धक्का - अंजली म्हसाणे




त्या घराबद्दल मला काही कळण्याचं कारण नव्हतं. पण त्या खूप पावसाच्या रात्री पप्पांचा ट्रक एका अवघड वळणावर घसरून उलटला. सगळंच उलटंपालटं झालं. मी ,मम्मी आणि माझे दोघे धाकटे बहीणभाऊ काहीतरी करून दिवस निभावत होतो. एकदम एक दिवस या ठिकाणी हाउसकीपिंगचा जाॅब आहे असं दीनाकाकाने सांगितलं. आणि या घरात मी येऊन पडले.

ही मालक मंडळी आपल्याशी काही बोलत नाहीत. सगळं राधाक्कांच्या तर्फे!

त्यांचा मुलगा सून नात इथेच मागच्या बाजूला रहायची आणि ड्रायव्हर अजित पण तिथेच रहायचा. माझ्या खोलीत राधाक्कांची नात नूपुर. हे सगळे तिथे काम करायचे

सरस्वतीदेवींचा मुक्काम सारखा स्टडीतच असायचा. त्या खोलीत छतापर्यंतच्या कपाटांमधे पुस्तकंच पुस्तकं होती. त्यातच त्या कायमच्या बसलेल्या असत. आणि आपण त्यांना काही नेऊन दिलं की काही न बोलता डोळेच हसायचे त्यांचे. राणासाहेब आणि सरस्वतीदेवी त्यांच्या बेडरूममधे असायचे तेव्हा तिथून भांडण केल्यासारखे खूप आवाज ऐकू यायचे. पण जेव्हा ते दोघे खोलीच्या बाहेर यायचे तेव्हा त्या भांडणाचा मागमूसही त्यांच्या चेहर्‍यावर दिसायचा नाही. मला विचित्रच वाटायचं सगळं...

राणासाहेब दिवसदिवस बाहेर असायचे आणि घरात हो नाही शिवाय फारसं काही बोलल्याचं ऐकू यायचं नाही. धाकटे राजासाब काहीतरी बरंच शिकून आले होते म्हणे. माँजी आणि राजासाब बर्‍याच वेळा हसर्‍या चेहर्‍याने एकमेकांशी गप्पा मारत बसलेले दिसायचे.अर्थात बहुतेक वेळ तेही बाहेरच असत आणि फोन कानाला असेच सतत.

माँजी टी.व्ही.वर काहीतरी लावून बसलेल्या असायच्या. नाहीतर सिनेमा बघत बसलेल्या असायच्या. ते सिनेमे पण विचित्रच. कधी त्यातली माणसं संपूर्ण सिनेमाभर टेबलाशी बसून बोलतच असायची. तर कधी युध्दं, लढाया, जखमी माणसं.. असली दृष्यं! कधी काहीतरी कुणीतरी स्टेजवर बसून सितार घेऊन आ ऊ करत गात असायचं. एकदा त्यांना विचारलं तेव्हा म्हणाल्या, "ती सितार नाही, तानपुरा आहे. "

इथे आल्यापासून कधी एकदाही नेहमीच्या सीरीयल नाही बघायला मिळाल्या.

दोन मुलं आहेत राणासाहेब आणि सरस्वतीदेवींना. पण त्यांना होस्टेलमधे ठेवलंय. घरात कामाला एवढी माणसं आहेत तरी मुलांना कशाला ठेवायचं आपल्यापासून दूर कोण जाणे! आता मात्र लाॅकडाउनमुळे घरीच असतात.

एक न एक विचित्र माणसांची फॅमिली आहे ही. अर्थात मला काय करायचंय त्याच्याशी? मला चांगले पैसे मिळतात मग बास झालं. काम पण मरणाचं असतंंच की! हाऊस कीपिंग म्हणे! यात सगळंच येतंय. सक्काळपासून रात्री झोपेपर्यंत एक मिनिट उसंत मिळत नाही. रविवारी मात्र सुट्टी असते. त्यादिवशी या विचित्र फॅमिलीतले लोक काहीतरी स्वतःच खुडबुड करतात स्वयंपाकघरात आणि आम्हा ५ जणांच्या स्टाफला खाऊ घालतात सकाळी. संध्याकाळी मात्र आम्ही आपापलं बघायचं.

पण बाकी त्रास नाही. आमची कामं आम्ही नीट केली की झालं. कधीतरी कुणाकडून तरी काहीतरी चुका होतातच. पण ही विचित्र फॅमिली ते काही डोक्यात घेत नाही. पण मी आले इथे. घरी आम्ही एका खोलीत चारजण रहातो. इथे नुपुर आणि मी दोघीच. शिवाय पाणी नळाला येतं. भरावं लागत नाही. काम फार असलं, तरी खायला पण भरपूर मिळतं. रविवारी सुट्टी मिळते. शिवाय घरी पैसे पाठवता येतात. घरचे लोक निदान नीट खाऊ शकतात. एक आहे की घरी जाता येत नाही. आता गेले सहा महिने मी अडकून पडलीये इथं लाॅकडाउनमुळे. पण आता काही करून तरी जायचच्चे मला घरी सगळ्यांना भेटायला. कंटाळा आलाय खूप. थकायला पण झालंय. काहीवेळा वाटतं की बास झाली ही नोकरी. अजून शिकावं म्हणजे जास्त पैसे पण मिळतील. पण काही काही जण म्हणतात की या लाॅकडाउनमुळे नोकर्‍या गेल्यात लोकांच्या. काय करावं गोंधळ होतोय डोक्यात.

एकदिवशी माँजींना म्हटलं,'माँजी, खूप आठवण येतेय घराची. जाऊ का थोडे दिवस?'

माँजीं माझ्याकडे थोडा वेळ बघतच राहिल्या. 'अं... सरस्वतीदेवींना विचार आणि बघ काय म्हणतायत त्या ते'.

सरस्वतीदेवी स्टडीत पुजलेल्या असतात. तिथेच सापडल्या. राणासाहेब पण तिथेच होते. आणि दोन्ही पोरं पण तिथेच. सगळेजण आपापल्या वह्यापुस्तकात डोकं घालून बसलेले होते. विचित्र फॅमिली!

मी विचारलं त्यांना "जाऊ का घरी" म्हणून.

हे ऐकल्यावर त्यांच्या भुवया उंच झाल्या आणि तिथेच थांबल्या. राणासाहेब आणि मुलं पण एकमेकांकडे पहायला लागली. सरस्वतीदेवींनी राणासाहेबांकडे पाहून भुवया खालीवर केल्या.

'लेट हर गो माय डिअर!' मला इंग्रजी समजतं हल्ली थोडं थोडं. आणि मला हसू फुटलं. मला हसताना पाहून ते सगळेचजण हसायला लागले. विचित्र आहेतच ते.

'पण कशी जाणार ग तू? बघूया ,काहीतरी करूया'.

माझं हसू मावळलं.

दोनतीन दिवसात राजासाबना एक महत्वाचं काम निघालं. त्यांच्याबरोबर मी जाईन असंही ठरलं. आनंदात होते मी. दुसर्‍या दिवशी निघायचं. रात्री सगळी कामं आटोपून दिवे बंद करून मागच्या दाराकडे जाणार्‍या बोळकंडीतून चालायला लागले. माझ्याच नादात. समोरून येणारे राजासाब मला दिसलेच नाहीत. अगदी समोरून धडकलेच त्यांच्यावर. अगदी काहीतरीच वाटलं. पण त्यांनी मला घट्ट पकडून मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि माझं तोंडही स्वतःच्या तोंडाजवळ आणण्याचा प्रयत्न केला. माझा थरकाप झाला होता.एक जोराचा हिसडा मारून त्यांना जोरात ढकलून मी मागच्या दारातून बाहेर पडले. माझा श्र्वासोच्छ्वास जोरात सुरु होता. भयंकर घाबरल्यामुळे एका दगडाला अडखळून तोल जाऊन मी धाडकन खाली पडले. त्या आवाजाने नुपुरचे आईबाबा जागे होऊन बाहेर आले. मला अगदी ओशाळवाणं झालं होतं. कसंबसं उठून खोलीकडे धाव घेतली.

उद्या मला घरी जायचंय आणि ते सुध्दा या राजासाबसोबत! या कल्पनेनेच मला घाम फुटला होता. काय करावं सुचत नव्हतं. एकाएकी एक निश्र्चय करून मी राधाक्कांच्या शोधात निघाले. किचनशेजारच्या खोलीत त्या झोपतात. बंगल्यातले बाकी दिवे पण आता बंदच होत होते. स्टडीतला दिवा मात्र अजून झगझगत होता. राधाक्कांच्या खोलीत डोकावून पाहिलं. पण त्या गायब.

देवा! काय करू आता? सरस्वतीदेवींना चहाकाॅफी द्यायला गेल्या असतील म्हणून स्टडीत डोकावले. दोघी तिथेच होत्या. गेले खरी त्यांच्या समोरपण काय बोलावं कळेना.

'काय झालं ग?' याचं उत्तर म्हणूनच की काय मला दरदरून घाम फुटला होता आणि शरीर थरकापत होतं. राधाक्कांनी मला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि पाण्याचा ग्लास समोर ठेवला.

'मला उद्या जायचंय आणि....' पुढे शब्द सरकेनात. त्या दोघींनी मला शांत होऊ दिलं आणि हळूहळू माझ्या तोंडून झाली गोष्ट बाहेर पडली. राधाक्का गप्प होत्या.

सरस्वतीदेवींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाल्या,'उद्या सुरक्षित जाशील तू. जा झोप आता. राधाक्का, तिला मागच्या दरवाज्याशी सोडून परत या. आणि दार लावून घ्या. नंदिनी, नूपुर आहे ना तुझ्या खोलीत?'

मी 'हो' म्हटलं. मी खोलीत परतले. पण मला उद्याची खात्री वाटेना. नूपुर गाढ झोपेत होती. मी अंथरुणावर पडून झोप लागण्याची वाट बघत राहिले. कधी झोप लागली मला समजलं नाही.

सकाळी मला नूपुर विचारत होती,'घरी जातेयस ना आज? कधी येशील परत?'

याचं उत्तर मला माहीत नव्हतं.'आधी मम्मी आणि बहीणभावाला भेटते तरी.' असं काहीतरी गोलमाल उत्तर देऊन मी आवराआवरीला लागले. तेवढ्यात राधाक्का आल्या, म्हणाल्या," सगळं आवर आणि सरस्वतीदेवींना जाऊन भेट'.

पुन्हा पोटात गोळा आला. काय होणार आता? माझी ही नोकरी काही रहाणार नाही आणि मी इथे पुन्हा काही परत येणार नाही. माझी खात्रीच झाली होती. नूपुरचा निरोप कसा घ्यावा हेही मला कळत नव्हतं. मी माझी बॅग उचलली आणि स्टडीकडे चालायला लागले.मी घरी तरी जाईन का? की वाटेतच काही होईल मला? जाण्यापूर्वी आईशी फोनवर बोलता येईल का मला? अनेक प्रश्र्न भिरभिरायला लागले.

स्टडीत पोचले तर असं वाटत होतं की सरस्वतीदेवी रात्रभर तिथेच बसून आहेत. मला आलेलं पाहून त्या उठल्या आणि मला चक्क जवळ घेतलं.'नंदिनी, घाबरू नको. खंबीर रहा. काही होत नाही. जगताना नाना प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. हा त्यातलाच एक समज!'

खरं तर मला हे ऐकून खूपच राग आला होता. म्हणे त्यातलाच एक प्रसंग. आता यांचं खरं रूप दिसतंय आपल्याला. टी.व्ही.वर काही खोटं दाखवत नाहीत. या लोकांना यातलं काहीच भोगायला लागत नाही.आणि दुसर्‍याला मात्र 'काही होत नाही,चल' म्हणतात! राधाक्कांनी मला चहा दिला. सकाळचा नाश्ता डब्यात भरुन दिला. बाहेरच्या हाॅलमधे आले. तिथे माँजी बसलेल्या होत्या आणि राजासाब उभे होते. सरस्वतीदेवी पण आल्याच पाठोपाठ. आता कसल्या स्फोटाला निमंत्रण मिळणारआहे याची कल्पना येईना.

तेवढ्यात राजासाबकडे हात करुन माँजी म्हणाल्या,' ऐक काय म्हणताहेत राजासाब.'

क्षणभर वर नजर करून मी राजासाबकडे पाहिलं. त्यांची नजर खाली होती. 'नंदिनी, आय अॅम व्हेरी साॅरी. काल चूक झाली माझ्या हातून. पुन्हा असं होणार नाही. खात्री देतो. तू तुला हवं तेव्हा इथे परत येऊ शकतेस.'

माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर माझा विश्र्वास बसेना. मला खूप हलकं वाटत होतं.खरंच इतकी चांगली असू शकतात माणसं?

इथल्या सगळ्याच बाया चांगल्या आहेत आणि पुरुष पण वाईट नाहीत. काहीतरी खूप चांगलं घडतंय आणि नक्की घडणारच आहे असा विश्र्वास मला वाटायला लागला होता . . .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form