१ अशी माझी पाळी
मी 13 वर्षांची असताना माझे पिरीयडस् सुरू झाले आणि 15 वर्षांची असताना पी. एम. एस. म्हणजे प्री मेंस्ट्रूअल सींड्रोमचा त्रास जाणवायला लागला. तेव्हा पासून मला दर महिन्याला प्रश्न पडायचा की, दर महिन्याला हे भोग कशासाठी?? ते पण वयाच्या पन्नाशी पर्यंत!आपण आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा मुलं जन्माला घालणार. मग दर महिन्याला ही चीडचीड, पाठदुखी, पोटदुखी, नॉशीआ,का सहन करायचं? समजा हे सगळं वर्षातून एकदा झालं असतं; तरी चालवून घेतलं असतं. अर्थात, हे आपल्या हातात नाहीच आहे! मग स्वतःच्या समाधानासाठी मी काही गमतीदार कल्पना करायचे. उदा. शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम यूटेरस बनवलं पाहिजे. जे जेंडर न्यूट्रल असेल. ज्या व्यक्तीला मूल जन्माला घालायची इच्छा असेल, तिने हे आय यू डी सारखं शरीरात घालून घ्यायचं, सी सेक्शनने जन्म द्यायचा आणि मग ते डिव्हाईस काढून टाकायचं! हाय काय अन् नाय काय !
अर्थात आता असे विचार मनात येत नाहीत. आपल्याला दर महिन्याला पिरीयडस येणार, हे मी नाखुशीने का होईना, पण मान्य केलेलं आहे. कारण पिरीयडस आले नाहीत, तर त्याचे सुद्धा वेगळे त्रास असू शकतात! आता मला एकच आशा आहे, की कधीतरी मी एवढी चांगली तब्येत कमवेन की पिरीयडस आले कधी, गेले कधी, कळणार पण नाही!
मुक्ता खरे
२ . सेक्सची ,गोड खाण्याची उत्कट इच्छा आणि पाळी
चिडचिड, मूड स्विंग्ज, पोट, कंबर, पाय दुखणं, अशक्तपणा, थकवा, जेवण पुरेसं न जाणं, मळमळणं, डोकं दुखणं, काहीच करावंसं न वाटणं, नुसतं झोपून रहावंसं वाटणं तरी झोप न येणं यातलं काही तरी किंवा अनेक किंवा सगळ्याच गोष्टी प्रत्येक बाई पाळी आल्यावर अनुभवते. या सगळ्याची हल्ली उघड चर्चा होऊ लागली आहे, ही एक चांगली गोष्ट. पण याच काळात शरीरात आणखी उलथापालथ होत असते त्याची आपण उघड चर्चा करत नाही. पाळीच्या काळात सेक्स करण्याची खूप इच्छा होते. शरीरातली हार्मोन्सची हालचाल अत्युच्च वेगाने होत असते, योनीकडचा भाग नैसर्गिकरित्या ओलसर lubricated असतो. त्यामुळे या काळात सेक्स करण्याची अनिवार इच्छा होणं जीवशास्त्रीयदृष्ट्या नैसर्गिक गोष्ट आहे. अर्थात तो करावा की नाही, हे त्या त्या जोडप्याच्या कम्फर्टवर, त्या पुरुषाला असलेल्या/नसलेल्या मेन्स्ट्रुफोबियावर आणि तज्ञ डॉक्टर याबद्दल काय सल्ला देतात, यावर अवलंबून आहे. एक मात्र आहे की पुरुष पाळीच्या रक्ताला - अगदी चौथ्या दिवशीही घाबरतात. जेव्हा रक्तस्राव बराच कमी झालेला असतो, तेव्हाही ते सेक्ससाठी फारसे उत्सुक नसतात बेडशीटला जास्त रक्त लागलं तर ते पाहून त्यांना भीती वाटते. याचंही काही तरी करायला पाहिजे!
'हो! मला पाळीच्या काळात सेक्स करण्याची प्रचंड इच्छा होते.' -
हे मला आवर्जून सांगायचं आहे सगळ्यांना
आणि माझ्या जवळच्या पुरुषालाही
यावर माझ्या मैत्रिणींना काय वाटतं - यावर मी त्यांच्याशी बोलले तर बहुतेकींना असंच वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आमच्या दोन व्हाट्सअप ग्रुपात 'पाळीच्या काळात सेक्स करण्याची इच्छा होते/नाही यावर ओपिनियन पोलही घेतला. त्यात ज्या सहभागी झाल्या- त्या प्रत्येकीचं उत्तर 'हो' असंच आलं तरी या मुद्द्यावर आपण लोक जास्तीत जास्त उघडपणे, मोकळेपणानं बोलत नाही याची कमाल वाटते.
या टिपणातून मला माझ्या आवडत्या पुरुषालाही सांगायचंय की - मला तुझ्याबद्दल एरवी जितकं आकर्षण, ओढ वाटते, ती या काळात आणखी म्हणजे खूsss sप जास्त वाटते. मला वाटतं तुझ्या पोटात शिरून, तुला बिलगून झोपून जावं. तू आसपास असावास, तुझा दिल को छुनेवाला आवाज कानी पडावा. तू केसांतून हात फिरवावास, पाय दाबून द्यावेस. भरपूर लाड करावेस. तू अयंगार बेकरीतून भरपूर रवा केक आणून माझ्या उशाशी ठेवून द्यावास.
काल माझ्या स्वप्नात रवाकेक आला आणि मला खूप रडू आलं. सध्या नेमकी माझी पाळी सुरू आहे. चौथा दिवस आणि मी काहीही गोड खाल्लं नाही, म्हणजे मी survive कसं केलं, याचंच मला आश्चर्य वाटतं. एरवीच मला गोड खूप आवडतं आणि पाळी सुरू असताना गोड खायचं प्रचंड क्रेविंग होतं. सेक्स करण्याच्या अनिवार क्रेविंगइतकंच! रवा केक, हनी बेल केक, ब्रिटानिया केक...आठवून प्राण कंठाशी येतो. इतकं जीवावर येतं हे गोड खानं कंट्रोल करणं. या महिन्यात काही तपासण्या केल्या आणि त्यात बॉर्डरलाईन शुगर असल्याचं कळल्यानं खाण्या-'पिण्या'वर निर्बन्ध!
अशी ही गोड खाण्याशिवायची पहिली पाळी सुसह्य झाली - ती मित्राच्या एका वाक्यानं. "हो...ठिके ना. आता आपण आधी वाढलेली शुगर कमी करूया ना...मग काही दिवसांनी तुला गोड खाता येईल." तुम्हाला आहे का असा गोड मित्र?
#menstrualhygiene#menstrualhygiene#MHDay2023