन डिश मिल्स बनवू लागले. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक मी वेळ पडेल तेव्हा करतेही, पण त्यात वेळ खूप जातो. एक तर स्वयंपाकाच्या बाबतीत माझ्या हाताला उरक नाही, त्यामुळे अशी वेळ येते तेव्हा मी सरळ कुकरमध्ये डाळ, तांदूळ, बटाटे शिजायला घालते. एकाचवेळी हे तिन्ही शिजलं की फक्त वरणाला फोडणी घालणं आणि उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी. मग चपात्या बाहेरून मागवणं शक्य असेल तर मागवायच्या नाही तर स्वतः करायच्या. वरण भात, भाजी, चपाती सगळं तुलनेने पटकन तयार होतं. एखादवेळी कोणी पाहुणे येणार असले आणि पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली की तेव्हाही मीच हाच मेनू करते फक्त बाहेरून मागवलेलं श्रीखंडाची त्यात भर पडते. अगदीच खासे पाहुणे असतील तर चपातीऐवजी पुरी करणं..आणि तेही शक्य नसेल तर हुशारीने बुंदी रायता, पापड भाजणं असे सोपे पदार्थ काम करतात. खूप न करताही आपण काही तरी स्पेशल केलंय, असा आभास तयार होतो. आता अर्थात मी आणखी काही भाज्या, काही रेसिपी शिकले आहे, पण त्या तब्येतीने कराव्यात, एवढा वेळ माझ्यापाशी कधीच नसतो. खाणं ही प्रत्येकाची मूलभूत गरज असल्याने त्यात लिंगनिरपेक्षता असावी आणि प्रत्येकाने किमान पोट भरता येईल इतकं आत्मनिर्भर असावं असं मला वाटतं.
स्वयंपाकाशी निगडित मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे बाजारातून भाज्या खरेदी करून आणणं आणि निवडणं. खासकरून पालेभाज्या निवडायला मला खूप आवडतं. ही माझ्यासाठी एक थेरपीच आहे जणू. आमच्याकडे भाज्या निवडायचं काम मी नियमितपणे करते. याव्यतिरिक्त किचनमधली बाकी कामं मला फारशी आवडत नाहीत. वाटण करणं, शेंगदाणे भाजून कूट करून ठेवणं, दळण करणं, वाणसामान सगळ्या बरण्यात भरून ठेवणं, किचनची साफसफाई हे फारच कंटाळवाणं वाटतं. मला किचन स्वच्छच लागतं पण उगीचच रैक पुसत बसणे, सतत काही तरी भराभर करणे, सतत ठेवणीतली भांडी घासायला काढणे हे प्रकार डोक्यात जातात. असं करणाऱ्या सगळ्या बायकांना थोडासा रिकामा वेळ मिळाला तर हे सगळं करण्यापेक्षा एखादं छान पुस्तक वाचत लोळत पडता येत नाही का? असा प्रश्न नेहमी पडतो.

आता मी शोधलेल्या काही युक्त्या

मी दोन दिवसांच्या काकडी, गाजर, बिटाच्या स्लाईस करून वेगवेगळ्या एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे दुपार संध्याकाळ दोन्ही वेळा चिराचीर करण्याचा वेळ वाचतो. पूर्वी मला कामं करताना वेळ वाया जातोय, असं वाटायचं. इतक्या वेळात मी किती लिहिलंवाचलं असतं, असं सारखं वाटायचं. मग मी पॉडकास्ट किंवा स्टोरीटेलवरच्या स्टोरीज किंवा नॉन फिक्शन ऑडियो बुक ऐकण्याचा मार्ग शोधून काढला. कालच मी पीठ मळताना न्यूयॉर्क टाईम्सचं 'मॉडर्न लव' हे कोरोनाकाळातल्या प्रेमावरचं पॉडकास्ट ऐकलं. किचनमध्ये काम करताना एप्रन वापरते. एप्रनच्या खिशात मोबाईल ठेवता येतो आणि इयरफोन्स कानात घालून चांगली पॉडकास्ट ऐकता ऐकता काम करता येतं. त्यामुळे किचनमधलं कामही होतं आणि त्यात एकदोन तास वाया गेल्याची भावनाही येत नाही.

प्रियांका तुपे 
पत्रकार 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form