मागच्याच आठवड्यात मुंबईच्या लोकलट्रेनमध्ये एका विद्यार्थिनीशी “लगट” करण्याचे प्रकरण गाजत होते. अजूनही अशा प्रकारच्या त्रासाला ‘लैंगिक हल्ला’ म्हणायची हिम्मत आपल्यामध्ये आलेली नाहीये. त्यामुळे घडल्या प्रकाराला ‘बलात्कार’ म्हणावं, ‘छेडछाड’ म्हणावं की आणखी काही म्हणावं या संभ्रमात ती बातमी अडकून पडली. त्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा राहिला बाजूला आणि पक्षीय राजकारणालाच उधाण आलं. ह्या प्रकरणातल्या आरोपीला अटक झाली आणि प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला. त्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या लैंगिक हिंसेच्या अशा इतरही काही घटना घडल्या आणि पुढेही घडत राहतील. खरंतर सार्वजनिक ठिकाणी महिलांशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या घटना आपल्या अंगवळणीच पडल्या आहेत – त्यामुळे बहुतेक लोक अशा बातम्या नेहमीप्रमाणे एखाददोन दिवसांनी विसरूनही जातील. पण कदाचित त्यातल्या आरोपीचा जर पुरुषांच्या हक्कांविषयी जागरूक असलेल्या एखाद्या संघटनेने त्याचा सत्कार केला तर त्याला भरपूर प्रसिद्धी मिळेल आणि फिर्यादी मुलीवरच भलभलते आरोप होऊन तिला जगणं मुश्किल होऊन जाईल! हा माझा ‘फेमीनाझी डिस्टोपिया’ आहे – असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही. अगदी अशीच घटना केरळमध्ये प्रत्यक्षात घडते आहे!
मागच्या महिन्यात केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (KSRTC) थ्रिसूर ते कोची या मार्गावरच्या बसमध्ये एक पुरुष दोन महिलांच्या मधल्या सीटवर बसून प्रवास करत होता. त्यापैकी एका महिला फोनवर बोलत असताना अचानक तिला जाणवले की तो तिला जाणीवपूर्वक स्पर्श करत आहे. त्याला विरोध करताना तिने त्याच्याकडे बघितल्यावर तिच्या लक्षात आले की तो पॅन्टमधून लिंग बाहेर काढून हस्तमैथुन करत होता. तिने ताबडतोब त्याचे हे चाळे रेकॉर्ड फोनवर केले आणि कंडक्टरला सांगितले. त्या पुरुषाच्या हे लक्षात येताच तो बसमधून उतरून पळून जायचा प्रयत्न करू लागला. परंतु, कंडक्टर आणि ड्रायवर या दोघांनी एका प्रवाशाच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला. ही घटना त्या मुलीने जेव्हा सोशल मिडियावर जाहीर केली, तेव्हा तिच्या प्रसंगावधानाबद्दल आणि धैर्याबद्दल तिचे कौतुक होऊ लागले. इतरही काही महिलांनी देखील त्यांना असा अनुभव आल्याचे तिला सांगितले.
घराबाहेर जणूकाही रावण आहे आणि म्हणून स्त्रिया घराच्या चार भिंतीआडच्या लक्ष्मण रेषेच्या आत “सुरक्षित” असतात हे आपलं आवडतं मिथक आहे. त्यामुळे घराबाहेर होणाऱ्या हिंसेबद्दल खूप गाजावाजा केला जातो, हिंसा करणाऱ्याला फाशी देण्याच्या मागण्या केल्या जातात पण त्याचवेळी घरात होणाऱ्या हिंसेला मात्र शक्य तितकं लपवून ठेवायचा आपण प्रयत्न करतो. विवाहांतर्गत बलात्काराला कायद्याच्या कक्षेत आणलं तर कुटुंबसंस्थेला धक्का पोहोचेल – असं म्हटलं जातं. कुटुंबसंस्थेत स्त्रियांवर अन्याय होतात, हे जर आपल्याला मान्य असेल – तर ती तशीच टिकवून ठेवायचा अट्टहास करायचा की त्यात बदल करायला अनुकूल वातावरण निर्माण करायचं? पण स्त्रियांवर अन्याय करणारी समाजरचना तशीच ठेवून आपल्याला वरवर उपाययोजना केल्याचा नुसता भास निर्माण करायचा असतो. याचं अगदी ताजं उदाहरण आपल्या महिला आणि बालविकास मंत्री महाशयांनी केलेल्या घोषणेत दिसतंय. स्त्रियांवरच्या वाढत्या हिंसाचारावरचा उपाय म्हणून मंगलप्रभात लोढा यांनी लाखो शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. महिलांकडे स्वसंरक्षणाचं कौशल्य नसल्यामुळे त्यांच्यावर हिंसा घडते – असं आपण किती काळ समजत रहाणार आहोत? लैंगिक हिंसेमागे असलेल्या सामाजिक सत्तेकडे डोळेझाक करायची मानसिकता कधी बदलणार? ऑलिंपिक मेडल जिंकण्याची ताकद असलेल्या कुस्तीगीर महिलांना देखील लैंगिक हिंसेला सामोरं जावं लागतं आणि त्यांनी जंतरमंतर सारख्या सार्वजनिक ठिकाणी येऊन देशासमोर केलेल्या तक्रारी देखील डावलल्या जातात – हे वास्तव आपण अनुभवतोच आहोत. लैंगिक शोषणाच्या मागची पितृसत्ताक मानसिकता कधी लक्षात घ्यायची ? बाईच्या मर्जीशिवाय तिच्याकडून लैंगिक सुख ओरबाडून घेणे हा आपला हक्क आहे असे अनेक पुरुषांना वाटते. जी बाई पुरुषाला नकार देते तिला मारून टाकणं किंवा बदनाम करणं हा त्याच मानसिकतेचा परिणाम आहे. ही पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी पुरुषांनाच कष्ट घ्यावे लागतील - त्यापेक्षा दुर्घटनांची जबाबदारी महिलांवर टाकणं खूप सोपं आहे!

परंतु, पुरुषांच्या हक्कांविषयी काम करणाऱ्या ‘ऑल केरला मेन्स असोसिएशन’ (AKMA) या संस्थेने मात्र अगदीच वेगळी भूमिका घेतली. AKMA चे अध्यक्ष व्ही. अजित कुमार यांच्या मते ह्या महिलेने जाणीवपूर्वक सापळा रचून एका निर्दोष पुरुषाला अडकवले आहे. तिची तक्रारच खोटी असल्याचा दावा त्यांनी केलाय. एवढंच नाही तर तो पुरुष आता आत्महत्या करायच्या मनस्थितीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ह्या आरोपीची जामिनावर सुटका होण्याच्या वेळी AKMA चे काही सदस्य ह्या ‘बिचाऱ्या’ पुरुषाला पाठिंबा देण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर हजर राहिले. आरोपी तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला आणि त्याला हार घालून त्याचे स्वागत केले. अर्थातच ह्या अभूतपूर्व प्रसंगाच्या चित्रीकरणा साठी त्यांनी प्रसारमाध्यमांनाही आमंत्रित केले होते. या आरोपीचा बचाव करण्यासाठी AKMA च्या वतीने एका हाय-प्रोफाइल वकिलाची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही सत्कार प्रसंगी जाहीर करण्यात आलेले आहे. ज्या महिलेने आरोपीला पकडून दिले आणि फिर्याद दाखल केली, तिच्या विरोधात आता एक संघटित सोशल मीडिया मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचे म्हटले जाते आहे. तक्रारदार महिलेला हे ट्रोलिंग नकोसे वाटल्याने तिने आपला सोशल मिडियावरचा वावर कमी केला असावा. पण AKMA चे सदस्यांच्या म्हणण्यानुसार, ‘तिचे आरोप खोटे असल्याचे उघड झाल्यामुळे ती गायब झाली आहे’. ज्या महिलेने ह्या किळसवाण्या प्रसंगातल्या आरोपीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि त्याला त्या तक्रारीवर आधारित अटक देखील झाली आहे – तिची तक्रारच खोटी आहे – असं म्हणणं खूपच धाडसाचं आहे. अर्थात, ज्यांना पुरुषहक्कवादी संघटनांची विचारसरणी माहीत असेल, त्यांना यात आश्चर्य वाटणार नाही. अजून त्या पुरुषाचा गुन्हा सिद्ध झालेला नसल्यामुळे, त्याचा ‘गुन्हेगार’ म्हणून उल्लेख करू नये – असं पुरुषांच्या हक्कांसाठी लढू पहाणारी AKMA आग्रहाने सांगत आहे. पण तोच आरोपी अजून निर्दोष असल्याचेही सिद्ध झालेले नाही, हे मात्र त्याचं समर्थन करणारी ही पुरुषहक्कवादी मंडळी विसरलेली दिसतात!
सगळे भारतीय कायदे महिलांना नको इतकं झुकतं माप देतात आणि म्हणून पुरुषांच्या मानवी हक्कांवर गदा येते – असे पुरुषांच्या हक्कांचे संरक्षण करू पाहणाऱ्या संस्थांचे मत असतं. अशा संस्थासंघटनांच्या वेबसाइटवरती महिलांना संरक्षण देणाऱ्या अनेक कायद्यांवर आक्षेप घेतलेले दिसून येतात. या संस्थांचा स्त्रीवादी विचारसरणीवर बराच राग असतो असंही दिसतं. भारतीय समाज पुरुषप्रधान आहे आणि पुरुषांच्या हातात मोठी सामाजिक सत्ता असते – हे या विचारसरणीच्या संस्थांना अजिबात मान्य नसतं. स्त्रीवादी लोकांनी पुरुषांना समाजासमोर खलनायक म्हणून उभं केलं आहे, पण खरं म्हणजे पुरुषच स्त्रियांच्या दुष्टपणाचे बळी आहेत - अशी मतं ह्या पुरुषहक्कवादी संस्थांच्या वेबसाइटवर मांडलेली दिसतात.

बहुतांश वेळा महिला कायद्यांचा गैरवापर करतात – अशी ह्या संस्थांची मांडणी असते. राष्ट्रीय महिला आयोगा प्रमाणे पुरुषांवरच्या अन्यायाची दखल घेणारा एक राष्ट्रीय पुरुष आयोग असावा - अशी या संस्थांची मागणी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवसा प्रमाणे आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा ह्या संघटना पर्यटन करतात. ह्या दिवसांच्या निमिताने पुरुषांना त्रास देणाऱ्या महिलांच्या फोटो आणि पुतळ्यांना चपलांनी बडवणे, तसंच वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळाला उलट्या प्रदक्षिणा घालणे असे लक्षवेधक उपक्रम अशा संस्था गेल्या काही वर्षांपासून करतात. अशाच एका संस्थेचे जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले होते, “तोकडे कपडे घालून पुरुष घायाळ होईल असे वर्तन महिला करतात – हा पुरुषाचा विनयभंग असतो”- थोडक्यात गुन्हेगार कोण, पीडित कोण आणि मुळात गुन्हा कशाला म्हणायचं – या सगळ्या संकल्पना फक्त पुरुषांचे विशेषाधिकार आणि वर्चस्व कायम राखण्यासाठी उलट्यापालट्या करायची त्यांची इच्छा दिसते आहे. अशी विचारसरणी वापरायची तर - बसमध्ये हस्तमैथुन करणाऱ्या पुरुषाचा गुन्हा सिद्ध झाल्यावर देखील कदाचित ही मंडळी म्हणतील की मुळात सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करण्यात काही आक्षेपार्ह मानलेच जाऊ नये! उलट पुरुषांच्या लैंगिकतेची अभिव्यक्ती म्हणून अशा वागण्याचं समर्थन देखील केलं जाईल आणि स्वानंदात मग्न असलेल्या पुरुषाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याच्या खासगीपणात अडथळा आणणाऱ्या महिलेलाच शिक्षा करण्याची देखील मागणी केली जाऊ शकते!
केरळमध्ये घडलेली घटना ही काही अपवादात्मक नाहीये, अशा प्रकारच्या घटना दिल्ली, बंगलोर, मुंबई, पुणे अशा अनेक शहरात वारंवार घडत असतात. पण त्याबद्दल स्त्रिया फारशी वाच्यता करायचं टाळतात; कारण त्यामुळे आपल्याच घराबाहेर पडण्यावर बंधनं यायची मोठी शक्यता असते – हे त्यांना माहीत असतं. एकीकडे कर्नाटक, दिल्ली सारख्या राज्यांमध्ये महिलांना सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते आहे. त्या निमित्ताने स्त्रियांचा सार्वजनिक अवकाशातला वावर वाढायची शक्यता तयार होते आहे. पण अजूनही स्त्रियांना सार्वजनिक जागी मोकळेपणाने वावरता येत नाही. जेव्हा सार्वजनिक अवकाशात बाईवर हिंसा होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे बाईलाच त्यासाठी जबाबदार धरलं जातं. ती बाई ‘त्या’ वेळी , ‘त्या’ ठिकाणी कशासाठी गेली होती? तिचे कपडे कोणते होते? असे तिचीच उलटतपासणी करणारे प्रश्न विचारले जातात. कारण ‘चांगल्या’ बाईने शक्यतो घराच्या बाहेर थांबायचंच नसतं – अर्थात, जी बाई ‘अवेळी’ घराबाहेर असेल ती ‘चांगली’ नसते – म्हणजे तिच्यावर हिंसा होणं योग्यच आहे – अशी आपली पारंपरिक विचारसरणी आहे. अगदी दर्शना पवार च्या ताज्या उदाहरणात देखील तीच मानसिकता दिसते आहे. ज्या मुलीचा तिच्या मित्राने फिरायला गेल्यावर खून केला, ती मुलगीच चुकीचं वागली - असं अनेकांना वाटतं.
घराबाहेर जणूकाही रावण आहे आणि म्हणून स्त्रिया घराच्या चार भिंतीआडच्या लक्ष्मण रेषेच्या आत “सुरक्षित” असतात हे आपलं आवडतं मिथक आहे. त्यामुळे घराबाहेर होणाऱ्या हिंसेबद्दल खूप गाजावाजा केला जातो, हिंसा करणाऱ्याला फाशी देण्याच्या मागण्या केल्या जातात पण त्याचवेळी घरात होणाऱ्या हिंसेला मात्र शक्य तितकं लपवून ठेवायचा आपण प्रयत्न करतो. विवाहांतर्गत बलात्काराला कायद्याच्या कक्षेत आणलं तर कुटुंबसंस्थेला धक्का पोहोचेल – असं म्हटलं जातं. कुटुंबसंस्थेत स्त्रियांवर अन्याय होतात, हे जर आपल्याला मान्य असेल – तर ती तशीच टिकवून ठेवायचा अट्टहास करायचा की त्यात बदल करायला अनुकूल वातावरण निर्माण करायचं? पण स्त्रियांवर अन्याय करणारी समाजरचना तशीच ठेवून आपल्याला वरवर उपाययोजना केल्याचा नुसता भास निर्माण करायचा असतो. याचं अगदी ताजं उदाहरण आपल्या महिला आणि बालविकास मंत्री महाशयांनी केलेल्या घोषणेत दिसतंय. स्त्रियांवरच्या वाढत्या हिंसाचारावरचा उपाय म्हणून मंगलप्रभात लोढा यांनी लाखो शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. महिलांकडे स्वसंरक्षणाचं कौशल्य नसल्यामुळे त्यांच्यावर हिंसा घडते – असं आपण किती काळ समजत रहाणार आहोत? लैंगिक हिंसेमागे असलेल्या सामाजिक सत्तेकडे डोळेझाक करायची मानसिकता कधी बदलणार? ऑलिंपिक मेडल जिंकण्याची ताकद असलेल्या कुस्तीगीर महिलांना देखील लैंगिक हिंसेला सामोरं जावं लागतं आणि त्यांनी जंतरमंतर सारख्या सार्वजनिक ठिकाणी येऊन देशासमोर केलेल्या तक्रारी देखील डावलल्या जातात – हे वास्तव आपण अनुभवतोच आहोत. लैंगिक शोषणाच्या मागची पितृसत्ताक मानसिकता कधी लक्षात घ्यायची ? बाईच्या मर्जीशिवाय तिच्याकडून लैंगिक सुख ओरबाडून घेणे हा आपला हक्क आहे असे अनेक पुरुषांना वाटते. जी बाई पुरुषाला नकार देते तिला मारून टाकणं किंवा बदनाम करणं हा त्याच मानसिकतेचा परिणाम आहे. ही पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी पुरुषांनाच कष्ट घ्यावे लागतील - त्यापेक्षा दुर्घटनांची जबाबदारी महिलांवर टाकणं खूप सोपं आहे!
#sexualharassment #victimblaming #safepublicplaces
वंदना खरे संपादक-'पुन्हास्त्रीउवाच'
Tags
लैंगिकता