स्वयंपाकघराशी रोमान्स...

लहानपणापासून मला घरकामाची अजिबात आवड नव्हती. घरांत आई व बराच वेळ बाई असल्याने माझ्यावर वेळही आली नाही. कधीतरी बाई आजारी पडल्या किंवा पुण्याला सगळे जमलो असताना, कधी केर काढणे व स्वतःच्या पांघरुणाची घडी घालणे, ही कामे करायला लागायची. पण स्वैपाक? कधीतरी दुपारच्या खाण्याची तयारी करून ठेवणे, दाणे भाजणे व खोबरे खवणे, ही कामे स्वतःहून घेतलेली होती. कारण दाणे हवे तसे खमंग भाजून हक्काने थोडेसे तोंडात टाकता यायचे. पुण्यात काय किंवा आमच्या घरी बडोद्याला, सर्वांनाच नवनवीन पदार्थ व चांगलेचुंगले खाण्याचा शौक होता व आहे. घर स्वच्छ व नीटनेटके असण्याची सवय होती, पण त्यासाठी कष्ट करायला लागतात हे लक्षात आलेले नव्हते. सर्व लक्ष अभ्यास, वाचन व नाचणे-गाणे यातच असायचे. वयाच्या १९व्या वर्षा पर्यंत मी अनुमानधपक्याने चहा-कॉफी करायची. सगळ्या नातेवाईकांना, विशेषत: बाहेरून लग्न करून आलेल्या स्त्री नातेवाईकांना आम्हा “मुलींचे” फारच लाड होतात असे वाटायचे. त्यामुळे कधीतरी आईलाही वाटायचे! त्यावरून एक दिवस आईबरोबर वाद घालताना, मी तिला स्पष्ट सांगितले की मला हे काहीही करायला आवडत नाही; मोठी झाल्यावर त्यासाठी मी नोकर ठेवेन.
त्यावर आई म्हणाली, “ठीक आहे! तुझी सांपत्तिक स्थिती तेवढी चांगली असो; असा मी आशीर्वाद देते. पण एवढे लक्षात ठेव की तुला काही येत नाही - हे लक्षात आल्यावर तुझ्या आवडीचे नाही, तर नोकरांच्या आवडीचे तुला खायला लागेल.”
काही दिवसांनी आई गावाला गेल्यावर त्याची प्रचीती आलीच ! ताबडतोब मी सूत्र हातात घेतली व धाकट्या बहिणींना सांगितले की मी बनवेन तसे खायचे. बाबांचा प्रश्न नव्हता कारण मुलींनी बनवलेले कसेही असो, ते वाखाणूनच खायचे. नेहमी सारख्या चवींच्या भाज्या रोज बनवणे, म्हणजे काळा मसाला, मिठगुळ घालून बनवणे फार बोर व्हायचे, म्हणून माझे चवीतले प्रयोग सुरु झाले. काही फसलेले प्रयोग आठवतात, म्हणजे एकदा मी फ्लॉवरच्या भाजीत खूप धने-जीऱ्याची पूड घातली. मलाच ती भाजी जाईना; पण बाबांनी वाखाणून खाल्ली. तसेच एकदा मी वाचून किंवा ऐकून, चनाजोरगरम घरी बनवायला गेले. ते इतके तेलकट झाले की पुढे कित्येक वर्षे मी चनाजोर खायचेच सोडले. एक यशस्वी प्रयोग म्हणजे मी बटाट्याची कढी करायची - ती बहिणींना खूप आवडायची. आई कुठे गेली की त्यांची फर्माईश असायची की ती कढी कर! आता मला त्याची कृती आठवतच नाही. आई व बाई असताना फारसे काही करायची वेळ यायची नाही. हे एम.ए. होई पर्यंत चालले व मग मी दिल्लीला होस्टेलवर आले. मुळात आवड नव्हती व आता गरज नव्हती, त्यामुळे स्वैपाक मी ठार विसरले. तरीही एकदोन कंत्राटदारांना हाकल्यावर आमच्या होस्टेलमध्ये पूर्णवेळ स्वैपाकी व त्यांचे मदतनीस नेमले गेल्यावर, आम्हा विद्यार्थ्यांवर मेनू ठरवण्याची व ते करून घेण्याची जबाबदारी पडली. आमच्या होस्टेलमध्ये संपूर्ण भारतातील जवळजवळ सर्व प्रांतातील विद्यार्थी होते. मला वेगवेगळ्या खाण्याची आवड असल्याने व सर्व काही खाऊन बघण्याची साहसी वृत्ती असल्याने, मी त्यांना आपापल्या प्रांतातील पदार्थ करून घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे तेंव्हापासूनच राईच्या तेलातील पदार्थ, खोबरेल तेलातील पदार्थ खायची सवय झाली. विविध प्रांतातील पदार्थही चाखले. कधीतरी आमचे पुरुष मित्र कुरकुर करायचे पण आम्ही आमचे उद्योग थांबवले नाही. असेच एकदा मला युएस एम्बसीकडून कॉकटेल पार्टीचे आमंत्रण आले. तिथे कसे कपडे करायचे, कसे वागायचे वगैरे आमच्या सिनियर्सनी सांगून आम्हाला तयार केले. मग माझा सिनियर मित्र पुष्पेश पंत याने व मी, तिथे बनवलेले कॉकटेल स्नॅक्स बनवण्याचा उद्योग करून पाहिला. तो पुढे फूड स्पेशालीस्ट झाला. पण त्याच्या बरोबर सुरवातीच्या काळात मी अनेक पदार्थ बनवून पाहिले.
पुढे मी सोविएत युनिअन मधील युक्रेनची राजधानी कीव ला, पुढील शिक्षणासाठी गेले. तिथे आणिकच वेगळी तऱ्हा, आपल्याकडील काहीच मिळायचे नाही. मी गेले सप्टेंबर मध्ये, त्यामुळे सर्व ताज्या भाज्या संपल्या होत्या. पुढील काही महिने बटाटे, कांदे, टोमाटो, कोबी व गाजर याच पाच भाज्या मिळणार होत्या. कधीकधी ग्रीनहाऊस मध्ये पिकवलेला पातीचा कांदा. नॉनवेज मध्ये फक्त बीफ, कधीतरी कोंबडी, कधीतरी गोड्या पाण्यातील मासे मिळत. सुरवातीला अंड्यांचे पण दुर्भिक्ष होते. पण ब्रेड, लोणी, चीज, दूध मुबलक व स्वस्त होते. तिथे जेवणाची सगळी पद्धतच बदलली. मैत्रिणींचे पाहून बोर्श, गुल्याश, रशियन सलाड, खारवलेल्या बाटलीबंद काकडी-टोमाटो यावर जगायला शिकले. उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भाज्या मिळायच्या. तुलनेने आपल्याकडे बारा महिने भाज्यांची रेलचेल असते. तिथे डाळ हा प्रकार नाहीच, म्हणजे प्रोटीन साठी नॉनवेजच. तिकडे जाण्यापूर्वी मी कच्चे नॉनवेज बघितलेही नव्हते. मटन-चिकन खाणे वडिलांनी बाहेर नेऊन शिकवले होते, पण बनवायला तिकडेच शिकले. तिथे पूर्ण कोंबडी विकत घ्यायला लागते. तिकडून परत आल्यावर मला सराईतपणे कोंबडी कापून साफ करताना, मासे साफ करताना पाहिल्यावर, आईच्या अंगावर काटा आला. तिथल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना भारतीय पदार्थ खायला घालायला म्हणून, गाजर हलवा, शिरा, सावर क्रीम वापरून फ्रुट सलाड, अक्रोडाचे कूट घालून गाजराची कोशिंबीर, असेही प्रयोग केले.
अजूनही नेटवर बघून स्वैपाकात विविध प्रयोग चालू आहेत, पण आईची आठवण करत! मला पोळ्या करायला अजिबात आवडत नाही, पण खायला पोळ्या आणि भाकरीच लागते. त्यामुळे या कामाला मी आधी बाई ठेवली. भाज्यांमध्ये पालेभाज्या जास्त आवडतात. निवडत बसायला वेळ नाही; मग ते बाईवर सोपवले. आजची मी जरी रोजचा स्वैपाक करत नसले तरी, घरी स्वैपाकाला येणाऱ्या मुली मानतात की त्यांना स्वैपाकाचे विविध प्रकार मी शिकवले.  खाण्याची आवड असली की चांगले बनवले जातेच, असे मला वाटते.



वासंती दामले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form