मी आणि माझी पाळी

मी रिक्षेने घरी निघाले होते पण रिक्षेत जागा असून बसले मात्र नव्हते. रिक्षावाले काका सतत म्हणत होते की, 'तू बसून घे' - पण मला जाम भीती वाटत होती,की कुठे डाग पडला तर?
मी नववीत असतांना मला पहिल्यांदा पाळी आली. त्यावेळी मी शाळेत होते. पाळी विषयी मला शाळेतून कळले होते. आणि माझ्या वडिलांनी माझ्यासाठी आधीच पॅड आणून ठेवलेले होते. मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा- 'हे काय झालं ?' - असं मला काही वाटलं नाही. कारण एकतर शाळेत खूप डिटेल माहीती,चित्रे दाखवली होती. पॅड कसे वापरायचे ते ही त्यात दाखवले होते. पोट दुखले तर कोणती गोळी घ्यायची,पडून राहावे वाटले तरी तो आजार नाही हे ही समजावले होते. त्यामुळे फार काही गहजब झाला नाही. 
मी अगदी लहान असतांना कधीतरी माझी आई ,काकू बाजूला बसून काम करतांना मी पहिल्या आहेत.पण तो प्रकार कसा काय बंद झाला हे मला आठवत नाही. पण त्यानंतर कोणी ‘बाजूला' बसलेलं पाहिले नाही. दुसरे असे की कोणत्याही धार्मिक प्रसंगी पाळी आली तर काय हा प्रश्न मला पडला नाही कारण घरात त्याबद्दल फार काही विशेष म्हणून बघितलं गेलं नाही.
नंतरही कधी मला पाळीची अडचण वाटली नाही.काही दिवस माझ्या पोटात दुखायचे, पायात गोळे यायचे. पण नंतर मी काही व्यायाम प्रकार करू लागले, मग हळूहळू  मला त्याची सवय झाली.  
दुसऱ्या वेळी पाळी आली तेव्हा वडिलांनी मला मेडिकल मध्ये नेले आणि सांगितले की त्यांच्याकडे पॅड माग. यामुळे पॅड खरेदी करण्याचा जो संकोच वाटतो तो हळूहळू कमी झाला.तसंच ते लपवून आणण्याची गरज वाटेनाशी झाली.

घरातील पुरुषांनी पुढाकार घेतला तर,

स्त्रियांसाठी  गोष्टी खूप सोप्या होतात असे मला वाटते.

लग्न झाल्यावर मला पाळी आली तेव्हा माझ्या चुलत सासुबाईंनी माझ्या नवऱ्याला बंबातून गरम पाणी काढून द्यायला सांगितलं. तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. – ‘या फालतू गोष्टी मी करणार नाही आणि अश्विनीला करू देणार नाही.’
खरेतर सासरी सुद्धा कोणी असे फार काही पाळत होते असे नाही.पण त्यावेळी त्यांना अचानक  हे करावेसे का  वाटले समजले नाही! मुळात पाळी म्हणजे काही चुकीचे आहे, असे माझ्या घरातल्या वातावरणामुळे मनात कधीच आले नाही. त्यामुळे विशेष करून धार्मिक स्थळांना भेटी देतांना मला अपराधीही वाटले नाही. मला वाटते घरातील पुरुषांनी पाळीच्या संदर्भात स्त्रियांना समजून घेतले तर गोष्टी खूप सोप्या होतील.

#menstrualhygiene#menstrualhygiene#MHDay2023

अश्विनी बर्वे

कथालेखिका आणि ब्लॉगर 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form