एका बिंदूपासून सुरू होणारा कोणत्याही रेषेचा प्रवास हा त्या रेषेच्या मर्जीवर होत नसतो. पण माणूस म्हणून जन्माला आल्यावर पुढचा प्रवास मात्र प्रत्येक व्यक्तीच्याच हातात असतो. काही वेळा हे त्या व्यक्तीला स्वत:चं स्वत:ला उमगतं तर काही वेळा हे सांगणारं कोणीतरी आयुष्यात यावं लागतं. अन्य कोणी जाणीव करुन दिल्यामुळे असेल किंवा स्वत:चं स्वतः ला उलगडल्यामुळे असेल, पण ' स्व' चा शोध घेतला की होणारा बोध हाआयुष्याचं सार्थक करणारा असतो. हे सार्वकालिक सत्य रंजकपणे सांगणारी नाट्यकृती म्हणजे - ' जन्मवारी’.
लेखिका दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी दोन भिन्न काळातील व्यक्तीरेखा, घटना, प्रसंग यांची गुंफण करुन ' जन्मवारी ' हे नाटक मांडलं आहे. १५ व्या शतकातील कान्होपात्रा आणि २१ व्या शतकातील मंजिरी यांची गोष्ट जशी आणि जितकी एकसारखी आहे, तशी आणि तितकीच भिन्न आहे. शामा गणिकेच्या पोटी जन्माला आलेली कान्होपात्रा आणि आधुनिक काळात देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या पोटी जन्माला आलेली मंजिरी यांच्यात फरक हाच आहे की कान्होपात्राला ' कोऽहम्?' चं खरं उत्तर सापडलंय आणि मंजिरी मात्र जे उत्तर सोपं आहे त्यालाच कवटाळून बसली आहे. कान्होपात्राच्या ' स्व ' शोधात ' विठा ' ची भूमिका महत्वाची आहे. तर मंजिरीला ' स्व 'चा बोध करुन देण्याचं काम ' वृंदा ' बजावते. या वृंदाचीही एक कहाणी आहे.
नियतीने केलेल्या आघातांचे आणि सोसलेल्या दु:खाचे व्रण कुरवाळत न बसता, त्या व्रणांचेच मानचिन्ह करण्याची सकारात्मकता वृंदामध्ये आहे आणि तिच तीची ताकद आहे.वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या सामाजिक,सांस्कृतिक परिघातील कहाण्यांचा गोफ ' जन्मवारी ' उलगडते. नाटककार हर्षदा बोरकर यांनी जाणीवपूर्वक नाटकाची वीण भूतकाळ आणि वर्तमान काळाचे धागे एकात एक मिसळून केली आहे. त्यामुळेच कान्होपात्रा आणि मंजिरीच्या जन्मवारीतील साम्य जसे अधोरेखित होतं तसंच त्यातला फरकही उठून दिसतो. या दोन्ही कहाण्यांना जोडण्यासाठी वृंदाच्या कहाणीचा सांधा चपखलपणे वापरला आहे.' विठा ' या व्यक्तिरेखेच्या नावापासूनच या व्यक्तिरेखेचं प्रयोजन अधोरेखित होतं. विठामुळे कान्होपात्रा आणि वृंदामुळे मंजिरीची जन्मवारी कशी सुफल संपूर्ण होते हे प्रत्ययकारीपणे दाखवण्यात नाटककार हर्षदा बोरकर नक्कीच यशस्वी झाली आहे.
नाटककार आणि दिग्दर्शकाची मेहनत गुणी आणि समजदार कलाकारांमुळे कशी आणि किती उठावदार होते याचं दर्शन ' जन्मवारी ' नाटकात घडतं. आधुनिक काळात एका देहविक्रय करणाऱ्या बाईच्या पोटी जन्माला आल्यामुळे आपसूकच त्याच मार्गावर चालणारी बिनधास्त मंजिरी संपदा कुलकर्णी जोगळेकर हीने अतिशय प्रभावीपणे साकारली. पैशांसाठी शरीराचा सौदा करायची सवय झाल्याने मंजिरीच्यावागण्या,बोलण्यात आलेला हिशोबीपणा, सावधपणा आणि जगाला फाट्यावर मारायचा बिनधास्तपणा संपदाने तंतोतंत दाखवला आहे. बारीकसारीक लकबी,उठण्या- बसण्याची चालण्याची पध्दत यातून तिने एक व्हायब्रंट व्यक्तिरेखाआवश्यक तितक्या (च) भडकपणे उभी केली आहे. स्वत:ची जीवनशैली सहजपणे ( खरंच?) स्विकारल्याचे मंजिरी दाखवत असली तरी ज्या शरीरावर ती पैसे कमावते, त्या शरीरातलं मन मात्र काही वेगळाच विचार करतंय आणि हा वेगळा विचार जो तिने स्वत:च्या वागण्याखाली दडपला आहे, तोच वृंदाची भेट झाल्यावर ,वृंदाची कथा ऐकल्यावर कसा उफाळून येतो हा प्रवास संपदाने यथार्थ दाखवला आहे. संपदाची मंजिरी ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर उभी राहाते याचं श्रेय जसं संपदाच्या कुशल अभिनयाला जातं तितकंच ते वृंदा साकारणाऱ्या कविता जोशी यांच्या सौम्य सादरीकरणाला जातं. वृंदाची कहाणी, त्यातली अनपेक्षित वळणे आणि त्यामुळे घडलेलं वृंदाचं व्यक्तिमत्त्व हे सगळं कविता जोशी यांनी अतिशय संयत, मवाळ, समंजस पध्दतीने सादर केलं. त्यांच्या या सौम्य अदाकारीमुळे वृंदाचं व्यक्तिमत्त्व जसं अचूकपणे उभं राहातं तसंच संपदाच्या मंजिरीला उठाव देतं. एखाद्या वाद्यमेळामध्ये आघाती वाद्यांची परिणामकारकता तंतुवाद्याच्या मंद सुरांनी अधिकच परिणामकारक ठरावीतसा अनुभव ' जन्म वारी ' नाटकात संपदा आणि कविता देतात. आजच्या काळातल्या मंजिरीची जन्म वारी उलगडण्यासाठी १५ व्या शतकातील कान्होपात्राच्या कथेतील तीन महत्वाच्या व्यक्तिरेखा शामा,कान्होपात्रा आणि विठा नाटककार हर्षदाने वापरल्या आहेत. अमृता मोडक यांनी मुरलेली, चतुर गणिका शामा आवश्यक त्या
झोकात सादर केली. धनवंत सरदारांची मर्जीराखून संपत्ती मिळवण्यासाठी पोटच्या पोरीला आपल्याच ( वाम) मार्गावर नेण्याइतकी ती व्यवहारी आणि क्रूर ही आहे. अमृता मोडक यांनी मोजक्या प्रसंगात शामाच्या या स्वभावछटा नीटपणे दाखवल्या. गणिकेच्या घरात जन्माला येऊनही ऐहिक सुखांमध्ये न अडकता परमेश्वराच्या कृपेचा ध्यास घेतलेली कान्होपात्रा शर्वरी कुलकर्णीने समरसून उभी केली. तिचा निरागसपणा , तिच्यातील भक्तीभाव, तिचा निश्चयीपणा शर्वरीने अगदी सुयोग्यपणे दाखवला. कान्होपात्राच्या जन्म वारीला दिशा दाखवण्याचं काम करते ती विठा. शामा गणिकेच्या घरातली कुणबीण विठा ही निव्वळ दासी वा सेविका नाही, ती कान्होपात्राच्या मनातल्या भक्तीच्या उमाळ्याचा स्रोत आहे. संपूर्ण नाटकात सर्वात कमी संवाद असलेली ही व्यक्तिरेखा शुभांगी भुजबळ यांनी समजून साकारली.विठाचा एकूण वावर, कान्होपात्राबरोबरचं तिचं नातं आणि कान्होपात्राच्या प्रवासातलं तिचं स्थान शुभांगीने आपल्या वावरण्यातून, हालचालींमधून अबोलपणे पण तरीही ठाशिवपणे साकारलं. शेवटच्या प्रसंगात दिग्दर्शिकेनं विठा आणि कान्होपात्राच्या रचनेतून दिग्दर्शिकेनं साधलेला परिणाम केवळ अप्रतिम.
जन्म वारीच्या प्रयोगाची परिणामकारकता तांत्रिक अंगांच्या सक्षमतेमुळे दुणावली आहे. मंदार देशपांडे यांचे संगीत संत रचनांना आणि हर्षदाच्या रचनांनाही साजेसे . अमोघ फडके यांची प्रकाशयोजना जशी स्थल काल जिवंत करणारी तशीच रसपरिपोषक होती. सचिन गावकर यांच्या सूचक पण बोलक्या नेपथ्यामुळे वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी स्थळे झटकन साकारत होती. नेहा जगताप यांची रंगभूषा, केशभूषा व्यक्तिरेखांना न्याय देणारी. वेशभूषा विशेषतः मंजिरी आणि वृंदाची, व्यक्तिरेखांना उठाव आणणारी.शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांनी' स्वेवन ' स्टुडिओज तर्फे ' जन्म वारी ' च्या निर्मितीचं धाडस केलं आहे. धाडस अशासाठी की प्रेक्षकानुनय करत, लोकांना जे हवंहवंस वाटेलतेच देण्यापेक्षा लोकांनी जे पाहायलाच हवं असं जरा वेगळ्या आशयाचं आणि आगळ्या बाजात सादर होणारं नाटक रंगभूमीवर आणण्याचं महत्वाचं काम या निर्माता द्वयीनं केलं आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. कुठे जन्म घ्यावा, मिळावा हे आपल्या हातात नसले तरी मिळालेल्या जन्माचे सार्थक नेमकं कशात आहे हे ओळखण्याची जबाबदारी मात्र आपलीच असते.' तरिच जन्मा यावे दास विठोबांचे व्हावे ' ही तुकाराम महाराजांची शिकवण असो किंवा समर्थ रामदास म्हणतात तसे ' जन्मा आलियाचे फळ | काही करावे सफळ ||' हेच सांगणारं नाटक म्हणजे' जन्म वारी '.
रंगमंचाच्या चौकटीत रंगणारं हे नाटक स्थलकालाच्या भिंती भेदून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतं कारण ' जन्म वारी ' कोणालाच चुकलेली नाही पण ती कृतार्थ करण्याची संधी मात्र अनेकांना गवसतच नाही. अशी संधी कशी मिळवावी हेच तर हे नाटक सांगतं.