मासिक पाळीबाबतचा अनुभव लिहायचा, तर तो स्त्रीयांनीच लिहायला हवा - नाही का? स्त्री कोणत्या अनुभवातून जात असते, त्याची आम्ही पुरुष नुसती कल्पनाच करु शकतो! पण काही अनुभव असेही असतात की, त्यातून पुरुषही मासिक पाळीबद्दल अनुभवी बनून जातो. मलाही एकदा मासिकपाळीला सामोरं जायची पाळी आली होती. मी एकदा रात्रीच्या वेळी स्लीपर कोच बसने प्रवास करत होतो. बस चंद्रपूरहून साधारण तीस किलोमिटर पूढे आली असेल,माझ्या बाजूच्या डबल बेड्सवरुन महिलांचा काही आवाज आला.सुरुवातीला दुर्लक्ष केले. बाजूचा आवाज वाढला,थोडासा रडण्याचा आवाजही येवू लागला. मी पुन्हा अंदाज करु लागलो की, एकतर माय-लेकी बोलत असतील किंवा सासु-सूना भांडत असतील. तेवढ्यात त्यातील एक महिला उठून ड्रायव्हरकडे धावत असल्याचे माझ्या लक्षात आले. आता मात्र मी सावध झालो हे भांडण नाही काही तरी गडबड आहे. मी असा विचार करत होतो, तेवढ्यात बस थांबली आणि मी क्षणाचाही विलंब न करता पडदा बाजूला सारुन ज्या बेडवरुन आवाज येत होता , तेथे गेलो, अगदी प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखेच हे सर्व घडले. समोर एक तरुणी पोटावर हात ठेवून विव्हळत होती,भोवती महिला गोळा झाल्या होत्या,त्या तिच्या बांगड्या मनगटावरच दाबत होत्या,कदाचित त्रास कमी करण्याची ती त्यांची ज्ञात पद्धत असावी. पण मी तिची बेभान अवस्था पाहून पटकन विचारले की,’तुम्हाला पाळीचा त्रास होतोय का?’ त्या तरुणीनेही होकारार्थी मान हलविली,मी पटकन ड्रायव्हरकडे गेलो की रस्त्यावर गाडी न थांबवता समोर वस्ती असेल तेथे सुरक्षित ठिकाणी थांबवायला सांगितलं.
मी ड्रायव्हरला सांगून टाकले,’ मुलीला असह्य त्रास होतोय, तिला एकटं सोडून चालणार नाही. प्रवाशांना समजावायची जबाबदारी मी घेतो, पण तुम्ही थांबा.’
त्या कार्यकर्त्याने आपल्या घरातील स्त्रीयांना चहा,पाणी, पॅड्स घेवून पाठवलं. पॅडचा वापर करण्यासाठी जागा कुठे शोधायची हा प्रश्न पडला, पण शेजारीच असलेल्या पोलीस चौकीमुळे तो प्रश्न सुटला. तेथे शौचालय नसलं तरी ,आडोसा होता. त्या तरुणीला महिला कार्यकर्त्याच्या सहाय्याने तेथे नेले. तेवढ्यात डॉक्टर आले आणि त्यांनी उपचार दिले, त्रास थोडा कमी होवू लागला तशी तरुणी पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाली. पण मी तिला न येण्याची विनंती केली. ‘तुमचा भाऊ आणि आई येत आहे त्यांच्याबरोबर माघारी जा.’ असं सुचवलं. ‘तुमचं औरंगाबादमधलं काम मी करुन देतो, काही काळजी करु नका’ अशी खात्री दिली व आमच्या बसचा पुढचा प्रवास सुरु झाला .
पुढे एका थांब्यावर बसमधील महिला माझ्याभोवती गोळा झाल्या. मी डॉक्टर असल्याची त्यांची समजूत झाली होती, पण मी केवळ एक माणूस असल्याचं सांगितलं.
नंतर दोन दिवसांनी त्या तरुणीचा फोन आला. तेव्हा असं कळलं की ती मुलगी नर्सिंगच्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी चालली होती आणि अचानक तिला रक्तस्त्राव सुरू झाला. पण तिची काही सज्जता नव्हती.
या अनुभवावरुन मला एक जाणवलं की,पाळीचं एक चक्र ठरलेलं असलं तरी ते कधी मागे-पुढेही होऊ शकते,पण कोणत्याही क्षणी एक समाज घटक म्हणून आपण सज्ज असायला पाहिजे. पाळीच्या प्रसंगी प्रत्येकाने आपणास शक्य होईल ते सगळं सहकार्य करायला हवं आणि मुख्य म्हणजे मानसिक आधार द्यायला हवा.आपण स्त्री किंवा पुरुष नंतर आहोत, आधी माणूस आहोत हे लक्षात ठेवायला हवं!
#MHDay2023#WeAreCommitted
#EndPeriodStigma
#EndPeriodPoverty
#PeriodEducationForAll
#PeriodFriendlyToiletsForAll
मुक्त पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ता