मासिक पाळी व्यवस्थापन - धोरणात्मक विचार

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणतीही मुलगी वयात आली की तिची पाळी सुरू होणे ही अत्यंत सहज घडणारी गोष्ट ! पण जगभरात (भारतासहित अनेक देशात) मुली आणि महिलांना समाजापासून वेगळे करण्यासाठी, प्रसंगी पापी ठरवून दुय्यम वागणूक देण्यासाठी एक हत्यार  म्हणून ‘मासिक पाळी’ला वापरले गेले आहे . अजूनही काही ठिकाणी हेच चित्र आहे हे खेदाने नमूद करावे लागेल.
वस्तुतः मासिक पाळी योग्य वयात सुरू होणे, ती व्यवस्थित सुरू असणे, हे  मुलीचे/ स्त्रीचे आरोग्य उत्तम असल्याचे निदर्शक आहे. पण ‘पाळी आणि आरोग्याचा’ हा महत्वाचा संबंध अनेक दशकांपासून दुर्लक्षिला गेला आहे. त्याचे विदारक परिणाम आत्तापर्यंत अनेक पिढ्यांनी भोगले आणि थोड्याफार फरकाने अजूनही भोगत आहेत. 
मासिक पाळीचे नीट व्यवस्थापन करण्यासाठी अनुकूल वातावरण न मिळाल्यामुळे जगभरातील महिला आणि मुलीना 
  • शिक्षण सोडावे लागते, 
  • बालविवाहाला सामोरे जावे लागते. 
  • काहींना शैक्षणिक आणि कामाच्या संधी गमवाव्या लागतात. 
  • तसेच लाखो महिला आणि मुलींना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यापासून रोखले जाते. 
  • परिणामी, मुली आणि महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य आणि एकूणच सामाजिक स्थिती खराब होते.
हे थांबवण्यासाठी WASH United या संस्थेने २०१३ मध्ये पुढाकार घेतला. चांगल्या मासिक पाळी स्वच्छता सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी व सामाजिक संस्था, सरकारी संस्था, व्यक्ती, खाजगी क्षेत्र आणि मीडिया यांना एकत्र आणत Menstrual Hygiene Day (मासिक पाळी स्वच्छता दिवस) साजरा करण्याच्या निमित्ताने एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याच अनुषंगाने २०१४ पासून हा दिवस साजरा केला जातो. जेणे करून, वर्षभरात किमान एक दिवस समाजातील सगळे भागीदार/ घटक एकत्र येऊन मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलतील. ज्यामुळे ‘पाळीविषयीची लाज, संकोच कमी होऊन समाज वर्षभर याबाबत अनेक कार्यक्रम राबवेल’ हा त्यामागचा मुख्य उद्देश.
२०२३ च्या Menstrual Hygiene Day ची थीम ‘We are committed (आम्ही कटिबद्ध आहोत)’ ही आहे. या थीमच्या उद्देशाबाबत विचार केला तर असे लक्षात येते की पाळीबद्दल बोलले जात आहे पण सातत्याने नाही. ते सातत्य टिकवण्यासाठी कटिबद्धता अपेक्षित आहे जी इथे अधोरेखित करण्यात आली आहे. ही कटिबद्धता नसल्यास दूरगामी आणि हानिकारक परिणाम आपल्या मुली महिलांना येणार्‍या काळात भोगावे लागतील. हे थांबवण्यासाठी ही कटिबद्धता !!

भारत सध्या युवा देश म्हणून ओळखला जातो. 

भारताची लोकसंख्या १४२ कोटीपेक्षा जास्त आहे. 

यातही पाळी येणार्‍या वयोगटाचा (१२ वर्षे ते ४५ वर्षे) विचार केला तर ती लोकसंख्या आकडेवारी 40 कोटीपेक्षा जास्त आहे. 

म्हणजेच ही मुली, महिला आणि पारलिंगी व्यक्तींची संख्या 

एकूण लोकसंख्येच्या २५% पेक्षा जास्त आहे.


भारतात ज्या पद्धतीने मासिक पाळीकडे  दुर्लक्ष केले जाते, ते इथून पुढच्या काळातही चालू राहिले तर ह्या 25% लोकसंख्येचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. असे का? कारण सध्या समाजात कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या गतीने पुढील काही दशकात त्या संख्येत लक्षणीय वाढ होणार हे निश्चित. आत्ता ज्या मुली किशोरवयीन आहेत ‘त्या’ त्यांच्या शिक्षण आणि कामासाठी घराबाहेर पडणार. मोठ्या प्रमाणावर मुली, महिला साधारण 8 ते 10 तास घराबाहेर राहणार असतील तर पाळीच्या काळात लागणारे WASH infrastructure ( कार्यान्वित असलेली स्वच्छतागृहे आणि पाणी, स्वच्छतेसाठी लागणार्‍या सर्व मुलभूत सुविधा) गरजेच्या प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा मूत्रमार्ग संसर्ग, जननमार्ग संसर्ग ते मूत्रपिंडाशी संबंधित अनेक प्रकारच्या व्याधी मुली व महिलांना होतच राहणार.




याबरोबरच मासिक पाळीविषयी असलेली अनभिज्ञता, अज्ञान हे देखील अनेक वाईट घटनांना कारणीभूत ठरत राहणार. उदाहरण द्यायचे तर कोल्हापूर जिल्ह्यातील जुनी घटना – मासिक पाळी सुरू झाल्यावर त्या मुलीला तो एक असाध्य रोग वाटला आणि त्या अज्ञानातून मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली वा नुकतीच ठाण्यात घडलेली, मासिक पाळी सुरू झाल्याचे सांगता न आल्यामुळे, भावाच्या मारहाणीमुळे मुलीला जीव गमवावा लागल्याची घटना.ह्या  दोन्ही घटना मासिक पाळी या विषयाची व्याप्ती किती खोल आणि गंभीर परिणाम करणारी हेच अधोरेखित करतात.

 मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने न बोलल्याने, शास्त्रोक्त माहिती नसल्याने, अज्ञानाने अनेक समस्या निर्माण होतात जसे -
१. मुलींना पहिली पाळी आल्यावर, रक्तस्त्रावाची भीती मनात असल्याने, आपल्याला गंभीर रोग झाला आहे अशी गैरसमजूत होऊन पाळीबद्दल भीती, अढी, नकारात्मक भावना निर्माण होते जी आयुष्यभर त्रास देत राहते
२. पाळीच्या काळात स्वतःची स्वच्छता कशी ठेवावी याचे मूलभूत ज्ञान नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अनेक पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या, दुर्गम भागांमध्ये आजही पाळीदरम्यान अंघोळ करू दिली जात नाही, ज्यामुळे समस्यात भरच पडते.
३. अनेक जण मासिक पाळी जनजागृतीच्या नावाखाली केवळ Sanitary Pad वाटपाचा कार्यक्रम करतात. जे निश्चितपणे वाईट नाही, पण त्यासोबतच केवळ Sanitary Pad वापरणेच उत्तम असेही मुलींच्या मनावर बिंबवले जाते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता हे केल्याने अनेकदा कुटुंबातून याला विरोध होतो. शिवाय मुलींना इतर प्रकारच्या पर्यावरणपूरक शोषकांची माहिती दिली जात नाही ते वेगळेच..
४. मासिक पाळीदरम्यान योग्य वेळी शोषके बदलण्यासाठी स्वच्छ, पाणी असलेले, सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यात जंतुसंसर्ग ते मूत्रपिंड विकार असा बराच मोठा canvas लक्षात घ्यावा लागेल.
५. मासिक पाळीबद्दल समाजात, घरी कायम कुजबुजले जाते. त्यामुळे पाळीदरम्यान आलेल्या आव्हानांना सामोरे जाताना मुलींना सतत दडपण जाणवते. या काळात योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन न मिळाल्याने, त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
६. घराबाहेर पडल्यावर, शाळेत, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, मासिक पाळीत बदललेल्या शोषकांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने, वापरलेली शोषके उघड्यावर टाकली जातात. त्यामुळे, हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण आणि पाणी प्रदूषण तर होतेच त्याबरोबर उघड्यावर चरणार्‍या मुक्या प्राण्यांच्या आरोग्याला देखील ते अपायकारक ठरू शकते.
७. मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती नसल्याने मुली, महिला अनेक अंधश्रद्धांना बळी पडतात. शिवाय जाचक (खरं म्हणजे निरर्थक) रूढी परंपरांना त्या छेद देऊ शकत नाहीत.
८. मासिक पाळीचे कारण देऊन त्यांना दुय्यम सामाजिक स्थान दिले जाते.
या सगळ्या समस्यांचे संवेदनशीलतेने निराकरण करण्यासाठी मासिक पाळीविषयी समाजातील सगळ्याच घटकांमध्ये व्यापक आणि सर्वांगीण जागृती करणे आवश्यक आहे.

याबाबत महाराष्ट्रात मागच्या ४ दशकांपासून व्यापक कार्यक्रम केवळ शाळकरी किंवा किशोरवयीन मुलींना केंद्रस्थानी ठेवून, त्या अनुषंगाने आराखडा बनवून राबवले गेले. ज्याचा फायदा त्या पिढीतील मुलींना नक्कीच झाला पण जी जनजागृती समाजात आवश्यक होती, ज्याचा परिणाम एकंदर मासिक पाळीबद्दलच्या सामाजिक विचार सरणीत, वर्तणूक बदलात अपेक्षित होता, तो झालाच नाही.

अगदी ज्या शाळांमध्ये मासिक पाळीची सत्रे घेतली जात, तिथेही मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याचेच आढळून आले. आजही अनेक शाळांमध्ये, मासिक पाळीदरम्यान लागणार्‍या स्वच्छता सुविधा उपलब्ध असल्याची आकडेवारी केवळ कागदोपत्रीच मिळते, पण प्रत्यक्षात तसे नसते. हे असेच चालू राहणे फार धोकादायक आहे.
हे चित्र बदलण्यासाठी सर्वसमावेशक, सखोल आणि शास्त्रीय दृष्ट्या योग्य अशी जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.
सद्यपरिस्थितीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर जी मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शिका उपलब्ध आहे, त्यामध्ये दिल्याप्रमाणे मुली आणि महिलांसाठी काम करणार्‍या सगळ्या विभागांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यास सुचविले आहे. शिक्षण विभाग यात अग्रेसर असावा असे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाकडे अपुरे मनुष्य बळ, तुटपुंजा निधी आणि इतर अनेक विभागांची कामे (जसे सर्वेक्षण, मतदान, जनगणना इत्यादी), यामुळे अवस्था दयनीय असते. तरीही काही संवेदनशील शिक्षिका आणि शिक्षक मासिक पाळी व्यवस्थापनविषयी जनजागृतीचे भरीव कार्य करत आहेत हे नक्कीच उल्लेखनीय आहे. पण इतर अनेक विभाग, मुली व महिलांसाठी पुरेसा निधी असूनही, पुढाकार घेऊन सहभागी होताना दिसत नाहीत. हे सार्वत्रिक चित्र झाल्याने हा “मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम” अनाथ लेकराप्रमाणे कुणाचीच प्राथमिकता राहात नाही आणि ओघानेच तो परिणामकारकरित्या राबविला जात नाही.

जोपर्यंत “मासिक पाळी व्यवस्थापन” कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून किंवा एखाद्या विभागात स्वतंत्र शाखा निर्माण करून, अंमलबजावणीचे अधिकार दिले जाणार नाहीत 

तोपर्यंत मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम, छोट्या छोट्या पातळ्यांवर, व्यापक स्वरूप न घेता, फारसा परिणाम न करता राबविला जाईल.


आजही, अनेक खाजगी/ सामाजिक संस्था, मिळालेल्या आर्थिक सहाय्याद्वारे मर्यादित काळापुरता, ठरलेल्या क्षेत्रातच असे कार्यक्रम राबवताना दिसतात. त्यातही सातत्य नसल्याने, अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. शिवाय अनेकदा निधी देणार्‍या दाता संस्थाचा अजेंडाच (परिणामांचा कसलाही विचार न करता) पुढे नेताना दिसतात. हे ही धोकादायकच आहे !

मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमातील या त्रुटी टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित जबाबदारी घेऊन, योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे करताना खालील काही मुद्दे नक्कीच विचारात घ्यावे लागतील.

1. सर्व स्तरावर, समाजातील सर्व घटकांना (केवळ मुली आणि स्त्रियांना नाही) मासिक पाळी प्रक्रिया आणि त्यासंबंधित आव्हाने, दुर्लक्ष केल्यास होणारे परिणाम याविषयी जागृत करणे.

2. धोरणकर्ते, त्याचे अंमलबजावणी करणारे संबंधित विभाग आणि त्यावर देखरेख करणारे अधिकारी, या सर्वांसाठी विशेष अभिमुखता (Orientation) कार्यक्रम आखणे आणि राबवणे

3. सर्व शासकीय/ निम शासकीय तसेच खाजगी संस्था स्तरावर (ग्राम पंचायत भवन, बाजार ठिकाणे, बस स्थानके ते सर्व शासकीय/ निम शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी) ठिकाणी महिलांसाठी उत्तम WASH infrastructure (स्वच्छतेसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा – पाणी असलेले, सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृह) निर्माण करून ते कार्यान्वित राहील याची खबरदारी घेणे

4. जिथे कुठे या पायाभूत सुविधा उपलब्ध नसतील त्याबाबत तक्रार करण्यासाठी एक स्वतंत्र टोलफ्री क्रमांक, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर मुली, महिलांसाठी निर्माण करावा. त्या नंबरवर स्वच्छतागृहासंबंधी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी. याचेही वारंवार पुनरावलोकन (consumer feedback द्वारे) केले जावे.
या पद्धतीने आपण आपल्या राज्यात, देशात मासिक पाळीविषयी आपली कटिबद्धता निश्चितच दाखवू शकतो.
#MHDay2023  #WeAreCommitted.
#EndPeriodStigma
#EndPeriodPoverty
#PeriodEducationForAll
#PeriodFriendlyToiletsForAll 


अपर्णा कुलकर्णी – गोवंडे

लेखिका सध्या तुळजापूर (TATA Institute of Social Sciences) येथे Post Graduate Diploma in Water Sanitation and Hygiene या अभ्यासक्रमाकरिता Program Officer म्हणून कार्यरत आहे. त्यापूर्वी मार्च २०२२ पर्यन्त युनिसेफसोबत पाणी, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन याकरिता सल्लागार म्हणून काम केले आहे.तसेच महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश आणि दिल्ली इत्यादी ठिकाणी १०० हून अधिक, प्रत्यक्ष / ऑनलाइन कार्यशाळांच्या माध्यमातून १,००,००० हून अधिक लोकांपर्यंत “मासिक पाळी व्यवस्थापन” हा विषय प्रभावीपणे पोचवला आहे.
















Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form